Wednesday, September 17, 2008

शब्दांमधला कागद

विद्यापीठात खिडकीजवळ फी भरण्यासाठी मुलांची रांग लागलेली. रांगेत मीही उभा. माझी भिरभिरती नजर भवतालचे प्रसन्न चेहऱ्यावरचे भाव टिपण्यात मग्न. काही चेहरे काळजीने भरलेले, काहीसे बेफिकीर, काही नुसतेच टाईमपाससाठी रेंगाळलेले, काही स्वतःच्याच मस्तीत. वातावरण भारून टाकणारे. तेथून एखादी गेली तरी सुगंध पेरून जाणारी. काही शोधक-चिकित्सक; तर काही अनामिक भीतीने व्यापलेले. मौज होती एकापाठोपाठ एक चेहरे वाचताना आणि मुखवटेही. चेहऱ्यांनी माझं वाट पाहणं काहीसं सुसह्य केलं. एखादी छबी रेंगाळतानाचा दुसरी तिची जागा घ्यायची अगदी अलगद. बाहेर पावसाची सर आली आणि अनेक पावलांनी आमच्या आजू-बाजूचा जागा आपलीशी केली. काही मिनिटं गलका झाला. चेहऱ्यांची दुनिया आणखी संपन्न झाली. रांग सरकू लागली. नजर एका ठिकाणी स्थिरावली. बाजूच्या उघड्या दरवाजातून तिने आत डोकावले. "ते दोघे' बहुधा गप्पात रंगले असावेत. एक खुर्चीत बसलेला, दुसरा उभाच. गलक्‍याने कानावर काही येत नव्हते पण ; पण नजर वारंवार तेथेच रेंगाळली. काय बोलत असावेत बरं?खुर्चीतल्याला चष्मा होता. शर्ट व्यवस्थित खोचलेला. समोरचा उभाही अगदी स्वच्छ कपड्यता, हातात वही घेतलेला. दोघेही विद्यार्थीच असावेत. त्यांचे आजूबाजूला लक्षच नव्हते. मध्येच उभा राहिलेला बसलेल्याच्या जवळ येई. दोघेही एकमेकांकडे टक लावून बोलत, चेहरे उजळत, खळखळत आणि टाळी देत. झकास चालेलेलं. उभा असलेला सटकला. दोघांत बिनसले असावे. बसलेल्यावर तो काहीसा चिडलेला दिसला. मग बसलेल्याने त्याची समजूत काढली. पुन्हा हसले. काय बोलत असावेत बरं? मागच्या मुलाचा धक्का बसला तंद्री भंगली. रांग पुढे सरकली. ते मला दिसेनासे झाले. रांगेतले माझे काम उरकले आणि मग पुन्हा त्यांची आठवण झाली. पावले आपसूकच मघाच्या खोलीकडे वळली. तेथे आता तो एकटाच खुर्चीत कसल्याशा विचारात. मी त्याच्यापुढे गेलो, हात पुढे केला "हाय!' त्याने हातात हात घेतला व नुसताच हसला. मी पुन्हा म्हणालो, "हाय !' तो बोलला काहीच नाही. त्याने माझा हात हळूवार दाबला. सात काळजाच्या आतलं माझं घरं थोडं हललं. तरीही मी पुन्हा विचारलं, "नाव काय, तुझं?'
त्याच्या चेहऱ्यावर मोठे प्रश्‍नचिन्ह------------------------------------------------------------------------आवाज वाढवायला नको होता असं आता वाटतंय पण काय करायचं किती सहज आणि स्वस्त शब्द उच्चारतो मी. "नाव काय तुझं!' त्याने हातवारे करुनच सांगायला सुरवात केली आणि मला अपराध्यासारखं वाटू लागलं.त्याने माझा हात पुन्हा हातात घेतला आणि खूणेनी बोलता व ऐकताही येत नसल्याचे सांगितले. मी खिशातून कागद काढला. त्यावर "तुझं नाव काय?' असं लिहिलं आणि त्याच्या समोर धरलं.त्यावर त्यानं लिहिलं "संतोष'. पाहता पाहता कागद बोलू लागले. ओळखीचा पूल बनत गेला आणि रस्ता छान वळणे घेत-घेत पुन्हा भेटूच्या थांब्यावर थांबला. विद्यापीठातच "संतोष'चा मित्रासही काम करीत असल्याचे समजले. शहरात होस्टेलवर राहून दोघे घरी मदत करत होते. ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------दोन दिवसांपूर्वी छोट्या मैत्रिणीसोबत रेल्वे स्टेशनावर गेलो होतो. आमच्यात छान गप्पा रंगलेल्या. तिचे प्रश्‍न आणि माझी उत्तरांची जुगलबंदी चाललेली. एवढ्यात पाठीवर गाढ मैत्रीची थाप पडली. मागे वळून पाहिले तर "संतोष'. पुढचा कितीतरी वेळ आम्ही दोघ कागदावर काय लिहितोय ते ती पाहतच राहिली.....