
आश्विन महिन्याला सोबतीला घेऊन धुक्यासोबत हातात हात घालून थंडीचे आगमन होतं आणि पांढुरक्या धुक्याची दुलई साऱ्या सृष्टीवर अलगद पांघरली जाते. सारे चराचर दबबिंदूंचे कण टिपून घेण्यासाठी उतावीळ असते. पाऊस पिलेला निसर्गही थंडीचे अमृत पिण्यासाठी आसुसलेला असतो. खळ्यावरून घराच्या अंगणात आलेल्या समृद्धीच्या सोन्यामुळे बळिराजाही मनोमन आनंदलेला असतो. नोकरदारांच्या हातात खुळखुळणारा ज्यादाचा पैसा सुखाची सोबत करतो. मनामनांचे गाभारे आनंदाच्या दीपोत्सवाने उजळून निघालेले असतात. नव्या नवलाईमुळे घराघरांतून आनंदाचे दीप प्रकाशमान होऊन सुखाच्या रेशीमलडी उलगडतात. हे रेशीम आणखी चमकदार बनविण्यासाठी दिवाळी येते. अशा वेळी पहाटे गाणं कानावर पडतं ...
उठी श्रीरामा पहाट झाली...
पूर्व दिशा उजळली...
उभी घेऊनी कलश दुधाचा
कौसल्या माऊली!
आणि दिवाळीची जाणीव भोवती रुंजी घालू लागते. भल्या पहाटे काकणभरले हात अंगणावरून फिरू लागतात आणि पाहता-पाहता सारे अंगण सजीव होतं, आपल्याशी बोलू लागतं. सारवलेल्या, स्वच्छ अंगणात किणकिण नाद येऊ लागतो आणि एक-एक नक्षी उमटून येऊ लागते. बोटांच्या चिमटीतून लोभस, गहिरे, मनाचा ठाव घेणारे, रंगबिरंगी रंग एकापाठोपाठ एक धरतीशी नातं जोडू लागतात आणि नक्षीची सुरेल मैफल आकार घेऊ लागते. त्या किणकिणणाऱ्या हातांची नजाकतभरी हालचाल एखाद्या चतुरस्त्र चित्रकाराची आठवण करून देतात. (तशी रांगोळी रेखणारी "ती' यजमानांच्या आयुष्यात रंग भरणारी चित्रकारच असते) रांगोळीची शुभचिन्हे गंधभरल्या अंगणावर झर-झर उतरतात आणि सारा माहौल बदलून जातो. कधी हा माहौल ठिपक्यांतून बोलतो, तर कधी त्यातील नक्षी तुमच्यासोबत संवादाचा पूल बांधते. कित्येक ठिकाणी फुलांच्या पाकळ्याही सोबतीला येऊन रांगोळीची श्रीमंती अधिक वाढवितात. दिवाळीसाठी घरोघरी येणारी लक्ष्मी अंगणातून प्रसन्न होऊन यावी आणि आपल्या घरीच तिने राहावे, या साठीची ही तयारी.
गारगोटीच्या चुऱ्यापासून बनविलेली पांढरीशुभ्र रांगोळी आणि रंगांची सोबत यांमुळे रांगोळी रेखलेले अंगण, येणाऱ्या प्रत्येकाशी आपसुक संवाद साधते. एरव्ही देव्हारा, तुळशीवृंदावन, जेवणाच्या ताटाभोवती रेखली जाणारी रांगोळी ऐन दिवाळीत मात्र साऱ्या अंगणाची आणि घराची शोभा अगदी काठोकाठ वाढवतं. रंगांच्या या ओळी पवित्रतेचे प्रतीक मानल्या जातात आणि म्हणूनच त्या घराघरांत रेखल्या जातात. सारं अंगण सजिव करून टाकणारी ही रांगोळी असते फक्त गारगोटीचा चुरा पण ती रेखतानाची भावना चैतन्य निर्माण करते. ही रांगोळी बंगालमध्येअल्पना म्हणून, बिहारमध्ये ती अरिपना म्हणून, राजस्थानात मांडना म्हणून, तर दक्षिण भारतात ती कोलाम म्हणून भेटते. केरळात ती पाकल्लम म्हणून समोर येते. महाराष्ट्राशिवाय इतरत्र रांगोळीसाठी तांदळाचे पीठ, फुले, फुलांच्या पाकळ्या, विटकरीचे तुकडे, नैसर्गिक रंग यांचाही उपयोग करतात; तर दक्षिणेत फुलांचा उपयोगाने रांगोळ्यांच्या पायघड्या, गालीचे अंथरले जातात; मात्र गारगोटीचा चुरा आणि रंग हे मात्र कॉमनच.
चिमटीतून सारं भावविश्व साकारण्याची किमया साधणारी रांगोळी मनांचा ठाव घेते आणि समृद्धीचा आनंदोत्सव साजरा करण्याचा पवित्र भाव साऱ्या अंगणभर मिरवते, सारा भवताला आनंदी, पवित्र बनवून स्वागतिका बनते.