Thursday, June 23, 2011

'बाप' माणूस...

त्यांनी टोपी काढली, घाम पुसला. पायऱ्या चढून आल्यामुळे लागलेली धाप कमी होण्याची वाट पहात शांतपणे खुर्चीत बसून राहिले. वयाने बहुधा पासष्टी ओलांडली असावी; पण अगदी अपटुडेट होते.
"वयाच्या मानाने झेपत नाही. पायऱ्या चढल्या की धाप लागते'' स्वगत बोलावे तसे ते टेलीफोन ऑपेरटरशी बोलले. मग शांतपणे उठले. हळूहळू जाहिरात विभागात गेले.
जाहिरात घेणाऱ्याकडे पाहून ओळखीचं हसले. त्यानेही फोनवर बोलतच हसून दाद दिल्याने त्यांना जरा बरं वाटलं. त्याने आजोबांना खुर्चीकडे हात करून बसण्याची खूण केली. आजोबांनी खुर्चीवर बसून शरीर काहीसं सैलावलं आणि त्याच्या फोन संपण्याची वाट पाहू लागले.
फोन संपवून तो म्हणाला, ""बोला आजोबा. किती उन्हात आलात? काल रात्रीच नाही का यायचं? ऊन तरी लागलं नसतं''
"ठरवलं होतं यायचं, पण जमलंच नाही. आज येण्याशिवाय पर्याय नव्हता.''
मला त्यांचा संवाद ऐकू आला आणि माझं त्यांच्याकडे लक्ष गेलं. मी पाहतोय हे पाहिल्यावर ते माझ्याकडे पाहून ओळखीचं हसले. त्यांच्या नजरेत मला हरवलेपण जाणवलं. माझ्या चेहऱ्यावरील स्मित पाहून बहुधा त्यांनाही बरं वाटलं.
दोघांत काहीतरी बोलणं झालं. त्यांनी खिशातून कसलासा लिहिलेला कागद काढून त्याच्याकडे दिला. त्यानं खात्री केली आणि पैसै घेतले.
"बराय निघतो मी, पुढील आठवड्यात येणार आहेच''
"ओके, आजोबा ! बाकी कसं काय चाललंय?''
"खरं सांगू मरण येत नाही म्हणून म्हातारपणाचं ओझं जेवढे दिवस वागवता येईल तेवढे वागवतो आहे; मग जगतोच आहे, तर जास्तीत जास्त समाधानाने कसं जगता येईल ते पाहतो. रोज फिरायला जाऊन प्रकृती उत्तम राखण्यासाठी प्रयत्न करतो. दिवसभरात सोसायटीमधील लोकांची जमतील तेवढी कामं करतो. सायंकाळी लहान मुलांना घेऊन गोष्टी सांगत बालपण शोधतो. रात्री मंदिरात भजन-कीर्तनाला जातो. जेवढं म्हणून आनंदी राहता येईल तेवढा आनंदी राहतो. जगण्याची शिक्षा मिळालीच आहे तर ती आनंदानं कशी भोगता येईल हे पाहतो. बराय चलतो. फार वेळ घेतला तुमचा, येतो.'' असं म्हणून पिशवी सावरत ते दरवाजाबाहेर पडले.
त्यांचं बोलणं ऐकून मी त्याला विचारलंच कोण होते हे आजोबा आणि कशासाठी आले होते?
त्यानं जे सांगितलं ते ऐकून मी सुन्न झालो....
माझ्यासमोर आजोबांनी दिलेला फोटो धरत तो म्हणाला, "" हा फोटो पाहिलांत, हा त्यांच्या 20 वर्षांच्या मुलाचा आहे. त्याच्या श्रद्धांजलीची जाहिरात द्यायला आले होते ते. दरवर्षी येतात न चुकता''
"कशानं गेला तो?''
"इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. कॉलेजमध्ये गॅदरींग होतं. मित्रांसोबत राबून त्यानं त्याची तयारी केली. गॅदरींगच्या आदल्या दिवशी डिसेंट्री लागल्याचं निमित्त झालं आणि त्यातून तो उठलाच नाही. हाता-तोंडाशी आलेल्या लेकाचं निष्प्राण कलेवर थकलेल्या खांद्यावरून आजोबांना वहावं लागलं.''
"बाप रे, केवढा मोठा आघात!'' माझा स्वर जड झाला.
"सर ते मघाशी म्हणाले नं पुढील आठवड्यात येणार आहे, का माहित आहे?''
"का?''
"बायकोला आदरांजली वाहण्याची जाहिरात द्यायला''
"काय...?''
"हाता-तोंडाशी आलेला मुलगा गेल्याचा धक्का ती माऊली सहन नाही करू शकली. तिने अंथरूण धरलं आणि त्यातून ती उठलीच नाही. त्या दिवसापासून गेली काही वर्षे आजोबा आपल्या एका मुलीसह राहत आहेत. इतर दोन मुलींची चांगल्या घरात लग्ने झाली आहेत. घरी आहे त्या मुलीला फिट्‌सचा विकार आहे, त्यामुळे ती त्यांच्याबरोबरच राहते. दोघंच एकमेकांचे आधार.''
"काय सालं नशीब!' केवढे हे आघात आणि ते सर्व सहन करणारा पहाडासारखा बाप माणूस. अडचणींचे एवढे अडथळे येऊनही मोडून न पडता जगण्याशी दोन हात करून जगण्यावर विजय मिळविण्याचा प्रयत्न करणारा बाप माणूस... त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना माझ्या डबडबलेल्या डोळ्यांतून दोन थेंब ओघळलेच.

Sunday, June 19, 2011

बापपण अनुभवताना...

कानावर तुझा रडण्याचा पहिलावहिला ट्याहां ट्याहांचा स्वर पडला अन्‌ आनंदानं छाती गच्च भरून आली.
तुझा जन्मसोहळा सुखरूप पार पडावा म्हणून हातांची बोटे होती त्या वेळी एकवटलेली परमेश्‍वरचरणी.
दुपट्यात गुंडाळलेली मऊसुत सावरीपरी तू आलीस सामोरी खरी; मात्र तेव्हा पापण्यांवर थबकल्या थेंबांतून तू भेटलीस मला धूसर धूसर.
मला सुचलेच नाही तुला अनुभवण्याचे, ना हृदयाशी कवटाळण्याचे.
मग आलं भान जरा, इवल्याशा तुला मी धरलं
हृदयाला आणि बापपणाचा अर्थ पोचला पार मनाच्या तळाला.
तुझ्या लुकलुकत्या डोळ्यांनी, बालमुठीत एकवटलेल्या असंख्य स्वप्नांनी घातली मला साद आणि आनंदाने भरून वाहत राहिला माझा श्‍वास अन्‌ श्‍वास.

------------------------
आळसावलेलाच होता तो माझा दिवस जरा.
भोवताली तुझं रांगत-रांगत खेळणं, मध्येच येऊन पुस्तक ओढणं, मस्ती करणं आणि सुरू होतं खळाळून हास्यफुलं उधळणं.
खेळता खेळता एकवटलंस बळ आणि राहिलीस क्षणभरच पहिल्यांदाच उभी स्वतःच्या पायावर.
पाहिलंस माझ्याकडे तेव्हा डोळ्यांत तुझ्या उसळला होता आत्मविश्‍वासभरला सागर.
हसलीस छानसं गोड आणि टाकलंस पहिलं अडखळतं पाऊल.
गेला तोल तुझा, सावरलं मी तुला अलगद हातांवर.
तुझ्या चेहऱ्यावर आनंद उमटला आणि माझ्या विस्फारल्या बाहुल्यांनी साठविला तो क्षण डोळाभर.

------------------------
त्या दिवशी पोचलो पाऊसधारांना सोबत घेतच शाळेवर.
मस्त गुलाबी ड्रेस खुलला होता तुझ्या नाजुकशा अंगावर.
गोड-गोड बोलत, समजावून सांगत, कॅडबरीचं प्रॉमिस करत सोडलं तुला वर्गाच्या दारात.
बाईंनी तुला घेतलं आत आणि लावून घेतलं दार.
बंद होणाऱ्या दारांच्या फटीतून दिसली मला तुझी भरून आलेली नजर आणि जाणवली त्यामध्ये दूर जातानाची असहायता, माझ्यावर आलेला मोठ्ठा राग आणि व्यक्त न करता येणारी घुसमट. बोलत होती नजर, "बाबा, तू वाईट्ट आहेस, सोडून मला नको जाऊस...' आईशपथ सांगतो त्या नजरेनं कालवला जीव. शहारा उमटला देहभर.

------------------------
कॅलेंडरवरील तारखा राहिल्या फडफडत, अंगणातला पारिजातकही फुलत राहिला काठोकाठ.
उगवणाऱ्या प्रत्येक सोनेरी दिवसाचं बोट धरून तू आनंदाच्या किरणांनी शिंपलेस आपलं अंगण.
समाधानाचे क्षण गुंफत राहिलीस एक-एक आणि घट्ट होत गेले आपसुक सारे भावबंध.
तुझे यशाचे क्षण घेऊन आले आनंदसरींची बरसात आणि चिंब न्हात राहिलं आपलं घर.
कधी पुरवून घेतलास हट्ट, कधी रुसलीस, कधी लटक्‍यानेच रागावलीस, भांडलीसही, मोठी होऊनही "गट्टी फू' करताना तू माझ्यासाठी मात्र सानुलीच राहिलीस.
तुझ्या कर्तृत्वाने आकाश आमचे उजळले, यशाचे ते सोनभरले क्षण भरून ठेवले मनाच्या कुपीत.
वाटली जेव्हा काळजी पहिल्यांदा तुझ्याबद्दल, तेव्हा खांद्यावर हात ठेवून म्हणालीस, "पिलावर विश्‍वास नाही का तुमचा बाबा?'
गैरविश्‍वास नव्हता गं! आतून आलेले तुझ्याबद्दलचे काळजी वाहणाऱ्या बापाचे भेदरलेपण.
ते भेदरलेपण मोडताना भक्कम अस्तित्वाने तू घालत राहिलीस सतत फुंकर.
ओळखतात जेव्हा मला "तुझा बाबा' म्हणून, अभिमानाने भरलं माझं मन हिंदोळत राहतं वाऱ्याच्या लहरींवर.

------------------------
पाहू या- करू या... करत मी ढकलत राहिलो तुझ्या आयुष्यातला तो सोनेरी दिवस.
मात्र अखेर आलाच "तो क्षण', जो माहीत असूनही लपवत राहिलो स्वतःपासून आयुष्यभर.
सनई, चौघडे वाजू लागले, घर सजलं, अंगण मांगल्यानं काठोकाठ भरलं.
सनईच्या सुरावटीने भारला सारा भवताल. पळ भरले आणि आली लग्नघटिका समीप.
"शुभमंगल....' शब्द-सूर उच्चारत गेले आणि फुटणारा बांध कसा आवरू आवरू झाले.
...आठवला तुझा जन्मसोहळा, तुझा पहिला मृदू सहवास, लुकलुकणारे डोळे, तुझं पहिलं पाऊल, पहिलं यश.
आठवला तुझा मला धीर देणारा स्पर्श, मैत्रीण होऊन झेलताना लुटलेला बापपणाचा आनंद.
उभे राहिले डोळ्यांसमोर तुझ्यासोबतचे लटके रागाचे क्षण, कधी तरी चुकून उचलला गेलेला हात आणि मग कुशीत शिरून मुसमुसणाऱ्या तुला सावरताना माझ्यातला गळून पडलेला कठोर बाप.
"कन्यादानाचं पाणी सुटलं हातातून अन्‌ जाणवलं आपलं पिलू आपल्याला कायमचं दुरावलं...'
उंबरठा ओलांडण्यास निघाली अन्‌... "बाबा।।। म्हणून धावत शिरलीस आवेगाने माझ्या कुशीत...'
खरं सांगतो पोरी, तेव्हा कढ दाटल्या हृदयातलं बापपण धो धो रितं होत राहिलं अश्रूंमधून..
also on: http://72.78.249.107/esakal/20110619/5214167252538387743.htm

Thursday, June 9, 2011

पाऊस



पाऊस उधाणलेला
दर्यावर स्वार झालेला!
पाऊस इंद्रधनूतला
सप्तरंगातून उमटलेला!
पाऊस छत्रीतला
थेंब-थेंब वेचलेला!
पाऊस पागोळ्यांतला
रात्रभर जागलेला!
पाऊस मनातला
तुफानाला नमविलेला!
पाऊस तुझ्या-माझ्यातला
मौनाला बोलकं केलेला!
पाऊस चिंब ओला
देह भरून मनात उतरलेला!
पाऊस तुझा, माझ्यासवे
सप्तपदी चाललेला!