Friday, January 13, 2012

'कॉम्प्लिमेंट'

दिवसभराच्या धावपळीमुळे सगळेच जाम थकले होते. कार्यक्रम नेटका झाल्यामुळे सगळे आनंदी होते. कोणतंही मंगलकार्य ठरवणं सोपं असतं; पण ते तेवढ्याच ताकदीनं पार पाडणं आणि पार पडणं दोन्हीही अवघड. सगळ्याच बाबी जुळून याव्या लागतात. आजच्या कार्यक्रमाचंही तसंच होतं. गेले पंधरा दिवस "त्याचं' कुटुंब हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीचा विचार करून तयारी करत होतं. घरातील प्रत्येकाला कामे नेमून दिलेली होती. त्यामुळे गोंधळ असा फारसा झाला नाही. कार्यक्रम अगदी आनंदात, उत्साहात पार पडला.

सायंकाळी सगळं आवरल्यानंतर दिवसभराच्या कामाचा आढावा घेण्याचं काम सुरू झालं. प्रत्येकानं नेमून दिलेली कामं चोख केल्यानं तो प्रत्येकाचं कौतुक करत होता आणि त्याच्या कौतुकाने सगळे सुखावत होते. आता त्याच्याकडे पार्टीची जोरदार मागणीही केली गेली. त्यानं ती लगेच मान्य केली. सगळ्या थोरल्यांनी भरपूर कामं केली असली तरी आज प्रत्येकाच्या तोंडात "तिचं' नाव आवर्जून येत होतं.

"लहान असून किती समज आहे. प्रत्येक काम तिनं अगदी मनापासून, तिच्या वकुबाला पेलेल असं केलं. तिच्या वयाला न शोभेल आणि न झेपेल अशी पळापळ तिने दिवसभरात केली,' असं कौतुक ऐकत ती आत्ता बाबाच्या जवळच बसली होती आणि तो लेकीच्या कौतुकानं मनोमन सुखावला होता. दहा वर्षांच्या आपल्या चिमुरडीचं भविष्यात कोठेच अडणार नाही या जाणिवेनं त्याला आणखीनच बरं वाटलं. लेकीबद्दलचा अभिमान त्याच्या चेहऱ्यावर काठोकाठ भरून राहिला. त्याच्या बायकोचे डोळे तर आनंदाने अगदीच भरून आले. खरंच पोरगी मोठी व्हायला लागली आहे. प्रत्येक गोष्ट समजून उमजून करत आहे, याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. पोरीची दृष्ट काढायची, असं तिनं मनोमन ठरवून टाकलं...

छोकरी तिथंच बसलेली कौतुक ऐकत. तिलाही सगळं छान-छान वाटत होतं. आपण दिवसभर जे काय केलं त्याचं सगळी कौतुक करत आहेत, हे ऐकून तिला मजा वाटत होती; पण तरीही ती काहीशी अस्वस्थ होती. कौतुकाने आनंद होतानाच कोठेतरी एक सल तिला जाणवत होती. पण, तिला नेमकं काय करावं हे समजत नव्हतं. ती शांतपणे सगळं ऐकत होती. आतून बेचैन होती. रंगलेल्या गप्पा संपल्या आणि पुन्हा प्रत्येकजण आपापल्या कामाकडे वळला. ती मात्र तेथेच बसून राहिली अस्वस्थपणे विचारांत बुडून गेली.

-------
तो त्याच्या खोलीत गेला. कोचावर रेलला आणि डोळे मिटून शांतपणे पडून राहिला. दिवसभराच्या पळापळीने त्याला शीण आला होता. काही वेळ गेला. जवळ हालचाल जाणवल्यानं त्यानं डोळे उघडले. त्याची छोकरी त्याच्या जवळ येऊन बसली होती; पण तिचे डोळे पाण्याने भरलेले होते. तो झटकन सावरून बसला.
""काय झालं बेटा? मघाशी तर तू खूश होतीस. आज सगळ्यांनी तुझं कौतुक केलं. मग आत्ता का तुझा चेहरा असा रडवेला?''
बाबांच्या या प्रश्‍नावर बळ एकवटून ती म्हणाली, ""बाबा, एक विचारू?''
""बोल बेटा, अगदी बिनधास्तपणे विचार'', असं म्हणत त्यानं तिला जवळ ओढून घेतलं.
""बाबा मी खरंच खूप काम केलं आज?''
""हो बेटा. अगदी खरंच तू खूप काम केलंस. म्हणून तर तुझं कौतुक केलं सगळ्यांनी. का काय झालं?''
""माझ्याबरोबर शेजारच्या त्या चिंगीनंपण किती काम केलं. उलट माझ्यापेक्षा जास्तच काम केलं तिनं. तिची आई भांडी घासत होती तेव्हा ती सगळी भांडी विसळून घेत होती. त्यानंतर तिनं सगळा हॉल झाडून काढला. नंतर तो पुसून काढला. सगळ्या खुर्च्या एका बाजूला लावल्या. सगळी भांडी मोजली. त्यांचा हिशेब आम्ही दोघींनी मिळून केला. माझ्यापेक्षाही तिनं किती तरी काम केलं आणि सगळ्यांनी माझं कौतुक केलं. तिचं कौतुक कोणीच केलं नाही. मघाशी सगळे माझे कौतुक करत होते. तेव्हा ती कोपऱ्यात उभं राहून ऐकत होती. माझं कौतुक ऐकून तिच्या चेहऱ्यावर कसला आनंद दिसत होता. तिचं कौतुक मात्र कोणीच केलं नाही. बाबा आपण तिचं कौतुक का नाही केलं? का कोणालाच तिचं काम दिसलं नाही? तिची आई आपल्याकडे कामाला होती हे मान्य; पण चिंगी माझ्याबरोबर नेहमी खेळते. माझी मैत्रीणच आहे ती. मी करते म्हणून तिनं काम केलं. तिचं मात्र कोणीच कौतुक केलं नाही.'' एवढं म्हणताना तिच्या डोळ्यांतून पाणी येऊ लागलं.

आता तो गहिवरला. आपल्या संवेदनशील लेकीचा त्याला अभिमान वाटला. ""ए वेडाबाई...'' म्हणत त्यानं तिला जवळ घेतलं आणि मायेनं कुरवाळलं.

------
मनाशी काहीतरी ठरवून तो उठला आणि बाहेर गेला. जाऊन आल्याबरोबर सर्वांना बोलावून घेतलं आणि लेकीला हाक दिली. चिंगीलाही बोलावून आणायला सांगितलं. त्याच्या लेकीबरोबरचीच ती पोर. त्यानं बोलावले म्हटल्यावर जरा दबकतच आली.
""ये चिंगी...'' त्यानं प्रेमळपणे हाक मारली.
चिंगी समोर आली. त्यानं लेकीच्या हातात एक बॉक्‍स दिला आणि चिंगीला द्यायला सांगितले.
तिनं तो बॉक्‍स चिंगीला दिला.
""काय हाय. मला नको ते...'' चिंगी म्हणाली.
""अगं चिंगी घे... तुच्या मैत्रिणीची ही तुझ्यासाठी भेट आहे बेटा. बघ उघडून.''
चिंगीनं बॉक्‍स उघडला आणि त्यातून सुंदरसा ड्रेस बाहेर काढला...""माझ्यासाठीऽऽऽ'' तिच्या डोळ्यांच्या बाहुल्या आनंदानं अगदी मोठ्या झाल्या.
""हो बाळा...''
""लय भारी हाय...'' म्हणत तिनं आपल्या मैत्रिणीला मिठी मारली.
दोन निर्व्याज, निष्पाप जिवांचा खराखुरा आनंदसोहळा तेथे रंगला.
---
तिच्या चेहऱ्यावरचा दिवसभराच्या कष्टाचा शीण कोठल्या कोठे पळून गेला. ड्रेसवरील सगळे सगळे रंग, प्रत्येक नक्षी तिच्या चेहऱ्यावर आनंदानं उमटून आली आणि मैत्रिणीवरील जीव आणखी घट्ट झाला.
---
चिंगीचंही कौतुक केल्याचं पाहून छोकरीला "त्या' मिठीत दिवसभराच्या कौतुकापेक्षा समाधानाचे मोठे बक्षीस सापडले आणि बाबांनी आपल्याला समजून घेतल्याचा आनंद तिच्या डोळ्यांतून अश्रू बनून घळाघळा ओघळला.
---
...आणि हे पाहून अभिमानाने त्याची छाती फुलून आली. लेकीच्या कौतुकाचा कढ दाटून आला. अश्रूंनी भावनांना वाट मोकळी करून दिली. पाणावलेल्या डोळ्यांनी त्यानं हे दृश्‍य साठवून घेतलं. लेकीच्या डोळ्यांतून ओघळणाऱ्या आनंदाश्रूंनी मिळालेली दिवसभरातील सर्वात मोठी "कॉम्प्लिमेंट' त्यानं हृदयाच्या कुपीत जपून ठेवली.