Earn an online degree today. |
हे केवळ नाव उच्चारले तरी त्याची असंख्य रुपे आणि व्यक्तित्वाचे कंगोरे आपल्यासमोर येत राहतात. देवकी पोटी जन्म घेऊन यशोदेच्या कुशीत लहानाचे मोठे झालेले खोडकर, खेळकर, लडीवाळ बाळरूप ते विश्वरूप धारण करून सर्वांना दीपवणारे ज्योतिरादित्य रूप...सारेच अनाकलनीय...
तो नेमका कोणत्या रुपातून आपल्याला निटसपणे उलघडतो...नाहीच उलघडत कारण तो कळतोय असे वाटत असतानाच त्याचे नव्याने रुप सामोरे येते...
त्याचे बाळरूप आठवून बाललीला पाहताना, अनुभवताना डोळ्यांतून आपसुक आसवं ओघळतात...ती का ओघळली हे व्यक्त नाही करता येत.... त्याचं वर्णन करण्यासाठी जेव्हा शब्दांना सोबतीला घेण्याचा प्रयत्न होतो तेव्हा ते प्रत्येक वाक्यागणिक थिटे पडत जातात...तरीही त्याचं रुप शब्दांत उतरवण्याचा प्रयत्न करताना....त्याचं आवडतं मोरपीस घ्यावं...फुलपाखरांच्या पंखांवरील रंगातून अलगद फिरवावं आणि विविधरंगी टपोऱ्या सारंगाला आधार देणाऱ्या, जलबिंदूंचे मोती अंगावर मिरवणाऱ्या कमलदलावर हळूवारपणे शब्दांतून रेखण्याचा प्रयत्न जरूर करावा...खचितच नव्याने काही तेथे उमटू शकेल...
बरं हे शब्द त्या माधवासाठीच असल्यामुळे ते प्रेमाने अगदी ओथंबलेले असणार... त्यामुळे त्यामध्ये आपसुकच भरलेला गोडवा मधुस्वादालाही मागे टाकणार...उमटणाऱ्या त्या शब्दांकडे पाहूनही मन त्याभोवतीच रुंजी घालत राहणार...हे शब्दचित्र रेखत असताना त्याचं सावळं रुप आठवणार...त्याचं बाळ रुप आठवताना एखाद्या वंध्या स्त्रीलाही पान्हा फूटून त्या क्षीराचा अभिषेक...त्या बालपावलांवर होणार... ओठ बिलगलेल्या बासरीमधून निर्माण होणारा सृजनसूर...भोवताल भारून टाकणार...सुदाम्यासोबतचे त्याचे मैत्र आठवणार...अर्जुनाला जगण्याचं सार सांगणारा...चक्रधर नजरेसमोर तरळणार...सखी द्रौपदीच्या वस्त्रांना हात घातल्यानंतर तिच्या लज्जा रक्षणासाठी धावलेला सखा अभिमान देणार...रुक्मिणी-सत्यभामेच्या भावनांची कदर करताना प्राजक्ताचा गंध जेथल्या तेथे पोहोचेल हे पाहणार...आणि मीरेच्या आर्त भक्तीला आपल्यामध्ये सामावून घेणार... रणांगणावर त्याच्यामधील योद्धा शस्त्र हाती न घेताही...पार्थासाठी...अश्वांना नियंत्रित करणार...आणि सारं युद्ध आपल्या योजनेबरहुकूम पूर्णत्त्वास नेणार...असत्याला...सत्याकरवी पराभूत करणार....आप्तांची कलेवरं...पाहताना डोळ्यांतून ओघळू पाहणारे अश्रू...कडांवर रोखून धरणार...आणि दुःखाचा कढ...आत खोलवर कोठेतरी...सोडून देणार... किती किती रुपे रेखली जातील...याशिवायही असंख्य...शब्द अपुरे पडत राहतील...आणि तो मात्र भेटत राहील...अखंड...अनंत...अमर्याद...आपला बनून....अगदी आजही...आणि उद्याही...