Tuesday, September 29, 2009

विट्याची वैशिष्ट्यपूर्ण विजयादशमी


विजयादशमी सीमोल्लंघनाचा सण. वाईट प्रवृत्ती नष्ट करून नवे घडविण्याच्या दिशेने पाऊल टाकण्याचा सण. दुष्ट प्रवृत्ती-मनोवृत्ती, तमोगुण, रजोगुण दूर सारण्यासाठी संकल्प सोडण्याचा दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस. या दिवशी कोणतेही कार्य सुरू करावे आणि ते निर्विघ्नपणे पार पडावे, ही आपली संस्कृती. या संस्कृतीला जोडून काही परंपराही रूढ झाल्या आहेत. कोल्हापूर, म्हैसूर येथे साजरे होणारा शाही दसरा हे त्याचेच मूर्तिमंत रूप. येथील सोहळ्याएवढा मोठा नसला तरी बहुतेक महाराष्ट्राला परिचित असलेला आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण दसरा विट्याचा. सांगली जिल्ह्यातील विट्यात विजयादशमीला देवांना (मुखवट्यांना) पालख्यांत ठेवून त्यांना पळविण्याची अनेक वर्षांची परंपरा असून ती आजही तेवढ्याच श्रद्धेने, भक्तीने आणि उत्साहाने जपली जाते. नोकरी-कामधंद्यानिमित्त देशभर असलेले विटेकर व परिसरातील नागरिक ही शर्यत पाहण्यासाठी आवर्जून या दिवशी उपस्थिती लावतातच.आश्‍विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्रोत्सवास प्रारंभ होतो आणि विविध मंदिरांत विधिपूर्वक घटस्थापना केली जाते. या कालावधीमध्ये मंदिरांतील मूर्तींना वेगवेगळे पोशाख करतात. विजयादशमी हा मुख्य दिवस असतो आणि याच दिवशी दुपारी पालख्यांच्या शर्यती रंगतात.मूळस्थानची म्हणजे सुळेवाडी येथील सिद्धनाथाची पालखी व विट्यातील सोनार गल्लीमधील रेवणनाथाची पालखी यांच्यामध्ये ही शर्यत होते. फार पूर्वी लाकडाचाच अधिक उपयोग करून या पालख्या बनविल्या जात. त्यामुळे त्या खूप वजनदार असत. तरीही कसबी खांदेकऱ्यांमध्ये त्या पळवत नेण्याची रग असे. कालांतराने या पालख्यांमध्ये बदल होत गेले आणि आताच्या पालख्या तुलनेत वजनाने हलक्‍या बनल्या. पाळणा, त्यावर बसविलेले दांडा आणि त्यावर तांबड्या रंगाची पिंजरी बसविलेली असते. पिंजरी झेंडूच्या फुलांनी व गोंड्यांनी सजविलेली असते. शर्यतीच्या धामधुमीतही ही पिंजरी निघणार नाही अशारीतीने ती घट्ट बांधलेली असते. ही पालखी खांद्यावरून पळविणे सोपी बाब नाही; पण पळविणारे जोशात ही शर्यत खेळतात. पालख्या पळविताना पालखीला खांदा देणे व खांदा काढून घेऊन दुसऱ्याच्या खांद्यावर पालखी देणे ही कला खांदेकऱ्यांना अवगत असणे अत्यंत आवश्‍यक असते.दुपारी तीनच्या सुमारास नाथ मंदिराच्या प्रांगणात भैरवनाथ, म्हसवडसिद्ध, भैरोबा, सिद्धनाथ (मूळस्थान) व रेवणनाथाच्या पालख्या एकत्र येतात. येथून त्या वाजत-गाजत येथील मुख्य पेठेतील काळेश्‍वर मंदिराजवळ आणल्या जातात. तेथे मानकऱ्यांच्या हस्ते मूळस्थानच्या पालखीला निरोप दिला जातो आणि विट्यातील रेवणसिद्धाच्या पालखीसोबत शर्यत सुरू होते. पालखी शर्यत सुरू होऊन काळेश्‍वर मंदिर, पाण्याची टाकी, शिवाजी चौक, बसस्थानकमार्गे शीलंगण मैदान असा शर्यतीचा मार्ग असतो. पालख्यांची शर्यत सुरू होण्यापूर्वी आबदागिरी व छत्र पळवत नेले जाते. त्यामुळे पालखी शर्यत लगेचच सुरू होत असल्याची वर्दी उपस्थितांना मिळते.मूळस्थानची सिद्धनाथाची पालखी पाहुणी असल्यामुळे तिला शर्यतीच्या रेषेपासून दहा पावले पुढे उभे राहण्याचा मान दिला जातो. त्या वेळी विट्याच्या सिद्धनाथाची पालखी डाव्या बाजूला उभी असते. मानकऱ्यांनी निरोपाचे विडे देताक्षणी पालख्यांच्या शर्यतीला प्रारंभ होतो आणि सुरू होतो थरार. साधारण दोन किलोमीटर अंतराची ही शर्यत पाहताना उपस्थितांचे श्‍वास रोखलेले असतात. "पालखी आली'च्या आरोळ्यांनी परिसर भरून राहतो. दोन्ही पालख्या पळविणारे खांदेकरी पालखी पळविण्यासाठी शर्थ करतात. प्रचंड चुरशीने पंधरा-वीस मिनिटांत होणारा हा शर्यतीचा थरार एकदा तरी अनुभवण्यासारखाच असतो. शर्यत जिंकण्यासाठी एकमेकांच्या पालख्या पकडण्याचेही प्रयत्न होतात.सपकाळ वस्तीवरील ओढ्यापासून चढ सुरू झाल्यानंतर खांदेकऱ्यांची दमछाक होते. या वेळी वाहणाऱ्या गर्दीमधून हेलकावत पालख्या पुढे सरकत असतात. शर्यत पाहण्यासाठी रस्ता दोन्ही बाजूने फुलून गेलेला असतो. पालख्या शीलंगण मैदानावर पोहोचल्यानंतर खांदेकरी आणि उपस्थित एकच जल्लोष करतात आणि मूळस्थानच्या पालखीला निरोप दिला जातो. नंबर कोणाचा आला याला येथे गौण स्थान असते येथे "खेळ' होणे महत्त्वाचे मानले जाते. शर्यत संपल्यानंतर गावातील नागरिक मैदानावर येतात. तेथे सामुदायिकरित्या शमीच्या पानांचे पूजन होते. एकमेकांना आपट्याची पाने अर्थात सोने देऊन शुभेच्छा दिल्या जातात आणि पावले परतीच्या वाटेला लागतात. जाताना चर्चा रंगते काही वेळापूर्वी रंगलेल्या थरारक शर्यतीची.

No comments: