Friday, November 13, 2009

प्रिय सचिन

खूप दिवस झाले तुला पत्र लिहिण्याचा विचार डोक्‍यात घोळत होता; पण कारणच सापडत नव्हते. त्याला कारण म्हणजे एक तर तू अपयशी ठरलास की प्रसारमाध्यमं (विशेषतः इलेक्‍ट्रॉनिक्‍स) तुझ्यावर अक्षरशः तुटून पडतात. दिवसभर त्यांचं चॅनेल ढणढणत राहतं आणि पाहणारेही मग हळूहळू सचिन संपलाय, या हाकाटीच्या बाजूने झुकू लागतात. हा गेल्या काही वर्षांमधील अगदी परिपाठ झालेला आहे. तुझ्या निवृत्तीसाठी तर अनेक जण देव पाण्यात ठेवल्याप्रमाणे वागत, लिहीत, बोलत असतात. जेव्हा जेव्हा तुझ्यावर टीकेचे फुटेज सुरू व्हायचे तेव्हा तेव्हा त्या चॅनेलवाल्यांचे तोंड फोडावे असे वाटायचे. बरं तू त्यांना कधीही बोलून उत्तर देत नाहीस. तुला जे काही बोलायचे असते ते तू तुझ्या बॅटनेच बोलतोस. मग माझ्यासारख्या तुझ्या चाहत्याला तू सुंदर खेळी केलीस की चेव चढतो. तरी बरं एक बाब खूप महत्त्वाची. आपले बहुतेक सारे मराठी पेपरवाले मात्र तुझ्या पाठीशी ठाम उभे राहतात. (खरे तर महाराष्ट्रात पाय ओढण्याची परंपरा आहे. तुझ्याबाबतीत मात्र ही परंपरा मोडली गेलीय ही अतिव आनंदाची बाब आहे) असो...परवा तुझे संघ सहकारी हैदराबादी बिर्याणी झोडत होते, तेव्हा तू मात्र त्यांच्यात नव्हतास. दुसऱ्या दिवशी त्याचा परिणाम जाणवला. तू तडाखेबंद 175 धावांची खेळी करून पुन्हा एकदा टीकाकारांचे तोंड फोडलेस आणि ज्यांच्या कौतुकांचे पूल बांधले जात होते ते फ्लॉप झाले. विशेष म्हणजे कधी नव्हे ते हिंदी इलेक्‍ट्रॉनिक्‍स मीडियाने दिवसभर तुझ्यावर स्तुतिसुमने उधळली. खरं सांगू, त्या दिवशी कधी नव्हे ते टीव्ही पुनःपुन्हा पाहावासा वाटला. त्या दिवशीची ऑस्ट्रेलियाविरुद्धची तुझी तडाखेबंद, सौंदर्यखणी खेळी खरोखरच मनाच्या कुपीत जपून ठेवावी अशीच होती. ऐन तारुण्यात असताना तू ज्याप्रमाणे गोलंदाजांना सीमारेषेच्या बाहेर उर्मटपणे भिरकावून द्यायचास, तोच पुन्हा अवतरल्याचा भास झाला. रिकी पॉंटिंगचा चेहरा तर पाहवत नव्हता. खडूस ऑस्ट्रेलियन्सची कशी ठेचायची असते ते तू पुन्हा एकदा दाखवून दिलेस. अगदी झोकात तू सतरा हजार धावांचा टप्पा ओलांडलास; मग तू अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर मात्र तुझी रनमशिन धडधडू लागली आणि धावांची रास पाहता पाहता उभी राहिली. क्रिकेटचे सर्व फटके पुन्हा एकदा "याची डोळा याची देही' अनुभवण्यास मिळाले. अगदी धन्य धन्य झालो. त्या दिवशी अगदी टेचात मित्रमंडळींत फिरलो. तुझ्या अनेक परममित्रांचे चेहरे वाचताना मी त्या दिवशी अगदी असुरी आनंद लुटला. अनेकदा त्यांनी सचिन कसा संपलाय हे अगदी बेंबीच्या देठापासून सांगण्याचा प्रयत्न केला होता ना! (सामना तुझ्या नाकर्त्या सहकाऱ्यांमुळे हरल्याचे जराही दुःख वाटले नाही). त्यानंतर मालिका भारत हरला; मात्र तुझ्या खेळीच्या हॅंगओव्हरमधून आम्ही काही बाहेर आलो नाही. त्यावर कळस चढला गुरुवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमामुळे. सुनील गावस्कर आणि गुंडाप्पा विश्‍वनाथ यांचा साठीनिमित्त झालेला सत्कार सोहळा. या सोहळ्यात चित्रपटसृष्टीचा शहेनशाह अमिताभ बच्चन (यशाच्या शिखरावर असूनही विनम्रतेचा कळस म्हणजे हा माणूस), यांच्यासोबत तुला त्या व्यासपीठावर पाहून कृतकृत्य झाल्याचे समाधान लाभले. या कार्यक्रमात तू ज्याप्रमाणे बोललास किंवा तुझ्याबद्दल अमिताभ, सुनील जे बोलले ते पाहताना डोळ्यांचे पारणे फिटले. तू कसा ग्रेट आहेस हेच पुन्हा एकदा पाहावयास मिळाले.आजच हे सारं पुन्हा तुला लिहिण्याचे कारण म्हणजे, 15 नोव्हेंबरला तुझ्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीस वीस वर्षे पूर्ण होत आहेत. सध्याच्या फास्ट क्रिकेटच्या युगात तू तब्बल वीस वर्षे भारतीय क्रिकेटसाठी स्वतःला वाहून घेतलेस. या कालावधीत खेळाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद तू मनमुरादपणे लुटलास आणि क्रिकेटचा देव बनलास. जगभरात चाहते निर्माण केलेस, धावांच्या एव्हरेस्टची उंची अधिकच उंच केलीस. बरं एवढं करूनही तू धावांसाठी आजही लहान मुलासारखाच भुकेलेला आहेस. भारतीय संघाला विश्‍वकरंडक जिंकून देण्याचे स्वप्न पाहत आहेस आणि एका अर्थाने पुन्हा एकदा विश्‍वकरंडक उंचावल्याचे स्वप्न दाखवत आहेस. कोट्यवधींचा मानकरी तू निश्‍चित असशील; पण कोट्यवधींच्या हृदयात तुझ्याबद्दल असलेल्या प्रेमाची गणतीच होणार नाही. तुझी ती श्रीमंती मोजताच येणार नाही.या पुढेही तू यशाचे नवे शिखर गाठून स्वतःचा अमिट ठसा उमटवावास याच शुभेच्छा!

तुझाच चाहता

2 comments:

भानस said...

प्राजक्त तू लिहिलेल्या एक न एक शब्दाशी मी सहमत आहे.माझ्या डोळ्यासमोर आजही मे १९८९ मध्ये माझ्या मुलाचा-शौमित्रच्या पहिल्या वाढदिवसाला आलेला सचिन आहे. चार तास सचिन आमच्याबरोबर होता.नचिकेत( माझा नवरा) आचरेकरांचा शिष्य-सचिन एकदम एवढुसा होता त्यावेळी.अगदी घरच्यासारखा वावरला होता.त्याचवेळी जाणवले होते हा खूप मोठा होणार आहे. शौमित्रला कडेवर घेऊन फिरवले होते.:)सचिन तू आता रिटायर हो म्हणणा~यांचे तोंड असेच बॆटने बोलून फोडत राहशील यावर माझा-आमचा संपूर्ण विश्वास आहे.आमच्या हृदयावर फक्त तुझेच अधिराज्य आहे. खूप खूप यशस्वी हो.आम्ही तुझेच होतो आणि राहू.

Sonal said...

सचिन दि ग्रेट!!! याच्या पेक्षा अधिक काय लिहिणार? विश यू ऑल दि बेस्ट!!!