Friday, February 5, 2010
धुके दाटलेले
कधी नव्हे ते डोळ्यांना सकाळी लवकरच जाग आली. (तसे आम्ही सूर्यवंशी. साधारण साडे दहा-अकरा हीच उठण्यासाठी आदर्श वेळ अशी आमची ठाम धारणा) डोळे चोळत टेरेसवर आलो आणि सेकंदात झोप उडाली. टेरेसवरून पुढील चार फुटांवरील काहीही दिसत नव्हतं. रात्री झोपेपर्यंत तरी समोर इमारती होत्या हे आठवत होतं. आत्ता मात्र गायब... मग लगेचच लक्षात आलं, अरे हा समोरचा शुभ्रधवल पडदा आहे धुक्याचा. गेले काही दिवस धुकं पडत असल्याचं फक्त ऐकलं होतं, आज लवकर उठल्यामुळे ते पहायला मिळालं एवढंच.
धुकं पाहण्याचा कौटुंबिक सोहळा चहा घेत उरकला आणि गाडीवर मांड ठोकली. गच्च धुक्याने भवताल भरून गेलेला असल्यामुळे अगदी आस्ते-आस्ते आमची सवारी सुरू झाली. अगदी चार फुटांवरीलही दिसत नसल्याने गाडीच्या लाईट लागलेल्याच होत्या. समोरून येणारे बिचकत, अंदाज घेत मार्गक्रमण करीत होते. हळू-हळू आम्ही रंकाळा गाठला. रंकाळ्याच्या अगदी काठावर उभा राहिलो तरी रंकाळ्याचे अस्तित्वच जाणवत नव्हते. अवघ्या रंकाळ्याला धुक्यांनी कवेत घेतलं होतं. रंकाळ्याचे एरव्ही काठाशी सलगी साधणारे पाणीही आज स्तब्ध भासत होतं, बहुधा त्यालाही धुक्याने घट्ट मिठीमध्ये सामावून घेतलं असावं. एरव्ही काठाच्या एका बाजूवरून दिसणारा शालीनी पॅलेस धुक्यात विरघळून गेल्याचा भास होत होता. फिरायला आलेले नेहमीच्या रस्त्यावरूनही अंदाज घेत फिरत होते. धुक्याचे लोटच्या लोट येऊन वातावरण आणखी गहिरं करत होते. जणू ढगांचे पुंजके धरतीच्या भेटीला आलेत असंच वाटत होतं. अनेक उत्साही तरुणांचा या पुंजक्यांना पकडण्याचा अपेशी प्रयत्न चाललेला. काय धुकं पडलंय नाही आज! असं ओठांचा चंबू करत काही चर्चेत रंगलेले. छोट्या दोस्तांच्या डोळ्यांच्या बाहुल्या धुक्यांचे कण बालमुठींत साठवताना भिरभिरत होत्या. झाडेही आधाशासारखी दवबिंदू टिपून तजेलदार बनू पाहत होती. सारी सृष्टी धुक्यांत न्हाऊन निघालेली. हे मोहक रुपडं डोक्यांत घट्ट करीत घराचा रस्ता धरला. घरी पोहोचेपर्यंत बऱ्यापैकी धुकं कमी झालेलं.
...घरी आलो. पुन्हा टेरेसवर पोहोचलो. आता सारां परिसर स्वच्छ दिसत होता. सगळ्या इमारती जागच्या जागीच होत्या. (जरां बरं वाटलं) धुकं गायब झालं होतं; मात्र टेरेसवरील फुलझाडांवर ते दवबिंदूच्या रुपात अंग सावरून उरलं होतं.
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
छान!! आमच्या बाल्कनीतून दिसणारं धुकं आठवलं... मस्तच!!
thank u!
Post a Comment