Tuesday, March 23, 2010
प्रिय ब्लॉगर्स
मराठी सारस्वतातील सर्वात मोठा उत्सव उद्यापासून पुण्यनगरीत सुरू होत आहे. साहित्यिकांच्या मांदियाळीत साहित्याच्या एकेका अंगावर चर्चा झडतील. मराठीच्या भल्या-बुऱ्याविषयी वाद-प्रतिवाद होतील, साहित्याचे अभ्यासक त्यावर अधिकारवाणीने बोलतील आणि तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य रसिकांना आपल्याला आवडणारे अनेक आद्य लेखक, कवी, मान्यवर "याची डोळा' पाहण्याची आणि ऐकण्याची सुवर्णसंधी साधता येईल. ग्रंथदिंडी, परिसंवाद, साहित्य विश्वातील नवोन्मेष, नवसाहित्य, इत्यादी-इत्यादी विषयांवरील चर्चांसाठी येथे तीन दिवस अगदी मेळा भरून येईल आणि त्यानंतर पुढे कित्येक दिवस त्याचे कवित्व सांगितले जाईल. एकूणच सरस्वती पूजकांच्या एकत्र येण्याचा सोहळा पुणे मुक्कामी रंगेल आणि प्रसारमाध्यमांतून तो आपल्यापर्यंत पोहोचेल...चला तर मग आपण या आनंदसोहळ्याचे येन-केन प्रकारे साक्षीदार होण्याचा आनंद घेऊ...पण त्यापूर्वी...
-----
...आत्ता हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे, साहित्यसंमेलनातील सरस्वतीपूजकांनी काही प्रमाणात "नवमाध्यमांतील लेखकांकडे पाठ फिरविल्याचे मंगळवारी वाचनात आले. त्यामध्ये आपले "अनिकेत समुद्रे, सोनल वायकुळ यांनी याबाबत खंतही व्यक्त केली. हे वाचल्याने मात्र मन काहीसं खट्टू झालं. (महत्त्वाचे दोघांचेही लेखन अप्रतिम आणि सातत्याने वाचावे असेच असते) साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरच ब्लॉगर्सच्या लिखाणाच्या दर्जावर शिक्कामोर्तब करून घेण्याचा अट्टहास बाळगून आपण आपल्याचा लिखाणाला दुय्यम का ठरवत आहोत, या प्रश्नाने अस्वस्थ वाटले.
मनापासून लिहिणाऱ्यांसाठी "ब्लागींग' एक नवे सशक्त आणि नव्या पिढीच्या अधिक जवळ जाणारे माध्यम आहे. ते हाताळताना व त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळत असताना कोणाच्या प्रशस्तीपत्रकाची आवश्यकता आपल्याला का वाटते? या प्रश्नाने पोखरून काढले. ब्लॉगच्या माध्यमातून प्रत्येक जण यथाशक्ती साहित्यामध्ये भरच घालत असतो. या लिखाणाला कसलीही मर्यादा नाही. कोणतेही बंधन नाही. कोणाचीही बांधीलकी नाही. येथे दर्जाची फिकीर नाही. कारण जे व्यक्त व्हायचे ते बिनधास्त व संवेदनशीलतेने. हेच ब्लॉगींगचे मूळ सूत्र आहे. येथे कोणाच्याही लिखाणावर कोणताही शिक्का नाही. येथे कोणत्याही विचारसरणीतून व्यक्त व्हावे त्याला बंधन नाही. कोणत्या शब्दांत व्यक्त व्हावे याचे नियम नाहीत. येथे बंधन एकच "न घसरण्याचे'. नियम एकच कोणालाही अनावश्यक न दुखावण्याचे आणि अगदी किरकोळ अपवाद वगळता सर्वच ब्लॉगर्स हे पाळतात. याचा सार्थ अभिमान आपणा सर्वांना असला पाहिजे.
येथे व्यक्त होणाऱ्या प्रत्येकाच्या डोक्यात फक्त एकच किडा वळवळत असतो (असावा) आणि तो म्हणजे, आपण जे लिहितोय ते कोणीतरी वाचावे, त्याबद्दल प्रतिक्रिया द्याव्यात आणि या माध्यमातून नव्याने जन्माला येणारे वेगवेगळ्या प्रकारचे लेखन वाचावे.
येथे लिखाणाच्या दर्जाची फुटपट्टी, लिहिणाऱ्याचे केस किती पांढरे झालेत आणि त्याने किती उन्हाळे-पावसाळे पाहिलेत यावर न ठरता लिखाणातील "तो अनुभव, ते शब्द, ते अभिव्यक्ती किती भिडणारी आहे' यावर ठरते.
"तुमचा अमुक-अमुक लेख वाचला आणि माझ्या डोळ्यांत पाणी उभे राहिले,' ही पोस्टच्या खाली पडलेली कॉमेंट (प्रतिक्रिया) साहित्यातील दिग्गजांना त्यांच्या लिखाणाबद्दल जशी दाद मिळते तेवढीच मोलाची आणि महत्त्वाची ठरते. (म्हणूनच मग कौतुकाने ब्लॉगर्स आपल्या लिखाणावर आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेला अगदी न थकता उत्तर देत असतात.)
म्हणजेच हे लिखाण तेवढ्याच आवडीने आणि डोळसपणए वाचले जात आहे. यामध्ये एकच मुद्दा येतो तो म्हणजे हे लिखाण मोठ्या प्रमाणावर वाचकांपर्यंत पोहोचते का याचा; पण सध्या ज्या वाचकांपर्यंत ते पोहचते तो वाचक नक्कीच प्रगल्भ होत असलेल्या पिढीचे प्रतिनिधित्व करतो आणि ही पिढी वाढत राहणारी आहे. प्रस्थापित साहित्यविश्वाला समांतर जाणाऱ्या महाजालावर ब्लॉगच्या माध्यमातून लिहिणाऱ्यांनी प्रस्थापित साहित्यविश्वाकडून मिळणाऱ्या दर्जाच्या शिक्क्याची फिकिर मुळीच करू नये. लेखकांनी वाचकांना भरपूर आनंद देण्याचा प्रयत्न करावा. संवेदनशीलतेने भवताल टिपावा, वाचकांना अंतर्मुख करणाऱ्या विषयांना स्पर्श करावा, वाचकांची मानसिकता बदलावी, समाजप्रबोधन करावे, विषयांना वाचाही फोडावी, माणुसपणाच्या सीमा अधिक विस्ताराव्यात...
...कोणाकडून त्यावर दर्जाची "मोहोर' उमटविण्याच्या भाबड्या अपेक्षेत राहू नये.
(माझी प्रामाणिक भावना मी मांडली आहे, कुणालाही दुखावण्याचा हेतू येथे मुळीच नाही; पण तरीही एखाद्या शब्दांनी दुखावले असल्यास मनःपूर्वक क्षमस्व)
Subscribe to:
Post Comments (Atom)
9 comments:
प्राजक्त, तुझ्याशी पूर्णपणे सहमत..
आपल्या सर्व मतांशी अगदी सहमत आहे!!
अगदी बरोबर!!!
दुसरं म्हणजे साहित्यिकांना मात्र हे कम्प्युटर रिलेटेड सगळं सेकंडरी किंवा कमी दर्जाचं वाटतं. मी कॉंप्युटरवर नाही - हे सांगणं मोठं अभिमानाचं मानलं जातं.
जाउ द्या, त्यांना आपल्या आयव्होरी टॉवर मधे सुखाने जगू द्या.. आपण इथे आपलं लिहित राहू.
हेरंब, महेंद्र, मनमौजी...माझ्या विचारांशी सहमती दाखविल्याबद्दल खुप-खुप धन्यवाद
विक्रांतजी असे झाले असेल तर ते उत्तमच आहे, माझा मुद्दा तो नाहीच. आपण जे लिहितो ते "वाचकांसाठी' हे आपण पक्के ध्यानात ठेवावे. साहित्यसंमेलनाच्या व्यासपीठावर त्यावर चर्चा झालीच तर ते ही चांगलेच आहे; पण समजा त्यांनी दखल घेतली नाहीच तर त्याने कोणीही निराश होऊ नये.
जाणिवांच्या फांद्यावरील फुले कोमेजण्यापुर्वी ती कुठेतरी वहावी म्हणून हा केलेला अट्टहास.... त्यात समाधान हाच प्रमुख उद्देश बाकी सगळं झूट.... तूम्ही लिहिलं ते अगदी बरोबर.....
THANK U SUSHMEYA
प्राजक्त, सहमत आहे. मनात आलेले दैनंदिन गोष्टीत हरवून जाऊ नये यासाठी तर हा खटाटोप आहे नं. ज्यांना आवडत नसेल त्यांचे जाऊ दे ... आपल्याला आनंद मिळतोयं नं... बस.:)लिहीते राहा.
अशी कशी ही पोस्ट वाचायची राहून गेली... खंत लागली. :(
thank u भानस
Post a Comment