Thursday, November 3, 2016

सुगंध

सुगंध...



(चित्र ः प्रदीप घोडके)

त्याने लॅच उघडून घरात प्रवेश केला. आत येताच दारामागे स्टॅंडवर शूज काढून ठेवले. तिथेच वरच्या बाजूला अंगातील जर्कीन काढून अडकवले.
--
""ए ऐकलंस का ! आलोय बरं का मी. काय करतेस?... कसा गेला आजचा दिवस?...''

प्रश्न विचारतच त्यानं कपडे बदलले आणि बाथरुमध्ये जावून फ्रेश होऊन आला.

""आजचा दिवस मस्त गेला. आज अगदी मनासारखं काम झालं. बॉस खूश झाला. न होऊन सांगतोय कोणाला म्हणा. त्याचं टेन्शन मी घेतलं. मग काय तो झाला मोकळा. अगं बोल ना काहीतरी... वेळ झाला म्हणून रागावलीस? सॉरी गं... खूप ठरवलं होतं वेळेत यायचं... पण नाही जमलं. कामात गुंतलो की मला माझंच भान राहत नाही. अगदी झपाटल्यासारखं होतं... हो हो... तुला हे सगळं माहिती आहे... हे संवाद तुझे अगदी पाठ आहेत; पण ए, असा अबोला मुळीच बरा नव्हे बरं का! बरं, ठिकाय. मी कॉफी करतो. घेऊ आपण. मग तर तुझा राग जाईल ना...''
------
किचनमध्ये जाऊन त्यानं कॉफी तयार केली. दोन मग हातात घेऊन तो गॅलरीजवळ गेला. कॉफी घेत येणाऱ्या वाऱ्यासोबत मनाच्या हिंदोळ्यावर झुलू लागला. अगदी तंद्रीच लागली त्याची... खूप वेळ तो तसाच उभा राहिला... दूरवर कुणीतरी गाडीचे ब्रेक जोरात लावले आणि त्याची तंद्री भंगली. घराकडे परतणारे रस्ते एव्हाना सुने सुने होण्यास सुरवात झाली होती.
------
""काय, कॉफी आवडली ना... तुला माहितीय, कॉफी माझा विक पॉईंट आहे. आणि मला माहितीय की माझ्या हातची कॉफी, तुझा विक पॉईंट; पण माझ्या कॉफीला तुझ्या इतकी दाद मात्र दुसऱ्या कोणीच दिली नाही हां...''
""ए तुला आठवतंय... एकदा तू घरी रियाज करत बसली होतीस आणि मी तिथे पोचलो. तू डोळे मिटून किशोरीचे "सहेला रे...' म्हणण्यात तल्लीन होतीस. मी कितीतरी वेळ कोपऱ्यात बसून तुझा आवाज कानात साठवत राहिलो. तुझं संपत आलं तेव्हा वाटलं, तुला कॉफी करून पेश करावी. मग आईंना सांगून तुमच्या किचनमध्ये कॉफी बनवून आणली आणि तुझा रियाज संपताना तुझ्यासमोर कॉफीचे मग ठेवले. तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर आश्‍चर्यानं उमटलेले भाव आजही नजरेसमोर आहेत. आईही खूश झाल्या माझ्या हातची कॉफी पिऊन. कॉफीचे घोट घेताना आपला सुरू असलेला डोळ्यांतील संवाद... आहा क्‍या बात है...! आई म्हणाल्या पण... ""जावईबापू, फार लाड नका करू... रोज अशीच आयती कॉफी पिण्याची सवय लागेल तिला...'' त्यावर मारे ऐटीत म्हणालो होतो... ""लागू दे.. लागू दे... आपली तयारी आहे...'' किती वेडेपणाने वागलो होतो ना मी तेव्हा...

""हसू येतंय तर ओठात दाबून का ठेवतेस?... चुकलो बाबा, आता रोज नक्की वेळेत येईन. मग तर झालं?... ए, कॉफी संपवलीस... कशी झालीय ते तरी सांग...''
-----
बोलत बोलत त्याने दोन्ही मग किचनच्या सिंकजवळ नेऊन ठेवले. फ्रिजवर ठेवलेली बिलं हातात घेतली आणि तो पुन्हा हॉलमध्ये आला.
-----
""ए, किती बिल आलंय ना मोबाईलचं... ऑफीसच्या कामासाठी किती बोलावं लागतं. तुझा कॉल जेव्हा जेव्हा येतो, तेव्हा मी कामातच असतो. बोलताच येत नाही. ए त्याबद्दल मात्र सॉऽऽऽरी...! ए काय गंम्मत आहे नाही? कॉलेजात होतो तेव्हा कित्ती बोलायचो आपण फोनवर... कॉलेजमधून घरी पोचताच पायऱ्या चढता चढता पोचलीस का... जेवलास का करत... पुन्हा फोनवर बोलणं सुरू व्हायचं. दिवसभर कितीतरी वेळ आपण बोलत रहायचो... आई तर एकदा मला म्हणाली, ""अरे, अशी मोबाईल कंपन्यांची भर करण्यापेक्षा लग्न करून तिला घरी आण आणि हवं तेव्हढं बोलत बसा समोरासमोर.'' काय भारी वाटलं होतं...! लग्नानंतर आपलं रुटीन सुरू झालं आणि दोघंही किती गुंतून पडलो. मला बोलू वाटायचं खूप तेव्हा तुझं गाणं, रियाज सुरू असायचा आणि तू जेव्हा मला फोन लावायचीच तेव्हा मी हटकून कामात बुडालेलो असायचो. दोघांचीही चिडचीड व्हायची; पण संध्याकाळी मात्र त्यावर गोड तोडगा काढायला शिकलो आपण. किती सवयीचं झालं सगळं...''
------
आता तो सेफ्यावर रेलून बसला. एकटक पाहत...
----
""ए फार झाला हं रुसवा. खरंच, उद्यापासून नक्की वेळेवर येईन. बरं, आज तुझा वरचा सा निट लागला ना... जरा लक्ष दे... देवकीताई म्हणत होत्या... वरचा सा लावताना जऽऽरा कसरत होतेय तुझी... पण तू करशील... असंही अगदी अभिमानानं सांगत होत्या. मला तर बुवा खात्रीच आहे! तंबोऱ्यावर तुझी बोटं किती अलवार फिरतात... किती सुंदर संवाद सुरू असतो तुझ्या बोटांचा आणि त्या तारांचा... किती एकमेकांना समजून उमजून साथ करतात... अगदी लडीवाळपणे झंकारत राहतात... तुझ्या बोटांतील जादू चारही दिशांना मुक्तपणे उधळतात... एकेक अस्सल सूर पेश करत राहतात. ऐकणारा अगदी तृप्त होऊन जातो... माझ्यासारखां... नाहीतरी या सुरांमुळेच तुला आणि तुझ्यामुळेच मला... पूर्णत्व आलंय...!''

""ए आज एक मज्जा झाली येताना लोकलमध्ये. ऐकून हसून हसून पुरेवाट होईल तुझी.
मी ज्या डब्यात होतो ना, तिथं एक "तो' पण होता. गाडी स्टेशनमधून बाहेर पडल्यावर लागला की हातवारे करत पैसे मागायला. मी लांबच होतो. म्हटलं, येणार हा माझ्याकडे पैसे मागायला. प्रत्येकाजवळ जावून टाळ्या वाजवणं, पैसे काढणं करत करत तो एकाजवळ जाऊन उभा राहिला. टाळ्या वाजवून त्याच्याजवळ पैशाची मागणी केली. त्यावर त्या प्रवाशानं काय केलं माहितीय?... त्यानं पण लगेच त्याच्यासारख्याच टाळ्या वाजवल्या, त्याच्यासारखेच हातवारे केले आणि त्याच्या पुढे हात केला नि म्हणाला... ""चल, अब तू मुझे पैसे दे दे...'' तो अस्ला बावरला, तिथून सटकलाच! डब्यातल्या सगळ्यांनी एकच कल्ला केला आणि सग्ळे जमले त्याच्या भोवती. आहे की नाही मज्जा?... हसलीस बाई एकदाची...!
बरं... चला खूप रात्र झाली. थोडं खाऊन घेतो... पुन्हा सकाळी 7.30 ची लोकल पकडायला हवी. तुझं काय बाई...! बरं, तू खाऊन घेतलंस ना... बरं झालं... चल!
----
तो उठला. त्यानं बॅग उघडली. बॅगेतून गजरा काढून तिच्या तस्बीरीसमोर ठेवला आणि जेवण-खाण्याचं बघायला किचनमध्ये निघून गेला...
...तस्बीरीतल्या हसऱ्या डोळ्यांनी त्याच्याकडे भरभरून पाहिलं... मोगऱ्याच्या गंधाबरोबरच आठवणींचा सुगंध खोलीभर दरवळत राहिला...! 

1 comment:

Suhas said...

सुंदर कथा , आवडली , मजा आहे तुमच्या लेखणीत येऊ दे अजून