Wednesday, November 4, 2009

घे भरारी...

वैताग आणलाय या चिमण्यांनी !
हिचा वैतागलेला स्वर कानावर पडला.
काय झालं? विचारत मी गॅलरीत गेलो; तर तेथे दोन चिमण्या चिवचिवाट करत इकडून तिकडं-तिकडून इकडं भरारत होत्या. त्यांच्या चिवचिवाटानं "ही' पुरती वैतागलेली. न राहवून हिनं त्या चिमण्यांना हुसकावलंच, तशी त्या तेथून जरा दूर पळाल्या.
असू दे गं! अशी तिची समजूत काढत मी तिला आत घेऊन गेलो (जाताना हिचा तोंडाचा पट्टा सुरूच) आणि चहाचा कप घेऊन पुन्हा गॅलरीत आलो. खुर्चीत पाय ताणवून बसलो आणि चहाचे घोट घेऊ लागलो. तेवढ्यात मघाच्या दोन्ही चिमण्या पुन्हा परतल्या. माझी कसलीच दखल न घेता पण माझ्यावर लक्ष ठेवून कोपऱ्यात अडकवलेल्या कपाटाच्या वरच्या बाजूस बसून काही तरी खुडबूड करू लागल्या. आता मात्र माझी उत्सुकता ताणली आणि मी दोन्ही चिमण्यांचं निरीक्षण करू लागलो.
एक चिमणी उडून जाई, चोचीतून काटक्‍या घेऊन येई, कपाटाच्या वरच्या बाजूस जाई, काहीबाही करीत बसे, तोपर्यंत दुसरी बाहेर राखण करी. आतलीचं काम संपलं की दोघं मिळून उडून जात आणि पुन्हा चोचीतून काहीबाही घेऊन येत.
अरेच्चा म्हणजे ही जोडी घरटे बांधणार तर!
यस्सऽऽऽ मी सुखावलो. माझ्या घरात नव्या पाहुण्यांनी केलेल्या घुसखोरीवर मी जाम खूश झालो.
आता छानसं घरटं तयार होणार... त्यामध्ये चिमणी अंडी घालणार... काही दिवसांनी त्या अंड्यांतून नवा जीव जग पाहणार... त्याला मोठे करण्यासाठी दोघी धडपडणार... चिमणचारा भरवणार आणि तो मला पाहायला मिळणार... त्याचं प्रत्येक घासासाठीचं आसुसलेपण पाहायला मिळणार... थोडं मोठं झालं की ते घरट्यातून उडू पाहणार... मग दोन्ही चिमण्या त्याच्या पंखात बळ भरणार... आणि एक दिवस आई-बाबांना मागं ठेवून ते उंच भरारी घेणार...
वाऽऽऽ हा सारा सृजनसोहळा माझ्या घराच्या गॅलरीत रंगणार... क्‍या बात है!
----------
""अहो, आंघोळीला पाणी काढलंय... येताय ना?''
हिच्या पुकाऱ्याबरोबर भानावर येऊन आत पळालो.
""एक रिक्वेस्ट होती!''
""बोला, काय?''
"ए त्या चिमण्यांना तिथून हुसकावू नकोस प्लीज ! हवं तर त्यांनी केलेली घाण मी स्वच्छ करतो. ''
"तुम्ही ना!''
तिच्या त्या लटक्‍या रागाबरोबरच मिळालेल्या होकाराने मी खूश.
------
आता माझं चिमणी निरीक्षण नेमानं सुरू झालं. आमच्या विश्‍वासावर "त्यांचं' इटुकलं घरकुल हळूहळू तयार झालं. माझा रोजचा चहा... त्यांच्या साक्षीने होऊ लागला आणि चिमण्यांनी केलेली घाण "ही' माझ्यावर डोळे मोठे करत साफ करू लागली. कधीतरी... "काय म्हणतात तुमचे लव्ह बर्डस्‌?' अशी विचारणाही ती करे; पण घुश्‍शातच केवळ माझ्यासाठी ती त्यांना सहन करीत होती.
एक दिवस दोन्ही चिमण्या नसताना त्या घरट्यात डोकावून पाहिलं तर दोन अंडी तेथे दिसली; मग तर मी त्या चिमण्यांची काळजी घेऊ लागलो. त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आणि थोडासा खाऊही ठेवू लागलो. मला वेध लागले बाळचिमण्यांचे.
-----
एक दिवस सकाळी-सकाळी, ""अहो उठा लवकर. ते पाहा तुमचे लव्ह बर्डस्‌ चार झालेत'' असे सांगत हिनेच मला "गुड न्यूज' दिली.
मी डोळे चोळत गॅलरीत आलो... तर घरट्यातून डोकावणाऱ्या छोट्या चोची दिसल्या आणि त्यांच्या चोचीत चोच घालून त्यांच्यावर माया करणाऱ्या चिमण्या पाहताना आनंदाने डोळ्यांच्या कडा ओलावल्या. नवजीवाच्या जन्माच्या आनंदसोहळ्याचे आम्ही साक्षीदार झाल्याचा आनंद आम्हीही साजरा केला. आता आम्ही दोघेही त्या जिवाच्या बाललीला पाहण्यात रंगून जाऊ लागलो.(हिचाही त्रागा काहीसा कमी झाला) आता त्यांचा चिवचिवाट आम्हाला हवाहवासा, आपला वाटू लागला.
----
एका रविवारी कामानिमित्त परगावी जाऊन आलो. सोफ्यावर डोळे मिटून शांत बसलो होतो. तेवढ्यात हिची गॅलरीतून हाक ऐकू आली.
""अहो इकडं या बघू...'' तिचा घाबरा स्वर ऐकून
""काय झालं गं?'' म्हणत मी तातडीने गॅलरीत पोहोचलो.
तिनं चिमण्यांच्या घरट्याच्या दिशेनं हात केला आणि छातीत धस्स झालं.
घरटं विस्कटलं होतं... खाली काड्या पडल्या होत्या... काही पिसंही पडलेली होती... आणि एका बाजूला एक पिलू निष्प्राण होऊन पडलं होतं आणि त्याला सर्व बाजूंनी मुंग्या डसल्या होत्या... दोन्ही चिमण्या जोरजोरात चिवचिवत होत्या... घरटे केलेल्या जागेजवळ जाऊन पुन्हा माघारी अशा भिरभिरत होत्या. पिलांच्या जाण्यानं त्या सैरभैर झाल्या होत्या... काळजाचा तुकडा हरवल्याचं दुःख सहन करण्याचा प्रयत्न करीत होत्या... पिलांच्या आठवणींनी त्या मोडलेल्या घरट्याजवळ पुनःपुन्हा जाऊन पिलांना शोधत होत्या.
माझा श्‍वास काहीसा जड झाला...
मी हिच्याकडं पाहिलं... तर चिमण्या आल्यादिवशी संतापलेल्या हिचे डोळे पाण्यानं काठोकाठ भरले होते.
-----
परवा सकाळी...
"अहो उठा पटकन'च्या हाकेनं जागा झालो.
""काय झालं?''
चला म्हणत तिनं मला ओढत गॅलरीत नेलं आणि तिनं बोट केलेल्या दिशेकडं पाहिलं. चिमण्या पुन्हा परतल्या होत्या आणि आमची दखल न घेता घरकुल बांधण्यात दंग झाल्या होत्या...

7 comments:

SUSHMEY said...

MASTACH

Ajay Sonawane said...

मस्त, आवडल एकदम !

भानस said...

prajkta चिमण्यांवर किती जीव जडला ना तुझा.:)जीवनात नाउमेद न होता पुन्हा नव्या आशेने उभे राहणे....त्या इवलाश्या जीवांना जे कळते ते कधी कधी आपल्याला...
खूप छान, भावले.

prajkta said...

सुषमेय, भानस, अजय
खूप खूप धन्यवाद. तुमच्या कौतुकाने अंगावर मुठभर मास चढते.

Unknown said...

kharach khup chan sir.....

शिनु said...

छान आहे तुझा ब्लॊग.
विठुरायाचा फ़ोटो तर केवळ अप्रतिम आहे. कुठे मिळाला हा?

prajkta said...

thank u shinu