Thursday, July 15, 2010

सलील (तुम्ही) खरंच "दादा' आहे



मला सही..मला सही ! करत हातात वह्या घेऊन गराडा घातलेल्या शंभरावर चिमुरड्यांच्या घोळक्‍यात तुम्ही परवा अगदी हरवून गेला होता आणि न थकता "स्वाक्षरी' देऊन त्या प्रत्येक चिमुरडीला आनंद वाटत होतात. (स्थळ कोल्हापुरातील एक शाळा)
त्या आधी तुम्ही त्याच मुलांवर तुमच्या स्वरांनी अक्षरशः गारूड घातलं होतंत ! म्हणूनच तर सही कशासाठी घ्यायची असते ही माहित नसलेल्या त्या गर्दीतील काही चिमुरड्यांनाही "सलीलदादाची सही' त्यांच्या वहीमध्ये हवीशी झाली. त्या गर्दीतूनच माझ्या छोट्याशा मैत्रीणीनेही अगदी ढकलाढकली करत, संयोजकांचा काहीसा ओरडा खात, दप्तर सांभाळत, खूप वेळ रांगेत उभे राहत तुमची सही मिळवलीच. सही मिळाल्यानंतर "ही बघा मी सलीलदादाची सही मिळविली' हे सांगतानाचा तिचा आनंद आणि चेहऱ्यावरची चमक वर्णनातीत. (असाच आनंद सही घेतलेल्या बहुतेक सर्व चिमुरड्यांच्या चेहऱ्यांवर होता) या आनंदातच मग आमची स्वारी घरापर्यंत तुमच्या सगळ्या कार्यक्रमाचे वर्णन ऐकवत राहिली; पण माझ्या डोळ्यासमोर तिचा फक्त तो आनंदलेला चेहरा आणि तुमचं मुलांत रंगून सह्या देणं एवढंच आठवत राहिलं.
गंम्मत बघा हं ! वर्षभरापूर्वी केशवराव भोसले सभागृहात तुमचा एक कार्यक्रम आम्ही पाहिला होता. त्या वेळी आमच्या छोट्या मैत्रीणीने तुमची सही घेतली होती. ती तिच्या संग्रही आहेच, तरीसुद्धा मैत्रीणींच्या सोबत सही मिळविण्याची तिची धडपड आणि ती मिळाल्यानंतरचा तिचा आनंद शब्दातीत. तुम्ही तेथूनच तिच्यासोबत खऱ्या अर्थाने आमच्या घरी "सलीलदादा' बनून पोचला.
---
तुमच्या स्वरांची मोहिनी अवघ्या महाराष्ट्राला आहे. तुम्ही सादर केलेल्या कविता, गाणी ऐकवूनच आम्ही आमच्या प्रेमाचे, मायेचे, मैत्रीचे धुमारे रुजविले आणि फुलविले. त्याचे काही संस्कार चिमुरड्यांवर केले आणि त्याचे फळ म्हणजे आज तुमची गाणी त्यांना आत्ताच भारून टाकत आहेत. हे निर्विवाद तुमचे आणि संदीप खरे यांचे यश. यश मिळाल्यानंतर माणूस माणसांत मिसळण्याचे टाळतो असे ऐकले होते; पण त्यालाही तुम्ही परवाच्या कृतीने छेद दिलात. चिमुरड्यांच्या गर्दीत तुम्ही त्यांचे "सलीलदादा' बनून राहिलात न थकाता न टाळता त्यांना आनंद वाटत राहिलात म्हणून लिहावं वाटलं. मनापासून वाटतं तुम्ही असेच "दादा' बनून रहा. (थोडं त्रासाचं जरूर आहे.)

स्वान्त सुखाय!

3 comments:

Yogesh said...

प्रा...संदीप अन सलील खरोखर "दादा"च आहेत...प्रत्येक गाण अन त्याच संगीत खुप सुख देउन जात.

Vijay Deshmukh said...

खरय .. एखादा व्यक्ती माणुस म्हणुन चांगला असला ना की त्याचा प्रत्येक पैलु आपल्याला भावतो...

vinski said...

Nice thoughts