
भारतीय फलंदाजी आणि सलमान खान यांच्यामध्ये सर्वात मोठे साम्य कोणते असेल? दोघेही प्रचंड बेभरवशाचे. सलमान कधी शर्ट काढून सिक्स पॅक्स दाखवेल सांगता येत नाही आणि भारतीय फलंदाजी भक्कमपणे वाटचाल करत आहे, असे वाटत असताना कधी कोसळेल याचा नेम नाही. नॉटींगहॅमला दुसऱ्या कसोटीच्या शनिवारी दुसऱ्या दिवशी पहिल्या दोन सत्रांमध्ये इंग्लंड गोलंदाजीवर वर्चस्व गाजवून मोठी आघाडी मिळविण्याची स्वप्ने पाहणारी भारतीय फलंदाजी चहापानानंतर काही वेळात पत्त्याचा बंगल्याप्रमाणे कोसळली आणि पदरात पडली नाममात्र आघाडी. ज्या ब्रॉडला पहिल्या दोन सत्रांमध्ये द्रविड, लक्ष्मण आणि युवराज यांनी रट्टे दिले, त्या ब्रॉडची उधारी चुकती करायची असल्यासारख्या विकेटही टाकल्या. पाच बाद 267 धावा अशा भक्कम स्थितीतील संघ 288 मध्ये माघारी परतला होता. अवघ्या 21 धावांत पाच फलंदाज "तू आधी का मी आधी' अशा पद्धतीने भोंज्या शिवल्यासारखे मैदानावर जाऊन माघारी आले. फलंदाजीवेळी बॅट घेऊन आडवा आलेला ब्रॉड गोलंदाजी करताना अंगावर धाऊन आला. त्याला मग शिंगावर घेण्याची हिम्मत ना द्रविडला दाखवता आली ना युवराजला. रैना, सचिन, कर्णधार धोनी, हरभजन, प्रवीणकुमार आदींनी रजा पडू नये, म्हणून ज्याप्रमाणे मस्टरवर सही करून ऑफिसमध्ये उपस्थिती दाखवतात तशी येऊन हजेरी लावली. फलंदाजी केल्यासारखं दाखविलं आणि पुन्हा पॅव्हेलियनची वाट धरली. विक्रमादित्य सचिनचा बॅड पॅच शनिवारीही सुटला नाही. तो तिसऱ्यांदा ब्रॉडचा गिऱ्हाईक झाला. ब्रॉडने लॉर्डस्च्या खेळपट्टीप्रमाणे नॉटींगहॅमच्या खेळपट्टीलापण स्विंगचे अमिष दाखवून वश करून घेतले आणि कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रीक नोंदविण्याची कामगिरी लिहिली. पडझड सुरू असताना खेळपट्टीवर नांगर टाकून शतक झळकावणारा आणि भारतीय फलंदाजीला आघाडीचा किनारा दाखविणाऱ्या राहुल द्रविडनेही (117)
आता बास झालं करत बॅट फिरवली आणि चेंडूने त्याला बरोबर गंडवले. संयम सुटला आणि त्याचा खेळ संपला. त्यापूर्वी त्याने युवराजबरोबर कामगिरी चोख बजावली खरी; पण अल्पसंतुष्टपणे त्याच्या माघारी जाण्याने या कसोटीवर वर्चस्वाची मोठी संधी भारताने गमावली ती गमावली. युवराजने अर्धशतकी (65) खेळी केली खरी पण अजूनही त्याला कसोटीसाठीचा संयम राखता येत नाही हे दिसून आले अर्थात ब्रॉडने त्याला टाकलेला चेंडूही तसाच अफलातून होता.
ज्या खेळपट्टीने वाकुल्या दाखविल्या त्याच खेळपट्टीला ब्रॉडने स्वींगने गुलाम बनविले. चेंडूला वेग देतानाच त्याने चेंडू फलंदाजाच्या बॅटपासून हळूच बाहेरही काढला. इनकटर आणि इनस्विंगचे शस्त्र त्याने वापरले आणि एकाच षटकात नाट्य घडवून भारतीय फलंदाजी कापून काढली. 46 धावांत सहा बळी घेत आपली भेदकता सिद्ध केली हे जसे खरे आहे, तसेच भारतीयांनी त्याच्या चेंडूचे अंदाज न घेता अत्यंत बेजबाबदार फटके मारले हे ही तितकेच खरे.