
आज (ता. 21) सकाळी लॉर्डस्च्या हिरवळीवर भारत आणि इंग्लंड संघातील खेळाडू पाय ठेवतील तेव्हा क्रिकेटच्या इतिहासातील आणखी एक सुवर्णपान लिहिलं जाईल. 2 हजाराव्या कसोटीमध्ये वर्चस्वासाठी दोन्ही संघ आमने-सामने उभे ठाकतील तेव्हा या ऐतिहासिक घटनेसोबत धोनीब्रिगेड आणि स्ट्रॉस सेना आपसुक जोडली जाईल. सायबांना त्यांच्याच घरात पराभवाचे खडे चारण्यास धोनीसेना उत्सुक असताना प्रत्यक्ष लॉर्डस्वर उपस्थित राहून तसेच दूरचित्रवाणीच्या माध्यमातून कोट्यवधी क्रिकेटरसिक या क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील.
15 ते 19 मार्च 1877 मध्ये पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर गेली 144 वर्षे क्रिकेटच्या मैदानावरील हा सिलसिला अखंड सुरूच आहे. या प्रवासात क्रिकेटमध्ये आमुलाग्र बदल घडला असून आणि यापुढेही घडण्याची नांदी होऊ घातली आहे. कसोटी सामने दिवस-रात्र खेळविण्याविषयी गांभीर्याने चर्चा सुरू आहे. एकदिवसीय सामन्यांमुळे कसोटी क्रिकेटची लोकप्रियता काही प्रमाणात कमी झाली असली तरी गेल्या काही वर्षांत कसोटी सामने निकाली होऊ लागल्याने पुन्हा एकदा प्रेक्षक या सामन्यांकडे वळू लागला आहे. कसोटी खेळणे म्हणजेच क्रिकेट खेळणे ही भावना अद्यापही क्रिकेटपटूंमध्ये दृढ असल्याने कसोटी क्रिकेट जिवंत राहणार हे नक्की.
भारत आणि इंग्लंड यांच्यात शंभरावी लढत होत असताना इंग्लंड भूमीवर भारतीय संघाची कामगिरी म्हणावी तशी बहरलेली नाही. पंधरा लढतींपैकी अवघी एक लढत जिंकण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला आहे, तर दहा पराभव पदरी पडलेत. तर 99 पैकी 19 लढतींमध्येच भारतीय संघ विजय मिळवू शकला आहे. इंग्लंडने 34 विजय मिळवताना 46 लढती अनिर्णित राखल्यात. सध्या भारतीय संघ कसोटी क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी आहे. कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली इतिहास बदलण्यासाठी हा संघ उत्सुक आहे; मात्र स्ट्रॉसच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाविरुद्ध त्यांच्याच मैदानावर खेळताना धोनीसेनेचा कस लागणार आहे हे नक्की.
लॉर्डसवर सचिन मोका साधणार?
ही कसोटी जशी ऐतिहासिक आहे. तसेच क्रिकेटच्या पंढरीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कारकिर्दीतील शंभरावे शतक झळकावून मणिकांचन योग साधण्यात यशस्वी होणार का, याकडेही क्रिकेटरसिकांचे लक्ष लागलेले आहे. यापूर्वी या मैदानावरील त्याची कामगिरी जरी सुमार असली तरी हा भूतकाळ पुसून हा मोका साधण्याचा प्रयत्न सचिन नक्कीच करेल अशी आशा आहे.
1 comment:
इंग्लंड व आपल्या संघास( जरा जास्तीच ;) ) अनेक शुभेच्छा! पाहुया ही आकडेवारी कशी बदलते ते. आणि सचिनच्या शतकाची आशा आहेच.
Post a Comment