Wednesday, August 27, 2008

शब्दातीत

शब्दातीत
का कोणास ठावूकतू समोर आलीस आणि आजशब्दांनी मनात फेर धरला !तशी तू रोजच भेटतेस, कधी प्रत्यक्ष... कधी अप्रत्यक्ष,कधी अस्पर्श, कधी स्पर्श भरून...कधी तशीच...आज तू भेटलीस...वेगळीच भासलीस...तारा छेडल्याच...मग कुठून सुरू करू?सारे मला शब्दप्रभू म्हणतात पण... सालं आज शब्दच फितूर!पण तरीही कविता करायची इच्छा आहेच.तुझे भुरभुरणारे केस...थरथरणारे ओठ...गुलाबी गाल...भाव विभोर का काय म्हणतात ते डोळे...सारं सामावून घेणारी नजर...च्या मारी सुचायला लागलं की,पण किती दमछाक !जावू दे... कशाला गुंतून पडाउपमा, अलंकार, विशेषणात...सौंदर्य अनुभवायचं सोडूनमी विडावलोयते शब्दांत पकडायला...पण खरं सांगूअवखळ वारा...उधाणलेला दर्या......आणि बेलगाम मन...कधी मावलंय का शब्दांत.तू ही तशीच अमर्याद...शब्दातीत

Friday, August 1, 2008

ती...

ती...
भुरभुरणारा पाऊस झेलत मी क्षितीज न्याहळत उभा. कलू लागलेल्या सूर्याच्या साक्षीने हाताशी वाफाळलेला गरम चहा आणि नाकाशी गाड्यावरच्या गरम भज्याचा रेंगाळलेला खमंग स्वाद. हिरवाईला साद घालत चिंब टेकड्या. थेंबांचे सगेसोयरे एकमेकांच्या हातात-हात घालून प्रवाही होऊन निघालेलेले अवखळपणे सरीतेच्या भेटीला. डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या करीत मी सारं पहात उभा, हाताशी गरम चहा आणि विचारांची मैफल स्टॅंडींग.तंद्री भंगली मोबाईल रिंगने...पाहिले, अंदाज खरा ठरला, तिचाच होता.ती ः तू कुठायस? काय करतोयस? आपलं ठरलं होतं ना? पाऊस पडतोय? तू भिजतोयस? रेनकोट घातलास? बाईकवर आहेस?मी ः थोडा श्‍वास घे!!! घेतलास हां आता विचार उरलेले प्रश्‍न !ती ः चेष्टा करतोस? मी आलेय, तू केव्हा येणार? माझी छत्री? तू काही खाल्लस? चहा तरी पिलास? ऑफिसातून बाहेर पडलास?.... पुन्हा प्रश्‍नच.मी ः तुझे प्रश्‍न संपलेत? पलीकडून तिची बडबड...चिंब भिजून मी कोरडाच. का? कोणास ठावूक! कानावर शब्द तिचे आत द्वंद माझेच.ती ः तुझं लक्ष नाही का? मी बंद करू का? हल्ली तू मला टाळतोस!मी ः ए वेडाबाई चल काही तरीच काय? (तू मला टाळतोसच्या वाक्‍यासरशी मी अगदी भानावर. हिरवाई गायब, खमंग स्वाद गायब, सरीतेच्या भेटीने निघालेले प्रवाह गायब. द्वंद बंद. कान तिच्या शब्दांकडे आणि हातात चहा व डोक्‍यात विचारांची बदललेली मैफल स्टॅंडींग.ती ः एक काय झालं? सॉरी ! दुखावलास? तुला "हर्ट' नव्हतं रे करायचं! पण...मी ः छे गं! मीच सॉरी. माझं लक्ष नव्हतं. पण काय?माझ्या त्या पण काय? वर बहुधा तिच्याही डोक्‍यांत विचारांचं काहूर माजलं असणार. (मायला माझी ती विचारांची मैफल, तिचे विचार ते काहूर?)ती ः तू भिजलायस का? (विषय बदलला)मी ः तुला कसं कळलं?ती ः मला कळतं सारं !!! मी तिथेच आहे.मी ः काय???( मी मोठा आ वासतो. माझी नजर तिच्या अस्तित्वाच्या शोधात भिरभिरते)ती ः मला शोधलसं? (तिच्या हसण्याचा खळखळाट आणि मन माझे चिंब...चिंब...) मी ः हो... (मी इनोसंटली बोलून गेलो...पण हिला कसं कळलं? च्यायला एवढ्या झकास वातावरणातही विचार आहेतच )ती ः काय झालं? कुठे हरविलास?मी ः ए मी फोन बंद करतो...दहा मिनिटांत पोहोचतो.ती ः प्रॉमीस! मी ः एस माय डियर!ती ः आता छान वाटलं. ये सावकाश. वाट पाहतेय तुझी...मग ठरवू...(अगदी लहान मुलासारखां वागतो हा काही वेळेस)फोन बंद. माझी मैफल पुन्हा रंगात. केवढे प्रश्‍न मघाशी तिने अधीरपणे विचारले. आता एकदम माघार. खरंच लवकर पोहोचायला हवं. पावसाला सोबतीला घेऊनच तिला गाठावं. एखादा गजरा घ्यावा का तिला? किती मुर्ख मी.घेतोच. फुलुन येईल चेहरा तिचा. लगेच माळेल गजरा; मग तिच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपताना माझी धांदल उडणार. उडू दे तिच्या मारी. माझ्या आयुष्यात समाधानाची फुले फुलविण्यासाठी तीच तर आहे; मला माझ्यापेक्षा तीच तर जास्त ओळखते. म्हणून तर एवढे प्रश्‍न विचारते!मी नशिबवान. ती बायको बनलीच नाही कधी. नेहमीच बनली माझी सखी, मैत्रीण, प्रेयसी आणि खूप काही. च्यायला हातात चहा, मैफल स्टॅंडीगंच!