Thursday, June 2, 2022

पाऊस २ जूनचा...


------------------
दिवस आजचाच (२ जून) पंधराएक वर्षांपूर्वीचा...
...उन्हानं काहिली झालेल्या जीवाला भरून आलेल्या आभाळाचं मोठं अप्रूप असतं...केव्हा एकदा ते विजांची नौबत देत...थेंबांच्या टिपऱ्या खेळू लागेल आणि चिंब मन कधी एकदा त्या थेंबांचा नाद अंगाखांद्यावर मिरवेल, असं होऊन जातं...
त्यादिवशी असंच झालेलं...उन्हं कलता कलता काळवंडून आलेलं...आकाशाची निळाई गायब होऊन त्यावर काळ्या-करड्या ढगांच्या नक्षीचे एकेक अलंकार एकामागोमाग एक उमटून येत होते...पावसाचा सांगावा घेऊन आलेले ते ढग रिते होण्याच्या वाटेवर वेगाने दौडत होते....
त्याने अंदाज घेतला आणि तिला साद घातली...पहिला पाऊस अनुभवायचा...
...तीही त्याच्यासारखीच...त्याच्या हाकेची वाटच पाहत होती...भेटायचं ठरलं...आणि पुढच्या काही मिनिटांत ठरलेल्या ठिकाणी दोघांची भेट झाली...अजून ढगांतील थेंबांनी त्यांची साथ सोडलेली नव्हती...तोवर त्याने गाडीला वेग दिला...तिच्यासोबतचा पन्हाळ्यावरचा पाऊस त्याला अनुभवायचा होता...गाडीने वेग घेतला आणि अवघ्या काही मिनिटांत वाऱ्याच्या झोतांबरोबर इतका वेळ स्वतःला सावरून बसलेले थेंब मातीच्या ओढीने झेपावू लागले...तड तड ताशे वाजू लागले...मधूनच लख्खकन् चमकणाऱ्या विजेच्या प्रकाशात ओला रस्ता...ओली झाडे वेगळीच भासत होती....पावसाने फेर धरलेला आणि पन्हाळा जवळ येत होता...छत्र्या सावरणारे दिसत होते...
पहिल्या पावसात ओसंडून वाहणारा पन्हाळा...रस्त्याच्या दोहो बाजूंनी खळाळत वाहणारे मातकट..केशरी प्रवाह...घरांच्या भरून वाहणाऱ्या पागोळ्या...कोठेतरी फुललेल्या निखाऱ्यावर भाजली जात असलेली कणसे...त्याचा खमंग असा वास...चहाच्या टपऱ्यांवर उकळणारा चहा...घरांच्या भिंतीचा आधार घेऊन पावसापासून बचावाचा केविलवाणा प्रयत्न करणारी माणसे...आणि पाऊससरींमध्ये मनमुराद चिंब भिजत पावसाला मिठीत घेण्याचा प्रयत्न करणारी त्याच्यासारखी अनेक वेडी...
.....हे सगळं तिच्यासोबत अनुभवताना आयुष्याचा अर्थ नव्याने पुन्हा एकदा त्याला गवसू पाहत होता....तिच्या सहवासाचा प्रत्येक क्षण तो मनाच्या कुपीत एकापाठोपाठ एक रजिस्टर करत होता....सरी बरसत होत्या....सहवासाच्या प्रवासात तो अंतर्बाह्य चिंब होत होता...
--------------------
दिवस आजचाच (२ जून) २०२२...
आजही असंच झालं...उन्हं कलता कलता काळवंडून आलं...आकाशाची निळाई गायब होऊन त्यावर काळ्या-करड्या ढगांच्या नक्षीचे एकेक अलंकार एकामागोमाग एक उमटून येऊ लागलेले...पावसाचा सांगावा घेऊन आलेले ते ढग रिते होण्याच्या वाटेवर वेगाने दौडू लागले होते....
नेमकी आज त्याला सुटी होती...दुपारची वामकुक्षी जराशी लांबल्याने तो अजूनही बेडवर जडावलेल्या डोळ्यांनी लोळत पडलेला....
वाऱ्याच्या झोतांबरोबर...ढगांतील थेंब मातीच्या ओढीने झेपावू लागले...तड तड ताशे वाजू लागले...मधूनच गर्जत वीज लख्खकन् चमकली...त्याने अंदाज घेतला...तिला साद घातली...पुन्हा एकदा गाडी काढून यंदाचा पहिला पाऊस अनुभण्याची अनिवार इच्छा त्याला झाली...
...तीही त्याच्या हाकेची जणू वाटच पाहत होती...त्याने हाक देताच....ती अगदी धावत आली...
...उठलात बरं झालं...ती म्हणाली
हो...म्हणत त्याने तिच्याकडे पाहिले...
ती हातात खराटा घेऊन उभी...पदर खोचलेला...केसांचा आंबाडा बांधलेला...अंगावरील साडी अर्धवट भिजलेली...आणि ती बोलली...ती बोलली तशी तो रंगलेल्या मनोराज्यातून धाडकन् संसाराच्या जमिनीवर लँड झाला....ती एवढेच म्हणाली....बरं झालं उठलात...पटकन् चला...पाऊस ओततोय...पाणी खिडक्यांतून, टेरेसवरून घरात यायला लागलंय...बहुतेक टेरेसचा नळा तुंबलाय...त्यामुळे पाणी जात नाही...माझा एकटीचा जीव घाईला आलाय...आणि तुम्ही कुंभकर्णासारखे झोपलाय...मनाने उठाल असे वाटले होते...पण कसचं काय...पटकन् या आणि पाणी बाहेर काढायला मला मदत करा...
...तो यंत्रवत उठला....खराटा हातात घेऊन टेरेसकडे निघाला आणि मनःपटलावरील पन्हाळा हळूहळू धूसर होऊ लागला...