Thursday, April 22, 2010

एक वही संस्काराची


चिमुकल्यांच्या इवल्याशा हातांतून पाटीवर किंवा वहीवर "श्री' साकारतो आणि शिक्षणाचा श्रीगणेशा होतो. पहिले वहिले अक्षर उमटते आणि आयुष्याचे चित्र हळूहळू आकारू लागते. हे चित्र ज्याच्या त्याच्या वकुबाने रंगत जाते. अनेकांच्या आयुष्यात हे चित्र खूपच रंगीन, मनोवेधक, सुंदर आणि सकारात्मक असते, तर काहींच्या आयुष्यात हे चित्र फिके, रंगहीन आणि अर्धवटही राहते. मात्र, अगदी सुरवातीलाच पहिला श्री साकारतानाच जर हाती वही सोपवणारा जर संस्कारक्षम असेल, तर मग त्यांच्या आयुष्याचे चित्र नक्कीच उठावदार होते.
राजकारणात अलीकडे अपवाद वगळता अशी संस्कारक्षम, अभ्यासू आणि दूरदृष्टीने विचार करणारी आणि त्याप्रमाणे वागणारी व्यक्तिमत्त्वे अभावाने आढळतात. मुळातच अलीकडे राजकारण म्हणजे चिखलफेक, एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढणे आणि स्वतःचे उखळ कसे पांढरे होईल हे पाहणे हीच संस्कृती बनली आहे. अनेक जण या संस्कृतीचे पाईक बनले आहेत. अशा वेळी काही व्यक्तिमत्त्वांची वाटचाल वेगळ्या वाटेवरून होताना पाहणे हे वाळवंटातील मृगजळ भेटण्यासारखे आहे. कोल्हापुरातील तरुण आमदार सतेज पाटील हे तसे पक्के राजकारणी; पण त्याबरोबरच त्यांनी काही संस्कारक्षम बाबी स्वतःच्या अंगी बाणविलेल्या आहेत. एरवी राजकारणावेळी राजकारणच करणाऱ्या सतेज यांनी गेल्या काही वर्षांत आपल्या वाढदिनी भेट म्हणून वह्या स्वीकारण्याचा सुरू केलेला उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आणि अनुकरणीय असा आहे. त्यांच्या समवयस्क लोकप्रतिनिधींकडे अशाप्रकारचा संस्कारक्षम उपक्रम राबविण्याचे वेगळेपण अभावानेच दिसते. वह्या गोळा करणे आणि त्या पुन्हा होतकरू विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या शिक्षणाला गती देण्याचे महत्त्वपूर्ण काम ते करीत आहेत. विशेष म्हणजे सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी काही वेळा असे उपक्रम सुरू केले जातात आणि कालांतराने ते केव्हा बंद पडतात, हे समजतही नाही; मात्र सतेज यांनी होतकरू विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सुरू केला आणि गेली कित्येक वर्षे तो सातत्याने राबविला आहे. सुरवातीला एक वेगळा उपक्रम म्हणून वह्या जमा होत होत्या; पण आता मात्र त्यांच्यावरील विश्‍वासाने या वह्या जमा होत आहेत, हे विशेष. यंदाच्या त्यांच्या वाढदिनी पाच लाखांवर वह्या जमा झाल्या. विशेष म्हणजे यामधील काही वह्या या छोट्या दोस्तांनी आपल्या खाऊचे पैसै बाजूला काढून ठेऊन आणून सतेज यांच्याकडे मोठ्या विश्‍वासाने दिल्या आहेत म्हण
जेच छोट्या दोस्तांमध्ये संस्कार रुजविण्यात ते यशस्वी ठरले आहेत.
कोल्हापूरच्या परोपकारी प्रतिमेला धरूनच सतेज यांचे एकूण वर्तन आहे; मात्र आता त्याही पुढे एखादे पाऊल त्यांना टाकावे लागेल. कोल्हापूरला विकासाच्या वाटेवर नेताना अनेक सक्षम हातांना काम मिळावे, यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून ठोस प्रयत्न करण्याची अपेक्षा आहे. राजकारणाबरोबरच समाजकारण करताना अनेक संसार उभे करण्याचे, सावरण्याचे श्रेय त्यांनी मिळवावे. राजकारणात त्यांना राजकारण करावेच लागेल; मात्र त्याचबरोबर समाजकारण करताना घेतलेला वसा न टाकता तो आणखी प्रगल्भपणे कसा विस्तारत नेता येईल, हे पाहावे. तरुणांची फळी राजकारणासाठी उभी करतानाच त्यांच्या हाताला काम देऊन त्यांची कुटुंबे सावरण्याचेही काम त्यांना करावे लागणार आहे. ते तरुण आहेत. विकासाची दृष्टी त्यांच्याकडे आहे. तिचा उपयोग कोल्हापूरच्या विकासासाठी ते नक्कीच करतील. येथील तरुणांना सोबत घेऊन विकासाच्या पायवाटेचा ते महामार्ग बनवतील आणि कोल्हापूरचे स्थान जगाच्या नकाशावर ठळक बनवतील असा विश्‍वास वाटतो. वाढदिनी मिळणाऱ्या प्रत्येक वहीतून त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्यावर केलेले संस्कार नक्कीच ते घराघरांत पोहचवतील आणि संपन्न कोल्हापूर, संपन्न महाराष्ट्र घडविण्यात मोलाचा वाटा उचलतील. राजकारणाबरोबच समाजकारण करून ते आगळेवेगळे नेतृत्व म्हणून उदयास येतील आणि तसे त्यांनी यावे कारण तो त्यांचा हक्क आहे. त्यांच्या अशा वेगळ्या उपक्रमांमध्ये सातत्य रहावे हीच अपेक्षा.