गाडीचा हॉर्न वाजला आणि "ती' कानात वारं भरल्यासारखं पळत सुटली. माडीच्या पायऱ्या धाड-धाड उतरत अवघ्या काही सेकंदात ती रस्त्यावर पोहोचली.
"अगं पडशील जरा हळू!' हे अम्माचे शब्द तिच्यापर्यंत पोहोचलेही नाहीत.
खाली "तो' बाईकवर तिची वाट पाहत उभा होता. त्याने दिलेला गुलाबांचा गुच्छ हातात पकडत ती पटकन बाईकवर बसली. बाईकने वेग घेतला आणि त्या गल्लीतून बाहेर पडली. त्याच्या पाठीमागे बसून जाताना तिच्यासाठी स्वर्ग दोन बोटं उरला होता. गाडी हळू-हळू वळण घेत शहरातून बाहेर पडली आणि दोघांतील संवाद आकारू लागला.
तो ः कशी आहेस?
ती ः कशी दिसतेय? तिचा प्रतिप्रश्न.
तो ः थोडी खराब झाली आहेस? (तिनं नुसतं हूँ केलं)
ती ः तू कसा आहेस?
तो ः एकदम मस्त आणि आज तू भेटल्यामुळे तर एकदम मुडच मुड.
ती ः आजचं प्लॅनींग काय?
तो ः आज व्हॅलंटाईन डे ना! जाऊ नेहमीच्या ठिकाणी, मस्त गप्पा मारू, रात्री छानसं जेवण घेऊ.
ती ः मी याच दिवसाची तर वाट पाहते. नव्हे त्या साठीच जगते!
तो ः तर..तर कोणी ऐकेल तर काय म्हणेल...! बरं तू काही शॉपींग करणारेस?
ती ः नाही, मला आज फक्त तुझा सहवास हवा बाकी काहीही नको.
तो ः ओके डिअर....
....त्याने गाडीचा वेग वाढविला. तासाभरात दोघांचं फेवरीट ठिकाण आलं! सकाळचे दहा वाजत आलेले असूनही "त्या' टेकडीवरून खाली पाहिलं तरी दाट धुक्यामुळं फारसं काही दिसत नव्हतं. त्याने गाडी त्यांच्या ठरलेल्या झाडाखाली लावली. सॅकमधून चटई काढली, झाडाखाली अंथरली आणि तिच्या मांडीवर डोकं ठेऊन छानपैकी ताणून दिली. ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवत राहिली आणि पुन्हा संवादांना जाग आली.
तो ः कशी आहेस?
ती ः आत्ता खरं तर खूप खूष आहे. तू सोबत आहेस ना ! 364 दिवस वाट पाहिल्यानंतर आजचा दिवस उगवतो आणि मग अक्षरशः पिसाटल्यासारखं होतं. काल रात्रीपासून आजच्या सकाळचे वेध लागले होते. मघाशी जेव्हा तुझ्या बाईकवर मागे बसले तेव्हा सारं जग मुठीत आल्यासारखं वाटलं! आपण एरव्ही का भेटत नाही?
तो ः झालं! दरवर्षीप्रमाणे पुन्हा तोच प्रश्न विचारलास? आणि तुला माझं उत्तर माहित आहेच. जाऊ दे अम्मा त्रास देते?
ती ः फारसां नाही. वर्षभर तिचं ऐकते; मग आज ती मला काहीही म्हणत नाही. बरं तुझी तब्येत कशी आहे?
तो ः "वेल अँड गुड' हल्ली काम जास्त झालं की थकवा जाणवतो.
ती ः औषधं घ्यावीत. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये.
तो ः तू आणि तुझा सहवास हेच माझं टॉनिक.
ती ः चल काहीतरीच!
तो ः लाजलीस...हाय कलेजा खल्लास झाला!
----
संवादांचे मळे फुलत राहिले आणि दिवस यथावकाश मावळतीकडे झुकलां. बाईकने पुन्हा शहराच्या दिशेने धाव घेतली. छानशा रेस्टॉरंटमध्ये दोघांनी मस्तपैकी जेवण घेतलं. दिवसभराचा प्रत्येक क्षण एकमेकांच्या सहवासात दोघेही आसुसून जगले आणि निरोपाची वेळ आली.
----
बाईक माडीखाली येऊन उभी राहिली. ती उतरली. त्यानं तिचा हात हातात घेतला.
तो ः पुढच्या वर्षी भेट होईल असं वाटत नाही ! समजा काही घडलंच तर मित्र तुला फोन करेल. जमलंच तर येऊन जा!
ती ः म्हणजे?
तो ः डॉक्टरांचं म्हणणं शेवटची स्टेज सुरू आहे. बहुधा महिनाभरच हातात आहे. माझी इच्छा होती फक्त आजचा दिवस मिळावा आणि आज मी तुझ्या सहवासाचा आनंद आकंठ घेऊन जात आहे. जगलोच तर पुढच्या वर्षी भेटूच....नाहीतर फोन येईलच. बाय....
....एवढं म्हणून त्यानं एकदा दिला डोळे भरून पाहून घेतलं. ती काही म्हणण्यापूर्वी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवून तो निघूनही गेला.
------
जाणाऱ्या बाईकडे पाहत ती मटकन खाली बसली...दिवसभरात एकाही शब्दानं बोलला नाही. कशी तरी बाजूला जाऊन ती माडीच्या पायरीवर बसली आणि भूतकाळ समोर उभा राहिला. पाच वर्षांपूर्वी एचआयव्ही तपासणी कॅंपमध्ये भेटला. किती भरभरून बोलत होता. त्याचं ते बोलणंच आपल्याला आवडलं. आपणहून त्याच्याकडे ओढली गेले. खोलीवर बोलावल्यावर आला. अगदी भरभरून बोलला. बोलताना त्याला चुकीचे रक्त मिळाल्याने एचआयव्ही झाल्याचं समजले; पण सारं विसरून तो जगण्याशी लढतोय आणि इतरांनाही बळ देतोय हे पाहून त्याचा कित्ती हेवा वाटलां. भेटीतून दोघांत प्रेम वाढलं; एकदा अचानक प्रकृती बिघडल्यावर मी अगदी धावत पळत त्याच्याकडे गेले. त्या वेळी त्याने विचित्र अट घातली. "माझ्यावर प्रेम करीत असशील तर वर्षात फक्त एकदाच भेटायचं ते ही "व्हॅलंटाईन डे' ला कारण आपली पहिली भेट त्याच दिवशी झाली होती. त्यानंतर वर्षाचे 364 दिवस वाट पहायचे आणि एक दिवस त्याच्या सोबतीनं जगायचं सुरू झालं...
---
तिनं डोळे पुसले...हळू-हळू माडीच्या पायऱ्या चढून खोलीपाशी आली. अम्मा होतीच.
"कसा गेला दिवस?'
"छान' एवढंच उत्तर दिलं आणि ती आतल्या खोलीत गेली. कपडे बदलताना त्याच्या सहवासाचं सोबत आलेलं अत्तर क्षीण होत गेलं; मात्र सगळा दिवस मनात खोलवर रूतून बसला.
अम्माचे शब्द कानावर पडले, "अगं उद्या रात्री तो शेठ भिकूमल येणार आहे' त्याला खूष कर! दहा हजार देणार आहे. मी ऍडव्हान्स घेऊन ठेवलाय.
-------
"हूँ' म्हणत तिनं लाईट घालविली. आजचा मयूरपंखी दिवस खऱ्या अर्थाने जगल्यानंतर आता ती 364 दिवस रोजच्या मरणाला सामोरे जाणार होती.
Saturday, February 13, 2010
Friday, February 5, 2010
धुके दाटलेले
कधी नव्हे ते डोळ्यांना सकाळी लवकरच जाग आली. (तसे आम्ही सूर्यवंशी. साधारण साडे दहा-अकरा हीच उठण्यासाठी आदर्श वेळ अशी आमची ठाम धारणा) डोळे चोळत टेरेसवर आलो आणि सेकंदात झोप उडाली. टेरेसवरून पुढील चार फुटांवरील काहीही दिसत नव्हतं. रात्री झोपेपर्यंत तरी समोर इमारती होत्या हे आठवत होतं. आत्ता मात्र गायब... मग लगेचच लक्षात आलं, अरे हा समोरचा शुभ्रधवल पडदा आहे धुक्याचा. गेले काही दिवस धुकं पडत असल्याचं फक्त ऐकलं होतं, आज लवकर उठल्यामुळे ते पहायला मिळालं एवढंच.
धुकं पाहण्याचा कौटुंबिक सोहळा चहा घेत उरकला आणि गाडीवर मांड ठोकली. गच्च धुक्याने भवताल भरून गेलेला असल्यामुळे अगदी आस्ते-आस्ते आमची सवारी सुरू झाली. अगदी चार फुटांवरीलही दिसत नसल्याने गाडीच्या लाईट लागलेल्याच होत्या. समोरून येणारे बिचकत, अंदाज घेत मार्गक्रमण करीत होते. हळू-हळू आम्ही रंकाळा गाठला. रंकाळ्याच्या अगदी काठावर उभा राहिलो तरी रंकाळ्याचे अस्तित्वच जाणवत नव्हते. अवघ्या रंकाळ्याला धुक्यांनी कवेत घेतलं होतं. रंकाळ्याचे एरव्ही काठाशी सलगी साधणारे पाणीही आज स्तब्ध भासत होतं, बहुधा त्यालाही धुक्याने घट्ट मिठीमध्ये सामावून घेतलं असावं. एरव्ही काठाच्या एका बाजूवरून दिसणारा शालीनी पॅलेस धुक्यात विरघळून गेल्याचा भास होत होता. फिरायला आलेले नेहमीच्या रस्त्यावरूनही अंदाज घेत फिरत होते. धुक्याचे लोटच्या लोट येऊन वातावरण आणखी गहिरं करत होते. जणू ढगांचे पुंजके धरतीच्या भेटीला आलेत असंच वाटत होतं. अनेक उत्साही तरुणांचा या पुंजक्यांना पकडण्याचा अपेशी प्रयत्न चाललेला. काय धुकं पडलंय नाही आज! असं ओठांचा चंबू करत काही चर्चेत रंगलेले. छोट्या दोस्तांच्या डोळ्यांच्या बाहुल्या धुक्यांचे कण बालमुठींत साठवताना भिरभिरत होत्या. झाडेही आधाशासारखी दवबिंदू टिपून तजेलदार बनू पाहत होती. सारी सृष्टी धुक्यांत न्हाऊन निघालेली. हे मोहक रुपडं डोक्यांत घट्ट करीत घराचा रस्ता धरला. घरी पोहोचेपर्यंत बऱ्यापैकी धुकं कमी झालेलं.
...घरी आलो. पुन्हा टेरेसवर पोहोचलो. आता सारां परिसर स्वच्छ दिसत होता. सगळ्या इमारती जागच्या जागीच होत्या. (जरां बरं वाटलं) धुकं गायब झालं होतं; मात्र टेरेसवरील फुलझाडांवर ते दवबिंदूच्या रुपात अंग सावरून उरलं होतं.
Tuesday, February 2, 2010
पहिलं वहिलं
पहिल्यावहिल्या प्रत्येक गोष्टीचं अप्रुप सर्वांनाच असतं! पहिला पाऊस, पहिलं प्रेम, पहिली मैत्री (मैत्रीण), पहिलं ".....', पहिलं अपत्य, पहिलं आईपण, पहिलं बापपण इत्यादी इत्यादी. या साऱ्या पहिलेपणाच्या "कळा' (आनंद या अर्थाने) ज्यांनी अनुभवल्यात त्यांनाच त्याच्यातली मजा माहीत.
(वाचकांतील बहुतेकांनी या "कळा' नक्कीच अनुभवल्या आहेत, याबद्दल माझ्या मनात जरासुद्धा शंका नाही) तर असो...
नुकताच मी एक असाच "पहिलावहिला' अनुभव घेतला. नव्या घरात राहायला आल्यापासून खिशाचा सल्ला घेतच अनेक बाबी होत असल्याने अनेक बाबींवर मर्यादा आल्या. त्यातच माझ्यासारख्या उधळ्या माणसाला याची जरा जास्तच झळ बसली. (बहुतेक जण उधळेच असतात) आम्हीही आस्ते-आस्ते घराचा लूक सुंदर करण्यासाठी धडपडत होतो; पण काही मजा येत नव्हती आणि मार्गही सुचत नव्हता. याच दरम्यान आमच्या स्नेह्यांच्या घरी आमचं जाणं झालं. त्यांच्या गॅलरीत मस्त फुललेली फुलझाडे पाहिली आणि आम्हाला "आयडिया' मिळाली. दुसऱ्याच दिवशी तातडीने आमचा मोर्चा आम्ही कुंडीवाल्याकडे वळविला. मनासारख्या सात-आठ कुंड्या आणल्या.
आता चर्चेला मुद्दा घेतला रोपे कोणती आणायची. झालं, त्यावर चहा रिचवत जोरदार चर्चा झडली. अखेर नर्सरीत जाऊन तेथे पाहून रोपे घेण्यावर एकमत झाले; मग आमचा कुटुंबकबिला एका नर्सरीत पोहोचला. अनेक रोपांची निगराणी केल्यानंतर "होम मिनिस्टर'नी काही रोपांबद्दल होकाराची मोहर उमटवली. रोपे घरी आली.
आता आमच्या गाडीने नदीकाठ गाठला. तेथून खास नदीकाठची माती घरी आली. (झाडे कशी लावायची या पुस्तकात "नदीकाठची माती आणा', असेच लिहिले होते. आम्ही ती सूचना तंतोतंत पाळली. माती आणावयास गेल्याचा त्रास आम्हाला झाला; मात्र पुरेपूर आनंद बच्चेकंपनीने मनसोक्त मातीत खेळून लुटला)
दोन दिवसांत शेणखत, गांडूळखत, नारळाच्या शेंड्या असा जामानिमा झाल्यानंतर आणलेल्या रोपांचे शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत कुंड्यांत रोपण झाले आणि टेरेसवर हिरवाईचे पहिले पाऊल पडले. मग रोज रोपांना पाणी घालणं, ठराविक दिवसांनंतर त्यांच्या मुळातील माती ढिली करणं! खतांचा डोस देणं आणि रोज होणाऱ्या बदलांना अनुभवणं असा दिनक्रम आकार घेऊ लागलां. आस्ते-आस्ते रोपांची मुळे रुजली आणि आणलेल्या रोपांवरील पानांची हिरवाई आणि आमची मैत्री गडद होऊ लागली. शेवंती, जास्वंदीने आम्हाला पहिल्या पंधरा दिवसांतच फुलांचे समाधान दिले. (अर्थात जेव्हा रोपे आणली तेव्हाच त्यांच्यासोबत कळ्याही होत्या) आमचे लक्ष मात्र गुलाबाच्या रोपांकडेच लागलेले. त्याला केव्हा एकदा फूल लागते असेच आम्हाला झालेले. त्यामुळे रोज निरीक्षण सुरूच.
...पंधरा दिवसांपूर्वी एका गुलाबाच्या फांदीवर पानांच्या बेचक्यांत फुगीर भाग दिसला आणि गुलाबाला पहिली कळी आल्याची वार्ता आम्हाला मिळाली. मग काय! आम्ही आणखीनच ममत्वाने त्या रोपांकडे पाहू लागलो. आस्ते-आस्ते कळी बेचक्यातून बाहेर पडली, वाढू लागली. दोन दिवसांपूर्वी एकमेकांना कळीच्या घट्ट बिलगलेल्या गुलाबी पाकळ्या पाहिल्या आणि आम्ही तो आनंद तिच्याभोवतीच कॉफी पिऊन साजरा केला.
--------------
आज सकाळी-सकाळी आमच्या "होम मिनिस्टर'नी झोपेतून जागं केले आणि खिडकीतून बाहेर बोट दाखविलं. वाऱ्याच्या झुळकीवर तो "गुलाब' मस्त डोलत होता. त्याच्या पाकळ्यांवर अंग चोरून बसलेले तुषार चमचमत होते. व्वा काय सकाळ आहे! पहिला-वहिला गुलाब आमच्या अंगणात फुलला, त्याचं तातडीने फोटोसेशनही केलं आणि हा लाखमोलाचा आनंद दिवसभर आम्ही मिरविला.
Subscribe to:
Posts (Atom)