Thursday, January 21, 2010
बी ब्रेव्ह...
गेल्या काही दिवसांमध्ये भोवताली घडणाऱ्या घटनांमुळे समाजमनाने अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे. विशेषतः ज्यांची मुले 16 ते 20 वयोगटांमधील आहेत त्यांच्या पालकांसाठी तरी ही निश्चितच धोक्याची घंटा आहे. गेल्या पंधरा दिवसांत राज्यात 35 पेक्षा अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आत्महत्या करून आपल्या सुंदर आयुष्याचा शेवट करून घेतला. या घटनांमुळे सारा समाज ढवळून निघाला आहे.
हे असं का घडतंय? याच्या विश्लेषणास सुरवात झाली आहे. रकानेच्या रकाने वृत्तपत्रांतून प्रसद्ध होत आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने त्याची कारणं शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. एकीकडे हे प्रयत्न सुरू असताना आपल्या आणखी काही मित्र-मैत्रिणींनी मृत्यूला कवटाळल्यामुळे स्थिती गंभीर बनत आहे.
दोस्तहो, कशासाठी आपण हा जीवघेणा मार्ग पत्करत आहोत? का आपण आपले सुंदर आयुष्य संपवत आहोत? आयुष्याचा डाव छानपैकी रंगवायचा सोडून अर्ध्यावरच का मोडत आहोत? कारणं निश्चितच आहेत; पण त्यावर मार्ग काढता नाही का येणार? छोट्या-छोट्या अपयशाने खचून जाऊन आपण लगेचच आपले आयुष्य संपविणे कितपत योग्य आहे? सारं आयुष्य खर्ची घालून आपले आई-बाबा आपल्याला लहानाचे मोठे करतात आणि मग त्यांच्या नशिबी जर हेच पाहणं येत असेल तर?
सध्या जगाच्या बाजारपेठेत तुमची मार्कांची गोणी काठोकाठ भरलेली असेल तरच तुमचा निभाव लागू शकतो असे एक (भयावह) चित्र तयार झाले आहे. या चित्राला आपण सारेच भूलून गेलो आहे. कमी गुणांची शिदोरी आपल्याला कशी उपयोगी पडणार या विचारानेच इथं प्रत्येक जण पोखरलेला आहे. आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये "माणूस' घडण्याची प्रक्रियाच होत नाहीये. यशाच्या साऱ्या फुटपट्ट्याच बदललेल्या आहेत. एवढी विविध क्षेत्रे हात पसरून तुमचे स्वागत करण्यासाठी बाहेर उभी असताना ठराविक क्षेत्राकडेच जाण्याचा ओढा आपल्याला अपयशाच्या गर्तेकडे ओढून नेत आहे हे कळून ही वळत नाही याचंच मोठं आश्चर्य आहे.
या समजांना, या गृहितकांना आता धक्का देण्याची वेळ आली आहे. तुम्ही-आम्ही-सगळ्या तरुणाईने बंड करून उठण्याची वेळ आली आहे. गुणांच्या फुटपट्ट्या मोडून फेकून दिल्या पाहिजेत. कमी गुणांच्या भांडवलावर उत्तम, वेगवेगळ्या पद्धतीने आयुष्य जगता येते, यशाचा मार्ग रेखाटता येतो हे दाखवून देण्याची गरज आहे. निव्वळ पैसा आणि यश हेच सर्वस्व न मानता आयुष्य वेगळ्या पद्धतीने कसे फुलविता येईल याचा विचार करण्याची गरज आहे. अपयशाचे फटके बसणार; पण त्यामुळे खचून न जाता, मोडून न पडता "मी उठून लढणार' ही वृत्ती अंगी बाणविण्याची गरज आहे. एकाच एका क्षेत्राकडे न जाता वेगळ्या वाटेने जाण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यायची तयारीही ठेवण्याची गरज आहे. म्हणून म्हणतो दोस्तहो...थोडा विचार करा... निराशा झटकून टाका...आयुष्य सुंदर आहे...ते जगताना संकटांशी दोन हात करा.
निडर बना...बी ब्रेव्ह!
Subscribe to:
Posts (Atom)