Saturday, September 24, 2011

जन्मापूर्वी...मी...

"आता फक्त काही दिवसांचा प्रश्‍न आणि आपण मोकळा श्‍वास घेणार. जग खूप सुंदर आहे, असं म्हणतात. ते आपण पाहू शकणार. जगातली प्रत्येक सुंदर गोष्ट आपल्याला अनुभवता येणार. वेगवेगळे रंग, वेगवेगळे गंध, झाडं, पानं, फुलं, वेगवेगळ्या प्रकारची माणसं, आणखी बरंच काही पाहायला मिळणार.

ती दोघं ताईसोबत आपल्यासाठी किती स्वप्नं रंगवत आहेत. दोघं सारखं काहीबाही बोलत असतात. "तो' म्हणतो मला डॉक्‍टर करायचं, तर "ती' म्हणते नाही, इंजिनिअर करायचं. मग दोघंही म्हणतात, "त्याला' जे व्हायचंय ते होऊ दे, आपण फक्त त्याच्या पंखात बळ भरू. रोज वेगळंवेगळं ठरवत असतात. एक मात्र खरं, दोघंही माझ्यासाठी जाम खूश आहेत. मला काय काय खायला देतात. तिनं नुसतं नाव उच्चारलं तरी तो तातडीने तिच्यासाठी सगळं हजर करतो. आईस्क्रीम काय, डोसा काय, वडे काय.... माझी तर मेजवानीच सुरू आहे. मज्जा येते नुसती. कित्येकदा मनात विचार येतो, काय करायचं बाहेर जाऊन? त्यापेक्षा येथेच मला हवं ते अगदी विनासायास मिळतंय. त्याचाच घेऊ मनमुराद आनंद. त्यांच्या कौतुकाच्या बदल्यात मी काय करायचं, तर फक्त तिच्या पोटाला जराशी ढुशी द्यायची, कधी तरी पाय झाडायचे. कसली खूश होते ती! तिचा आनंद मला जाणवत राहतो आणि मग मलाही चेव चढतो. अक्षरशः ढुशा मारून, लाथा मारून मला दमायला होतं; पण ती मनापासून आनंदते. भोवतीच्या सर्वांना अगदी कौतुकाने सांगते, "ढुशा देतो लबाड मला. असलं भारी वाटतं!' तिच्या बोलण्यातून माझ्याबद्दल आनंद, कौतुक अगदी भरभरून व्यक्त होत असतं. ती आनंदली की मलाही शहारल्यासारखं होतं. वाटतं, असं तिच्या मिठीत विरघळून जावं. मग जाणवतं, अरेच्च्या, मी तिचाच अंश आहे की...'

"दोन दिवस झाले, दोघंही अगदी गप्प गप्प आहेत. ताईचापण आवाज नाही. त्यांच्या नेहमीच्या छान-छान गप्पा ऐकायलाच मिळत नाहीत. "ती' पण अगदी गप्प गप्प असते. माझ्याकडे लक्ष द्यावं म्हणून काल किती ढुशा दिल्या; पण ती नेहमीसारखं काहीच बोलली नाही की कौतुकानं तिनं कोणाला काहीच सांगितलं नाही. "त्यानं' पण माझी जरासुद्धा चौकशी केली नाही. माझ्यासाठी काही खाऊही आणला नाही. परवापर्यंत माझे कौतुक करताना दोघंही थकत नव्हते, मग अचानक काय झालं बरं..... अरे हां, परवा दवाखान्यात जाऊन आल्यापासून त्यांच्यात हा फरक पडला.

काय झालं बरं दवाखान्यात? हां, आत्ता आठवलं...डॉक्‍टरांनी तपासणी केली आणि ते म्हणाले, "बेबी इज गुड अँड नॉर्मल.' मलाच म्हटले असणार. माझं हलतं बोलतं चित्रही म्हणे त्यांनी पडद्यावर दाखवलं दोघांना. त्यावेळी ती कसली मोहरली. ती मोहरली आणि माझ्या रोमारोमावर मोरपीस फिरवल्यासारखं वाटलं. माझ्यासाठीचा तिचा आनंद बघून मला काय करू आणि काय नको असं वाटलं. तेव्हाच ठरवून टाकलं, जगात प्रवेश केल्यानंतर तिचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण धडपडायचं...

एवढ्यात "त्याचे' शब्द कानावर पडले. ""डॉक्‍टर, प्लीज सांगा काय आहे, मुलगा की मुलगी..'' डॉक्‍टरांनी बरेच आढेवेढे घेतले. तो म्हणाला, ""डॉक्‍टर, प्लीज तुमची काही अपेक्षा असेल तर बोला; पण सांगा काय आहे!'' खूप आढेवेढे घेतल्यानंतर डॉक्‍टरांनी जे सांगितलं ते ऐकून "ती' काहीशी हलल्यासारखी वाटली आणि त्यानंतर दोघांमधील संवादच बंद झाला. दोघेही घरी आले पण त्यांच्यात नेहमीसारखं बोलणं झालंच नाही दोन दिवस.

एकदा ती म्हणाली, आपल्या हातात काही नसतं. सगळी परमेश्‍वरी कृपा. जे आहे ते आपण स्वीकारू. जगात इतरांकडेही जरा पाहा. पण बहुधा त्याला माझं "असणं' आवडलं नसावं. त्याच्या बोलण्यात माझ्याबद्दलचा विखार जाणवला. त्यानंतर दोघांमधील संवादच बंद झाला.

त्याच्याकडून होणारे माझे लाड बंद झाले. आताशा "तो' माझी चौकशीही करेनासा झाला. "तिनं' मात्र मला तिला जमेल तसं जपलं. मला हवं नको ते पाहिलं. माझ्याबद्दल त्याच्यासोबत वादही घातला. पण त्याला मात्र मी नकोशी झाले आहे. परवा तर मला तो "धोंड' म्हणाला. कसली रडली ही. तिच्या रडण्यानं माझ्याही अंगाला कापरं भरलं...'

"काय करू मी जगात येऊन? मी येणार म्हणून आनंदित असलेल्या दोघांमध्ये मी कोण आहे हे समजल्यानंतर किती अंतर पडलं. त्यापेक्षा मी जगात नाहीच आले तर? त्याच्या गळ्यातली धोंड जाईल. माझ्या जन्माला येण्याने जर "तिला' बोल लावला जाणार असेल तर मी का म्हणून जन्म घेऊ? मरून का काय ते जाऊ या... छे छे, भलतेच काय विचार करतेय मी! तिला काय वाटेल? तिनं मला कुठं अंतर दिलंय? ती खूश आहे. मला तिच्यासाठी जन्माला यायला हवं. तिचा अंश म्हणून मी जग पाहिलं पाहिजे. ती किती माझ्यासाठी खंबीर राहिली आहे हे मी विसरून चालणार नाही. तिच्या आनंदासाठी, समाधानासाठी मी जन्मले पाहिजे. माझ्यासाठी भांडणाऱ्या तिला पाहून मला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. "त्याच्या' विचारांची दिशा चुकलीय हे दाखविण्यासाठी मी जन्मलं पाहिजे. तिचं आईपण किती मोलाचं आहे, हे दाखविण्यासाठी मला जन्मलं पाहिजे. त्याला "बाबा'पणाचा आनंद देण्यासाठी मी जन्मले पाहिजे. मला जेव्हा तो पाहील तेव्हा तो पाहतच राहील, मला खात्री आहे...'

"कसली गोड आहे नं ही... अगदी कापसासारखी. माझ्याकडेच पाहून हसतेय. माझं चुकलंच. ए, मला माफ कर हं...मी उगीच... तिच्या जीवावर उठलो होतो. हिला मी सगळी सुखं देणार...तिला मी डॉक्‍टर करणार...'' त्याच्या त्या बोलांनी ती गहिवरली. दोघांच्याही डोळ्यांत पाणी तरळलेलं मी पाहिलं. त्या वेळी बाबांच्या कुशीतल्या "मला' माझी आई किती ममत्वाने पाहत होती.. आई, तू कसली भारी आहेस गं. तू जगातली सर्वांत सुंदर आई आहेस. माझी आई, जिनं मला हे जग दाखवलं....

Thursday, September 22, 2011

परिवर्तन

रोज रात्री ऑफीस सुटलं की बाईकवरून जाताना कधी एकदा घर गाठेन असं होऊन जातं. पंधरा-सोळा किलोमीटरचं अंतर पार करून घरी पोचेपर्यंत पार गळाटून जातो. बरं मध्यरात्रीनंतरची वेळ असल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांशिवाय रस्त्यावर विरंगुळा तो कसला नाहीच. भरधाव वेगाने जाणारी वाहने, पुलावरून जाताना वाहणाऱ्या नदीचे जाणवणारे अस्तित्व, आजूबाजूच्या शेतातील पिकांची, झाडांची सळसळ आणि बाईकचा अखंड सोबत करणारा आगळावेगळा आवाज. शहरात प्रवेश केला की रस्त्यांच्या मधोमध उभे राहून दोन्ही बाजूंना पिवळसर प्रकाशाची उधळण करणारे विजेचे खांब. खचित गस्त घालत फिरणारी आणि कधीमधी भेटणारी पोलिस व्हॅन. चौकांतील एखाद्या कोपऱ्यात गाडी उभी करून गप्पांत रंगलेली दोस्त मंडळी, तसेच काही पोलिस. दिवसभर व्यवसाय करून आवराआवर करणारे राजाभाऊ भेळच्या गाड्यावरील मंडळी. मध्यवर्ती स्टॅंड परिसरात उभ्या खासगी गाड्या, त्या गाड्यांसाठी प्रवासी शोधत फिरणारे पंटर, माणसांची आवक-जावक. एखाद्या दडग्या कोपऱ्यांवर चमकत्या कपड्यांत उभे "ते' आणि "त्या'. त्यांच्या आजूबाजूला कानोसा घेत दबक्‍या पावलाने चालणारी "ती" मंडळी. काही ठिकाणी त्यांच्यात सुरू असलेले हास्यविनोद, भांडणे. रोजचंच हे दृष्य. गेल्या कित्येक वर्षांमध्ये यातील एखादीच बाब मागे पुढे झाली असेल अन्यथा फरक कसलाही नाही. रोज त्या-त्या ठिकाणी ते-ते भेटणार हे नक्की. त्यामुळे रोजच्या प्रवासातला हा रुटीनचाच भाग. नाही म्हणायला सण-समारंभाच्या दिवशी रस्ते काही प्रमाणात माणसांनी वाहते आणि कोपरे आणखीनच जागे, कुजबुज वाढलेले.
या रोजच्या चित्रामध्ये काही महिन्यांपूर्वी आणखी एक भर पडली. म्हणजे "तिचं' अस्तित्व जाणवू लागल्यामुळे भर पडली म्हणता येईल. "ती' पूर्वीपासूनच असणार फक्त तिचं ठिकाण माझ्या रोजच्या वाटेवर नक्कीच नव्हतं. ती होती एक अजागळ बाई.

एक दिवस चटकन बाईकचा प्रकाश तिच्या तोंडावर पडला आणि तिच्या अस्तित्वाची दखल माझ्याकडून घेतली गेली आणि त्यानंतर वरील सर्व गोष्टींप्रमाणे दररोज तिही भेटू लागली. मी तिला नोटीस करू लागलो. केस विस्कटलेले, कित्येक महिने त्यांनी बहुधा तेल पाहिलेलं नसावं. अंगावरील साडी गलिच्छ भिकाऱ्यासारखी, कशीबशी अंगाभोवती गुंडाळलेली. तिचा चेहरा कधीच निरखून पाहिला नाही पण, तो फारसा पाहण्यासारखा नसावा. डोळ्यांचा पांढरा भाग प्रकाश पडला की चमकत असे. ठरावीक परिसरात ती ठरावीक स्थितीत उभी राहिलेली. येणाऱ्या जाणाऱ्यांकडे आशाळभूतपणे पाहणारी तिची नजर अस्वस्थ करणारी. त्या डोळ्यांत भूक, असाह्यता, जगण्याची धडपड काठोकाठ भरलेली. अरेच्चा म्हणजे ही "तसली' बाई. बापरे....कोणी तिच्या सावलीलाही उभे राहणार नाही एवढी ती गलिच्छ आणि उभी राहते व्यवसायासाठी. (एरव्ही अशा बायकांच्या अंगावरील कपडे लांबूनही पटकन ध्यानी येतात) एखादे तरी गिऱ्हाईक येईल आणि टिचभर पोटाची तजवीज होईल, या आशेवर ती उभी राहत असावी. म्हणजे पूर्वी तिने "हेच" केलेले असणार आणि आताही शरिराची लक्तरे सांभाळत जगण्यासाठी तिच्या लेखी दुसरा कुठलाच मार्ग शिल्लक राहिलेला नसणार. म्हणून मग पुन्हा ती कोपरा पाहून उभी असते होते का काय तजवीज हे पाहत. काय असेल तिचं विश्‍व? ती आत्तापर्यंत कशी जगत होती? ती काय खाते? कोठे राहते? कशी जगते? ती जगण्यासाठी दुसरं काही का स्वीकारत नाही? का तिला मध्यरात्री कोपऱ्यावर येऊन उभे रहावे वाटते. ही तिची असाह्यता आहे की तिला आता काहीच समजेनासं झालंय? की ती काहीच करू शकत नाही? तिला दुसरं कोणी आहे की नाही? बरं कडाक्‍याच्या थंडीत आणि भर पावसातही ती उभी असलेली भेटते. म्हणजेच तिला जगण्यासाठी तिथं उभं राहणं भागच पडतंय. ते का?

किती प्रश्‍न. या प्रश्‍नांनी गेल्या काही दिवसांत डोक्‍याचा अक्षरशः रोज भुगा झाला. बरं थांबून विचारण्याएवढी आपल्या अंगात हिंम्मतही नाही. ती नेमकी काय आहे? हे गुढ उलघडण्यासाठी बाईक तिच्याजवळ थांबवायला हवी, तिच्यासोबत बोलायला हवं, ती थांबविण्याची आपली मानसिकताच नाही. तरीही तिच्या त्या दिसण्यानं आपण अस्वस्थ होतोय, विचारांत गुरफटलं जातोय हे नक्की. कोण आहे ती? नक्की कोण? हा प्रश्‍न काही पिच्छा सोडत नाही.

परवा रात्री नेहमीप्रमाणे येताना. "त्या' कोपऱ्यावर गर्दी जमलेली दिसली. न राहवून बाईकचा वेग कमी केला आणि रस्त्याकडेला उभी केली. गर्दीच्या दिशेने गेलो. दहा-बारा जण कोंडाळं करून उभे राहिले होते. दोन पोलिसही त्यांच्यासोबत होते. जरा डोकावून पाहिलं तर "ती' खाली पडलेली दिसली. सगळेजण वाकून तिला पाहत होते. मी पोलिसांकडे चौकशी केली. काय झालं हो या बाईला?

माझ्याकडे विक्षिप्त नजरेनं पाहत,"मेली, आजारी होती, कुठं राहते माहित नाही, रोग झाला असणार....' शिपायाचे पुढचे शब्द माझ्या कानावर पडलेच नाहीत.
मी विचार करू लागलो,"गेली बरं झालं! नरकयातनांमधून सुटली एकदाची. पण कशानं गेली, रोगानं की भुकेनं की आणखी कशानं? कोण होती ती? तिचा आगापिछा काय? असलेच तर तिच्या घरच्यांना कसे समजणार? तिच्या जगण्याचं प्रयोजन काय होतं आता मेली तर...? बरं मेली तिही रस्त्यावर तिच्या रोजच्याच जागेवर, याला काय म्हणायचं? पुन्हा अनुत्तरीत प्रश्‍नांचा गुंता वाढत राहिला. मी बाईकला कीक मारली, आता ती दिसणार नाही. बहुधा परिवर्तन यालाच म्हणत असावेत.

Wednesday, September 7, 2011

पुढच्या वर्षी लवकर या!


बहुतेक घरगुती गणपतींचे मंगळवारी गौरीसोबतच विसर्जन सुरू झालं आणि घरामध्ये जेथे गजाननाची प्रतिष्ठापना केलेली होती तो कोनाडा, कोपरा, ती आरास रिकामी रिकामी झाली. गेले सहा दिवस पूजा, मंत्रोच्चार, आरती यांनी भारून गेलेलं घर सायंकाळनंतर उदास उदास झालं. विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाने आठवडाभर साऱ्या घरात चैतन्य भरून राहिलं. गणरायाच्या स्वागताची उडालेली धांदल, आरास मांडताना त्यात हरवून जाणं, आठवडाभर त्याच्या सेवेत कोणतीही कसूर होऊ नये यासाठीची धडपड. बालगोपालांसाठी तर गणपती घरी येणं आनंदोत्सवाची पर्वणीच. उंबरठा ओलांडून गणराया घरात आले आणि मनं आनंदाने अगदी काठोकाठ भरून वाहिली. आनंदसोहळा रंगला पुढील सहा दिवस. आरतींचे मंगलमयी सूर घराघरांतून उमटत राहिले. धुपाचा गंध दरवळत तर भक्ती, श्रद्धेचा संगम खळाळत राहिला...
पण आता मात्र काहीसं रितं रितं वाटतंय. हातातून निसटल्यासारखं, कदाचित पुन्हा गवसण्यासाठी. आता काय पुढील पाच दिवस सार्वजनिक गणेशोत्सवाची धूम अनुभवायची आणि या रितेपणावर फुंकर घालायची.

Thursday, September 1, 2011

शंभराची नोट...

मालकानं दिलेली शंभराची नोट त्यानं खिशात ठेवली. झटपट काम संपवून तो बाहेर पडला. त्याची पावलं घराच्या दिशेनं ओढीनं वेगात निघाली. आता सण झोकात साजरा करायचे इमले तो मनात बांधू लागला. गेल्या कित्येक दिवसांत घरात काही गोडधोड शिजलेलं नव्हतं. पोरगं किती तरी दिवसापासनं खीर खायला मागतंय. आज पहिलं खिरीचं साहित्य आणायचं. बायकोची चमचमीत खायची इच्छा कित्येक दिवसांपासून आहे; पण जमलंच नव्हतं. आज ती जाम खूष होईल. मालकिणीनं दिलेली चोळी आणि पातळ जरा शिवून घेईल. यातलेच चार पैसे बाजूला ठेवतो म्हणजे आणखी चार दिवस तरी ताटात कसली ना कसली भाजी दिसेल. बटाट्याची रसभाजी खाऊन किती दिवस झाले? बाप रे, आठवतपण नाही. एक लॉटरीचं तिकीट काढू, बघू काय नशीब फळफळलं तर. चार वर्षांपूर्वी दिवाळीत घेतलेला सदराच जरा शिवून घेतो. तोच घालता येईल. लेकाला जुन्या बाजारातनं एखादा शर्ट मिळतोय का बघू. तो धुऊन घातला तर नवा शर्ट मिळाला म्हणून लेकरू खूष होईल. पोराटोरांत जरा मिरवून येईल. बरेच दिवस झाले नाक्‍यावरच्या गणपतीपुढं नारळ फोडलेला नाही. उद्या सण म्हणून नक्की फोडू. देव दयाळू असतो म्हणतात. या नारळाला जागून जरा त्रास तरी कमी होईल. चप्पल तुटली म्हणून पंधरा दिवस झालं घातलेली नाही, ती आधी दुरुस्त करून घेतो. पावण्या-रावळ्यात जायचं म्हटलं, की पायात काय नसलं की लाजल्यासारखं होतंय...

....त्याची विचारांची गाडी अगदी सुसाट सुटलेली. घराचं स्टेशन आलं आणि गच्चकन ब्रेक लावून गाडी थांबली. तो घरात शिरला.
नवऱ्याच्या चेहऱ्यावरील हसू बघून तिनं ताडलंच, आज काही तरी विशेष आहे. भाकरी करता करता ती लगबगीनं उठली. त्याच्या हातातली पिशवी तिनं काढून बाजूला ठेवली. पटकन त्याला पाण्याचा तांब्या भरून दिला आणि चहाचं आधण ठेवलं.
"काय आज खुशीत?' तिच्या प्रश्‍नावर त्यानं हसऱ्या चेहऱ्यानं "हूं' म्हणत उत्तर दिलं.
तिनं बिनकानाच्या कपात चहा ओतला आणि त्याच्यासमोर ठेवला.

त्यानं चहाचा एक घोट घेतला. आता त्याला राहवेना. शंभराची नोट तिला दाखवूयाच म्हणत त्यानं खिशात हात घातला आणि शॉक बसल्यासारखा झटका त्याने हाताला दिला. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पार काळवंडला. चहाची चव एकदम कडवट झाली. तो तीन-तीनदा फाटलेला खिसा तपासू लागला. खिसा फाटलाय हे विसरून त्याच खिशात शंभराची नोट आपण ठेवली हे त्याच्या आता लक्षात आलं. अंगावरच्या कपड्याला जेवढे म्हणून खिसे होते ते त्याने तपासले. कपडे काढून झाडले; पण ती नोट काही सापडायला तयार नव्हती.
"अहो, काय झालं? असं काय करताय? आनंदात घरात आला आणि आता एकदम काय झालं...?' ती न समजून सारखं विचारत राहिली.
नोट नाही हे समजल्यानं तो सैरभैर झालेला. तिचे प्रश्‍न त्याला ऐकू येत होते; पण उत्तर द्यायला मनापर्यंत पोचतच नव्हते. "माझी नोट पडली, माझी नोट पडली' एवढंच तो म्हणत राहिला. काही तरी वाटून तो उठला आणि घरातनं धावत सुटला. ज्या रस्त्यानं आला होता, त्या रस्त्याचा कोपरा न्‌ कोपरा शोधत निघाला. येणाऱ्या-जाणाऱ्याला विचारू लागला... माझी नोट सापडली का? कुणी नोट पाहिली का? येताना काय काय स्वप्नं आपण बघितली. सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. आता काही काही नाही. खीर नाही, चमचमीत जेवण नाही, पोराला चड्डी नाही, बायकोची चोळी नाही, लॉटरी नाही, घरात सण नाही... काही काही नाही... सगळा रस्ता त्यानं तीन-तीनदा पाहिला. नोट सापडत नाही याची खात्री झाली आणि तो डोक्‍याला हात लावून तिथंच बराच वेळ बसून राहिला, खचला. बऱ्याच वेळानंतर कधी तरी पाय ओढत ओढत तो घरी आला. उंबऱ्यातून आत जायचे त्राणच त्याच्यात उरले नव्हते. तो दारातच बसून राहिला. काही क्षण शांततेत गेले.

"आये, पप्पा आला!' म्हणत पोरगं येऊन त्याच्या पाठीवर पडलं. एरवी फुलासारखं वाटणाऱ्या पोराला त्यानं तिरीमिरीत झटकून टाकलं.
"आई गं!' म्हणून ते कळवळलं. "असं काय करताय!' म्हणत बायकोनं येऊन त्याला उचलून घेतलं. त्यानं तिच्याकडं पण रागानं पाहिलं.
"बबल्या काय सांगतो ते तर ऐका.'
"हे बघ!' म्हणून बबल्यानं त्याच्या पुढं शंभराची नोट नाचवली. तो उडालाच. हे कुठून आले? विचारत त्यानं बबल्याकडून नोट हातात घेतली.
रडवेल्या चेहऱ्यानं बबल्या म्हणाला, ""खेळत खेळत बाजारात गेलोतो, येताना वाटेत गावली.''
त्यानंतर बबल्या काय काय सांगत राहिला; पण त्याला काही ऐकू आलं नाही. त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. त्यानं बबल्याला छातीला कवटाळून मटामट मुके घेतले. बायकोच्या पाठीवर हात टाकला. आता त्यांचा सण झोकात साजरा होणार होता!