Tuesday, November 17, 2015

भक्‍ती

ती मंदिरात आली. तिने देवाला हात जोडले. काही तरी पुटपुटली; मग काही सेकंद मूर्तीकडे एकटक पाहत उभी राहिली. समाधानाचे हसू तिच्या चेहऱ्यावर उमटले; मग पुन्हा एकदा मस्तकाला हात लावून तिने पुन्हा एकदा मनोमन नमस्कार केला. कनवटीला लावलेल्या दोन हिरव्या नोटा बाहेर काढल्या. दोन्ही हातांनी व्यवस्थित केल्या आणि दानपेटीत टाकल्या. पुन्हा एकदा नमस्कार केला. 

ती पैसे दानपेटीत टाकणार तेवढ्यात समोर देवापुढे वाहिलेले साहित्य गोळा करणारी महिला पुटपुटली ‘‘अंग येडे, पैसे या पाटीत टाकायचे नाहीस का. थेट देवाच्या पायाजवळ पोचले असते. कशाला पेटीत टाकून सरकारची भर करतेस. काय त्या सरकारचा तुला उपयोग नाही नी काही नाही. निदान मी प्रसादाचा नारळ तरी तुला दिला असता.‘‘

तिने ते ऐकले. हसली आणि बाजूला कोपऱ्यात जाऊन हात जोडून उभी राहिली. देवापुढे साहित्य जमा करणारी महिला तिला बहुधा ओळखत असावी. त्यामुळे ती अगदी कुत्सित हसत तिला टोमणे मारत होती; मात्र तिच्या बोलण्याचा तिच्यावर कसलाही परिणाम झाला नाही. ती काहीच उत्तर देत नाही हे पाहून ती महिला आणखी अस्वस्थ झाली. ते दोनशे रुपये तिच्या पाटीत पडले नव्हते म्हणून तिला तिचा रागा आला होता. तिची बडबड सुरूच राहिली. 
‘‘कायम येते नि पैसे देवापुढे न टाकता दानपेटीत टाकते. अशाने तिला पुण्य काही लाभणार नाहीच. दानपेटीत टाकून सरकारची धन करते. पाटीत टाकले तर देवाला पैसे जातील. खुळीच आहे, काही कळत नाही तिला.‘‘ तिच्या या बोलण्यावर तिथे जमलेले काही फिदीफिदी हसले. ‘‘असंच करत जा. म्हणूनच देवाने तुला आहे तिथेच ठेवलेय. तुला सुखचं मिळत नाही. तुझी अवस्था काही बदलत नाही. तू तशीच राहणार आणि तशीच मरणार...‘‘ देवापुढे उभे राहून ती महिला त्या बाईला आता चक्‍क सुनावू लागली होती, तरीही देवापुढे उभी असल्यामुळे आणि इतर भक्‍त येत-जात असल्यामुळेच तिने स्वत:वर काहीसा संयम ठेवला होता. नाही तर त्या दोनशे रुपयांवरून ती आणखी किती तरी बोलली असती. आता त्या बाईची मंदिरातून बाहेर पडायची वेळ झाली. ती पुढे आली. तिने पुन्हा देवाला मनापासून नमस्कार केला आणि ती वळून चालू लागली. 

ती निघाली हे पाहून या महिलेला आणखी चेव चढला. ‘‘तू पाटीत कधीच पैसे टाकत नाहीस म्हणून तुझी अशी अवस्था आहे. म्हातारी झालीस तू... तू अशीच राहणार...अशीच मरणार....‘‘ पुन्हा बडबडली. 

आता ती बाई थांबली. माघारी वळली म्हणाली. 

‘‘मी पैसे पेटीत टाकते, ते सरकारला जमा होतात. मला जेवढं लागतात त्यापेक्षा जास्त पैसे असले की मी पेटीत टाकते. पैसे टाकताना समाधानी असते. या पैशाची सरकारला गरज हाये, त्या पैशातून सरकार गोर-गरिबांसाठी नक्‍कीच काही तरी करंल. फूल नाय फुलाची पाकळी गरिबाला पण भेटंल. खाणारी खावू देत. माझ्या गरिबाचं पैसं त्यांना नाहीत पचत; पण ज्यो गरिबांसाठनं करतोय तेच्यापर्यंत तरी पोचतील की, सरकारला पैसे लागत्यात काय काय करायला. तू घेतलंस तर पैसं फकस्त तुझ्या घरातच जाणार आणि तुला कितीबी मिळालं तरी कमीच पडणार.... व्हय नव्हं.‘‘ एवढं बोलून ती बाई हातातली कसलीशी पिशवी सावरत मंदिरातून बाहेर पडली. देवापुढची महिला तिच्या या बोलण्याने काहीशी वरमली, तरी ती बाई गेली तरी बडबडतच राहिली. 

मी देवाला नमस्कार केला. प्रदक्षिणा घालून मंदिरातून बाहेर पडलो. त्या बाईचा विचार करत करत रस्त्यावर आलो. अगदी अशिक्षित वाटणारी बाई किती समजुतीनं बोलत होती. डोळ्यांत आशेची चमक जागत ठेवणारी वाटत होती. कुठून आलं असेल तिच्याकडे हे धैर्य, बरं स्वत: अगदी फाटकी वाटत असूनही शंभरच्या दोन नोटा तिने किती सहजपणे परमेश्‍वरचरणी वाहिल्या. बरं, तिचं दानही किती डोळसपणे केलेलं. दानपेटीत पैसे टाकताना त्या पैशाचा विनियोग नक्‍कीच चांगल्या कामासाठी होणार हा विश्‍वास तिच्या ठायी आहे. असा विश्‍वास आपल्या ठायी नाहीच. देवापुढील महिला एवढं बोलली तरी ती शांतच राहिली. एकही शब्द उलटून नाही बोलली. फक्‍त हसली... मार्मिक बोलली आणि निघून गेली. या तिच्या भक्‍तीला म्हणावं तरी काय?

‘‘दादा गरिबाला चहाला पैसे देता.... या आवाजाने माझी विचारांची मालिका तुटली. भीक मागणाऱ्या बाईकडे पाहिले आणि पाहतच राहिलो. त्या मघाच्याच मंदिरातील बाईने माझ्यापुढे हात केलेला..‘‘

Wednesday, September 16, 2015

आपली ज्योतही चेतवू...


विघ्नहर्त्या
  गजाननाचे आज घराघरांत आगमन होत आहे. आनंदोत्सवाचे पर्व त्याच्या येण्याने सुरू होत आहे. 
पुढील अकरा दिवस सर्वत्र उत्साह, मांगल्य, भक्तिभाव भरून राहील. ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशमूर्तींची 
प्रतिष्ठापना होईल आणि चौकाचौकांतून चैतन्य निर्माण होईल. व्रतवैकल्याची आवड असलेल्या मराठी 
मनासाठी गणेशोत्सव ही पर्वणी असते. ती अगदी मनापासून साधली जाते. यंदा मात्र आपण सर्वांनीच हा उत्सव साजरा करताना भान राखण्याची वेळ आली आहे. वरुणराजाने फिरवलेली पाठ हे त्याचे मुख्य कारण आहे. 
एरव्ही पाऊस ठिकठाक असेल तर बळिराजाच्या चेहऱ्यावर हास्य फुलते आणि मग सणांची गोडी वाढते. यंदा 
दुष्काळाचे संकट आ वासून उभे आहे. मराठवाडा, विदर्भात त्याची तीव्रता भयानक आहे. सप्टेंबर 
महिन्यामध्येच पाण्यासाठी वणवण सुरू आहे. धरणे कोरडी पडली आहेत. आत्ताच जर अशी अवस्था असेल 
तर पुढील कालावधीत काय होईल, हा विचार कुरतडणारा आहे. शिवार अधिकच भेगाळले आहे. जगण्याएवढाही चारा जनावरांसाठी उपलब्ध नाही. उत्पादन घटणार असल्याने अन्नधान्य महागणार आहे. त्यामुळेच आपली 
जबाबदारी वाढली आहे. गजाननाचे स्वागत जरूर उत्साहात करू; मात्र त्यामध्ये साधेपणा ठेवू. आपल्याच 
राज्यातील आपल्यासारखीच हाडामासाची माणसे जगण्याचा संघर्ष करत आहेत याचे भान ठेवू. जगण्याचे बळ 
हरल्याने मृत्यूला कवटाळत आहेत याची जाणीव ठेवू. विघ्नहर्त्याला दुष्काळाचे संकट टाळण्यासाठी पावसाचे 
दान देण्याची प्रार्थना करूच; पण दुष्काळाने होरपळणाऱ्या जीवांचे अश्रू पुसण्यासाठी पुढाकार घेऊ. सरकार 
काही तरी करेल, आपल्याला काय त्याचे, असे न म्हणता आपला वाटा आपण उचलू. अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, अक्षयकुमार, क्रिकेटपटू अजिंक्‍य रहाणे आदींनी त्यासाठीची ज्योत पेटवली आहे. ती ज्योत अधिक  प्रकाशमान होण्यासाठी आपली ज्योतही चेतवू. आपल्याच बंधू-भगिनींचे जगणे सुसह्य करण्यासाठी 
आपल्यामधील जिवंत माणसाला हाक देऊ. उत्सवाचा बडेजाव टाळून हाताशी असलेल्या रकमेमधून उद्‌ध्वस्त 
होणारे संसार सावरण्याचा प्रयत्न करू. गजाननासमोर उभे राहताना काही चेहऱ्यांवर आनंद फुलवल्याचे 
समाधान आनंदाने मिरवू.