Wednesday, September 16, 2015

आपली ज्योतही चेतवू...


विघ्नहर्त्या
  गजाननाचे आज घराघरांत आगमन होत आहे. आनंदोत्सवाचे पर्व त्याच्या येण्याने सुरू होत आहे. 
पुढील अकरा दिवस सर्वत्र उत्साह, मांगल्य, भक्तिभाव भरून राहील. ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशमूर्तींची 
प्रतिष्ठापना होईल आणि चौकाचौकांतून चैतन्य निर्माण होईल. व्रतवैकल्याची आवड असलेल्या मराठी 
मनासाठी गणेशोत्सव ही पर्वणी असते. ती अगदी मनापासून साधली जाते. यंदा मात्र आपण सर्वांनीच हा उत्सव साजरा करताना भान राखण्याची वेळ आली आहे. वरुणराजाने फिरवलेली पाठ हे त्याचे मुख्य कारण आहे. 
एरव्ही पाऊस ठिकठाक असेल तर बळिराजाच्या चेहऱ्यावर हास्य फुलते आणि मग सणांची गोडी वाढते. यंदा 
दुष्काळाचे संकट आ वासून उभे आहे. मराठवाडा, विदर्भात त्याची तीव्रता भयानक आहे. सप्टेंबर 
महिन्यामध्येच पाण्यासाठी वणवण सुरू आहे. धरणे कोरडी पडली आहेत. आत्ताच जर अशी अवस्था असेल 
तर पुढील कालावधीत काय होईल, हा विचार कुरतडणारा आहे. शिवार अधिकच भेगाळले आहे. जगण्याएवढाही चारा जनावरांसाठी उपलब्ध नाही. उत्पादन घटणार असल्याने अन्नधान्य महागणार आहे. त्यामुळेच आपली 
जबाबदारी वाढली आहे. गजाननाचे स्वागत जरूर उत्साहात करू; मात्र त्यामध्ये साधेपणा ठेवू. आपल्याच 
राज्यातील आपल्यासारखीच हाडामासाची माणसे जगण्याचा संघर्ष करत आहेत याचे भान ठेवू. जगण्याचे बळ 
हरल्याने मृत्यूला कवटाळत आहेत याची जाणीव ठेवू. विघ्नहर्त्याला दुष्काळाचे संकट टाळण्यासाठी पावसाचे 
दान देण्याची प्रार्थना करूच; पण दुष्काळाने होरपळणाऱ्या जीवांचे अश्रू पुसण्यासाठी पुढाकार घेऊ. सरकार 
काही तरी करेल, आपल्याला काय त्याचे, असे न म्हणता आपला वाटा आपण उचलू. अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, अक्षयकुमार, क्रिकेटपटू अजिंक्‍य रहाणे आदींनी त्यासाठीची ज्योत पेटवली आहे. ती ज्योत अधिक  प्रकाशमान होण्यासाठी आपली ज्योतही चेतवू. आपल्याच बंधू-भगिनींचे जगणे सुसह्य करण्यासाठी 
आपल्यामधील जिवंत माणसाला हाक देऊ. उत्सवाचा बडेजाव टाळून हाताशी असलेल्या रकमेमधून उद्‌ध्वस्त 
होणारे संसार सावरण्याचा प्रयत्न करू. गजाननासमोर उभे राहताना काही चेहऱ्यांवर आनंद फुलवल्याचे 
समाधान आनंदाने मिरवू. 

No comments: