Friday, September 6, 2013

...गुरुरदेवो महेश्वरा...

आई-वडील हे आपले आद्य गुरू (त्यांची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही). त्यांचे बोट पकडून आपण चालू लागतो आणि सुरू होतो आयुष्याचा प्रवास. या प्रवासात आपल्याला सक्षमपणे उभे करण्यात सर्वात मोलाचा वाटा असतो तो भेटणाऱ्या शिक्षकांचा; सर्वत्र शिक्षकदिन साजरा होत असताना मला आज माझ्या तीन शिक्षकांची अगदी प्रकर्षाने आठवण आली. अर्थात ज्या-ज्या शिक्षकांच्या वर्गात बसण्याची संधी मला मिळाली त्या सर्व शिक्षकांकडून अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी शिकण्यास मिळाल्या. अगदी पटकन आठवतात अशी नावे म्हणजे, पारखे बाई, पुणेकर बाई, गुरव बाई, एम. एम. पवारमॅम, श्री. लिगाडे सर, श्री. वाघमोडे सर, काळेबाग मॅम, श्री. डी. एस. माने सर, तांबोळी मॅम, चौगुले सर, श्री. प्रकाश कुंभारसर, श्री. पिरजादे, एस. एच. पाटील, पाटील मॅम आणि इतरही शिक्षक-शिक्षिका. 
या सर्वांसोबतच आयुष्यावर सर्वाधिक प्रभाव पडला असे तीन शिक्षक म्हणजे क्षीरसागर बाई, एम. एम. शिकलगार मॅम आणि देशमुख सर.
---
ज्या वयात खूप उत्तम वाचणे, उत्तम ऐकणे, उत्तम वर्क्तृत्व म्हणजे काय आणि चांगला माणूस म्हणून जगणे म्हणजे काय याचे संस्कार होण्याची आवश्‍यकता असते अशा वयातच बाईंकडून शिकण्याची आणि त्यांच्या घरामध्ये वावरण्याची मला संधी मिळाली. त्यांनी माझ्यावर अगदी मुलाप्रमाणे प्रेम केले. नवनव्या बाबींची ओळख करून दिली. चांगली पुस्तके हातात ठेवली. ह्रदयनाथांना मी मनापासून ऐकले त्यांच्या "औदुंबर'मध्ये. मी जे काही थोडंफार लिखाण करतो त्याची पहिली ठिणगी माझ्यामध्ये चेतविण्याचं काम बाईंनी आणि त्यांची कन्या प्रियाताईने केले. क्षीरसागर गुरुजी माझ्या बाबांचे शिक्षक (त्यांनीही बाबांवर उत्तमादी उत्तम संस्कार केले) त्यामुळे त्यांच्यापासून मी बहुतेकदा दूरच असे; मात्र बाईंनी नेहमीच मला ममत्वाने अनेक गोष्टी शिकविल्या. ज्याच्या शिदोरीवर माझं आयुष्य घडतं आहे.(आणखी खूप खूप सांगता येईल)
---
दुसरे व्यक्तित्व भेटले महाविद्यालयाच्या फुलपंखी आयुष्यात. श्री. देशमुख सर. मी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि त्याच वर्षी ते पुण्यातून बदलून बळवंत महाविद्यालयात राज्यशास्त्र शिकविण्यास आले. सगळं आयुष्य पुणे शहर आणि जिल्ह्यात घालविलेल्या देशमुख सरांनी मी आणि आमच्या ग्रुपच्या ज्ञानाच्या कक्षांना रुंदावल्या. त्यांनी आम्हाला जगाकडे पाहण्यास शिकविले. केवळ राज्यशास्त्र हा विषय त्यांनी शिकविला नाही तर आयुष्याचं शास्त्र कसं असतं हे पदोपदी सांगितलं. बाहेरच्या जगात नेमकं काय सुरू आहे आणि आम्ही काय करण्याची आवश्‍यकता आहे हे त्यांनी सांगितलं. स्पर्धेची जाणीव करून दिली. त्यांच्या विषयाशिवाय इतर विषयांबाबतही ते सातत्याने मार्गदर्शन करत राहिले. दुर्दैवाने काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले; मात्र त्यांनी शिकविलेल्या काही बाबींमधून ते आजही सोबतच आहेत.
---
तिसरं आणि माझ्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकणारे व्यक्तिमत्व म्हणजे शिकलगार मॅम यांचे. दुसरे वर्ष सुरू झाले आणि साधारण दोन-एक महिने झाल्यानंतर आमच्या कॉलेजमध्ये शिक्षणशास्त्र विषय शिकवण्यासाठी त्या पुण्याहून बदलून आल्या. प्रसन्न आणि हसतमुख व्यक्तिमत्वाच्या शिकलगार मॅम नेट उत्तीर्ण झालेल्या. माझा शिक्षणशास्त्र विषय नव्हता. त्यामुळे थेट त्यांच्या वर्गात बसण्याचा प्रश्‍नच नव्हता; जनरल नॉलेज स्पर्धेसाठी विद्यार्थी निवडण्याच्या निमित्ताने मी आणि मित्र संदीप पाटील त्यांना पहिल्यांदा भेटलो-बोललो आणि अक्षरशः भारावलो. त्यांचा अभ्यास, त्यांच्याकडे असलेली माहिती, स्पर्धा परीक्षेतील बारकावे यापूर्वी आम्ही कधीही न ऐकलेल्या गोष्टी त्यांच्याकडून आम्हाला समजल्या आणि त्यानंतर मात्र त्यांच्यासोबत आमचा एक ग्रुपच बनून राहिला. या ग्रुपमध्ये धर्मेंद्र पवार, सराटे-पाटील, धनवडे, सूर्यवंशी आणि आणखी एक-दोन जणांचा समावेश होता; मग आम्ही स्पर्धांमधून भाग घेतला. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, वाद-संवाद घडला. वेगवेगळी पुस्तके वाचण्यासंबंधी चर्चा झडल्या. अपडेट कसे रहावे याच्या टिप्स आणि खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व घडण्यासाठी आवश्‍यक असंख्य बाबी समजत राहिल्या...
---
....या तिघांच्या संस्कारांमुळेच आजपर्यंतची वाटचाल करू शकलो आहे. खूप लिहिता येईल त्यावर. यापुढेही त्यांच्याकडून मिळालेल्या शिदोरीवरच वाटचाल सुरू राहील. बाई आणि मॅम दोघींनाही परमेश्‍वराने दीर्घायुराराग्य प्रदान करो याच सदिच्छा-शुभेच्छा!

No comments: