Friday, January 12, 2018

सखी...


खरे तर सुरवातीला प्रिय असे लिहिले नाही म्हणून कदाचित तू थोडी खट्टू झाली असशील; पण एकदा सखी म्हटल्यावर त्याला पुन्हा आणखी कोणती विशेषणे लावायची गरज आहे का? निदान मला तरी तसे नाही वाटले. आता तू म्हणशील आजच हे अचानक पत्र वगैरे काय? पण खरे सांगू कित्येकदा तू सोबत असलीस की मनाच्या खोलवर जे काही सुरू असतं ते ओठांवर येतच नाही...तळ नुसताच ढवळत राहतो आणि फक्त मनावर तरंग उमटत राहतात. व्यक्त होतंच नाही. नेमके जे बोलायचे असते ते बोलणे होतच नाही... म्हणून म्हटलं शब्दांना सोबतीला घ्यावं. निदान ढवळलेल्या तळातून जे जे म्हणून बाहेर पडेल त्याचे तरंग नुसतेच मनावर उमटत राहण्यापेक्षा कागदावर साठवून तुझ्यापुढे मांडता येतं का पहावं...म्हणून हा खटाटोप.
---
असो...हे असे होते...तुझ्यासोबत नुसते बोलाचये म्हंटले की "सेंटी' व्हायला होतं...तू म्हणतेस मला फार "सेंटी' होत नको जावू म्हणून; पण काय करणार...जित्याची खोड.....
झाला आला राग...माझं हे असं बोलणं तुला नक्की आवडलं नाही...तुझ्या चेहऱ्यावर नाराजीची एक रेषा उमटलीच. माफ करो...मरणाची भाषा नाही करणार. पण कित्येकदा सत्य असंच सांगावं लागतं.
---------
खरे सांगू तुझ्याप्रति मनापासून आभार व्यक्त करण्यासाठी हा पत्रप्रपंच मांडला आहे. आता आभार कशासाठी? असा प्रश्‍न करू नकोस...तसे केलेस तर कित्येक बोलायच्या गोष्टी राहून जातील... पुन्हा फक्त तळ ढवळला जावून तरंग उमटत राहतील.
--
खरे तर तुझे नी माझे नाते काय कसे हे प्रश्‍न फिजूल आहेत ते मनाशी जुळलेत. तू मला नेहमी म्हणायचीस...मन साफ हवं...मोठं हवं...समजून घेणारं हवं...जाणून घेणारं हवं...दुसऱ्याच्या मनाचा ठाव घेता यायला हवां...दुसऱ्याच्या मनातील कालवाकालव आपल्या मनापर्यंत भिडली पाहिजे...बिनधास्तपणे मनात डोकावता आले पाहिजे...तेथे कसलाही पण...परंतु...येता उपयोगी नाही. तेथे कसलेही वयाचे बंध नाही की कसला भेद नाही.
खरे तर तुझ्या याच लॉजिकने माझ्या मनाची तार कोठे तरी झेडली गेली. आपणही याच वाटेचे मुसाफिर आहोत काय? असा स्वतःलाच प्रश्‍न विचारला. उत्तर होकारार्थी आले पण त्याचसोबत आणखी एका प्रश्‍नाने फेर धरला...आपल्यासाठी अशी समोरची व्यक्ती कोण? आणि उगाचच वाटले तूच तर ती नव्हेस ना? आणि तू सखी बनलीस...सखी दोनंच अक्षरं पण किती अर्थ भरलाय ना त्यात. तू म्हणशील चल काहीतरीच तुझं....पण खरं सांगू त्यामुळेच अद्यापही तुझ्या मनाचा थांग मला लागलेला नाही किती प्रयत्न करूनही. तुझे प्रत्येकवेळचे रुपच वेगळे. त्या रुपांनाही मनात बांधू पाहिले पण तेही जमले नाही. एक निर्विवाद सत्य...तू अथांग आहेस आणि माझ्या आयुष्याला व्यापून राहिलेली आहेस. किती आश्‍वासक आहे तुझे माझ्यासोबत असणं...
तुला कितीतरी वेळा विचारलंय "तू इतकी चांगली का आहेस' आणि त्याच्या उत्तरादाखल तुझे फक्त स्मित. हे कोडे काही सुटत नाही आणि मग पुन्हा नव्याने मी तुला उलघडायला घेतो आणि मी छोटा छोटा होत जातो; खरं सांगू पुरुषी अहंकारालाही हे छोटं होणं मनापासून आवडून गेलंय कारण त्यातूनच तर मला सावरणारं जोडलं गेलंय. (स्वार्थच बघ...तू देत राहतेस असेही)
----
तर मूळ मुद्यावर येतो. तुझं माझ्या आयुष्यातलं असणं...किती महत्त्वाचे हे मला सांगायंचंय तुला...

प्रत्येकाला वाटतं आपल्याला सावरणारं...आवरणारं कोणीतरी असावं. तसंच मला वाटलं आणि तू भेटलीस आणि मला मनापासून व्यक्त होण्यासाठी हक्काचे ठिकाण मिळाले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे "मी जसा आहे तसां' मला तू स्वीकारलंस...लटकी तक्रार जरूर केलीस...करतेस...पण सतत सोबत राहून सावरत राहतेस... हे सावरणंच तर जगणं सुसह्य करतं...समजुतदार असणं याला वयाचं बंधन नसतं हे तुझ्यामुळेच मला समजलं...आणि तेच मनाला भावलं. व्यक्त होण्याला ठिकाण गवसलं...तू सतत तुझा कान मला दिलास... मला ऐकत राहिलीस...माझ्या दोषांना हळूवारपणे मांडत माझ्यातील छोट्यातल्या छोट्या चांगल्या गोष्टीला मनापासून दाद देत राहिलीस. मला माणूस म्हणून उभं करत राहिलीस...माझा वेडेपणा सहन करताना सतत मला उभारी देत राहिलीस... देतेस. कौतुकाचे अत्तरपाणी सतत शिंपत राहिलीस...कोणी नसले तरी तू सोबत आहेस हा विश्‍वास सतत देत राहिलीस. कित्येकदा मी चुकलो असतानाही सावरत राहिलीस...मी कोलमडून नये म्हणून उत्साही शब्दांनी साथ दिलीस....चुकीच्या बाबींनाही अशा काही खुबीने माझ्यासमोर मांडलेस की मलाच त्या दुरुस्त कराव्या वाटल्या त्या केवळ तुझ्यासाठी...तू मला ऐकत राहीलीस... कोणीतरी आपलं मनापासून ऐकतं ही भावनाच मुळी खूप सुखद असते...ती माझी भावना तू सतत जपलीस....सहवासाचा प्रत्येक क्षण आनंदी होईल...उभारी घेणारा होईल...जगण्याशी दोन हात करण्यासाठी बळ भरणारा होईल असे सतत जगत राहिलीस...प्रत्येक अनुभव चांगलाच करण्यासाठी प्रयत्नशील राहिलीस...म्हणून तर आज मी हे मांडू पाहतोय...
तुझं आयुष्यातलं नेमकं स्थान सांगण्यासाठी एका कवितेच्या चार ओळी आठवतात.
...ती कविता म्हणजे तू आहेस....

कैसे बतावू मै तुम्हे ...
मेरे लिए तुम कौन हो...
तुम ही मेरी पहचान हो...
कैसे बताऊँ मैं तुम्हें.
देवी हो तुम मेरे लिये.
मेरे लिये भगवान हो!
---
माहिती आहे तुला "भगवान' म्हटलेलं नाही आवडणार...तुझा माणूसपणावर जास्त विश्‍वास आहे आणि तू माझ्यातल्या माणुसपणाला जपण्यासाठीच सतत सोबत आहेस...पण तरीही...
तुझ्याप्रतिची ती भावना सच्ची आहे.

Thursday, November 3, 2016

सुगंध

सुगंध...(चित्र ः प्रदीप घोडके)

त्याने लॅच उघडून घरात प्रवेश केला. आत येताच दारामागे स्टॅंडवर शूज काढून ठेवले. तिथेच वरच्या बाजूला अंगातील जर्कीन काढून अडकवले.
--
""ए ऐकलंस का ! आलोय बरं का मी. काय करतेस?... कसा गेला आजचा दिवस?...''

प्रश्न विचारतच त्यानं कपडे बदलले आणि बाथरुमध्ये जावून फ्रेश होऊन आला.

""आजचा दिवस मस्त गेला. आज अगदी मनासारखं काम झालं. बॉस खूश झाला. न होऊन सांगतोय कोणाला म्हणा. त्याचं टेन्शन मी घेतलं. मग काय तो झाला मोकळा. अगं बोल ना काहीतरी... वेळ झाला म्हणून रागावलीस? सॉरी गं... खूप ठरवलं होतं वेळेत यायचं... पण नाही जमलं. कामात गुंतलो की मला माझंच भान राहत नाही. अगदी झपाटल्यासारखं होतं... हो हो... तुला हे सगळं माहिती आहे... हे संवाद तुझे अगदी पाठ आहेत; पण ए, असा अबोला मुळीच बरा नव्हे बरं का! बरं, ठिकाय. मी कॉफी करतो. घेऊ आपण. मग तर तुझा राग जाईल ना...''
------
किचनमध्ये जाऊन त्यानं कॉफी तयार केली. दोन मग हातात घेऊन तो गॅलरीजवळ गेला. कॉफी घेत येणाऱ्या वाऱ्यासोबत मनाच्या हिंदोळ्यावर झुलू लागला. अगदी तंद्रीच लागली त्याची... खूप वेळ तो तसाच उभा राहिला... दूरवर कुणीतरी गाडीचे ब्रेक जोरात लावले आणि त्याची तंद्री भंगली. घराकडे परतणारे रस्ते एव्हाना सुने सुने होण्यास सुरवात झाली होती.
------
""काय, कॉफी आवडली ना... तुला माहितीय, कॉफी माझा विक पॉईंट आहे. आणि मला माहितीय की माझ्या हातची कॉफी, तुझा विक पॉईंट; पण माझ्या कॉफीला तुझ्या इतकी दाद मात्र दुसऱ्या कोणीच दिली नाही हां...''
""ए तुला आठवतंय... एकदा तू घरी रियाज करत बसली होतीस आणि मी तिथे पोचलो. तू डोळे मिटून किशोरीचे "सहेला रे...' म्हणण्यात तल्लीन होतीस. मी कितीतरी वेळ कोपऱ्यात बसून तुझा आवाज कानात साठवत राहिलो. तुझं संपत आलं तेव्हा वाटलं, तुला कॉफी करून पेश करावी. मग आईंना सांगून तुमच्या किचनमध्ये कॉफी बनवून आणली आणि तुझा रियाज संपताना तुझ्यासमोर कॉफीचे मग ठेवले. तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर आश्‍चर्यानं उमटलेले भाव आजही नजरेसमोर आहेत. आईही खूश झाल्या माझ्या हातची कॉफी पिऊन. कॉफीचे घोट घेताना आपला सुरू असलेला डोळ्यांतील संवाद... आहा क्‍या बात है...! आई म्हणाल्या पण... ""जावईबापू, फार लाड नका करू... रोज अशीच आयती कॉफी पिण्याची सवय लागेल तिला...'' त्यावर मारे ऐटीत म्हणालो होतो... ""लागू दे.. लागू दे... आपली तयारी आहे...'' किती वेडेपणाने वागलो होतो ना मी तेव्हा...

""हसू येतंय तर ओठात दाबून का ठेवतेस?... चुकलो बाबा, आता रोज नक्की वेळेत येईन. मग तर झालं?... ए, कॉफी संपवलीस... कशी झालीय ते तरी सांग...''
-----
बोलत बोलत त्याने दोन्ही मग किचनच्या सिंकजवळ नेऊन ठेवले. फ्रिजवर ठेवलेली बिलं हातात घेतली आणि तो पुन्हा हॉलमध्ये आला.
-----
""ए, किती बिल आलंय ना मोबाईलचं... ऑफीसच्या कामासाठी किती बोलावं लागतं. तुझा कॉल जेव्हा जेव्हा येतो, तेव्हा मी कामातच असतो. बोलताच येत नाही. ए त्याबद्दल मात्र सॉऽऽऽरी...! ए काय गंम्मत आहे नाही? कॉलेजात होतो तेव्हा कित्ती बोलायचो आपण फोनवर... कॉलेजमधून घरी पोचताच पायऱ्या चढता चढता पोचलीस का... जेवलास का करत... पुन्हा फोनवर बोलणं सुरू व्हायचं. दिवसभर कितीतरी वेळ आपण बोलत रहायचो... आई तर एकदा मला म्हणाली, ""अरे, अशी मोबाईल कंपन्यांची भर करण्यापेक्षा लग्न करून तिला घरी आण आणि हवं तेव्हढं बोलत बसा समोरासमोर.'' काय भारी वाटलं होतं...! लग्नानंतर आपलं रुटीन सुरू झालं आणि दोघंही किती गुंतून पडलो. मला बोलू वाटायचं खूप तेव्हा तुझं गाणं, रियाज सुरू असायचा आणि तू जेव्हा मला फोन लावायचीच तेव्हा मी हटकून कामात बुडालेलो असायचो. दोघांचीही चिडचीड व्हायची; पण संध्याकाळी मात्र त्यावर गोड तोडगा काढायला शिकलो आपण. किती सवयीचं झालं सगळं...''
------
आता तो सेफ्यावर रेलून बसला. एकटक पाहत...
----
""ए फार झाला हं रुसवा. खरंच, उद्यापासून नक्की वेळेवर येईन. बरं, आज तुझा वरचा सा निट लागला ना... जरा लक्ष दे... देवकीताई म्हणत होत्या... वरचा सा लावताना जऽऽरा कसरत होतेय तुझी... पण तू करशील... असंही अगदी अभिमानानं सांगत होत्या. मला तर बुवा खात्रीच आहे! तंबोऱ्यावर तुझी बोटं किती अलवार फिरतात... किती सुंदर संवाद सुरू असतो तुझ्या बोटांचा आणि त्या तारांचा... किती एकमेकांना समजून उमजून साथ करतात... अगदी लडीवाळपणे झंकारत राहतात... तुझ्या बोटांतील जादू चारही दिशांना मुक्तपणे उधळतात... एकेक अस्सल सूर पेश करत राहतात. ऐकणारा अगदी तृप्त होऊन जातो... माझ्यासारखां... नाहीतरी या सुरांमुळेच तुला आणि तुझ्यामुळेच मला... पूर्णत्व आलंय...!''

""ए आज एक मज्जा झाली येताना लोकलमध्ये. ऐकून हसून हसून पुरेवाट होईल तुझी.
मी ज्या डब्यात होतो ना, तिथं एक "तो' पण होता. गाडी स्टेशनमधून बाहेर पडल्यावर लागला की हातवारे करत पैसे मागायला. मी लांबच होतो. म्हटलं, येणार हा माझ्याकडे पैसे मागायला. प्रत्येकाजवळ जावून टाळ्या वाजवणं, पैसे काढणं करत करत तो एकाजवळ जाऊन उभा राहिला. टाळ्या वाजवून त्याच्याजवळ पैशाची मागणी केली. त्यावर त्या प्रवाशानं काय केलं माहितीय?... त्यानं पण लगेच त्याच्यासारख्याच टाळ्या वाजवल्या, त्याच्यासारखेच हातवारे केले आणि त्याच्या पुढे हात केला नि म्हणाला... ""चल, अब तू मुझे पैसे दे दे...'' तो अस्ला बावरला, तिथून सटकलाच! डब्यातल्या सगळ्यांनी एकच कल्ला केला आणि सग्ळे जमले त्याच्या भोवती. आहे की नाही मज्जा?... हसलीस बाई एकदाची...!
बरं... चला खूप रात्र झाली. थोडं खाऊन घेतो... पुन्हा सकाळी 7.30 ची लोकल पकडायला हवी. तुझं काय बाई...! बरं, तू खाऊन घेतलंस ना... बरं झालं... चल!
----
तो उठला. त्यानं बॅग उघडली. बॅगेतून गजरा काढून तिच्या तस्बीरीसमोर ठेवला आणि जेवण-खाण्याचं बघायला किचनमध्ये निघून गेला...
...तस्बीरीतल्या हसऱ्या डोळ्यांनी त्याच्याकडे भरभरून पाहिलं... मोगऱ्याच्या गंधाबरोबरच आठवणींचा सुगंध खोलीभर दरवळत राहिला...! 

Tuesday, November 17, 2015

भक्‍ती

ती मंदिरात आली. तिने देवाला हात जोडले. काही तरी पुटपुटली; मग काही सेकंद मूर्तीकडे एकटक पाहत उभी राहिली. समाधानाचे हसू तिच्या चेहऱ्यावर उमटले; मग पुन्हा एकदा मस्तकाला हात लावून तिने पुन्हा एकदा मनोमन नमस्कार केला. कनवटीला लावलेल्या दोन हिरव्या नोटा बाहेर काढल्या. दोन्ही हातांनी व्यवस्थित केल्या आणि दानपेटीत टाकल्या. पुन्हा एकदा नमस्कार केला. 

ती पैसे दानपेटीत टाकणार तेवढ्यात समोर देवापुढे वाहिलेले साहित्य गोळा करणारी महिला पुटपुटली ‘‘अंग येडे, पैसे या पाटीत टाकायचे नाहीस का. थेट देवाच्या पायाजवळ पोचले असते. कशाला पेटीत टाकून सरकारची भर करतेस. काय त्या सरकारचा तुला उपयोग नाही नी काही नाही. निदान मी प्रसादाचा नारळ तरी तुला दिला असता.‘‘

तिने ते ऐकले. हसली आणि बाजूला कोपऱ्यात जाऊन हात जोडून उभी राहिली. देवापुढे साहित्य जमा करणारी महिला तिला बहुधा ओळखत असावी. त्यामुळे ती अगदी कुत्सित हसत तिला टोमणे मारत होती; मात्र तिच्या बोलण्याचा तिच्यावर कसलाही परिणाम झाला नाही. ती काहीच उत्तर देत नाही हे पाहून ती महिला आणखी अस्वस्थ झाली. ते दोनशे रुपये तिच्या पाटीत पडले नव्हते म्हणून तिला तिचा रागा आला होता. तिची बडबड सुरूच राहिली. 
‘‘कायम येते नि पैसे देवापुढे न टाकता दानपेटीत टाकते. अशाने तिला पुण्य काही लाभणार नाहीच. दानपेटीत टाकून सरकारची धन करते. पाटीत टाकले तर देवाला पैसे जातील. खुळीच आहे, काही कळत नाही तिला.‘‘ तिच्या या बोलण्यावर तिथे जमलेले काही फिदीफिदी हसले. ‘‘असंच करत जा. म्हणूनच देवाने तुला आहे तिथेच ठेवलेय. तुला सुखचं मिळत नाही. तुझी अवस्था काही बदलत नाही. तू तशीच राहणार आणि तशीच मरणार...‘‘ देवापुढे उभे राहून ती महिला त्या बाईला आता चक्‍क सुनावू लागली होती, तरीही देवापुढे उभी असल्यामुळे आणि इतर भक्‍त येत-जात असल्यामुळेच तिने स्वत:वर काहीसा संयम ठेवला होता. नाही तर त्या दोनशे रुपयांवरून ती आणखी किती तरी बोलली असती. आता त्या बाईची मंदिरातून बाहेर पडायची वेळ झाली. ती पुढे आली. तिने पुन्हा देवाला मनापासून नमस्कार केला आणि ती वळून चालू लागली. 

ती निघाली हे पाहून या महिलेला आणखी चेव चढला. ‘‘तू पाटीत कधीच पैसे टाकत नाहीस म्हणून तुझी अशी अवस्था आहे. म्हातारी झालीस तू... तू अशीच राहणार...अशीच मरणार....‘‘ पुन्हा बडबडली. 

आता ती बाई थांबली. माघारी वळली म्हणाली. 

‘‘मी पैसे पेटीत टाकते, ते सरकारला जमा होतात. मला जेवढं लागतात त्यापेक्षा जास्त पैसे असले की मी पेटीत टाकते. पैसे टाकताना समाधानी असते. या पैशाची सरकारला गरज हाये, त्या पैशातून सरकार गोर-गरिबांसाठी नक्‍कीच काही तरी करंल. फूल नाय फुलाची पाकळी गरिबाला पण भेटंल. खाणारी खावू देत. माझ्या गरिबाचं पैसं त्यांना नाहीत पचत; पण ज्यो गरिबांसाठनं करतोय तेच्यापर्यंत तरी पोचतील की, सरकारला पैसे लागत्यात काय काय करायला. तू घेतलंस तर पैसं फकस्त तुझ्या घरातच जाणार आणि तुला कितीबी मिळालं तरी कमीच पडणार.... व्हय नव्हं.‘‘ एवढं बोलून ती बाई हातातली कसलीशी पिशवी सावरत मंदिरातून बाहेर पडली. देवापुढची महिला तिच्या या बोलण्याने काहीशी वरमली, तरी ती बाई गेली तरी बडबडतच राहिली. 

मी देवाला नमस्कार केला. प्रदक्षिणा घालून मंदिरातून बाहेर पडलो. त्या बाईचा विचार करत करत रस्त्यावर आलो. अगदी अशिक्षित वाटणारी बाई किती समजुतीनं बोलत होती. डोळ्यांत आशेची चमक जागत ठेवणारी वाटत होती. कुठून आलं असेल तिच्याकडे हे धैर्य, बरं स्वत: अगदी फाटकी वाटत असूनही शंभरच्या दोन नोटा तिने किती सहजपणे परमेश्‍वरचरणी वाहिल्या. बरं, तिचं दानही किती डोळसपणे केलेलं. दानपेटीत पैसे टाकताना त्या पैशाचा विनियोग नक्‍कीच चांगल्या कामासाठी होणार हा विश्‍वास तिच्या ठायी आहे. असा विश्‍वास आपल्या ठायी नाहीच. देवापुढील महिला एवढं बोलली तरी ती शांतच राहिली. एकही शब्द उलटून नाही बोलली. फक्‍त हसली... मार्मिक बोलली आणि निघून गेली. या तिच्या भक्‍तीला म्हणावं तरी काय?

‘‘दादा गरिबाला चहाला पैसे देता.... या आवाजाने माझी विचारांची मालिका तुटली. भीक मागणाऱ्या बाईकडे पाहिले आणि पाहतच राहिलो. त्या मघाच्याच मंदिरातील बाईने माझ्यापुढे हात केलेला..‘‘

Wednesday, September 16, 2015

आपली ज्योतही चेतवू...


विघ्नहर्त्या
  गजाननाचे आज घराघरांत आगमन होत आहे. आनंदोत्सवाचे पर्व त्याच्या येण्याने सुरू होत आहे. 
पुढील अकरा दिवस सर्वत्र उत्साह, मांगल्य, भक्तिभाव भरून राहील. ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशमूर्तींची 
प्रतिष्ठापना होईल आणि चौकाचौकांतून चैतन्य निर्माण होईल. व्रतवैकल्याची आवड असलेल्या मराठी 
मनासाठी गणेशोत्सव ही पर्वणी असते. ती अगदी मनापासून साधली जाते. यंदा मात्र आपण सर्वांनीच हा उत्सव साजरा करताना भान राखण्याची वेळ आली आहे. वरुणराजाने फिरवलेली पाठ हे त्याचे मुख्य कारण आहे. 
एरव्ही पाऊस ठिकठाक असेल तर बळिराजाच्या चेहऱ्यावर हास्य फुलते आणि मग सणांची गोडी वाढते. यंदा 
दुष्काळाचे संकट आ वासून उभे आहे. मराठवाडा, विदर्भात त्याची तीव्रता भयानक आहे. सप्टेंबर 
महिन्यामध्येच पाण्यासाठी वणवण सुरू आहे. धरणे कोरडी पडली आहेत. आत्ताच जर अशी अवस्था असेल 
तर पुढील कालावधीत काय होईल, हा विचार कुरतडणारा आहे. शिवार अधिकच भेगाळले आहे. जगण्याएवढाही चारा जनावरांसाठी उपलब्ध नाही. उत्पादन घटणार असल्याने अन्नधान्य महागणार आहे. त्यामुळेच आपली 
जबाबदारी वाढली आहे. गजाननाचे स्वागत जरूर उत्साहात करू; मात्र त्यामध्ये साधेपणा ठेवू. आपल्याच 
राज्यातील आपल्यासारखीच हाडामासाची माणसे जगण्याचा संघर्ष करत आहेत याचे भान ठेवू. जगण्याचे बळ 
हरल्याने मृत्यूला कवटाळत आहेत याची जाणीव ठेवू. विघ्नहर्त्याला दुष्काळाचे संकट टाळण्यासाठी पावसाचे 
दान देण्याची प्रार्थना करूच; पण दुष्काळाने होरपळणाऱ्या जीवांचे अश्रू पुसण्यासाठी पुढाकार घेऊ. सरकार 
काही तरी करेल, आपल्याला काय त्याचे, असे न म्हणता आपला वाटा आपण उचलू. अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, अक्षयकुमार, क्रिकेटपटू अजिंक्‍य रहाणे आदींनी त्यासाठीची ज्योत पेटवली आहे. ती ज्योत अधिक  प्रकाशमान होण्यासाठी आपली ज्योतही चेतवू. आपल्याच बंधू-भगिनींचे जगणे सुसह्य करण्यासाठी 
आपल्यामधील जिवंत माणसाला हाक देऊ. उत्सवाचा बडेजाव टाळून हाताशी असलेल्या रकमेमधून उद्‌ध्वस्त 
होणारे संसार सावरण्याचा प्रयत्न करू. गजाननासमोर उभे राहताना काही चेहऱ्यांवर आनंद फुलवल्याचे 
समाधान आनंदाने मिरवू. 

Friday, September 6, 2013

...गुरुरदेवो महेश्वरा...

आई-वडील हे आपले आद्य गुरू (त्यांची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही). त्यांचे बोट पकडून आपण चालू लागतो आणि सुरू होतो आयुष्याचा प्रवास. या प्रवासात आपल्याला सक्षमपणे उभे करण्यात सर्वात मोलाचा वाटा असतो तो भेटणाऱ्या शिक्षकांचा; सर्वत्र शिक्षकदिन साजरा होत असताना मला आज माझ्या तीन शिक्षकांची अगदी प्रकर्षाने आठवण आली. अर्थात ज्या-ज्या शिक्षकांच्या वर्गात बसण्याची संधी मला मिळाली त्या सर्व शिक्षकांकडून अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी शिकण्यास मिळाल्या. अगदी पटकन आठवतात अशी नावे म्हणजे, पारखे बाई, पुणेकर बाई, गुरव बाई, एम. एम. पवारमॅम, श्री. लिगाडे सर, श्री. वाघमोडे सर, काळेबाग मॅम, श्री. डी. एस. माने सर, तांबोळी मॅम, चौगुले सर, श्री. प्रकाश कुंभारसर, श्री. पिरजादे, एस. एच. पाटील, पाटील मॅम आणि इतरही शिक्षक-शिक्षिका. 
या सर्वांसोबतच आयुष्यावर सर्वाधिक प्रभाव पडला असे तीन शिक्षक म्हणजे क्षीरसागर बाई, एम. एम. शिकलगार मॅम आणि देशमुख सर.
---
ज्या वयात खूप उत्तम वाचणे, उत्तम ऐकणे, उत्तम वर्क्तृत्व म्हणजे काय आणि चांगला माणूस म्हणून जगणे म्हणजे काय याचे संस्कार होण्याची आवश्‍यकता असते अशा वयातच बाईंकडून शिकण्याची आणि त्यांच्या घरामध्ये वावरण्याची मला संधी मिळाली. त्यांनी माझ्यावर अगदी मुलाप्रमाणे प्रेम केले. नवनव्या बाबींची ओळख करून दिली. चांगली पुस्तके हातात ठेवली. ह्रदयनाथांना मी मनापासून ऐकले त्यांच्या "औदुंबर'मध्ये. मी जे काही थोडंफार लिखाण करतो त्याची पहिली ठिणगी माझ्यामध्ये चेतविण्याचं काम बाईंनी आणि त्यांची कन्या प्रियाताईने केले. क्षीरसागर गुरुजी माझ्या बाबांचे शिक्षक (त्यांनीही बाबांवर उत्तमादी उत्तम संस्कार केले) त्यामुळे त्यांच्यापासून मी बहुतेकदा दूरच असे; मात्र बाईंनी नेहमीच मला ममत्वाने अनेक गोष्टी शिकविल्या. ज्याच्या शिदोरीवर माझं आयुष्य घडतं आहे.(आणखी खूप खूप सांगता येईल)
---
दुसरे व्यक्तित्व भेटले महाविद्यालयाच्या फुलपंखी आयुष्यात. श्री. देशमुख सर. मी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि त्याच वर्षी ते पुण्यातून बदलून बळवंत महाविद्यालयात राज्यशास्त्र शिकविण्यास आले. सगळं आयुष्य पुणे शहर आणि जिल्ह्यात घालविलेल्या देशमुख सरांनी मी आणि आमच्या ग्रुपच्या ज्ञानाच्या कक्षांना रुंदावल्या. त्यांनी आम्हाला जगाकडे पाहण्यास शिकविले. केवळ राज्यशास्त्र हा विषय त्यांनी शिकविला नाही तर आयुष्याचं शास्त्र कसं असतं हे पदोपदी सांगितलं. बाहेरच्या जगात नेमकं काय सुरू आहे आणि आम्ही काय करण्याची आवश्‍यकता आहे हे त्यांनी सांगितलं. स्पर्धेची जाणीव करून दिली. त्यांच्या विषयाशिवाय इतर विषयांबाबतही ते सातत्याने मार्गदर्शन करत राहिले. दुर्दैवाने काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले; मात्र त्यांनी शिकविलेल्या काही बाबींमधून ते आजही सोबतच आहेत.
---
तिसरं आणि माझ्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकणारे व्यक्तिमत्व म्हणजे शिकलगार मॅम यांचे. दुसरे वर्ष सुरू झाले आणि साधारण दोन-एक महिने झाल्यानंतर आमच्या कॉलेजमध्ये शिक्षणशास्त्र विषय शिकवण्यासाठी त्या पुण्याहून बदलून आल्या. प्रसन्न आणि हसतमुख व्यक्तिमत्वाच्या शिकलगार मॅम नेट उत्तीर्ण झालेल्या. माझा शिक्षणशास्त्र विषय नव्हता. त्यामुळे थेट त्यांच्या वर्गात बसण्याचा प्रश्‍नच नव्हता; जनरल नॉलेज स्पर्धेसाठी विद्यार्थी निवडण्याच्या निमित्ताने मी आणि मित्र संदीप पाटील त्यांना पहिल्यांदा भेटलो-बोललो आणि अक्षरशः भारावलो. त्यांचा अभ्यास, त्यांच्याकडे असलेली माहिती, स्पर्धा परीक्षेतील बारकावे यापूर्वी आम्ही कधीही न ऐकलेल्या गोष्टी त्यांच्याकडून आम्हाला समजल्या आणि त्यानंतर मात्र त्यांच्यासोबत आमचा एक ग्रुपच बनून राहिला. या ग्रुपमध्ये धर्मेंद्र पवार, सराटे-पाटील, धनवडे, सूर्यवंशी आणि आणखी एक-दोन जणांचा समावेश होता; मग आम्ही स्पर्धांमधून भाग घेतला. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, वाद-संवाद घडला. वेगवेगळी पुस्तके वाचण्यासंबंधी चर्चा झडल्या. अपडेट कसे रहावे याच्या टिप्स आणि खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व घडण्यासाठी आवश्‍यक असंख्य बाबी समजत राहिल्या...
---
....या तिघांच्या संस्कारांमुळेच आजपर्यंतची वाटचाल करू शकलो आहे. खूप लिहिता येईल त्यावर. यापुढेही त्यांच्याकडून मिळालेल्या शिदोरीवरच वाटचाल सुरू राहील. बाई आणि मॅम दोघींनाही परमेश्‍वराने दीर्घायुराराग्य प्रदान करो याच सदिच्छा-शुभेच्छा!

Friday, August 16, 2013

अवघा रंग...!

स्वातंत्र्य या शब्दाचा नेमका अर्थ काय? 
स्वतंत्र होणं...एखाद्याच्या गुलामगिरीतून मुक्त होणं, स्वतःच्या मनासारखं जगणं, हवं तसं वागणं, आई-वडिलांच्या छत्रछायेखालून बाहेर येऊन स्वतःचं आभाळ निर्माण करणं, नव्या अवकाशात भरारी घेणं... 
...काय, नेमका अर्थ काय लावायचा? 
काय सालं... 
स्वातंत्र्य या एका शब्दानं पार डोक्‍याचा भुगा करून सोडला. का, तर म्हणे तिला माझ्यापासून स्वतंत्र व्हायचं आहे म्हणून... 

आई-बाबांचं घर सोडलं आणि मी स्वतःच्या पायांवर उभा राहिलो. माझं वेगळं घरटं पाहून आई-बाबांना झालेला आनंद म्हणजे माझ्या यशाची पोचपावती... 
कधीतरी एकदा ती भेटली आणि या हृदयीचं त्या हृदयी गुज सांगितलं गेलं. त्याला विश्‍वासाचं कोंदण जडलं...गाठ बांधली गेली...एक नवं स्वतंत्र नातं जन्माला आलं...अगदी आनंदाचे डोही आनंद तरंग असं... थोडं वळून पाहिलं... आशीर्वादासाठी उंचावलेल्या आई-बाबांच्या हातामागील चेहऱ्यांवर अपार समाधान दिसलं...डोळ्यांत आनंद काठोकाठ भरलेला...पोरगं स्वतंत्र उभं राहिलं हे दर्शविणारे भाव... मनाला सुखावून गेले... 

नवलाई संपून संसार सुरू झाला... फुलपंखी हिंदोळ्यांवरील झुले बाजूला टांगले गेले...संसार नावाचा यज्ञ सुरू झाला...मग जरासे चटकेही जाणवू लागले... 
पण...समजुतीनं...जाणिवेनं...सांभाळून घेत...कमीत कमी झळ लागेल याची काळजी घेत पावले पुढे पडत राहिली...थोडी फार ज्वाळा भडके; पण अगदी किरकोळ... 
पण परवा जरा भडका जास्तच उडाला...ऑफिसातून यायला वेळ काय लागला...तिला दिलेला शब्द मोडला गेला... आणि मग भांड्याला भांडं लागलंच...ताव ताव तावलो...एकमेकांची उणीदुणी निघाली...अबोला धरला...अढीची पहिली गाठ बसली... दोघेही ठाम, त्यामुळे ती सुटण्याचं काही चिन्ह दिसेना...अचानक एकमेकांच्या स्वातंत्र्यावर घाला वगैरे घातल्यासारखं वाटू लागलं... 

....ही माझ्या आयुष्यात आली आणि माझं स्वातंत्र्य हिरावलं...आयुष्य तिच्या दावणीला बांधलं गेलं...माझं काही मतच शिल्लक राहिलं नाही...इत्यादी इत्यादी.... हे मनात म्हणत राहिलो... 

ती थेटपणे म्हणाली....""तू नव्हतास तोपर्यंत मी माझी होते....तू आलास आणि मी माझी राहिलेच नाही...तुझ्या अंमलाखाली माझं स्वतंत्र अस्तित्वच संपलं... मला या परजीवी जगण्याचा कंटाळा आलाय... मला तुझ्यापासून मोकळा श्‍वास हवाय... माझा जीव गुदमरतोय तुझ्या सहवासात... हे घर म्हणजे तुरुंग भासतोय... प्रत्येक ठिकाणी तूच का? मी का नाही... मी कोठे आहे?... मला मी हवी आहे... बास... आता मी कदापि सहन करणार नाही... माझंही काही मत असू शकतं.. माझंही व्यक्तिमत्त्व आहे...मी तुझ्यापासून वेगळं होणार... उद्याच्या उद्या तुला वकिलाकडून नोटीस येईल... मग दे त्याला काय द्यायचं ते उत्तर... सही कर आणि मला मोकळं कर...'' 

""जा, गेलीस उडत...तुझ्यासारख्या छप्पन्न.....'' तिच्या भरलेल्या डोळ्यांकडे लक्ष गेले आणि पुढील शब्द घशातच अडकले... बॅग भरून ती गेली तरातरा निघून आणि तो अडकला "तुझ्यासारख्या 56....' वर 

तिच्या शेवटच्या करवादलेल्या वाक्‍याने तो मुळापासून हलला... बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज आता त्याला सतावू लागला... पडणाऱ्या प्रत्येक थेंबागणिक विचारांचा ढोल त्याच्या मेंदूवर वाजू लागला... 
ती आपल्यापासून दूर निघाली आणि आपण काय बोललो हे... असं असतं का? आपण इतके कसे घसरलो...एवढ्याचसाठी सगळा अट्टहास केला होता का? ती मिळावी म्हणून काय नाही केलं आपण? तिच्या आयुष्यात येण्यानं आयुष्याचा सगळा अर्थच बदलला आपल्या. बेताची नोकरी असतानाही तिनं आपल्यावर प्रेम केलं... सुरवातीचे काही महिने फक्त मी नोकरीत कसा स्ट्रॉंग होईन यासाठी तिनं मेहनत घेतली...स्वतःचं करिअर तिनं बाजूला ठेवलं...माझ्या रंगात रंगून गेली...कधीही ती दिसली नाही... तिच्यातही मला मीच दिसत राहिलो... आपली चूक झाल्यानंतर तिनं ती आपल्याला दाखविली तर आपल्याला एवढा का राग आला... आपला इगो एवढा का मोठा झाला, की आपण आपल्याच प्रतिमेसोबत भांडलो... आपल्या आयुष्यात येताच तिनं तिच्या स्वतंत्र अस्तित्वाला जणू तिलांजलीच दिली...तिचा प्रत्येक श्‍वास आपल्या श्‍वासाचा एक भाग बनला आणि आज आपल्या श्‍वासाची माळ तुटू लागलीय आणि आपण "तुझ्यासारख्या 56...' म्हणू कसे शकतो? 
....का वाटलं तिला आपल्यापासून वेगळं व्हावं असं... याचा का नाही मी विचार केला... माझी चूक माझ्या लक्षात कशी नाही आली... अरे बापरे, हे काय करून बसलो...माझी चूक झाली...माझी चूक झाली...मला ती सुधारलीच पाहिजे.... 

तो अंगावरील कपड्यानिशी पळत सुटला...स्टेशन गाठलं...शोध शोध शोधलं...तिच्या गावची शेवटची गाडी गेल्याचं समजलं आणि...स्वतःवर चरफडला...काय केलं आपण...आपल्या सावलीवर कोण चिडतं का? सकाळी पहिल्या गाडीनं गाव गाठायचं. तिची माफी मागायची... नाक घासायचं पण तिला घेऊन यायचं... पुन्हा असं कधी कधी नाही करायचं... 

घरी आला...कोचावर बसला विषण्ण मनाने... छातीत कढ दाटला... डोळ्यांतून पाणी वाहू लागलं... 
""कॉफी लगेच घेणार आहेस की...?'' 

सर्रकन काटा आला अंगावर.... 
नजर वर गेली...समोर ती उभी...तेवढीच शांत...मोठं वादळ पचवून उभी! 

""...तू गेली नाहीस...? कोठे होतीस...? 
""कोठे जाणार तुला सोडून... तू आणि मी, आपण वेगळे कोठे आहोत? माझं अस्तित्वच तुला जोडलं गेलं आहे... माझा रंग तुझा झाला असताना तो कसा वेगळा होईल...आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे...आपल्या दोघांचं एक वेगळं स्वतंत्र जग आहेच की...ते सोडून कोठे जाणार? कशी जगणार...तुझ्याशिवाय मी, हा विचार नाही करता येत मला...तू ओरडलास...भांडलास...त्याचं नाही वाईट वाटलं फारसं...पण तू म्हणालास ना...की "तुझ्यासारख्या 56...' त्यानं मी दुखावले... माझ्यासाठी ऑलमोस्ट तू एकटाच आहेस...तुझ्याशिवाय मला मिळालेलं स्वातंत्र्य.. मला नाही वाटत मी त्यात मोकळा श्‍वास घेऊ शकले असते...'' 
""असं नको बोलूस...जर दोघांचा रंग एक असेल तर तो वेगळा कसा होईल... मी बोलताना चुकलोच... मला समजलंय...माझा इगो मोठा झाला आणि स्वतंत्रपणाचा फुगा फुगला...पण तो आता फुटलाय...आता पुन्हा कधीही फुगणार नाही...इट्‌स प्रॉमिस...''

Thursday, July 4, 2013

पाऊस तिचा...त्याचा!

परवा तो खिडकीशी बसलेला. काहीसा उदास... पाऊस सरींचा राग ऐकत. एखादा मुरलेला कलाकार जसे सतारीवर एकापाठोपाठ एक रागांच्या लडी छेडतो त्याप्रमाणे बरसणाऱ्या सरींचं सुरू होतं... कधी तरल... कधी अवखळ... कधी विरह... कधी व्याकूळ... कधी रौद्र... तर कधी अगदीच सुनं सुनं... म्हणजे सरी जशा बरसतील तसा हा आभास होत राहिला... बरं सुरावटीमध्ये विविधता असूनही ती ऐकण्याची ओढ अगदी काठोकाठ भरलेली... ऐकता ऐकता त्यानं ओंजळ भरून घेतली आणि एक अनामिक शिरशिरी अंगावर उमटून गेली... तिच्या आठवणीची... 
 
एकदा असाच पाऊस सुरू असताना ती अचानक घरी आली. म्हणाली, "चल फिरायला जाऊ..' त्याच्या नको म्हणण्याकडे दुर्लक्ष करत तिने त्याला जर्किन अडकवलं, अगदी लहान मुलासारखं आणि दुडदुडत पायऱ्या उतरून गाडीशी पोचलीसुद्धा. 

आता त्याचा नाईलाज. खाली पोचला तो बाईसाहेबांनी गाडी सुरू केलेली. खूप उतावीळ झालेली पाऊस झेलायला. मग तो सावरून बसला तिच्या पाठी. गाडीने वेग घेतला... दहा एक मिनिटांत शहरभरचा पाऊस झेलत गाडीने घाट रस्ता पकडला आणि हिरवाईतून प्रवास सुरू झाला... त्याचंही कोरडेपण संपलं... तिचा पाऊस पिण्यातला आनंद त्याला जाणवू लागला... 

किती लहान मुलासारखं करते. पाऊस म्हणजे तिचा जीव की प्राण... त्याला पाऊस आवडतो प्रचंड... पण तो खिडकीतून. हे तिलाही माहिती आहे म्हणूनच ती त्याला मुद्दाम आज खिडकीबाहेरचा पाऊस अनुभण्यासाठी घेऊन आली. आता ती बडबडत होती... पावसाच्या कविता सांगत होती... गाण्यांतला पाऊस मांडत होती... आणि तो तिचा पाऊस अनुभवण्यात अगदी तल्लीन झाला. 

गाडीने वळणावर टर्न घेतला. तिने घाईने गाडी उभी केली आणि गाडी सोडून समोरच्या कठड्यावर धावली. काय म्हणायचं तिच्या या बालीशपणाला... त्याला येण्यासाठी खुणावलं. तो तिच्याजवळ पोचला. समोरच्या दरीकडे तिने बोट केलं. 

"दरीतून धुक्‍यांचे लोट वर येत होते... हिरवाईवर शुभ्र नक्षी अलगद हेलकावत होती... वरून रिमझिमणारा पाऊस आणि हिरवाईतून येणारे शुभ्र धुके... आहाहा... ती दूरवरील निसर्गसौंदर्य टिपण्यात मग्न... आणि तो तिला पाहण्यात. "ती एक चित्र बनून राहिलेली... तिच्या चेहऱ्यावरून निथळणारा पाऊस... वाऱ्यावर भुरभुरणारी एकच सुटलेली बट... चेहऱ्यावर असिम समाधान... मिटलेल्या पापण्यांआड बहुधा निसर्ग कवेत घेतल्याचा परमानंद... ती अगदी अविचल... मूर्तीरुप... पावसात पाऊस बनलेली... थेंबांतून अगदी मिसळून गेलेली... तिचं वेगळं अस्तित्वच नव्हतं जाणवत... अचानक वीज चमकली... 
 
समोर विजेचा लोळ चमकला आणि पाठोपाठ कडकडाट शांतता भेदून गेला. सुरांची मैफल विस्कटली. भान आलं... घरातच असल्याचं... मोबाईलची रिंग वाजली... तिचे शब्द कानी पडले... "मला न्यायला येतोस... तुझ्याशिवाय कशी राहू...' या शब्दांनी जादू केली... आलोच म्हणत तो धडधडत पायऱ्या उतरला... गाडी काढली आणि स्टेशनच्या दिशेने सुसाट निघाला... सरी झेलत... त्याचा खराखुरा पाऊस त्याला भेटीला आला होता... दोन महिन्यांचं मौन सुटलं होतं... मोडणारं घर सावरणार होतं... स्टेशनचं अंतर कमी होऊ लागलं... पाऊस बरसतच राहिला... त्याच्या डोळ्यांमधून... आनंद ओसंडत राहिला...!