Thursday, October 2, 2008

माणुसकीचाघालू जागर

माणुसकीचाघालू जागर
घटस्थापनेने विधिवत नवरात्र सुरू होईल आणि सारा भवताल भक्तीच्या जागराने भरून आणि भारून जाईल. पहाटेच्या काकडआरतीपासून रात्रीच्या शेजारतीपर्यंत मंदिरांना जाग राहील. घराघरांतील देवघरांत बसविलेले घट, अखंड तेवणारा नंदादीप, भक्तीभरल्या मनाला मिळणारी मिणमिणत्या प्रकाशाची आश्‍वासक ऊब आणि मुखी परमेश्‍वराचे नामस्मरण, असं वातावरण आपल्या सभोवताली राहील. सश्रद्ध मनांसाठी हा उत्सव प्रेरणा, आश्‍वासन आणि दिलासा घेऊन येणाराच असेल; मात्र आजूबाजूला पाहिल्यास सध्या सामाजिक भान हरवल्यासारखी स्थिती आहे. ऐहिक सुखापाठी लागलेला एक समाज आणि टीचभर पोटाचे खळगे भरण्यासाठी खुरटणारा समाज हा ठळक विरोधाभास संवेदनशील मनाला बोचणारा आहे. ही बोच जाणवू न घेता "मला काय त्याचे?' म्हणत कोषात जगणाराही एक समाज फोफावतोय हे खरे दुःख आहे.बुद्धीदेवता श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीत डोकी तापतात, त्याचे पर्यवसान छोट्या-मोठ्या मारामारीत होते. कुणाला याचं काही देणं-घेणं नसतं! रस्त्यावर एखादी मोटारसायकल घसरते, त्यावरील दोघे जखमी होऊन तळमळत उपचाराची वाट पाहत पडतात. येणारे-जाणारे नुसतेच बघे. जखमी तरुण तडफडत असतो. मग कुणीतरी "हृदय' असलेला माणूस मदतीचा हात देतो; पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. वीज वाहक तारेच्या स्पर्शाने एक माऊली जिवाला मुकते. कोणाच्या तरी बेफिकिरीची सजा कोणाला तरी मिळते. अशा कितीतरी घटना सभोवती घडत असतात आणि मला काय त्याचे? करत जगणारा समाज पुढचा दिवस गाठण्यातच मग्न असतो. या घटनांमुळे संवेदनशील मने मात्र हळहळतात. चुकचुकतात. मनातच आक्रंदत राहतात. काही तरी करायला हवं या जाणिवेने पेटून उठतात; पण त्यांच्या पेटण्याची धग चौकटीआडच बंदिस्त राहते. पुन्हा घटना घडते, पुन्हा तसंच होतं. दिवस कॅलेंडरवर उलटला जातो. आक्रंदणारी मनं म्हणतात हे बदलायला कोणीतरी मसिहा, देवदूत जन्मास यायला हवा! आणि मग बेटं मन वाटेकडे डोळे लावून बसतं.... ...आपण किती दिवस असं वाट पाहत राहायचं. ज्या समाजाचे आपण घटक आहोत, तो कुणामुळे तरी डागाळतो. तो तसा होऊ द्यायचा का? याचा विचार आपणच करायला हवा. आजपासून सुरू होणारं नवरात्र त्यासाठीचा अगदी उत्तम मुहूर्त आहे असे मानू! चौकटीआड बंदिस्त झालेली पेटून उठण्याची, काहीतरी उत्तम, समाजहित साधण्याची, अंधार दूर लोटण्याची धग खुशाल भडकू देऊ. आहे रे-नाही रेची दरी सांधणारा सेतू बनू! समाजाचा रंग एकच बनण्यासाठी आपले मूळचे रंग विसरून जाऊ. गावगप्पांतून इमले न बांधता प्रत्यक्ष कृती करू. नवरात्रात दररोज अंबेचा जागर होईल. आपणही मिळून सारे माणुसकीचा जागर घालू!