Wednesday, March 31, 2010

थोडी चंमत ग!

1)मुंबईमधील एका कार्यक्रमात स्टेजवर एका बाजूने अभिनेते अमिताभ बच्चन आणि दुसऱ्या बाजूने मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अचानक एंट्री केली आणि संयोजकांचे धाबे दणाणले. त्यांच्या चेहऱ्यावर "अगा मी ब्रह्म पाहिले' असे भाव पाहून मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला, ""हायकमांड'च्या आदेशानेच अमिताभ बच्चन यांच्यासोबत आमचा "मिले सूर मेरा तुम्हारा'. घाबरू नका!'' त्यांचे स्पष्टीकरण ऐकताच संयोजकांपैकी एकाने तातडीने दोघांना एकच हार घालून त्यांचे स्वागत केले. दोघांनीही छायाचित्रकारांना छानशी पोझ दिली आणि तीच वर्तमानपत्रात पहिल्या पानावर झळकली.

2)एकदिवसीय सामन्यात नुकतेच द्विशतक झळकविलेल्या आणि सध्या आयपीएलमध्ये सुसाट सुटलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तातडीने निवृत्ती पत्करत असल्याची घोषणा केली. नव्या रक्ताला वाव देण्यासाठी मी हा निर्णय अत्यंत आनंदाने घेत असल्याचे सांगितले. त्याच्या फ्यूचर प्लॅनविषयी विचारले असता, सचिन नेहमीप्रमाणे काहीसा लाजला. म्हणाला, ""मी हिंदी चित्रपट साईन केलेला आहे व लवकरच त्याचे शूटिंग सुरू होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आमीर खान करणार असून माझ्या उंचीला सूट होणाऱ्या आणि अभिनय येणाऱ्या नायिकेचा शोध सुरू आहे. निर्मिती अर्थातच "अंबानी ग्रुप' करणार आहे. मी या नव्या इनिंगसाठी एक्‍साईट आहे.''

3)मुंबईच्या कुठल्याशा पंचतारांकित हॉटेलात पत्रकार परिषदेत अभिनेता आमीर खान भुताच्या वेशात प्रगटला आणि विचित्र आवाजात किंचाळल्याने काही महिला पत्रकार बेशुद्ध पडल्या. आमीर सावरायला गेला, तर काही अर्धवट शुद्धीत येऊन पुन्हा बेशुद्ध पडल्या (त्यांना मग बाहेरच नेण्यात आले). येऊ घातलेल्या नव्या चित्रपटात आमीर एका भुताची भूमिका करणार असून ती भूमिका वास्तववादी व्हावी यासाठी त्याने केस, भुवया, मिशा, हाता-पायांची नखे वाढविली आहेत. त्यामुळे चॉकलेट हिरो आमीर अगदीच भेसूर दिसू लागला आहे. हा गेटअप केल्यापासून तो आपल्या पत्नीला भेटलेला नाही. कारण पहिल्यांदा असे पाहिल्यावर तिला सडकून ताप भरला होता म्हणे.

4)राज्यातील बहुतेक सर्व शहरांत काल रात्री जे पाणी सुरू झाले ते अद्याप थांबण्याचे नावच घेत नाही. बाया-बापड्यांनी घरामधील ज्या-ज्या म्हणून भांड्यांत पाणी साठविणे शक्‍य आहे त्यामध्ये केवळ पाणीच भरून ठेवले. काहींनी घरातील वाट्या, फुलपात्रे, छोटी गाडगी, माळ्यावर ठेवलेले डबे, झाडांच्या मोकळ्या कुंड्या, दिसेल त्या खोलगट भागात पाणी साठवून ठेवले. ज्याअर्थी आज दिवसभर नळाला पाणी राहिले याचा अर्थ पुढचा आठवडाभर तरी पाणी येणार नसल्याचा त्यांचा संशय बळावला. काय करणार, नेहमीचा अनुभव. हा प्रकार बहूतेक शहरांतील पालिका-महापालिका प्रशासनाला समजल्यानंतर त्यांनी गाड्या फिरवून शहराला येथून पुढे कायमच 24 तास अखंड पाणी सुरू राहणार असल्याचे सांगितले तेव्हा नागरिक फक्त पडायचे बाकी राहिले.

5)काय, वरील सर्व घटनांबाबत वाचून धक्का बसला ना? कांदा, फाटकी चप्पल, लिंबू आणि वारे घेण्यासाठी पेपरही घेऊन ठेवलाय जवळ तुम्ही! छे, सगळं आधी बाजूला ठेवा आणि पहिला एअर कूलर, एअर कंडिशनर, पंखा तातडीने सुरू करा आणि जरा थंड व्हा! अहो, आता अखंड वीज तुमच्या घरातच राहणार आहे. आपल्या ऊर्जामंत्र्यांनी काल रात्रीच तसा आदेश दिलाय, "राज्यात अखंड वीजपुरवठ्याचा.' अरे, हे काय, तुम्ही चक्क नाचायला लागला....
.....हो..हो, जरा थांबा. जरा कॅलेंडर पाहा ! थोडी चंमत गं! रागावू नका बरं! एप्रिल फूल केलं बुवा जरा!

Tuesday, March 23, 2010

प्रिय ब्लॉगर्स


मराठी सारस्वतातील सर्वात मोठा उत्सव उद्यापासून पुण्यनगरीत सुरू होत आहे. साहित्यिकांच्या मांदियाळीत साहित्याच्या एकेका अंगावर चर्चा झडतील. मराठीच्या भल्या-बुऱ्याविषयी वाद-प्रतिवाद होतील, साहित्याचे अभ्यासक त्यावर अधिकारवाणीने बोलतील आणि तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य रसिकांना आपल्याला आवडणारे अनेक आद्य लेखक, कवी, मान्यवर "याची डोळा' पाहण्याची आणि ऐकण्याची सुवर्णसंधी साधता येईल. ग्रंथदिंडी, परिसंवाद, साहित्य विश्‍वातील नवोन्मेष, नवसाहित्य, इत्यादी-इत्यादी विषयांवरील चर्चांसाठी येथे तीन दिवस अगदी मेळा भरून येईल आणि त्यानंतर पुढे कित्येक दिवस त्याचे कवित्व सांगितले जाईल. एकूणच सरस्वती पूजकांच्या एकत्र येण्याचा सोहळा पुणे मुक्कामी रंगेल आणि प्रसारमाध्यमांतून तो आपल्यापर्यंत पोहोचेल...चला तर मग आपण या आनंदसोहळ्याचे येन-केन प्रकारे साक्षीदार होण्याचा आनंद घेऊ...पण त्यापूर्वी...
-----
...आत्ता हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे, साहित्यसंमेलनातील सरस्वतीपूजकांनी काही प्रमाणात "नवमाध्यमांतील लेखकांकडे पाठ फिरविल्याचे मंगळवारी वाचनात आले. त्यामध्ये आपले "अनिकेत समुद्रे, सोनल वायकुळ यांनी याबाबत खंतही व्यक्त केली. हे वाचल्याने मात्र मन काहीसं खट्टू झालं. (महत्त्वाचे दोघांचेही लेखन अप्रतिम आणि सातत्याने वाचावे असेच असते) साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरच ब्लॉगर्सच्या लिखाणाच्या दर्जावर शिक्कामोर्तब करून घेण्याचा अट्टहास बाळगून आपण आपल्याचा लिखाणाला दुय्यम का ठरवत आहोत, या प्रश्‍नाने अस्वस्थ वाटले.
मनापासून लिहिणाऱ्यांसाठी "ब्लागींग' एक नवे सशक्त आणि नव्या पिढीच्या अधिक जवळ जाणारे माध्यम आहे. ते हाताळताना व त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळत असताना कोणाच्या प्रशस्तीपत्रकाची आवश्‍यकता आपल्याला का वाटते? या प्रश्‍नाने पोखरून काढले. ब्लॉगच्या माध्यमातून प्रत्येक जण यथाशक्ती साहित्यामध्ये भरच घालत असतो. या लिखाणाला कसलीही मर्यादा नाही. कोणतेही बंधन नाही. कोणाचीही बांधीलकी नाही. येथे दर्जाची फिकीर नाही. कारण जे व्यक्त व्हायचे ते बिनधास्त व संवेदनशीलतेने. हेच ब्लॉगींगचे मूळ सूत्र आहे. येथे कोणाच्याही लिखाणावर कोणताही शिक्का नाही. येथे कोणत्याही विचारसरणीतून व्यक्त व्हावे त्याला बंधन नाही. कोणत्या शब्दांत व्यक्त व्हावे याचे नियम नाहीत. येथे बंधन एकच "न घसरण्याचे'. नियम एकच कोणालाही अनावश्‍यक न दुखावण्याचे आणि अगदी किरकोळ अपवाद वगळता सर्वच ब्लॉगर्स हे पाळतात. याचा सार्थ अभिमान आपणा सर्वांना असला पाहिजे.
येथे व्यक्त होणाऱ्या प्रत्येकाच्या डोक्‍यात फक्त एकच किडा वळवळत असतो (असावा) आणि तो म्हणजे, आपण जे लिहितोय ते कोणीतरी वाचावे, त्याबद्दल प्रतिक्रिया द्याव्यात आणि या माध्यमातून नव्याने जन्माला येणारे वेगवेगळ्या प्रकारचे लेखन वाचावे.
येथे लिखाणाच्या दर्जाची फुटपट्टी, लिहिणाऱ्याचे केस किती पांढरे झालेत आणि त्याने किती उन्हाळे-पावसाळे पाहिलेत यावर न ठरता लिखाणातील "तो अनुभव, ते शब्द, ते अभिव्यक्ती किती भिडणारी आहे' यावर ठरते.
"तुमचा अमुक-अमुक लेख वाचला आणि माझ्या डोळ्यांत पाणी उभे राहिले,' ही पोस्टच्या खाली पडलेली कॉमेंट (प्रतिक्रिया) साहित्यातील दिग्गजांना त्यांच्या लिखाणाबद्दल जशी दाद मिळते तेवढीच मोलाची आणि महत्त्वाची ठरते. (म्हणूनच मग कौतुकाने ब्लॉगर्स आपल्या लिखाणावर आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेला अगदी न थकता उत्तर देत असतात.)
म्हणजेच हे लिखाण तेवढ्याच आवडीने आणि डोळसपणए वाचले जात आहे. यामध्ये एकच मुद्दा येतो तो म्हणजे हे लिखाण मोठ्या प्रमाणावर वाचकांपर्यंत पोहोचते का याचा; पण सध्या ज्या वाचकांपर्यंत ते पोहचते तो वाचक नक्कीच प्रगल्भ होत असलेल्या पिढीचे प्रतिनिधित्व करतो आणि ही पिढी वाढत राहणारी आहे. प्रस्थापित साहित्यविश्‍वाला समांतर जाणाऱ्या महाजालावर ब्लॉगच्या माध्यमातून लिहिणाऱ्यांनी प्रस्थापित साहित्यविश्‍वाकडून मिळणाऱ्या दर्जाच्या शिक्‍क्‍याची फिकिर मुळीच करू नये. लेखकांनी वाचकांना भरपूर आनंद देण्याचा प्रयत्न करावा. संवेदनशीलतेने भवताल टिपावा, वाचकांना अंतर्मुख करणाऱ्या विषयांना स्पर्श करावा, वाचकांची मानसिकता बदलावी, समाजप्रबोधन करावे, विषयांना वाचाही फोडावी, माणुसपणाच्या सीमा अधिक विस्ताराव्यात...
...कोणाकडून त्यावर दर्जाची "मोहोर' उमटविण्याच्या भाबड्या अपेक्षेत राहू नये.
(माझी प्रामाणिक भावना मी मांडली आहे, कुणालाही दुखावण्याचा हेतू येथे मुळीच नाही; पण तरीही एखाद्या शब्दांनी दुखावले असल्यास मनःपूर्वक क्षमस्व)

Sunday, March 7, 2010

"ती'


.........
.........
.........
पत्राच्या वरच्या मायन्यामध्ये सुरवातीला काही ओळी रिकाम्या सोडल्यात त्याला कारण तेथे काय लिहायचे हे सुचलेले नाही असं नाही तर तेथे किती आणि काय-काय लिहायचं यावरून माझ्या मनात प्रचंड गोंधळ माजलेला आहे. खरं तर खूप काही लिहावं, व्यक्त व्हावं, भावनांना वाट मोकळी करून द्यावी असं वाटूनही मी त्यांना बांध घालण्याचा प्रयत्न केलाय कारण तेथे वापरावयाचे शब्दच माझ्यावर रुसलेत ते मला फितूरच होत नाहीत. मग मी तो प्रयत्न सोडून दिलाय. आता तुम्ही म्हणाल असं काय बुवा तेथे लिहिणार होतास?
-------------
खरं तर मीही तोच विचार करतोय, आपण तेथे काय लिहिणार होतो? कारण मी जे लिहायचा विचार करतोय ते शब्दबद्ध करू शकेन हा विश्‍वासच माझ्या ठायी उरलेला नाही. तिच्याबद्दल मी विचार करू लागतो आणि "ती' मला असंख्य रुपात भेटू लागते आणि मग त्यातल्या कोणत्याच रुपाला मी न्याय देऊच शकत नाही याची जाणीव मला मागे खेचून घेते कारण....
-------------
"ती' अंबिका..."ती' दुर्गा..."ती' सरस्वती..."ती' रणचंडिका..."ती' सीता..."ती' मंदोदरी..."ती' अहल्या..."ती' द्रौपदी..."ती' जिजाऊ..."ती' सारा पुराण व्यापून राहिलेली त्यागाची मूर्ती..."ती' देशासाठी रक्त सांडलेली कणखर इंदिरा, "ती' डेअरर किरण बेदी..."ती' वात्सल्यमूर्ती मदर तेरेसा..."ती' अनेक श्‍वासांना थबकवणारी गानकोकिळा लता..."ती' आयर्न लेडी..."ती'....ही यादी खूप मोठी आहे...वाढतच राहणारी आहे...शब्दांत न मावणारी.
--------------------------
पण तरीही "ती'
माझी जन्मदात्री, वात्सल्यसिंधू, माझी दिशादर्शी, माझ्या पाऊलखुणा जपणारी, या जगाची ओळख करून देणारी, मुक्त विहरण्यासाठी माझ्या पंखांत बळ भरणारी, माझ्या यशासाठी कण कण झिजलेली आणि माझ्या इवल्याशा यशानेही यशाने आनंदून तृप्त होणारी आणि खूप्प काही... माझी आई.
---------------------------
"ती' माझ्यावर जीव ओवाळून टाकणारी, माझ्या कर्तृत्वावर विश्‍वास ठेऊन तिच्या आईला दुरावणारी, माझ्या यशावर जानसे फिदा होणारी, माझ्यातल्या मला सावरणारी, मी चूक असलो तरी बरोबर मानून सप्तपदीचा मान राखणारी पत्नी, प्रेयसी, माझी अर्धांगीनी आणि माझ्या पिलांची खास "आई' आणि अद्यापही मला पुरती न उमगलेली माझी सखी.
---------------------------
"ती' माझा अंश, माझी प्रतिमा, माझे प्रतिरूप, माझी स्वप्ने, छोट्याशा बाळमुठींतून माझ्या सुखांचे हळवे कोपरे समृद्ध करणारी, माझ्यावर बिनधास्त विश्‍वासून आयुष्याला बेधडक सामोरी जाणारी, सारं जग मुठीत घेऊन गगनाला गवसणी घालण्याची आकांक्षा बाळगणारी, येणाऱ्या प्रत्येक क्षणांना भिडण्याची पात्रता अंगी बाळगणारी माझी चिमुरडी.
---------------------
याशिवायही "ती' अनेक ज्ञात - अज्ञात रुपांतून अमीट, असामान्य कामगिरी करणारी, जेथे आम्ही श्‍वास घेतो ती "वसुंधरा'.
"ती'....बस्स! आता मात्र किती लिहू आणि काय लिहू असं झालंय म्हणून थांबतो.
----------------------
आता आलं लक्षात मी वरच्या मायन्यामध्ये काहीच का लिहू शकलो नाही. कारण माझ्यात "तिला' शब्दबद्ध करण्याचे बळच नाही. कारण "ती' अमर्याद, उत्तुंग, स्वच्छंद, गहिरी, अथांग, शब्दातीत आणि.... पाहिलंत असं होतं!
"तिला' लाख-लाख प्रणाम.