Friday, December 9, 2011

ये मौसम का जादू है......हे गाणं आणि अनेकांची ह्रदयं यांचं एक अतुट नातं आहे. या गाण्यातील मौसम अनेकांच्या मनात घर करून आहे. टवटवीत निसर्गाचे सानिध्य आणि त्या टवटवीतपणामुळे मनात उमटलेली लहर शब्दांच्या माध्यमातून ओठांतून बाहेर पडू लागते आणि हे गाणं रुंजी घालत रेंगाळू लागतं. नेहमी....
परवा नेमका हाच फिल मी घेतला...कधी नव्हे ते पहाटे जाग आली. मुड होता. बाहेर पडलो. रस्त्यावर आलो आणि गुलाबी थंडीने दोन्ही हात पसरून माझे स्वागत केले आणि याचवेळी धुक्‍क्‍यांचे नाजूक नाजूक तुषार भोवतीने रुंजी घालू लागले. त्याच्या स्पर्शाने चित्तवृत्ती मोहरल्या. हाताच्या तळव्यांवर हळू-हळू धुक्‍यातील कणांनी जागा पक्की केली आणि हळू हळू ओंजळ थंडीने भरून गेली. यथावकाश पूर्वेला रंगांची उधळण सुरू झाली, निशेची चादर हळू हळू बाजूला होऊ लागली; मात्र धुक्‍यांची दुलई अधिकच गडद झाली आणि तिने सारा भवताल आपल्या मिठीत घेतला. धुक्‍यांचे लोटच्या लोट विहरत राहिले आणि पानापानांवर दवबिंदूंचे सौंदर्य रेखत राहिले. सूर्यकिरणांनी खेळ मांडला आणि पानापानांवर कुबेराचा खजिना रिता झाला. या खजिन्याची मोजदाद अवघडच. माझ्या ओंजळीत सामावलेल्या थंडीनेही त्या खजिन्याला साठविण्याचा प्रयत्न केला...पण कंबक्त नशिब...त्याचं पाणी पाणी झालं; पण हे पाणी मौसमची जादू माझ्याजवळ सोडून गेलं...सगळा दिवस मस्त, प्रसन्न, तजेलदार बनून गेलं...मनात रेंगाळून राहिलं...

Saturday, November 26, 2011

ज्योत से ज्योत...त्रिपुरारी पौर्णिमेला पहाटे कोल्हापुरातील पंचगंगा घाटावर सुमारे 51 हजारांवर पणत्या उजळल्या आणि त्याच्या मिणमिणत्या ज्योतीने सारा भवताल प्रकाशमान झाला. धुक्‍यांची शेला सोबतीला घेऊन येणाऱ्या मस्त थंडीची चाहूल, पंचगंगेच्या प्रवाहावरून हळूवार पुढे सरकणारे धुके. वाऱ्याच्या झुळकीसोबत लवलवणाऱ्या ज्योतींची आगळीवेगळी मैफल येथे सजली. या मैफलीमध्ये यथाशक्ती प्रत्येकाने ज्योतीतून ज्योत तेजवून प्रकाश भरला. उपस्थित कोल्हापूरकरांनी ही मैफल अगदी मनापासून अनुभवली आणि पंचगंगा फ्रेंडस सर्कल ग्रुपच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमाला धन्यवाद देत पावले आपसूक घराच्या दिशेने वळली.

Monday, October 31, 2011

"सृजन' दिवाळी अंकास उदंड प्रतिसाद

"सृजन' दिवाळी अंकास उदंड प्रतिसाद
नरकचतुर्दशीदिवशी "सृजन ई दिवाळी' अंक नेटवर आला आणि आत्तापर्यंत वाचकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
हा अंक आता.
https://docs.google.com/open?id=0B6FpjbggjhRAMDdmMzFmMDUtOTA2Mi00YjlhLWJlNjEtMWY2MjllMzk2NTJl
वरील लिंकसोबतच
http://ebooks.netbhet.com/2011/10/srujan-e-diwali-ank-2011.html
येथेही अपलोड केला असून तो येथेही वाचता येईल. असेच प्रेम वाढू द्यावे ही विनंती. प्रतिक्रिया आवर्जुन कळवा.

Tuesday, October 25, 2011

"सृजन ई दीपावली' अंक प्रकाशीत

दीपावलीच्या पहिल्या दिवशी सर्व वाचकांच्या हाती "सृजन' "ई दीपावली अंक' हाती देताना मनस्वी आनंद होत आहे. सकाळ वृत्तपत्रसमुहाचे उपमुख्य संपादक श्री. श्रीराम पवार यांनी क्‍लिक करून या "ई दीपावली अंकाचे प्रकाशन केले. वाचक भरभरून प्रतिसाद देतील ही अपेक्षा.

येथे वाचता येईल अंक.
https://docs.google.com/open?id=0B6FpjbggjhRAMDdmMzFmMDUtOTA2Mi00YjlhLWJlNjEtMWY2MjllMzk2NTJl

Sunday, October 23, 2011

ती सीता

नाटक संपलं, तिनं मेकअप उतरला, आवराआवर केली आणि गाडीत जाऊन बसली. सीटवर डोकं टेकून मागे रेलली आणि डोळे मिटून त्याची वाट पाहू लागली. तिच्या डोळ्यासमोर नाटकातील प्रसंग उभा राहिला.
---
तो म्हणाला,""सीते...मला माहित आहे, तू पवित्र आहेस. रावणानं तुझं हरण केलं होतं तो विधीचा संकेत होता. आपण त्या संकेतानुसार वागलो. आत्ताही मी ह्रदयावर दगड ठेऊन त्या संकेतानुसारच तुझा त्याग करणार आहे. मी तुझ्यावर अन्याय करतोय पण तू मला समजून घेशील...''
"माझी काहीच तक्रार नाही. तुम्ही आहात म्हणून मी आहे. माझा जन्मच मुळी सोसण्यासाठी झाला आहे. तुमचा जेवढा संग मला लाभला त्यावरच मी तृप्त आहे. तुमच्या सोबत असणाऱ्या आठवणी माझ्यासाठी खूप आहेत. तुम्ही नका वाईट वाटून घेऊ''

...पडदा पडला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. नाटक छान रंगलं. दोघांचं ट्युनिंग आजही प्रेक्षकांना आवडलं. दोघांमधील प्रसंग विशेष खुलत आणि ते पाहण्यासाठीच प्रेक्षक गर्दी करत असं बोललं जाई. दोघांच्या अभिनयाला रसिक प्रेक्षक अगदी मनापासून दाद देत. सातत्याने प्रयोग होऊनही हाऊसफुल्लचा बोर्ड काही हटलेला नव्हता. डिमांड शो वाढत होते आणि पैसा, प्रसिद्धीचा दोघांवरही वर्षाव होत होता. पुरस्कारांनी दिवाणखाना भरून गेला होता. जोडीलाच आणखीही दोन नाटकं सुरू होती. त्यांनाही प्रतिसाद मिळत होता. सर्व प्रकारच्या भूमिका "ती' उत्तम प्रकारे करू शकते असा विश्‍वास दिग्दर्शक, निर्मात्यांना असल्यामुळे ते पैसे लावायला तयार होते.
---
गाडीचे दार लावल्याचा आवाज आला आणि तिची तंद्री भंगली. तो येऊन शेजारी रेलला. दारूचा दर्प तिच्या नाकात घुसला.
"ड्रायव्हर चल' ती म्हणाली आणि गाडी मार्गस्थ झाली.
तो अर्धवट शुद्धीत होता. प्रयोग झाल्याबरोबर त्यानं मेकअप उतरवला आणि तेथेच बसून सुरवात केली. जणू प्रवेश संपण्याची तो वाटच पाहत होता. बराच वेळ तो पित बसला आणि ती त्याच्यासाठी गाडीत वाट पहात बसली. थिएटर बंद करण्याची वेळ झाली तशी तेथील पोऱ्याने त्याला धरून आणून गाडीजवळ सोडले.
गाडी सुरू झाली आणि तिच्या विचारचक्राने वेग घेतला.
चार वर्षांपूर्वी आपण रंगमंचावर पहिल्यांदा पाऊल ठेवले तेव्हा तो अगदी भरात होता. त्याच्यासोबत सीतेची भूमिका करताना मजा यायची. आपण अगदी समरसून सीतेची भूमिका साकारत असू. हळू हळू तो आपल्या प्रत्यक्ष जीवनातील "राम' आहे असेच वाटू लागले आणि पाहता पाहता आपण त्याचे कधी झालो हे समजलेच नाही. तो किती अदबीने वागायचा आपल्यासोबत. प्रयोग झाले की जेवण एकत्र घ्यायचा. विकेंडला फिरायला घेऊन जायचा. घरी येऊन आई-बाबांसोबत झकास गप्पा मारायचा. घरातला एक होऊन जायचा. वेगवेगळ्या वस्तू आणून द्यायचा आणि मुख्य म्हणजे किती प्रेमाने बोलायचा आपल्यासोबत. माझा होकार मिळविल्यानंतर आई-बाबांना म्हणाला,""फुलासारखं जपेन तुमच्या मुलीला. तिच्याशिवाय माझं जगणं अपुरं अपुरं आहे. मला ज्या जीवनसाथीचा शोध होता, ती तुमची मुलगीच आहे. तिच्या येण्याने माझ्या आयुष्याला पूर्णरूप येईल, नाही म्हणू नका.''
प्रतिथयश जावई मिळतोय आणि माझा होकार आहे हे लक्षात आल्यावर नकाराचा प्रश्‍नच उरला नाही. धुमधडाक्‍यात लग्न झालं. पहिले काही महिने अगदी मजेत, मस्त, फुलपंखी होते. सुख पायाशी लोळण घेत होतं. म्हणेल ती बाब समोर उभी राहत होती. त्याची बायको म्हणून मिरविण्यात पराकोटीचा आनंद मिळत होता. त्याच्यासोबत फिरणे, पार्ट्या, नाटकांच्या तालमी, दौरे सगळं कसं स्वर्गीय वाटत होतं. तो सुखांचा वर्षाव करत होता आणि आपली अवस्था "किती घेशील दोन करांनी' अशी झाली होती. माझ्यासाठी तो रामच बनला होता.
---
या सुखाला दृष्ट लागली. परगावी नाटकाच्या दौऱ्यावर असताना एकदा तो भरपूर प्याला आणि नाटकातल्या नायिकेसोबत लगट केली. त्याचा बभ्रा झाला. त्यानं प्रयत्न करूनही झाला प्रकार तिच्या कानावर आलाच. तो दौऱ्यावरून आल्यावर दोघांत "त्या' प्रकरणावरून भरपूर वाद झाला. काही दिवस अबोल्यात गेले. नाटक करतानाच काय ते दोघांचे बोलणे होई. एरव्ही संवाद बंद. असेच खूप दिवस गेले. मग तिनेच पडती बाजू घेतली. हळू हळू अबोला दूर झाला. तिनं सगळं पाठीवर टाकलं; मात्र अविश्‍वासाची एक फट दोघांत कायमची निर्माण झाली. करियरसाठी मूल होऊ न देण्याचा तिनं घेतलेला निर्णय आणखी ठाम झाला. त्याची "नट' म्हणून नव्याने ओळख झाल्याने ती मनोमन दुखावली; पण तरीही हे दुखावलेपण तिनं आत खोलवर ठेवलं. तिच्यापुढेही कितीतरी मोहाचे क्षण आले पण, तिने त्यावर प्रयत्नपूर्वक मात केली कारण नाटकातली सीता तिच्यात पुरेपूर भिनली होती; मात्र त्याच्या करणीने नाटकातली सीता आता ती यंत्रवत सादर करू लागली. त्या भूमिकेशी समरस होणं तिलां जड जाऊ लागलं. तिच्यातल्या अभिनेत्रीला मिळणारी दाद तिला स्वस्थ बसू देत नव्हती आणि म्हणून त्याला सहन करत ती स्टेजवर सीता साकारत राहिली.
---
गाडी बंगल्यात शिरली. तिच्या विचारांच्या गाडीला ब्रेक लागला. ती उतरून आत गेली. नोकराने त्याला आणून बेडवर झोपवलं. तिनं आवरलं आणि बेडवर पुन्हा विचारांत बुडून गेली. त्याच्या बरळण्यामुळे तिच्या विचारांना आणखी खाद्य पुरविलं. बराच वेळ तो बरळत होता आणि ती ऐकत राहिली. त्याचे शब्द तिच्या कानात शिशाचा रस ओतल्यासारखे शिरले. ऐकून ती खूप वेळ तशीच दगडासारखी बसून राहिली. बरळता-बरळता त्याची शुद्ध हरपली.
---
सकाळी उठल्याबरोबर त्यानं सवयीनं हाक मारली. प्रतिसाद आला नाही. त्याचा आवाज ऐकून नोकर चहा घेऊन आला. सोबत आणलेलं पत्र त्यानं त्याच्या हातात दिलं. म्हणाला "बाईसाहेब देऊन गेल्या.'
त्यानं पत्र फोडलं.
""...........
रात्री तू खूप बडबडलास. स्वतःबद्दल, माझ्याबद्दल. तू स्वतःबद्दल बडबडलास तेथपर्यंत सारं ऐकलं, सहन केलं कारण मला त्याची सवय झालीय; मात्र तू माझ्याबद्दलही गरळ ओकलीस. तुझी प्रत्येक चूक पोटात घालून तुझं असणं सहन करत राहिले. तुझ्या वागणुकीचे शिंतोडे माझ्या अंगावर उडूनही मी त्याबद्दल एक शब्दही काढला नाही. नाटकाच्या दौऱ्यांवर मी एकटी गेले त्यावर प्रश्‍नचिन्ह उभं केलंस. तू झोपेत का होईना पण माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडविलेसच. जे तू बोललास ते एक स्वाभीमानी स्त्री म्हणून सहन करण्यापलीकडचं आहे त्यामुळे मी तुझ्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. वाईट एकाच गोष्टीचं वाटतं. नाटकात तू राम साकारायचास पण वास्तवात तू कधीच राम होऊ शकला नाहीस आणि मी मात्र नाटकात सीता झाले आणि वास्तवातही सीताच राहिले. खऱ्या रामायणात रामासाठी सीता धरणीच्या कुशीत लुप्त झाली. मी मात्र माझ्यातल्या स्त्रीसाठी तुझ्यापासून विभक्त होत आहे सीतेचा धर्म पाळण्यासाठी.''

Saturday, September 24, 2011

जन्मापूर्वी...मी...

"आता फक्त काही दिवसांचा प्रश्‍न आणि आपण मोकळा श्‍वास घेणार. जग खूप सुंदर आहे, असं म्हणतात. ते आपण पाहू शकणार. जगातली प्रत्येक सुंदर गोष्ट आपल्याला अनुभवता येणार. वेगवेगळे रंग, वेगवेगळे गंध, झाडं, पानं, फुलं, वेगवेगळ्या प्रकारची माणसं, आणखी बरंच काही पाहायला मिळणार.

ती दोघं ताईसोबत आपल्यासाठी किती स्वप्नं रंगवत आहेत. दोघं सारखं काहीबाही बोलत असतात. "तो' म्हणतो मला डॉक्‍टर करायचं, तर "ती' म्हणते नाही, इंजिनिअर करायचं. मग दोघंही म्हणतात, "त्याला' जे व्हायचंय ते होऊ दे, आपण फक्त त्याच्या पंखात बळ भरू. रोज वेगळंवेगळं ठरवत असतात. एक मात्र खरं, दोघंही माझ्यासाठी जाम खूश आहेत. मला काय काय खायला देतात. तिनं नुसतं नाव उच्चारलं तरी तो तातडीने तिच्यासाठी सगळं हजर करतो. आईस्क्रीम काय, डोसा काय, वडे काय.... माझी तर मेजवानीच सुरू आहे. मज्जा येते नुसती. कित्येकदा मनात विचार येतो, काय करायचं बाहेर जाऊन? त्यापेक्षा येथेच मला हवं ते अगदी विनासायास मिळतंय. त्याचाच घेऊ मनमुराद आनंद. त्यांच्या कौतुकाच्या बदल्यात मी काय करायचं, तर फक्त तिच्या पोटाला जराशी ढुशी द्यायची, कधी तरी पाय झाडायचे. कसली खूश होते ती! तिचा आनंद मला जाणवत राहतो आणि मग मलाही चेव चढतो. अक्षरशः ढुशा मारून, लाथा मारून मला दमायला होतं; पण ती मनापासून आनंदते. भोवतीच्या सर्वांना अगदी कौतुकाने सांगते, "ढुशा देतो लबाड मला. असलं भारी वाटतं!' तिच्या बोलण्यातून माझ्याबद्दल आनंद, कौतुक अगदी भरभरून व्यक्त होत असतं. ती आनंदली की मलाही शहारल्यासारखं होतं. वाटतं, असं तिच्या मिठीत विरघळून जावं. मग जाणवतं, अरेच्च्या, मी तिचाच अंश आहे की...'

"दोन दिवस झाले, दोघंही अगदी गप्प गप्प आहेत. ताईचापण आवाज नाही. त्यांच्या नेहमीच्या छान-छान गप्पा ऐकायलाच मिळत नाहीत. "ती' पण अगदी गप्प गप्प असते. माझ्याकडे लक्ष द्यावं म्हणून काल किती ढुशा दिल्या; पण ती नेहमीसारखं काहीच बोलली नाही की कौतुकानं तिनं कोणाला काहीच सांगितलं नाही. "त्यानं' पण माझी जरासुद्धा चौकशी केली नाही. माझ्यासाठी काही खाऊही आणला नाही. परवापर्यंत माझे कौतुक करताना दोघंही थकत नव्हते, मग अचानक काय झालं बरं..... अरे हां, परवा दवाखान्यात जाऊन आल्यापासून त्यांच्यात हा फरक पडला.

काय झालं बरं दवाखान्यात? हां, आत्ता आठवलं...डॉक्‍टरांनी तपासणी केली आणि ते म्हणाले, "बेबी इज गुड अँड नॉर्मल.' मलाच म्हटले असणार. माझं हलतं बोलतं चित्रही म्हणे त्यांनी पडद्यावर दाखवलं दोघांना. त्यावेळी ती कसली मोहरली. ती मोहरली आणि माझ्या रोमारोमावर मोरपीस फिरवल्यासारखं वाटलं. माझ्यासाठीचा तिचा आनंद बघून मला काय करू आणि काय नको असं वाटलं. तेव्हाच ठरवून टाकलं, जगात प्रवेश केल्यानंतर तिचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण धडपडायचं...

एवढ्यात "त्याचे' शब्द कानावर पडले. ""डॉक्‍टर, प्लीज सांगा काय आहे, मुलगा की मुलगी..'' डॉक्‍टरांनी बरेच आढेवेढे घेतले. तो म्हणाला, ""डॉक्‍टर, प्लीज तुमची काही अपेक्षा असेल तर बोला; पण सांगा काय आहे!'' खूप आढेवेढे घेतल्यानंतर डॉक्‍टरांनी जे सांगितलं ते ऐकून "ती' काहीशी हलल्यासारखी वाटली आणि त्यानंतर दोघांमधील संवादच बंद झाला. दोघेही घरी आले पण त्यांच्यात नेहमीसारखं बोलणं झालंच नाही दोन दिवस.

एकदा ती म्हणाली, आपल्या हातात काही नसतं. सगळी परमेश्‍वरी कृपा. जे आहे ते आपण स्वीकारू. जगात इतरांकडेही जरा पाहा. पण बहुधा त्याला माझं "असणं' आवडलं नसावं. त्याच्या बोलण्यात माझ्याबद्दलचा विखार जाणवला. त्यानंतर दोघांमधील संवादच बंद झाला.

त्याच्याकडून होणारे माझे लाड बंद झाले. आताशा "तो' माझी चौकशीही करेनासा झाला. "तिनं' मात्र मला तिला जमेल तसं जपलं. मला हवं नको ते पाहिलं. माझ्याबद्दल त्याच्यासोबत वादही घातला. पण त्याला मात्र मी नकोशी झाले आहे. परवा तर मला तो "धोंड' म्हणाला. कसली रडली ही. तिच्या रडण्यानं माझ्याही अंगाला कापरं भरलं...'

"काय करू मी जगात येऊन? मी येणार म्हणून आनंदित असलेल्या दोघांमध्ये मी कोण आहे हे समजल्यानंतर किती अंतर पडलं. त्यापेक्षा मी जगात नाहीच आले तर? त्याच्या गळ्यातली धोंड जाईल. माझ्या जन्माला येण्याने जर "तिला' बोल लावला जाणार असेल तर मी का म्हणून जन्म घेऊ? मरून का काय ते जाऊ या... छे छे, भलतेच काय विचार करतेय मी! तिला काय वाटेल? तिनं मला कुठं अंतर दिलंय? ती खूश आहे. मला तिच्यासाठी जन्माला यायला हवं. तिचा अंश म्हणून मी जग पाहिलं पाहिजे. ती किती माझ्यासाठी खंबीर राहिली आहे हे मी विसरून चालणार नाही. तिच्या आनंदासाठी, समाधानासाठी मी जन्मले पाहिजे. माझ्यासाठी भांडणाऱ्या तिला पाहून मला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. "त्याच्या' विचारांची दिशा चुकलीय हे दाखविण्यासाठी मी जन्मलं पाहिजे. तिचं आईपण किती मोलाचं आहे, हे दाखविण्यासाठी मला जन्मलं पाहिजे. त्याला "बाबा'पणाचा आनंद देण्यासाठी मी जन्मले पाहिजे. मला जेव्हा तो पाहील तेव्हा तो पाहतच राहील, मला खात्री आहे...'

"कसली गोड आहे नं ही... अगदी कापसासारखी. माझ्याकडेच पाहून हसतेय. माझं चुकलंच. ए, मला माफ कर हं...मी उगीच... तिच्या जीवावर उठलो होतो. हिला मी सगळी सुखं देणार...तिला मी डॉक्‍टर करणार...'' त्याच्या त्या बोलांनी ती गहिवरली. दोघांच्याही डोळ्यांत पाणी तरळलेलं मी पाहिलं. त्या वेळी बाबांच्या कुशीतल्या "मला' माझी आई किती ममत्वाने पाहत होती.. आई, तू कसली भारी आहेस गं. तू जगातली सर्वांत सुंदर आई आहेस. माझी आई, जिनं मला हे जग दाखवलं....

Thursday, September 22, 2011

परिवर्तन

रोज रात्री ऑफीस सुटलं की बाईकवरून जाताना कधी एकदा घर गाठेन असं होऊन जातं. पंधरा-सोळा किलोमीटरचं अंतर पार करून घरी पोचेपर्यंत पार गळाटून जातो. बरं मध्यरात्रीनंतरची वेळ असल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांशिवाय रस्त्यावर विरंगुळा तो कसला नाहीच. भरधाव वेगाने जाणारी वाहने, पुलावरून जाताना वाहणाऱ्या नदीचे जाणवणारे अस्तित्व, आजूबाजूच्या शेतातील पिकांची, झाडांची सळसळ आणि बाईकचा अखंड सोबत करणारा आगळावेगळा आवाज. शहरात प्रवेश केला की रस्त्यांच्या मधोमध उभे राहून दोन्ही बाजूंना पिवळसर प्रकाशाची उधळण करणारे विजेचे खांब. खचित गस्त घालत फिरणारी आणि कधीमधी भेटणारी पोलिस व्हॅन. चौकांतील एखाद्या कोपऱ्यात गाडी उभी करून गप्पांत रंगलेली दोस्त मंडळी, तसेच काही पोलिस. दिवसभर व्यवसाय करून आवराआवर करणारे राजाभाऊ भेळच्या गाड्यावरील मंडळी. मध्यवर्ती स्टॅंड परिसरात उभ्या खासगी गाड्या, त्या गाड्यांसाठी प्रवासी शोधत फिरणारे पंटर, माणसांची आवक-जावक. एखाद्या दडग्या कोपऱ्यांवर चमकत्या कपड्यांत उभे "ते' आणि "त्या'. त्यांच्या आजूबाजूला कानोसा घेत दबक्‍या पावलाने चालणारी "ती" मंडळी. काही ठिकाणी त्यांच्यात सुरू असलेले हास्यविनोद, भांडणे. रोजचंच हे दृष्य. गेल्या कित्येक वर्षांमध्ये यातील एखादीच बाब मागे पुढे झाली असेल अन्यथा फरक कसलाही नाही. रोज त्या-त्या ठिकाणी ते-ते भेटणार हे नक्की. त्यामुळे रोजच्या प्रवासातला हा रुटीनचाच भाग. नाही म्हणायला सण-समारंभाच्या दिवशी रस्ते काही प्रमाणात माणसांनी वाहते आणि कोपरे आणखीनच जागे, कुजबुज वाढलेले.
या रोजच्या चित्रामध्ये काही महिन्यांपूर्वी आणखी एक भर पडली. म्हणजे "तिचं' अस्तित्व जाणवू लागल्यामुळे भर पडली म्हणता येईल. "ती' पूर्वीपासूनच असणार फक्त तिचं ठिकाण माझ्या रोजच्या वाटेवर नक्कीच नव्हतं. ती होती एक अजागळ बाई.

एक दिवस चटकन बाईकचा प्रकाश तिच्या तोंडावर पडला आणि तिच्या अस्तित्वाची दखल माझ्याकडून घेतली गेली आणि त्यानंतर वरील सर्व गोष्टींप्रमाणे दररोज तिही भेटू लागली. मी तिला नोटीस करू लागलो. केस विस्कटलेले, कित्येक महिने त्यांनी बहुधा तेल पाहिलेलं नसावं. अंगावरील साडी गलिच्छ भिकाऱ्यासारखी, कशीबशी अंगाभोवती गुंडाळलेली. तिचा चेहरा कधीच निरखून पाहिला नाही पण, तो फारसा पाहण्यासारखा नसावा. डोळ्यांचा पांढरा भाग प्रकाश पडला की चमकत असे. ठरावीक परिसरात ती ठरावीक स्थितीत उभी राहिलेली. येणाऱ्या जाणाऱ्यांकडे आशाळभूतपणे पाहणारी तिची नजर अस्वस्थ करणारी. त्या डोळ्यांत भूक, असाह्यता, जगण्याची धडपड काठोकाठ भरलेली. अरेच्चा म्हणजे ही "तसली' बाई. बापरे....कोणी तिच्या सावलीलाही उभे राहणार नाही एवढी ती गलिच्छ आणि उभी राहते व्यवसायासाठी. (एरव्ही अशा बायकांच्या अंगावरील कपडे लांबूनही पटकन ध्यानी येतात) एखादे तरी गिऱ्हाईक येईल आणि टिचभर पोटाची तजवीज होईल, या आशेवर ती उभी राहत असावी. म्हणजे पूर्वी तिने "हेच" केलेले असणार आणि आताही शरिराची लक्तरे सांभाळत जगण्यासाठी तिच्या लेखी दुसरा कुठलाच मार्ग शिल्लक राहिलेला नसणार. म्हणून मग पुन्हा ती कोपरा पाहून उभी असते होते का काय तजवीज हे पाहत. काय असेल तिचं विश्‍व? ती आत्तापर्यंत कशी जगत होती? ती काय खाते? कोठे राहते? कशी जगते? ती जगण्यासाठी दुसरं काही का स्वीकारत नाही? का तिला मध्यरात्री कोपऱ्यावर येऊन उभे रहावे वाटते. ही तिची असाह्यता आहे की तिला आता काहीच समजेनासं झालंय? की ती काहीच करू शकत नाही? तिला दुसरं कोणी आहे की नाही? बरं कडाक्‍याच्या थंडीत आणि भर पावसातही ती उभी असलेली भेटते. म्हणजेच तिला जगण्यासाठी तिथं उभं राहणं भागच पडतंय. ते का?

किती प्रश्‍न. या प्रश्‍नांनी गेल्या काही दिवसांत डोक्‍याचा अक्षरशः रोज भुगा झाला. बरं थांबून विचारण्याएवढी आपल्या अंगात हिंम्मतही नाही. ती नेमकी काय आहे? हे गुढ उलघडण्यासाठी बाईक तिच्याजवळ थांबवायला हवी, तिच्यासोबत बोलायला हवं, ती थांबविण्याची आपली मानसिकताच नाही. तरीही तिच्या त्या दिसण्यानं आपण अस्वस्थ होतोय, विचारांत गुरफटलं जातोय हे नक्की. कोण आहे ती? नक्की कोण? हा प्रश्‍न काही पिच्छा सोडत नाही.

परवा रात्री नेहमीप्रमाणे येताना. "त्या' कोपऱ्यावर गर्दी जमलेली दिसली. न राहवून बाईकचा वेग कमी केला आणि रस्त्याकडेला उभी केली. गर्दीच्या दिशेने गेलो. दहा-बारा जण कोंडाळं करून उभे राहिले होते. दोन पोलिसही त्यांच्यासोबत होते. जरा डोकावून पाहिलं तर "ती' खाली पडलेली दिसली. सगळेजण वाकून तिला पाहत होते. मी पोलिसांकडे चौकशी केली. काय झालं हो या बाईला?

माझ्याकडे विक्षिप्त नजरेनं पाहत,"मेली, आजारी होती, कुठं राहते माहित नाही, रोग झाला असणार....' शिपायाचे पुढचे शब्द माझ्या कानावर पडलेच नाहीत.
मी विचार करू लागलो,"गेली बरं झालं! नरकयातनांमधून सुटली एकदाची. पण कशानं गेली, रोगानं की भुकेनं की आणखी कशानं? कोण होती ती? तिचा आगापिछा काय? असलेच तर तिच्या घरच्यांना कसे समजणार? तिच्या जगण्याचं प्रयोजन काय होतं आता मेली तर...? बरं मेली तिही रस्त्यावर तिच्या रोजच्याच जागेवर, याला काय म्हणायचं? पुन्हा अनुत्तरीत प्रश्‍नांचा गुंता वाढत राहिला. मी बाईकला कीक मारली, आता ती दिसणार नाही. बहुधा परिवर्तन यालाच म्हणत असावेत.

Wednesday, September 7, 2011

पुढच्या वर्षी लवकर या!


बहुतेक घरगुती गणपतींचे मंगळवारी गौरीसोबतच विसर्जन सुरू झालं आणि घरामध्ये जेथे गजाननाची प्रतिष्ठापना केलेली होती तो कोनाडा, कोपरा, ती आरास रिकामी रिकामी झाली. गेले सहा दिवस पूजा, मंत्रोच्चार, आरती यांनी भारून गेलेलं घर सायंकाळनंतर उदास उदास झालं. विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाने आठवडाभर साऱ्या घरात चैतन्य भरून राहिलं. गणरायाच्या स्वागताची उडालेली धांदल, आरास मांडताना त्यात हरवून जाणं, आठवडाभर त्याच्या सेवेत कोणतीही कसूर होऊ नये यासाठीची धडपड. बालगोपालांसाठी तर गणपती घरी येणं आनंदोत्सवाची पर्वणीच. उंबरठा ओलांडून गणराया घरात आले आणि मनं आनंदाने अगदी काठोकाठ भरून वाहिली. आनंदसोहळा रंगला पुढील सहा दिवस. आरतींचे मंगलमयी सूर घराघरांतून उमटत राहिले. धुपाचा गंध दरवळत तर भक्ती, श्रद्धेचा संगम खळाळत राहिला...
पण आता मात्र काहीसं रितं रितं वाटतंय. हातातून निसटल्यासारखं, कदाचित पुन्हा गवसण्यासाठी. आता काय पुढील पाच दिवस सार्वजनिक गणेशोत्सवाची धूम अनुभवायची आणि या रितेपणावर फुंकर घालायची.

Thursday, September 1, 2011

शंभराची नोट...

मालकानं दिलेली शंभराची नोट त्यानं खिशात ठेवली. झटपट काम संपवून तो बाहेर पडला. त्याची पावलं घराच्या दिशेनं ओढीनं वेगात निघाली. आता सण झोकात साजरा करायचे इमले तो मनात बांधू लागला. गेल्या कित्येक दिवसांत घरात काही गोडधोड शिजलेलं नव्हतं. पोरगं किती तरी दिवसापासनं खीर खायला मागतंय. आज पहिलं खिरीचं साहित्य आणायचं. बायकोची चमचमीत खायची इच्छा कित्येक दिवसांपासून आहे; पण जमलंच नव्हतं. आज ती जाम खूष होईल. मालकिणीनं दिलेली चोळी आणि पातळ जरा शिवून घेईल. यातलेच चार पैसे बाजूला ठेवतो म्हणजे आणखी चार दिवस तरी ताटात कसली ना कसली भाजी दिसेल. बटाट्याची रसभाजी खाऊन किती दिवस झाले? बाप रे, आठवतपण नाही. एक लॉटरीचं तिकीट काढू, बघू काय नशीब फळफळलं तर. चार वर्षांपूर्वी दिवाळीत घेतलेला सदराच जरा शिवून घेतो. तोच घालता येईल. लेकाला जुन्या बाजारातनं एखादा शर्ट मिळतोय का बघू. तो धुऊन घातला तर नवा शर्ट मिळाला म्हणून लेकरू खूष होईल. पोराटोरांत जरा मिरवून येईल. बरेच दिवस झाले नाक्‍यावरच्या गणपतीपुढं नारळ फोडलेला नाही. उद्या सण म्हणून नक्की फोडू. देव दयाळू असतो म्हणतात. या नारळाला जागून जरा त्रास तरी कमी होईल. चप्पल तुटली म्हणून पंधरा दिवस झालं घातलेली नाही, ती आधी दुरुस्त करून घेतो. पावण्या-रावळ्यात जायचं म्हटलं, की पायात काय नसलं की लाजल्यासारखं होतंय...

....त्याची विचारांची गाडी अगदी सुसाट सुटलेली. घराचं स्टेशन आलं आणि गच्चकन ब्रेक लावून गाडी थांबली. तो घरात शिरला.
नवऱ्याच्या चेहऱ्यावरील हसू बघून तिनं ताडलंच, आज काही तरी विशेष आहे. भाकरी करता करता ती लगबगीनं उठली. त्याच्या हातातली पिशवी तिनं काढून बाजूला ठेवली. पटकन त्याला पाण्याचा तांब्या भरून दिला आणि चहाचं आधण ठेवलं.
"काय आज खुशीत?' तिच्या प्रश्‍नावर त्यानं हसऱ्या चेहऱ्यानं "हूं' म्हणत उत्तर दिलं.
तिनं बिनकानाच्या कपात चहा ओतला आणि त्याच्यासमोर ठेवला.

त्यानं चहाचा एक घोट घेतला. आता त्याला राहवेना. शंभराची नोट तिला दाखवूयाच म्हणत त्यानं खिशात हात घातला आणि शॉक बसल्यासारखा झटका त्याने हाताला दिला. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पार काळवंडला. चहाची चव एकदम कडवट झाली. तो तीन-तीनदा फाटलेला खिसा तपासू लागला. खिसा फाटलाय हे विसरून त्याच खिशात शंभराची नोट आपण ठेवली हे त्याच्या आता लक्षात आलं. अंगावरच्या कपड्याला जेवढे म्हणून खिसे होते ते त्याने तपासले. कपडे काढून झाडले; पण ती नोट काही सापडायला तयार नव्हती.
"अहो, काय झालं? असं काय करताय? आनंदात घरात आला आणि आता एकदम काय झालं...?' ती न समजून सारखं विचारत राहिली.
नोट नाही हे समजल्यानं तो सैरभैर झालेला. तिचे प्रश्‍न त्याला ऐकू येत होते; पण उत्तर द्यायला मनापर्यंत पोचतच नव्हते. "माझी नोट पडली, माझी नोट पडली' एवढंच तो म्हणत राहिला. काही तरी वाटून तो उठला आणि घरातनं धावत सुटला. ज्या रस्त्यानं आला होता, त्या रस्त्याचा कोपरा न्‌ कोपरा शोधत निघाला. येणाऱ्या-जाणाऱ्याला विचारू लागला... माझी नोट सापडली का? कुणी नोट पाहिली का? येताना काय काय स्वप्नं आपण बघितली. सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. आता काही काही नाही. खीर नाही, चमचमीत जेवण नाही, पोराला चड्डी नाही, बायकोची चोळी नाही, लॉटरी नाही, घरात सण नाही... काही काही नाही... सगळा रस्ता त्यानं तीन-तीनदा पाहिला. नोट सापडत नाही याची खात्री झाली आणि तो डोक्‍याला हात लावून तिथंच बराच वेळ बसून राहिला, खचला. बऱ्याच वेळानंतर कधी तरी पाय ओढत ओढत तो घरी आला. उंबऱ्यातून आत जायचे त्राणच त्याच्यात उरले नव्हते. तो दारातच बसून राहिला. काही क्षण शांततेत गेले.

"आये, पप्पा आला!' म्हणत पोरगं येऊन त्याच्या पाठीवर पडलं. एरवी फुलासारखं वाटणाऱ्या पोराला त्यानं तिरीमिरीत झटकून टाकलं.
"आई गं!' म्हणून ते कळवळलं. "असं काय करताय!' म्हणत बायकोनं येऊन त्याला उचलून घेतलं. त्यानं तिच्याकडं पण रागानं पाहिलं.
"बबल्या काय सांगतो ते तर ऐका.'
"हे बघ!' म्हणून बबल्यानं त्याच्या पुढं शंभराची नोट नाचवली. तो उडालाच. हे कुठून आले? विचारत त्यानं बबल्याकडून नोट हातात घेतली.
रडवेल्या चेहऱ्यानं बबल्या म्हणाला, ""खेळत खेळत बाजारात गेलोतो, येताना वाटेत गावली.''
त्यानंतर बबल्या काय काय सांगत राहिला; पण त्याला काही ऐकू आलं नाही. त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. त्यानं बबल्याला छातीला कवटाळून मटामट मुके घेतले. बायकोच्या पाठीवर हात टाकला. आता त्यांचा सण झोकात साजरा होणार होता!

Monday, August 22, 2011

नंबर वन...(इंग्लंड डायरी)


भारताचा इंग्लंड दौरा सुरू झाल्यानंतर जेव्हा शाब्दिक युद्ध छेडले, त्यावेळची गोष्ट. "या इंग्लंड दौऱ्यामध्ये भारतीय संघाच्या हाती फारसे काही लागणार नाही, उलट भारतीय संघाला नंबर एकचा किताब गमवावा लागेल, असे भाकित इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेनने केले होते. त्यावेळी भारतीय संघाचे पाठिराखे त्याच्यावर तुटून पडले होते. हुसेनच्या डोक्‍यावर परिणाम झालेला आहे, असे म्हणण्यापर्यंत त्याच्यावर टीका झाली; पण नासीरने भविष्य पाहिले होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्याने केलेल्या भविष्यवाणीला कोणत्याही प्रकारचा तडा जाणार नाही, अशा पद्धतीने भारतीय संघ खेळला. (अपवाद फक्त राहुल द्रविडचा. तो एकटाच लढला.) क्रिकेटच्या सर्व पातळ्यांवर स्ट्रॉसच्या संघाने धोनीच्या संघाला चारीमुंड्या चीत केले. भारतीय संघाला दुखापतीने घेरले, असे लंगडे समर्थन होऊ शकते; पण असे म्हणून इंग्लंडच्या खेळाडूंनी घेतलेल्या कष्टाला कमी लेखण्याचा अधिकार नक्कीच कोणाला नाही. इंग्लंड संघाने दौऱ्याच्या सुरवातीपासून अत्यंत योजनाबद्ध असा खेळ केला. चार कसोटी सामन्यांतील आठ डावांत त्यांनी भारतीय संघाला बाद केले. बरं, हे बाद करताना त्यांनी अखेरच्या कसोटीचा अपवाद (पहिल्या डावात 300 धावा केल्या होत्या.) वगळता तीनशे धावांचा टप्पा पार करू दिलाच नाही. भारताच्या दिग्गज फलंदाजांना त्यांनी पद्धतशीरपणे जखडून ठेवले. त्यांच्यावर उसळत्या चेंडूंचा मारा करतानाच हळूवारपणे चेंडू स्विंग करून भारतीय फलंदाजांना सेटच होऊ दिले नाही. राहुल द्रविडचा अपवाद वगळता एकाही खेळाडूला ब्रॉड, अँडरसन, ब्रॉस्नन आणि स्वॉन यांची तगडी गोलंदाजी खेळता आली नाही तसेच समजलीही नाही. या सर्व गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांचा अगदी बारकाईने अभ्यास करून गोलंदाजी केली. घरच्या मैदानांवर आणि जिवंत खेळपट्ट्यांवर त्यांना फा
यदा होणार, हे नक्कीच होते. भारतीय फलंदाजांना येथील चारही खेळपट्ट्यांना त्यांच्याच गोलंदाजांविरोधात फूस लावता आली नाही. द्रविडने खेळपट्ट्यांना आपल्या बाजूने वळविण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी झाला. या खेळपट्ट्यांनी त्याच्या पदरात धावांचे माप अगदी पुरेपूर टाकले. सगळे सहकारी धडाधड पडत असताना या पठ्ठ्याने या खेळपट्ट्यांवर तीन शतकांसह 461 धावांचा रतीब घातलाच. बरं, प्रत्येक वेळी त्याने भारतीय संघाचा पराभव लांबविण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्याला पुढून साथच मिळाली नाही आणि पराभवाचे शिक्के बसत गेले.
फलंदाजीमध्येही पीटरसन, बेल, प्रायर, कुक यांनी कोणतीही कसूर बाकी ठेवली नाही. कुक, पीटरसन आणि बेलने भारतीय गोलंदाजांची शिकार करून द्विशतकांचे ताव मारले आणि तृप्तीचे ढेकर दिले. कमकुवत भारतीय गोलंदाजांना इंग्लंडच्या भक्कम फलंदाजीला संपूर्ण उद्‌ध्वस्त करण्यात फारसे यश मिळालेच नाही. इंग्लंडच्या सर्वच प्रमुख फलंदाजांनी धावांची लयलूट केली आणि नंबर एकचा मुकुट अगदी दिमाखाने आपल्या डोक्‍यावर चढविला. चारही सामने मोठ्या फरकाने जिंकणाऱ्या इंग्लंडने कसोटी क्रिकेटविश्‍वात आपणच नंबर एक आहोत, याची द्वाही फिरविली. खेळाच्या सर्वच आघाड्यांवर उत्तम कामगिरी करून नंबर एकच्या सिंहासनावर विराजमान होण्यासाठी लागणारे सर्व गुण दाखवून दिले. भारतीय क्रिकेट किती बेभरवशी आहे, हे जगासमोर उघडे केले. कर्णधार झाल्यापासून कसोटीमध्ये अपयश न पाहिलेल्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीला प्रथमच मोठा पराभव पत्करावा लागला. यामधून सावरून तो नक्कीच बाऊन्स बॅक करेल, अशी आशा आहे; मात्र सद्या तरी इंग्लंडच्या रस्त्यांवर भारतावरील विजयाचा जल्लोष साहेब करत आहेत आणि त्यासाठी ते खरोखरच पात्र आहेत. भारतीय संघाने आत्मचिंतन करून वनडे मालिकेसाठी कम बॅक करावे, हीच अपेक्षा.

Saturday, August 20, 2011

धुलाई (इंग्लंड डायरी)


भारतीय संघाचे नष्टचक्र सुरूच आहे. शुक्रवारी पीटरसन (175) आणि इयान बेलने (नाबाद 181) भारतीय जखमांवर अक्षरशः मीठ चोळले. त्यांनी अर्धमेल्या भारतीय गोलंदाजीवर घणाघाती हल्ला केला आणि धावांची पुन्हा एकदा लयलुट केली. काही तरी चुकत आहे; पण नेमकं काय हे कर्णधार धोनीसह कोणालाच कळेनासे झाले आहे. खराब कामगिरी होऊ शकते याबद्दल कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. पण एवढी वाईट कामगिरी गेल्या काही वर्षांत भारतीय संघाची झालेली नव्हती. पहिल्या पराभवानंतर भारतीय संघ "बाऊन्स बॅंक' करून सायबांसोबत दोन हात करेल या आशेचा पार चक्काचूर झाला. भारतीय संघ सपाटून मार खात आहे आणि सायबांचे फलंदाज भारतीय गोलंदाजीला धोपटून काढत आहेत. भारतीय संघाची अवस्था अक्षरशः गलीतगात्र झालेली आहे.
खेळामध्ये हारजीत नक्कीच असते; मात्र पराभवानंतर पेटून उठण्याची वृत्ती दाखविणेही गरजेचे असते. यापूर्वी भारतीय संघाने कितीतरी वेळा अशी वृत्ती दाखवून ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघांनाही नामोहरम केले आहे. ऑस्ट्रेलियाला पराभूत करता येते याचा वस्तूपाठ भारतीय संघानेच साऱ्या क्रिकेटजगताला घालून दिला. कित्येक सामन्यामध्ये अगदी बॅकफुटवरून येऊन अवघड विजय मिळवून दाखवून भारतीयांना जल्लोष करण्याची संधी याच भारतीय संघाने दिलेली आहे. मात्र सध्याचे खेळाडू जान नसल्याप्रमाणे मैदानात उतरताना दिसत आहेत. मैदानावरील त्यांचा वावरही गेल्या काही दिवसांत खांदे पाडूनच सुरू आहे. चौथ्या कसोटीमध्येही गेल्या तीन कसोटी सामन्यांतील अपयशाचा सिलसिला सुरूच राहिला. अवघे तीन गडी बाद होताना सायबांनी धावांचा डोंगर उभा केला. भारतीय संघाचा व्हाईटवॉश करण्याच्याच इराद्याने इंग्लंडचे फलंदाज मैदानात उतरल्याचे दिसते तर अब्रू कशी वाचवता येईल या विवंचनेत भारतीय गोलंदाज आहेत. कधी नव्हे एवढी भारतीय गोलंदाजी मोडून पडलेली आहे. बळीच मिळत नसल्याने त्यांचा आत्मविश्‍वासच गमावलेला आहे. हरभजन निष्प्रभ ठरला आणि कसोटीमधून बाहेर पडला. त्याच्या जागी आलेल्या मिश्राला अद्याप काहीही करामत दाखविता आलेली नाही. श्रीशांत, इशांत आणि आर. पी. सिंग यांना गोलंदाजीची लयच सापडलेली नाही. त्यांच्या गोलंदाजीमध्ये कोठेही आक्रमकता दिसत नाही आणि जेव्हा त्यांनी संधी निर्माण केल्या तेव्हा त्या क्षेत्ररक्षकांनी वाया घालविल्याचेही आपण पाहतो आहोत. गोलंदाजी, क्षेत्ररक्षणापाठोपाठ फलंदाजीतही खेळपट्टीवर नांगर टाकायची जिद्द कोणाचीच दिसत नाही. सर्वच आघाड्यांवर निष्प्रभ ठरणाऱ्या भारतीय संघावर निर्णायक घाव घालण्याच्या इराद्याने पीटरसन, बेल यांनी फलंदाजी करून संघाच्या नजरेच्या टप्प्यात यश आणून ठेवलेले आहे. शुक्रवारी त्यांनी कोणत्याही गोलंदाजाला दयामाया न दाखविता फोडून काढले आहे. शनिवारीही ते धावांचा डोंगर उभा करतील आणि उरलेल्या अडीच दिवसांत भारतीय संघाचे शिरकाण करण्याचा प्रयत्न करतील हे नक्की.

Thursday, August 18, 2011

शुक्‍लकाष्ठ सुरूच...


सायबांच्या भूमीवर उतरल्यापासून भारतीय संघाच्या पाठीमागे सुरू असलेले शुक्‍लकाष्ठ ओव्हलवरही कायम राहिले. सलग पराभवांमुळे गेलेली अब्रू काही प्रमाणात मिळविण्यासाठी गुरुवारी चौथ्या कसोटी सामन्यातून भारतीय संघ मैदानावर उतरला खरा पण, तो मैदानात उतरण्यापूर्वीच बऱ्यापैकी गोलंदाजी करणारा प्रवीणकुमार गमवावा लागला होता. या दुबळया गोलंदाजीचा समाचार घेत स्ट्रॉस आणि कुक यांनी संघाला नाबाद 75 धावांची सलामी दिली. पाऊस आला आणि दोन्ही संघांना पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. 75 धावांची सलामी देताना दोघांनीही भारतीय गोलंदाजीच्या सुमारपणावर शिक्कामोर्तब केले. पाऊस देवासारखा धावला आणि अब्रूच्या आणखी चिंध्या होण्यापूर्वी भारतीय संघ खांदे पाडून ड्रेसिंग रुममध्ये परतला. काहीच मनासारखं घडत नसल्याचे भाव त्या वेळी सर्वांच्या चेहऱ्यावर होते. सामन्यातील एक दिवस वाया गेल्यामुळे या सामन्यात यश मिळवून गेलेली पत मिळविण्याची संधीही काही प्रमाणात दुरावल्याचे दिसत आहे. शुक्रवारी गोलंदाजांची कामगिरी कशी होईल त्यावर भारतीय संघाचे यशापयश अवलंबून असेल.

Saturday, August 13, 2011

पायउतार...(इंग्लंड डायरी)


भारतीय क्रिकेटचं काहीतरी बिनसलं आहे हे नक्की. अति क्रिकेट, मिळणारा अतिपैसा, विश्‍वकरंडक विजेतेपदाचे डोक्‍यात गेलेलं यश, खेळाबद्दल खेळाडूंमध्ये असलेली बेफिकीरी आणि काही देणं घेणं नसल्यासारखा मैदानावरील वावर. या सगळ्यांचा परिपाक इंग्लंड दौऱ्यात दिसला आणि शनिवारी त्यावर कळस चढला. श्रीशांत बाद झाला आणि भारतीय संघ एक डाव 242 धावांनी पराभूत झाला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाण्या पराभवापैकी एक पराभव नोंदला गेला. गेली दोन वर्षे भारतीय क्रिकेटच्या सुरू असलेल्या घोडदौडीला आज सायबांनी लगाम घातला.
जगातली सर्वात भक्कम फलंदाजी असणाऱ्या संघाचे बुरुज ब्रॉड, अँडरसन, ब्रॉस्नन यांनी एकापाठोपाठ उध्वस्त केले आणि कसोटी क्रिकेटच्या अव्वलस्थानाच्या सिंहासनावर हक्क सांगितला. क्रिकेटची मायभूमी गेली कित्येक वर्षे अव्वलस्थानाला पोरकी झाली होती. भारतीय संघाला एजबस्टनमध्ये नमवून सायबांनी हा मुकुट हिसकावून घेतला. भारतीय संघ अव्वस्थानावरून पायउतार झाला. गेल्या तिन्ही सामन्यांमध्ये इंग्लंड संघाने केलेली कामगिरी खरोखरच कौतुक करण्यासारखी आहे. त्यांच्या फलंदाजांनी वसुली केल्याप्रमाणे भारतीय संघाच्या गोलंदाजांना ठोकून काढले. धावांच्या राशी ओतल्या. भारतीय क्रिकेटने भविष्यात गोलंदाजीसाठी खास मेहनत घेतली पाहिजे हे वाजवून सांगितले. झहीरखानशिवाय भारतीय गोलंदाजी रांगल्याचं या दिवसांत पहावयास मिळालं. इतर गोलंदाजांना इंग्लंडच्या फलंदाजांना रोखणे जमलेच नाही. त्याच्याबरोबर उलट परिस्थिती इंग्लंड गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची केली. पहिल्या दोन सामन्यात राहुल द्रविड आणि अखेरच्या सामन्यात कर्णधार धोनी वगळता एकाही भारतीय फलंदाजाला त्यांनी हुकुमत गाजवू दिली नाही. उलट प्रत्येक धाव घेण्यासाठी त्यांना कमालीचा घाम गाळण्यास भाग पाडले. क्रिकेटच्या देवाचे महाशतक हा क्रिकेटरसिकांमध्ये चेष्टेचा विषय बनला. एकाही सामन्यात त्याची बॅट बोलू दिली नाही. इतरांनाही त्यांनी फारशी करामत दाखवू दिलीच नाही. करामत दाखविण्यापूर्वीच त्यांनी आपल्या खेळपट्ट्यांना आपल्याच मुठीत ठेवले आणि त्यावर भारतीय फलंदाज अगदी टिपून बाद केले. येथील वातावरण, खेळपट्टी आणि हात-हात स्विंग होणारे चेंडू यांच्या चक्रव्युहातून भारतीय संघ बाहेर पडूच शकला नाही. भारतीय संघाचा तारणहार असा गाजावाजा करत बोलावलेला सेहवाग फलंदाजी विसरल्याप्रमाणे अखेरच्या कसोटी सामन्याच्या दोन्ही
डावांत खेळला. उभ्या उभ्या फटके मारण्याची त्याची सवय जाता जात नाही हेच खरे. त्यातही समोर जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहेत हेही तो विसरला. परिणाम त्याला दोन्ही डावांत भोपळा फोडताच आला नाही आणि इतर फलंदाज प्रतिकार करण्यापूर्वी बाद होत गेले. त्यामध्ये नवा-जुना असा भेदच राहिला नाही. मोठी खेळी करून संघाला बाहेर काढायचे असते हेच बहुधा भारतीय संघ विसरला. झहीरमुळे लंगडी झालेल्या गोलंदाजीची धुरा प्रवीणकुमारने वाहण्याचा प्रयत्न केला खरा पण; त्याला दुसऱ्या बाजूने जरासुद्धा आश्‍वासक साथ मिळाली नाही. इशांत, श्रीशांत यांना खूप काही शिकावे लागणार हे या दौऱ्याने अधोरेखीत केले. गॅरी कर्स्टन यांनी प्रशिक्षकपदावर आल्यानंतर भारतीय संघाला क्रिकेटच्या सर्व प्रकारांत अव्वलस्थानी पोचविण्यासाठी मेहनत घेतली. यामध्ये सातत्य ठेवण्यात सध्यातरी डंकन फ्लेचर यांना अपयश आले आहे. गेलेली अब्रू आणि पत परत मिळविण्यासाठी त्यांना कंबर कसून कामाला लागावे लागेल हे नक्की.

Friday, August 12, 2011

पाऊले चालती पराभवाची वाट (इंग्लंड डायरी)


पूर्ण दोन दिवस, 180 षटके आणि नऊ खेळाडू शिल्लक. इंग्लंड दौऱ्यातील आत्तापर्यंतचा सर्वात मानहानीकारक पराभव टाळण्यासाठी आणखी 451 धावांचे डोक्‍यावर असलेले ओझे. "केविलवाणे' या शब्दाला लाजवेल अशी झालेली भारतीय संघाची अवस्था. ही कसोटी वाचविण्यासाठी काहीतरी चमत्कार व्हावा, अशीच सच्च्या क्रिकेटप्रेमींची अपेक्षा; पण चमत्कार करणार कोण? ज्याच्याकडून चमत्काराची अपेक्षा बाळगू शकतो, जो काही षटकांमध्ये सामन्याचा नूर बदलू शकतो तो वीरेंद्र सेहवाग पहिल्याच चेंडूवर बाद. बरं त्याला बाद होताना पाहिल्यानंतर क्‍लब क्रिकेटमधील खेळाडू जशा बालीश चुका करतात तशीच चूक करून त्याचं बाद होणं हे हृदयाचा ठोका चुकविणारं होतं. तो आला, पहिला चेंडू खेळला आणि बाद झाल्यानंतर मान खाली घालून परतला, हे साऱ्या क्रिकेटविश्‍वाने पाहिले. त्याला बाद करण्याचं श्रेय शंभर टक्के अँडरसनचे. सेहवाग काय चूक करू शकतो हे अचूक ध्यानी घेऊन त्याने चेंडू टाकला. सेहवागच्या बॅटजवळून चेंडू हळूवार बाहेर काढला आणि या सापळ्यात सेहवाग अलगद फसला. बाकीचं काम कर्णधार स्ट्रॉसनं स्लीपमध्ये केलं. भारतीय संघाच्या वर्मावर पहिला घाव घालण्यात साहेब यशस्वी झाले. दिवसभरात त्यांनी गंभीर आणि द्रविडवर दडपण राखण्यात यश मिळविले. भारतीय संघाचा पराभव अटळ आहेच. हा पराभव फक्त लहरी निसर्ग लांबवू शकतो जर तो पावसाच्या रुपात बरसला तर. सर्व फलंदाजांचा कस पाहणारी स्थिती येऊन ठेपलेली आहे. सर्व खेळाडूंनी मिळून ही परिस्थिती हाताळली, समजून उमजून फलंदाजी केली तरच काहीतरी होऊ शकतो अन्यथा...
त्यापूर्वी आज दिवसभरात पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजीचा मनोभंग करत कुकने मॉर्गन (104) आणि ब्रेस्नन (53) यांच्या संगतीने आजची दिवसभराची परिस्थिती हाताळली. ज्या खेळपट्टीवर दिग्गज भारतीय फलंदाज गळपटले त्याच खेळपट्टीला वश करून घेऊन भारतीय संघाचं क्रमांक एकचं बिरुद हिसकावून घ्यायचंच या हेतूने कुकने आजही कालचाच कित्ता पुढे गिरवताना 294 धावांची खेळी साकारली. बिचाऱ्याचे त्रिशतक हुकले. सायबांच्या सर्वच यशस्वी फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीचा पार लोळा गोळा करून टाकला. एकालाही लय मिळू दिली नाही की बळी मिळू दिले नाहीत. संघाला कॉंक्रीट स्थितीत पोचविण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. हिरव्यागार आऊटफिल्डवर भारतीय क्षेत्ररक्षक चेंडू आणून गोलंदाजांकडे देण्याचे काम दिवसभर करत राहिले. काल दिवसभरात सोडलेल्या झेलांचे मोल किती मोठे होते हे कुक आणि मॉर्गनच्या खेळीवरून भारतीय खेळाडूंच्या लक्षात आलेच. दिवसभर घाम गाळल्यानंतर भारतीय गोलंदाजांना बळी मिळाले अवघे चार; मात्र तोपर्यंत धावांनी सातशेचा टप्पा ओलांडला होता. हरभजनसिंगच्या जागेवर मोठा गाजा-वाजा करत आलेल्या मिश्राची डाळ सायबांनी मुळी शिजूच दिली नाही. त्याचे चेंडू फिरक घेत होते; पण त्याला खेळण्यात इंग्लंडच्या फलंदाजांना फारशी अडचण आलीच नाही.
उद्या उपाहारापूर्वी सामन्याचा निकाल नक्की झालेला असणार आहे. भारतीय फलंदाज टिकून आणि टिच्चून खेळले तरच निभाव लागणार आहे, अन्यथा आणखी एक मानहानीकारक पराभव भाळी लिहिला जाणार हे नक्की.

कुकने दिले धडे (इंग्लंड डायरी)


हिंदी सिनेमामध्ये पहिला चित्रपट सुपरडुपर हिट दिल्यानंतर अनेक हिरो गायब झाल्याची कितीतरी उदाहरणे आहेत. भारतीय क्रिकेट संघाची अवस्था सध्या तरी डिट्टो तशी झाली आहे. विश्‍वकरंडक जिंकल्यामुळे हिरो बनलेल्या भारतीय संघाबद्दल चाहत्यांच्या मनामध्ये अपेक्षांचा डोंगर उभा राहिलेला आहे. त्यात हा संघ कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावरील त्यामुळे तर यश मिळालेच पाहिजे अशी अपेक्षाही बाळगली जात आहे. प्रत्यक्षात इंग्लंड दौऱ्यात राहुल द्रविड वगळता एकाही भारतीय खेळाडूला त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी मैदानावर दाखवण्यात यश आलेले नाही. दौऱ्याच्या सुरवातीपासून आजपर्यंत भारतीय संघाच्या बाजूने एक गोष्ट होईल तर शपथ. खेळाडू जायबंदी होण्याचा ससेमिरा, गोलंदाजांना मिळत नसलेले अपेक्षित यश आणि पूर्णपणे ढेपाळलेली फलंदाजी अशी केविलवाणी अवस्था संघाची झालेली आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांत दणकून मार खाल्यानंतर भारतीय संघ "बाऊन्स बॅक' करेल अशी भाकिते वर्तविली जात होती, प्रत्यक्षात एजबस्टन कसोटीच्या पहिल्या दोन दिवसांत तरी "मागचे पाढे पंचावन्न' अशीच स्थिती आहे. पहिल्या दोन पराभवानंतर भारतीय संघ काही शिकलाय असे वाटत नाही, उलट भारतीय संघाचे मनोधैर्य पूर्णपणे खच्ची झाल्याचे मैदानावर सातत्याने दिसत आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यातही खराब फलंदाजीनंतर गोलंदाजांनाही ही खेळपट्टी समजलेली नाही. स्वैर गोलंदाजीचा पुरेपूर समचार साहेबांनी घेतला. विशेषतः ऍलिस्टर कुकने गेल्या दोन कसोटी सामन्यांतील अपयशाची पुरेपूर भरपाई करताना या सामन्यात भारतीय गोलंदाजीवर हुकुमत गाजवली. गेल्या वर्षभरातील कामगिरीवर त्याने चार चांद लावणारी खेळी केली. अर्थात त्यामध्ये त्याला मिळालेल्या जीवदानाचा वाटा मोठा आहे. त्याने उत्तम सलामीवीर कसा असतो याचा वस्तूपाठ गुरुवारी घालून दि
ला. त्याने स्ट्रॉससोबत आधी भक्कम भागिदारी केली आणि त्यानंतर पीटरसनसोबत संघाला आघाडीवर नेले. कारकिर्दीतील 19वे शतक झळकवताना त्याने दाखविलेली मॅच्युरिटी "काबीले तारीफ' अशीच होती. त्याने एकाही भारतीय गोलंदाजाला हुकुमत गाजवू दिली नाही. आक्रमण, बचाव आणि संधीचा लाभ कसा घ्यायचा असतो हे भारतीय फलंदाजांना दाखवून दिले. ज्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी लोटांगण घातले त्याच खेळपट्टीवर हा पठठ्या पाय रोवून उभा राहिला. त्याने आपली कामगिरी पार पाडताना संघाला दोनशेच्यावर आघाडी मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली आहेच. शिवाय संघाच्या विजयाचा पाया भक्कम करण्यात कोणतीही कसूर ठेवलेली नाही. आपल्या 182 धावांच्या खेळीत त्याने मैदानाच्या चौफेर धावांची वसुली केली. त्याच्या धडाक्‍यासमोर भारतीय गोलंदाज हतबलतेने गोलंदाजी करताना दिसत होते. भरीत भर म्हणून क्षेत्ररक्षकांनीही जेवढी म्हणून करता येईल तेवढी सुमार कामगिरी केली. कुकने भारतीय संघाच्या डोक्‍यावरील एक नंबरचा मुकुट काढून घ्यायला हात घातला आहे. हा सामना संपेल तेव्हा तोच मुकुट इंग्लंड संघाच्या डोक्‍यावर कदाचीत विराजमान झालेला असेल.

Thursday, August 11, 2011

धोनी धावला...एकदाचा (इंग्लंड डायरी)


भारतीय क्रिकेट संघाची अवस्था वादळात सापडलेल्या नौकेसारखी सध्या झालेली आहे. इंग्लंडमधील वातावरण, तेथील खेळपट्ट्यांना भारतीय संघ नेमका कधी जुळवून घेणार याचे उत्तर दौरा निम्म्यावर आला तरी अद्याप मिळालेले नाही. तिसऱ्या कसोटीमध्ये भारताने कसाबसा दोनशे धावांचा टप्पा ओलांडला. मोठ्या गाजावाजा करत संघात दाखल झालेला सेहवाग शुन्यावर बाद झाला. (याबद्दल त्याला दोष देता येणार नाही, कारण त्यालाही खेळपट्टीसोबत जुळवून घ्यायला थोडा वेळ लागणारच) गंभीरची सुरवात झकास झाली पण पुन्हा एकदा तो मोठी खेळी उभारण्यात अपयशी ठरला. मग भिंत स्वस्तात ढासळली आणि व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण स्पेशल करण्यापूर्वीच परतला. महाशतकामुळेच गेले काही दिवस चर्चेत असलेला मास्टर ब्लास्टरने भोपळा फोडला पण त्यापेक्षा जास्त काही करण्यापूर्वी त्याची बॅट थंड करण्यात आली. रैनाची दैना याही सामन्यात संपली नाही आणि पाहता पाहता सहा फलंदाज शंभर धावांत तंबूत. ही अवस्था पाहिल्यानंतर एकवेळ भारतीय संघ दीडशे धावांचा टप्पा पाहील ही अपेक्षा चाहत्यांनी सोडून देऊन स्टॅंडमधून बाहेर पडायला सुरवातही केली; मात्र कसा कोण जाणे पण आज धोनी पेटला. दौऱ्यात प्रथमच त्याची बॅट मैदानावर चालली. "आक्रमण हाच उत्तम बचाव' हे सूत्र अंगीकारून धोनीने प्रवीणकुमारसह सायबांच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला आणि मग मात्र धावफलक वेगाने हलता झाला. धोनी दोन षटकार ठोकून मैदानात चैतन्य आणले. जो भारतीय संघ दीडशे धावांचा टप्पा गाठेल असे छातीठोकपणे सांगता येत नव्हते. त्या संघाने दोनशे धावांचा टप्पा ओलांडला तो धोनी आणि कुमारच्या धडाकेबाज खेळीमुळे. धोनीच्या खेळीमध्ये क्रिकेटमधील फारसे आदर्श फटके नव्हतेच पण तो खूप दिवसानंतर त्याच्या शैलीत खेळला आणि त्याच्या बॅटला धावांचा खुराक मिळाला. तो बाद झाला तेव्हा समोर त्याला ज
ोडीला फारशा आशा राहिलेल्या नव्हत्या; मात्र त्याच्या 77 धावांच्या खेळीने संघाची अब्रू काही प्रमाणात तरी झाकली. गेल्या काही सामन्यांत पूर्णतः सूर हरपलेल्या धोनीने बुधवारच्या खेळीने काही प्रमाणात पुन्हा एकदा लय पकडण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजांनी गुरुवारी जर करामत दाखवली तर धोनीच्या 77 धावांचे मोल नक्कीच समजेल. तूर्त एवढेच म्हणता येईल. रथी-महारथींच्या बॅटा थंडावलेल्या असताना धोनीची बॅट तळपली. संघ अडचणीत असताना कर्णधाराने धावून जायचे असते, याला बुधवारी एकदाचा काही प्रमाणात का होईना न्याय दिला. आता इतर आघाड्यांवरही असाच आक्रमकपणा दाखवून भारतीय संघाची गेलेली पत, अब्रू काही प्रमाणात का होईना परत येऊ शकेल अर्थात त्याला इतर खेळाडूंचीही तेवढ्याच समरसतेने साथ मिळण्याची आवश्‍यकता आहे.

Thursday, August 4, 2011

परीक्षा

गाडीला जास्तीत जास्त वेग देण्याचा प्रयत्न करून परीक्षेला वेळेत पोचण्यासाठी तो धडपडत होता. मूठ वाढवतानाच त्याचे घड्याळाकडे सारखे लक्ष जात होते. पेपर सुरू व्हायला अवघी काही मिनिटे बाकी होती आणि अजून दोन-तीन किलोमीटर तरी त्याला जायचं होतं. एवढ्यात त्याचं लक्ष फुटपाथच्या बाजूला उभ्या मुलीकडं गेलं. परीक्षेची वेळ गाठायची धांदल असतानाही त्याचे तिच्याकडे लक्ष जाण्याचं कारण तिची सुरू असलेली धडपड. त्याच्या हाताची मूठ आपसुक सैलावली आणि गाडीचा वेग कमी झाला. ती मुलगी वैतागलेली दिसत होती आणि गाडी सुरू करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. त्यानं बाईक वळविली आणि तो तिच्याजवळ जाऊन उभा राहिला. गाडी सुरू होत नसल्यामुळे एकाचवेळी रडकुंडीला येऊन आणि चरफडत ती गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करत होती. त्याने तिच्या बाजूला बाईक उभी केली आणि विचारलं,
"काय झालं?'
त्याच्या अनाहूत प्रश्‍नावर तिनं काहीच उत्तर दिलं नाही. उलट त्याच्याकडे दुर्लक्ष करून गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करू लागली.
तिचे गाडी सुरू करण्याचे प्रयत्न खूप वेळापासून सुरू आहेत हे तिच्या कपाळावर जमलेल्या घामाच्या थेंबांवरून दिसत होतं. आपल्या प्रश्‍नाला उत्तर न आल्याने तो पुढे झाला आणि त्यानं पुन्हा तिला विचारलं, "गाडी सुरू होत नाही का?'
आता मात्र ती वैतागली. साधारण तिच्यापेक्षा वर्षभराने तो मोठा असावा. गोल, हसऱ्या चेहऱ्याचा.
"दिसत नाही, किका मारतेय ते? परीक्षेला जायचं असताना कोणी टाईमपास म्हणून रस्त्याकडेला गाडी उभे करून अशी झटापट करत बसेल का?'
तिनं सटकून उत्तर दिलं.
त्यानं खुणेनंच "मी पाहू का?' असं विचारलं.
त्यावर तिनं "नको...' म्हणून गाडी सुरू करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला.
"ओके' खांदे उडवून तो म्हणाला आणि त्याने बाईक सुरू केली. ती वळवून तो जाणार एवढ्यात काय झालं कोण जाणे. ती वरमली. म्हणाली, "पाहता का प्लीज!'
त्यानं बाईक बंद केली आणि तिची गाडी पाहू लागला. झटापट करून दहा-पंधरा मिनिटांत त्याने तिच्या गाडीचा प्रॉब्लेम सोडविला. तिला गाडी सुरू करायला सांगितलं. गाडी सुरू होताच त्याच्या चेहऱ्यावर समाधान तर तिच्या चेहऱ्यावर मस्त हास्य फुललं. तिची गाडी सुरू झालेली पाहून तो बाईकवर बसला आणि तेथून सटकला... आता त्याला त्याचा वर्ग दिसत होता...
--
"अरे आपण साधं त्याला थॅंक्‍सही म्हणालो नाही... त्याच्यामुळं आता निदान वेळेत पेपर तरी गाठता येईल,' असं स्वतःशी म्हणत तिनंही गाडीला वेग दिला.
--
तो वेगात कॉलेजात पोचला. गाडी गडबडीने स्टॅंडला लावून तो पळत पळत वर्गात गेला. तर पेपर सुरू होऊन अर्धा तास होऊन गेला होता. वर्गावरील प्राध्यापकांनी वेळ का झाला? कळत नाही का? काळजीच नाही... कॉलेज म्हणजे काय धर्मशाळा आहे काय? असं सुनावत त्याची उलटतपासणी सुरू करत आणखी दहा-पंधरा मिनिटे खाल्ली. अखेर त्याने गयावया केल्यानंतर त्याला वर्गात प्रवेश दिला. पेपर लिहिण्यासाठी त्यानं पेन उघडला खरा, पण त्याचे दोन्ही हात काळेकुट्ट झाले होते. आधीच वेळ झालेला असल्यामुळं वर्गावरील शिक्षकांना विचारायची सोय नव्हती. कसेबसे रुमालाने हात स्वच्छ करून मिळालेल्या वेळेत होईल तेवढा पेपर उरकण्यास सुरवात केली.
ती कॉलेजात पोचली. गाडी स्टॅंडला लावून वर्गाकडे निघाली तर तिला मघाची बाईक दिसली. "अरेच्चा! म्हणजे हा आपल्याच कॉलेजात शिकतो तर; पण त्याचा तर पेपर असणार, म्हणजे आपली गाडी दुरुस्त करण्याच्या नादात त्याला पेपरला पोचायला वेळ झाला असणार. बापरे! आपल्यामुळे त्याचे नुकसान होणार? पण काहीही असो. त्याच्या हातात जादू आहे. केवळ एका स्क्रू ड्रायव्हरने त्याने आपली गाडी दुरुस्त केली. पण आपल्यामुळे त्याचं नुकसान होणार हे नक्की. काय करावं?...पटकन्‌ काही तरी आठवून तिनं वहीत पटापट काहीतरी लिहिलं आणि तो कागद फाडून त्याच्या बाईकच्या हॅंडलला अडकवून ती पेपरला निघून गेली.
--
पेपर सुटला. काहीसा चेहरा पाडून तो वर्गातून बाहेर आला. हा विषय काही सुटत नाही. बाबा जाम धूर काढणार. काय सांगायचं त्यांना? काय अवदसा आठवली आणि त्या पोरीला मदत करत बसलो. पण दिसत होती गोड. अशी छान मैत्रीण असावी आपली. पण आता बाबांना काय सांगायचं? विचार करत तो बाईकजवळ आला. किक मारणार एवढ्यात त्याचं लक्ष समोर हॅंडलला अडकवलेल्या कागदाकडे गेलं. कुतूहलाने त्याने कागद काढला आणि वाचला. पेपर अवघड गेल्याचे दुःख कोठच्या कोठे पळून गेलं. त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे ताटवे फुलून आले. मस्त शीळ मारत, त्याच खुशीत त्याने बाईकला किक मारली.
--
कागदावर लिहिलं होतं...
""मी रमा... एक्‍स्ट्रीमली सॉरी; पण स्वतःचा पेपर असतानासुद्धा तू मघाशी माझी गाडी दुरुस्त करण्यासाठी थांबलास. मी अडचणीत असताना धावलास. स्वतःचे नुकसान करून माझी मदत केलीस. तुझ्यामुळे मी परीक्षा देऊ शकले; मात्र तू पेपरला उशिरा पोचलास. तू खरंच सच्चा माणूस आहेस. असं म्हणतात, संकटावेळी धावतो तो खरा मित्र. आज मला एक सच्चा मित्र गवसला. संध्याकाळी आपण भेटू आणि मैत्रीची पहिली भेट साजरी करू कॉफी घेऊन. नक्की ये...हॅपी फ्रेंडशीप!'

Monday, August 1, 2011

हार आणि फक्त हारच! (लंडन डायरी)


खेळामध्ये हार जीत ठरलेली आहे. कोणीतरी एक हरतो म्हणूनच तर कोणीतरी जिंकतो. मात्र हरतानाही त्यामध्ये प्रतिकार केल्याचे, लढल्याचे समाधान मिळविता आणि इतरानाही देता येते. मात्र काही पराभव जिव्हारी लागणारे असतात. सोमवारी नॉटींगहॅमला झालेला 319 धावांनी झालेला दणदणीत पराभव असाच तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींच्या जिव्हारी लागणारा आणि चिड आणणाराच ठरला. बाद झालेल्या बेलला पुन्हा बोलावून खेळण्याची संधी देऊन सर्वांना जिंकणाऱ्या धोनी सेनेने जिंकता येईल अशी कसोटी गमावली ती निव्वळ बेजबाबदारीने. पहिल्या दिवशी इंग्लंड संघाला दीडशेमध्ये गुंडाळण्याची संधी दवडली. त्यानंतर फलंदाजी करताना मोठी आघाडी मिळविण्याची संधी अशाच बेफिकीरीने विकेट फेकून गमावली. धावांची आघाडी दीडशेच्या घरात असती तरी ही कसोटी भारतीय संघ किमान हरला तरी नसता; पण बहुधा नियतीला ते मंजूर नसावे. ज्या खेळपट्टीने ब्रॉडचे बोट धरले त्याच खेळपट्टीने दुसऱ्या डावात प्रवीणकुमार, इशांत, श्रीशांतला दमविले. पुन्हा बेल फलंदाजी करत असताना याच खेळपट्टीने त्याच्या फटक्‍यांसाठी कोणतीही अडकाठी येऊ दिली नाही; मात्र तेथेच दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांविरुद्ध ब्रेस्नन वर अगदी दिलोजानसे फिदा झाली इतकी की त्याच्या खिशात पाच बळींचा खुराक टाकून रिकामी झाली. खेळपट्टीने जरी रंग सरड्यासारखे बदलले असले तरी भारताच्या पराभवाला फक्त तीच एकटी जबाबदार नाही तर तिच्यापेक्षा शतपटीने भारतीय फलंदाजांची हाराकिरी कारणीभूत आहे. पहिल्या डावात राहुल द्रविड वगळता एकही पठ्ठ्या खेळपट्टीवर टिकून राहू शकला नाही. दुसऱ्या डावात काही प्रमाणात सचिन तेंडुलकर (पण त्याच्या खेळात कसलीच जान नव्हती). कर्णधार महेंद्रसिंग धोनी तर फलंदाजी करण्याचेच विसरून गेल्यासारखी परिस्थिती आहे. दोन कसोटी चार डावांत मिळून त्याने अवघ्या 49 धा
वा फटकावलेल्या आहेत. राहुल द्रविड आणि लक्ष्मण वगळता एकही खेळाडू सायबांच्या गोलंदाजीचा समाचार घेण्यात यशस्वी ठरलेले नाहीत. पहिल्या कसोटीमधील जोरदार पराभवाच्या धक्‍क्‍याने भारतीय खेळाडूंनी कसलाही बोध घेतलेला नसल्याचे नॉटींगहॅम कसोटीमध्ये दिसून आले. स्विंग गोलंदाजीला एकीकडे द्रविड समर्थपणे तोंड देत असताना इतर स्पेशालिस्ट फलंदाज मात्र त्यापुढे लोटांगण घालताना दिसले. एकाच्याही खेळामध्ये ब्रॉड, अंडरसन, ब्रेस्नन आदींचा सामना करण्याची, त्यांच्यावर वर्चस्व गाजविण्याची धमक दिसली नाही. भारतीय फलंदाजीच्या 158 धावांत ठिकऱ्या उडाल्या. सामना वाचविण्याच्या दिशेने एकही भागिदारी झाली नाही. उसळत्या चेंडूवरली भंबेरी साऱ्या क्रिकेट जगताने पाहिली. 478 धावांचा डोंगर चढावयाचा असताना खेळपट्टीवर नांगर टाकायचा असतो हे आता पुन्हा एकदा भारतीय फलंदाजांना शिकविण्याची वेळ आली आहे.
पहिली कसोटी हरल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार नासिर हुसेनने भारतीय खेळाडूंवर जोरदार टिकास्त्र सोडले होते. त्यावेळी त्याने भारतीय खेळाडू थकले असून ते क्रिकेटसाठी शंभर टक्के योगदान देत नसल्याचे म्हटले होते. त्या वेळी त्याचा जाम राग आला होता; मात्र सोमवारची भारताची फलंदाजी पाहिली असता तो किती योग्य बोलला होता तंतोतंत पटते. कसोटी क्रमवारीतील अग्रस्थान जवळपास गमावल्यात जमा असलेल्या भारतीय संघाला सर्वच पातळ्यांवर कामगिरी उंचावण्याचे आव्हान आता आहे. धोनीसेनेने गेल्या दोन वर्षांत मिळविलेले यश पहिल्या दोन सामन्यात पार रसातळाला गेले आहे. विश्‍वकरंडकाची धुंदी आणि आयपीएलमधून मिळालेल्या पैशाचा खळखळाट यामध्ये भारतीय संघ हरवू लागला आहे काय? असा प्रश्‍न पडल्यावाचून राहत नाही. पहिल्या दोन पराभवाने भारतीय संघाची अब्रू तर इंग्लंडच्या वेशीवर टांगली गेली आहेच. निदान येत्या दोन सामन्यांत उरलीसुरली प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी किमान प्रयत्न होतील अशी आशा आहे.

Saturday, July 30, 2011

बेभरवसा = भारतीय फलंदाजी (इंग्लंड डायरी)


भारतीय फलंदाजी आणि सलमान खान यांच्यामध्ये सर्वात मोठे साम्य कोणते असेल? दोघेही प्रचंड बेभरवशाचे. सलमान कधी शर्ट काढून सिक्‍स पॅक्‍स दाखवेल सांगता येत नाही आणि भारतीय फलंदाजी भक्कमपणे वाटचाल करत आहे, असे वाटत असताना कधी कोसळेल याचा नेम नाही. नॉटींगहॅमला दुसऱ्या कसोटीच्या शनिवारी दुसऱ्या दिवशी पहिल्या दोन सत्रांमध्ये इंग्लंड गोलंदाजीवर वर्चस्व गाजवून मोठी आघाडी मिळविण्याची स्वप्ने पाहणारी भारतीय फलंदाजी चहापानानंतर काही वेळात पत्त्याचा बंगल्याप्रमाणे कोसळली आणि पदरात पडली नाममात्र आघाडी. ज्या ब्रॉडला पहिल्या दोन सत्रांमध्ये द्रविड, लक्ष्मण आणि युवराज यांनी रट्टे दिले, त्या ब्रॉडची उधारी चुकती करायची असल्यासारख्या विकेटही टाकल्या. पाच बाद 267 धावा अशा भक्कम स्थितीतील संघ 288 मध्ये माघारी परतला होता. अवघ्या 21 धावांत पाच फलंदाज "तू आधी का मी आधी' अशा पद्धतीने भोंज्या शिवल्यासारखे मैदानावर जाऊन माघारी आले. फलंदाजीवेळी बॅट घेऊन आडवा आलेला ब्रॉड गोलंदाजी करताना अंगावर धाऊन आला. त्याला मग शिंगावर घेण्याची हिम्मत ना द्रविडला दाखवता आली ना युवराजला. रैना, सचिन, कर्णधार धोनी, हरभजन, प्रवीणकुमार आदींनी रजा पडू नये, म्हणून ज्याप्रमाणे मस्टरवर सही करून ऑफिसमध्ये उपस्थिती दाखवतात तशी येऊन हजेरी लावली. फलंदाजी केल्यासारखं दाखविलं आणि पुन्हा पॅव्हेलियनची वाट धरली. विक्रमादित्य सचिनचा बॅड पॅच शनिवारीही सुटला नाही. तो तिसऱ्यांदा ब्रॉडचा गिऱ्हाईक झाला. ब्रॉडने लॉर्डस्‌च्या खेळपट्टीप्रमाणे नॉटींगहॅमच्या खेळपट्टीलापण स्विंगचे अमिष दाखवून वश करून घेतले आणि कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रीक नोंदविण्याची कामगिरी लिहिली. पडझड सुरू असताना खेळपट्टीवर नांगर टाकून शतक झळकावणारा आणि भारतीय फलंदाजीला आघाडीचा किनारा दाखविणाऱ्या राहुल द्रविडनेही (117)
आता बास झालं करत बॅट फिरवली आणि चेंडूने त्याला बरोबर गंडवले. संयम सुटला आणि त्याचा खेळ संपला. त्यापूर्वी त्याने युवराजबरोबर कामगिरी चोख बजावली खरी; पण अल्पसंतुष्टपणे त्याच्या माघारी जाण्याने या कसोटीवर वर्चस्वाची मोठी संधी भारताने गमावली ती गमावली. युवराजने अर्धशतकी (65) खेळी केली खरी पण अजूनही त्याला कसोटीसाठीचा संयम राखता येत नाही हे दिसून आले अर्थात ब्रॉडने त्याला टाकलेला चेंडूही तसाच अफलातून होता.
ज्या खेळपट्टीने वाकुल्या दाखविल्या त्याच खेळपट्टीला ब्रॉडने स्वींगने गुलाम बनविले. चेंडूला वेग देतानाच त्याने चेंडू फलंदाजाच्या बॅटपासून हळूच बाहेरही काढला. इनकटर आणि इनस्विंगचे शस्त्र त्याने वापरले आणि एकाच षटकात नाट्य घडवून भारतीय फलंदाजी कापून काढली. 46 धावांत सहा बळी घेत आपली भेदकता सिद्ध केली हे जसे खरे आहे, तसेच भारतीयांनी त्याच्या चेंडूचे अंदाज न घेता अत्यंत बेजबाबदार फटके मारले हे ही तितकेच खरे.

Friday, July 29, 2011

ब्रॉड आडवा आला (लंडन डायरी)लॉर्डस्‌वर भारताला पराभूत करण्यामध्ये ख्रिस ब्रॉडचा वाटा मोठा होता. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये त्याने धडाकेबाज कामगिरी करताना भारतीय संघाची भंबेरी उडवली होती. ज्या खेळपट्टीवर त्याच्या गोलंदाजीवर भारतीय फलंदाजांना खेळता आले नव्हते, त्याच खेळपट्टीवर भारतीय जलदगती गोलंदाजीचा मारा त्याने फोडून काढला. त्याने प्रायरसोबत भक्कम भागीदारी नोंदवताना भारताच्या पराभवाचा पाया रचला होता. आजही भारतीय संघ पूर्ण वर्चस्व मिळवण्याच्या वाटेवर असताना ब्रॉड भक्कमपणे आडवा आला आणि संघाला दोनशे धावांच्या पार नेले. ब्रॉड खेळला नसता तर इंग्लंडचा डाव दीडशेच्या आत खल्लास झाला असता; पण ब्रॉडने प्रवीणकुमार, इशांत आणि तेजतर्रार श्रीशांतसह हरभजनसिंगच्या गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेतला. त्याने जोरदार प्रतिआक्रमण करून भारताचे मनसुबे पुरते उधळून लावले. त्याने 66 चेंडूंमध्ये 64 धावा फटकावताना नऊ चौकार लगावले. त्याने हे आक्रमण रचताना स्वानला हाताशी धरले. संघाची धावसंख्या 124 असताना स्वान मैदानात उतरला होता. त्यानंतर दोघांनी भारतीय गोलंदाजीवर प्रहार करण्यास प्रारंभ केला. कुमारच्या गोलंदाजीवर मुकुंद झेल घेईपर्यंत संघाची धावसंख्या 197 वर पोचली होती. त्यानंतर अँडरसनच्या साथीने ब्रॉडने इंग्लंडला दोनशेचा टप्पा पार करून 221 वर पोचविले. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ब्रॉड गेल्या काही सामन्यांत कामगिरी करत आहे. विशेषतः जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा तो अलीकडे खेळताना दिसतोय.
ब्रॉडचे प्रतिआक्रमण वगळता आज भारतीय गोलंदाजांची तारीफ करावी तेवढी थोडीच आहे. झहीरच्या अनुपस्थितीत संधी मिळालेल्या श्रीशांतने डोके शांत ठेवत गोलंदाजी करताना आपला क्‍लास आज तरी दाखवलाच. त्याच्या संगतीने इशांत आणि प्रवीणकुमारने नॉटिंगहॅमच्या जिवंत खेळपट्टीचा फायदा अगदी अधाशासारखा उठविला. भारतीय क्षेत्ररक्षकांनी दोन-तीन झेल सोडले नसते तर इंग्लंडला आणखी स्वस्तात तंबूत पाठविण्यात या जलद त्रिकुटाला नक्की जमले असते. तिघांनीही अचूक गोलंदाजी करताना स्विंगवर भर दिला. विशेष म्हणजे तिघांनीही टप्पा बिलकूल भरकटू दिला नाही. तिघेही एकमेकांना मार्गदर्शन करताना दिसत होते आणि हे चित्र निश्‍चितच सुखावणारे होते. झहीरच्या नसण्याचा कोणताही परिणाम होऊ न देण्याचा विडा तिघांनी उचलल्याप्रमाणे गोलंदाजी केली आणि मग बळीही समसमान वाटून घेतले. त्यामुळे हरभजनला फार काही करायची वेळ आली नाही. त्याने अखेरचा घाव घालताना ब्रॉडला बाद केले आणि सायबांना 221 धावांवर रोखले.धावांची रास ओतायला हवी
सायबांना स्वस्तात बाद करण्यात जरी यश मिळाले असले तरी त्यांच्याकडे अँडरसन, ब्रॉडसारखे भेदक गोलंदाज आहेत हे विसरून चालणार नाही. हा सामना जिंकण्यासाठी जगातली सर्वात भक्कम फलंदाजी असल्याचे बिरूद मिळविणाऱ्या भारतीय संघाला धावांची रास ओतण्याची गरज आहे. पहिल्याच चेंडूवर मुकुंदला गमावणाऱ्या भारतीय खेळाडूंना किमान दोन मोठ्या भागीदाऱ्या या मैदानावर करण्याची गरज आहे. खेळपट्टीचा रंग पाहता हे काहीसे अवघड आहे; मात्र "धोनीसेनेला' हे करावेच लागेल; अन्यथा गोलंदाजांनी घाम गाळून जे कमावले ते फलंदाजांनी गमावले, असे म्हणण्याची वेळ भारतीयांवर येऊ शकते.

Thursday, July 28, 2011

लढाई अस्तित्वाची (लंडन डायरी)


कसोटी क्रमवारीत हा संघ अव्वल आहे. वेस्ट इंडीजमध्ये कसोटी मालिकाही जिंकलीय. वनडेचा विश्‍वकरंडकही पटकावलाय. अशा भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याची सुरवात पराभवाने झाली आणि कोट्यवधी क्रिकेटरसिक चुकचुकले. भारतीय संघाच्या अव्वल स्थानाविषयीच प्रश्‍नचिन्ह उभे केले जाऊ लागले. शुक्रवारपासून नॉटींगहॅमच्या वेगवान खेळपट्टीवर सुरू होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. लॉर्डस्‌च्या खेळपट्टीने भारतीय फलंदाजांना खेळवले. त्यापेक्षा वेगळी परिस्थिती नॉटींगहॅमला नाही; मात्र येथे असणाऱ्या कोरड्या वातावरणाचाच पडला तर फरक पडू शकतो. तसे पाहता हे मैदान भारतीयांसाठी लकी आहे. या मैदानावर भारतीय संघाने इंग्लंडमधील विजय साकारलेला आहे. या मैदानावर सचिनची बॅटही चमकलेली आहे. या मैदानावर सचिनने सत्तरपेक्षा जास्त सरासरीने धावा करताना शतकही झळकावलेले आहे. हे सर्व जरी खरे असले तरी भारतीय संघापुढील मुख्य समस्या गोलंदाजीची आहे. झहीरखान नाही, हरभजन निष्प्रभ ठरतोय (अर्थात वेगवान खेळपट्टीवर त्याच्याकडून किती अपेक्षा करणार म्हणा), इशांत, प्रवीणकुमार प्रयत्न करताहेत पण ते पुरेसे नाहीत. झहीर खेळू शकणार नसल्यामुळे श्रीशांत किंवा मुनाफ पटेलला संधी मिळण्याची शक्‍यता आहे. श्रीशांतला संधी दिल्यास त्याचा "आक्रमक' स्वभाव उपयोगी पडू शकतो अर्थात तो गोलंदाजीमध्येच जास्त वापरला गेला तर. दुसरीकडे फलंदाजी भक्कम असली तरी गंभीर खेळणार की नाही या विषयी मोठे प्रश्‍चचिन्ह आहे. गंभीर न खेळल्यास युवराजसिंगला संधी मिळू शकते. युवराज संघात आल्यास मुकुंदसह पुन्हा एकदा द्रविडलाच सलामीला उतरावे लागणार हे नक्की.

लॉर्डस्‌वरील मोठ्या पराभवामुळे भारतीय संघाच्या एकूणच दर्जाविषयी प्रश्‍नचिन्ह उभारण्याची अहमहिका लागलेली आहे; मात्र त्याविषयी कोणतेही भाष्य न करता कर्णधार धोनीने सामन्याच्या पुर्वसंध्येला आम्ही सकारात्मक मानसिकतेने या सामन्यात उतरू असे सांगून प्रत्यक्ष मैदानातच उत्तर देण्याची मानसिक तयारी केल्याचे स्पष्ट होत आहे. यापूर्वीचा इतिहास पाहता अनेकदा भारतीय संघ परदेशी भूमीवर सलामीच्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर पुन्हा उसळून आला असून उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न भारतीय संघाने केलेला आहे. नॉटींगहॅमच्या मैदानावरही अशाप्रकारेच भारतीय संघ पुन्हा एकदा उत्तम कामगिरीसाठी उसळी घेण्याची अपेक्षा आहे. हे जरी खरे असले तरी गेल्या सामन्यात भारतीय फलंदाजी कापून काढणाऱ्या अँडरसनची या मैदानावरील कामगिरी अफलातून अशी आहे. चार सामन्यात त्याने 28 बळी मिळविलेले आहे. त्यामध्ये चार वेळा त्याने पाचपेक्षा जास्त बळी मिळविलेले आहेत हे विसरून चालणार नाही. सध्या पूर्ण फॉर्मात असलेल्या अँडरसनचे हे फेव्हरीट मैदान आहे. त्याच्या जोडीला ब्रॉड आहेच. भारतीय संघाला पराभूत करून नंबर एकचा मुकुट हिसकावून घेण्यास स्ट्रॉस आणि कंपनी एकीकडे सज्ज होत असताना जिव्हारी लागलेल्या पराभवावर विजयाचे मलम लावून आम्हीच "नंबर एक' आहोत हे दाखवून देण्यासाठी भारतीय संघ नक्कीच प्रयत्न करेल अशी आशा आहे. पाहुया शुक्रवारी सकाळीच या फैसल्याला सुरवात होईल आणि मग नॉटींगहॅमच्या खेळपट्टीचे खरे रंग दिसायला सुरवात होईल.

Monday, July 25, 2011

फक्त रैनाच लढला! (लंडन डायरी)


लॉर्डसवरील कसोटीचा निकाल चौथ्याच दिवशी नक्की झाला होता. एकतर भारत हरणार किंवा सामना ड्रॉ राहणार हे स्पष्ट होते. पाचव्या दिवशी पराभवावर शिक्कामोर्तब झाले. चौथ्या डावामध्ये फलंदाजी करणे हे नेहमीच अवघड असते. त्यातही जर 458 धावांचे ओझे तुमच्या मानेवर असेल तर फलंदाजी करताना देव आठवणारच; मात्र जगातील सर्वात भक्कम फलंदाजी आणि कसोटी क्रमवारीतील क्रमांक एकच्या संघाकडून निदान प्रतिकार तरी होण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात लक्ष्मणचा काहीसा आणि त्यानंतर रैना वगळता इतरांनी त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ केलाच नाही. त्यातही दैवाचे सगळे फासे भारताच्या विरोधातच पडले. एकतर गंभीर पूर्णतः तंदुरुस्त नसताना मैदानात उतरला आणि सचिन अंगात ताप असताना फलंदाजीला आला. त्यामुळे भारतीय फलंदाजीही डळमळली. कालच्या आश्‍वासक सुरवातीमुळे द्रविड आणि लक्ष्मण अखेरच्या दिवशीही भक्कम खेळी करतील ही अपेक्षा अँडरसनने मोडून काढली. पहिल्या डावात भारताचे वस्त्रहरण रोखणाऱ्या द्रविडला दुसऱ्या डावात फारशी संधीच मिळाली नाही. जखमी गंभीर मैदानात उतरला खरा पण कोपराच्या कळा सोसत त्याने कशीबशी 22 धावांची मजल मारली. त्यानंतर मात्र सचिन, लक्ष्मण, सचिन, धोनी, हरभजन यांना अँडरसन, ब्रॉड जोडगोळीने फारशी संधी दिली नाही. एकीकडे रैनाने नांगर टाकलेला असताना त्याला दुसऱ्या बाजूने पुरेशी साथच मिळाली नाही. त्याने ब्रॉड, अँडरसन, ट्रेमलेट स्वॉन यांचा मारा खेळून काढताना त्यांना चौकार लगावण्याचे धारीष्ट्यही दाखविले. या ऐतिहासीक सामन्यातील भारताचा पराभव आधी टाळण्याचा आणि नंतर लांबविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. सराव सामन्यात शतक झळकवून लॉर्डस्‌वर खेळण्याची संधी मिळविलेल्या रैनाने दुसऱ्या डावामध्ये इंग्लंड गोलंदाजीचा कसून प्रतिकार केला. लढाऊ वृत्ती दाखवली. त्याने खेळपट्टीचा अंदा
ज घेऊन फलंदाजी केली. आक्रमक स्वभावाला पूर्णपणे मुरड घालून अत्यंत संयमाने फलंदाजी केली. 78 धावांच्या खेळीसाठी त्याने 136 चेंडू घेतले. तब्बल 207 मिनिटे त्याने किल्ला लढविण्याचा प्रयत्न केला. त्याच्या सोबत आणखी एक दोन मोठ्या भागीदारी झाल्या असत्या तर हा सामना भारतीय वाचवू शकले असते; मात्र प्रत्यक्ष मैदानात सायबांच्या गोलंदाजीने भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले ते पाडलेच. एकटा रैनाच अखेरपर्यंत लढत राहिला. पहिल्या दिवसापासूनच अनेक बाबी भारतीय संघाच्या विरोधात गेल्या. झहीर जायबंदी झाला, गंभीर जखमी झाला, सचिन ताप अंगात असताना खेळला. तर गोलंदाजी करून काही प्रमाणात आपल्या गोलंदाजांना विश्रांती देण्याचा प्रयत्न करणारा कर्णधार धोनी फलंदाजी करताना दोन्ही डावांत सपशेल अपयशी ठरला. जिव्हारी लागला असला तरी या पराभवातून भारतीय संघ शिकेल आणि नॉटींगहॅममध्ये शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या कसोटीमध्ये पुन्हा नव्याने उभारी घेईल ही आशा आहे.

Sunday, July 24, 2011

कोण-कोण होणार तारणहार?(लंडन डायरी)


लॉर्डस्‌वरील कसोटीत चौथ्या दिवशी सकाळी भारतीय गोलंदाजीला अचानक धार आली आणि पहिल्या डावात पूर्णपणे निष्प्रभ ठरलेला इशांत शर्मा भेदक बनला. त्याने सायबांना गुंडाळून भारताला ड्रायव्हर सीटवर नेण्याचा जोरदार प्रयत्न केला. त्यामध्ये तो काही प्रमाणात यशस्वीही झाला; मात्र दुसऱ्या बाजूने तेवढ्याच ताकदीने साथ मिळाली नाही. साहेबांचे सहा गडी 107 धावसंख्येत तंबूत पाठविल्यानंतर इंग्लंड काहीसे बॅकफुटवर आले होते; मात्र पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही प्रायर आडवा आला आणि या वेळी त्याने ब्रॉडला सोबतीला घेतले. पहिल्या दोन तासांतील नूर दोघांनी नंतरच्या सत्रांमध्ये पूर्णपणे बदलून टाकला. पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजीवर वर्चस्व गाजवून पाहता पाहता संघाची आघाडी चारशेच्यावर नेली; मात्र खेळपट्टी फलंदाजीला साथ देत आहे हे पाहून स्ट्रॉसने डाव लगेच सोडण्याची घाई केली नाही. मग मिळालेल्या संधीचा फायदा उठवून प्रायरने लॉर्डस्‌च्या यादीत आपले नाव कोरताना सुरेख शतकी खेळी साकारली. संघाला पुन्हा ड्रायव्हरसीटवर नेताना त्याने व ब्रॉडने भारतीय गोलंदाजी फोडून काढली. धोनीने पुन्हा एकदा गोलंदाजी करून ही जोडी फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रायर-ब्रॉडपुढे कोणाचीच डाळ शिजली नाही. अखेरचा सुमारे दोन तासांचा खेळ शिल्लक असताना प्रायरने शतक पूर्ण केले आणि स्ट्रॉसने त्यांना बाल्कनीतून माघारी येण्याची खूण केली.
कसोटी वाचविण्यासाठी चौथ्या दिवसाचे अखेरचे दोन तास आणि पाचवा संपूर्ण दिवस खेळण्याचे आव्हान घेऊन मैदानात उतरणाऱ्या भारतीय संघाला पहिल्या डावातील तारणहार द्रविडला-मुकुंदसह सलामीला उतरवावे लागले. प्रायरच्या स्विपवर गंभीरच्या कोपरावर बसलेला जोरदार तडाखा सहन न होण्यासारखाच होता. द्रविडने मुकुंदसह परवाची उर्वरीत खेळीच सुरू केल्याप्रमाणे सुरवात केली. पहिल्या चेंडूपासूनच तो मस्तपैकी सेट होऊन खेळला. मुकुंदने आश्‍वासक सुरवात केली; पण अनुभवाची कमतरता जाणवली आणि पुन्हा एकदा चेंडू स्टंपवर ओढवून तो बाद झाला. त्यानंतर लक्ष्मण मैदानावर आला आणि भारताच्या या सिनीयर जोडीने दिवसभरात भक्कमपणे किल्ला लढवून कोणतेही खिंडार पडू ने देण्याची काळजी घेतली. विशेष म्हणजे कसोटी वाचविण्याचे ओझे डोक्‍यावर असताना दोघांनी अत्यंत पॉझीटीव्ह खेळ केला. लक्ष्मणने एका षटकात सलग तीन चौकार मारून सामना जिंकण्यासाठीही प्रयत्न करता येऊ शकतो हे दाखवून दिले. आता अखेरच्या दिवशी सामना वाचविण्यासाठी संघासाठी तारणहार होण्याची भूमिका कोण-कोण बजावतो हे पहावे लागेल. त्याचबरोबरीने कोलकत्त्यात ज्याप्रमाणे लक्ष्मणने काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पिछाडीवरून येऊन भारतीय संघाला जिंकून दिले होते तसा पराक्रम आताही करणार का हीच उत्सुकता आहे. त्यासाठी 378 धावांचा डोंगर पार करण्याची अवघड कामगिरी त्यांच्यापुढे असेल आणि आणि जेव्हा-जेव्हा भारतीय संघ संकटात सापडला आहे तेव्हा लक्ष्मण त्याच्या पूर्ण क्षमतेने बचावासाठी धावल्याचा लौकिक आहे. अखेरच्या दिवशीही तो आपला हा लौकिक द्रविडच्या साथीने कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे. फक्त या दोघांसोबत सचिन, धोनी, रैना आणि जखमी गंभीर यांनीही आपला वाटा उचलण्याची आवश्‍यकता आहे.

Saturday, July 23, 2011

द्रविड कृष्ण बनून आला (लंडन डायरी)


लॉर्डसच्या खेळपट्टीने तीन दिवसांत वेगवेगळे रंग दाखवले. पहिल्या दिवशी झहीर, दुसऱ्या दिवशी पीटरसन तर तिसऱ्या दिवशी तिने ब्रॉडला सहकार्य केलं. तिचा नेमका रंग काय या बाबत अंदाज बांधणेच अवघड बनले आहे. एकीकडे ब्रॉड आणि ट्रेम्पलेटला पूर्ण सहकार्य करत असतानाच तिने द्रविडचा हातही अखेरपर्यंत मुळीच सोडला नाही. म्हणजे जो कर्तृत्व दाखवेल त्याच्या पाठीशी "ती' असंच काहीसं दृष्य गेल्या तीन दिवसांत दिसलं आणि आपल्याला क्रिकेटची पंढरी का म्हणतात ते दाखविले.
झकास ओपनींग देऊन भारतीय सायबांना चोख उत्तर देणार असं वाटत असतानाच स्टुअर्ट ब्रॉडने खेळपट्टीला स्वींगची लालूच दाखविली आणि पाहता पाहता उभा राहू पाहत असणारा डाव पुरता विस्कटला. मुकुंद अर्धशतक पूर्ण करता करता राहिला तर गंभीरला लय सापडत असताना गेला. मुकुंदच्या रुपाने कसोटीसाठी आणखी एक सलामीवीर मिळू शकेल याची चुणुक दिसली. ज्याच्या महाशतकाची वाट क्रिकेटरसिक पाहत होते त्या सचिनने सुरवात झकास केली; मात्र ब्रॉडने या मैदानावरील आधीची सर्वोच्च धावसंख्याही त्याला गाठू दिली नाही. लक्ष्मण आणि रैना मैदानावर अगदी पाहुण्यासारखे आले. उपस्थिती लावली आणि विकेटचा आहेर देऊन गेले. कर्णधार धोनीने प्रयत्न केले; पण त्याची बॅटही शांत केली गेली. एकीकडून इंग्लीश गोलंदाजांकडून जगातल्या अव्वल संघाचे वस्त्रहरण सुरू असताना क्रिकेटरसिकांनी राहुल द्रविडचा धावा सुरू केला आणि द्रविड कृष्ण बनून धावला. त्याने भारतीय संघाची अब्रू झाकण्यासाठी मैदानावर घट्ट नांगर रोवला. एक-एक धावेचे वस्त्र तो भारतीय फलंदाजीभोवती गुंडाळत राहिला आणि फालोऑनची नामुष्की टाळून त्याने संपूर्ण वस्त्रहरण रोखले. शतकी खेळी करून या मैदानावर शतक ठोकण्याचा पंधरा वर्षांचा वनवासही त्याने संपविला. सचिन मैदानात आल्यानंतर ज्या प्रमाणे त्याच्याबद्दलच्या अपेक्षांनी टाळ्या वाजल्या. त्यापेक्षा जास्त टाळ्या द्रविडने मैदानातून बाहेर जाताना घेतल्या. एक दोन अपवाद वगळा पूर्णतः निर्दोष खेळी त्याने सादर करून लॉर्डसच्या यादीत नाव कायमचे कोरले. मैदानावर तो भींतीसारखा उभा राहिला आणि या भिंतीवर ब्रॉड, ट्रेम्पलेट प्रभूतींना डोके आपटण्यास भाग पाडले. पंधरा चौकारांची नजाकत, वेळेनुरूप संयम आणि समोरील जोडीदाराला बरोबर घेऊन जाण्याची धमक त्याने दाखवून दिली. झळकलेले शतक त्याच्या नावावर लागलेच पण संघाची अ
ब्रू वाचवली हीच फार मोलाची कामगिरी ठरली. ही कामगिरी करतानाच त्याने सर्वाधीक धावांच्या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रिकी पॉंटींगला मागे टाकले. आता तो सचिनच्या धावांच्या एव्हरेस्टच्या पाठोपाठ आपले शिखर घेऊन उभा राहिला आहे.

Friday, July 22, 2011

पीटरसन पेटला (इंग्लंड डायरी)


पहिल्या दिवशी खेळ करणारा पाऊस दुसऱ्या दिवशी खुपसा शहाण्यासारखा वागला आणि नेमका त्याच वेळी झहीरखान मैदानाबाहेर राहिला. या दोन्ही बाबींचा पुरेपूर फायदा साहेबांनी विशेषतः पीटरसनने उठविला आणि भारतीय गोलंदाजीविरुद्ध धावांचा वणवा पेटवला. काल सावधपणे खेळून खेळपट्टीचा आणि भारतीय गोलंदाजीचा अंदाज घेतलेला केवीन पीटरसन आज चांगलाच पेटला. त्याने झहीरशिवाय भारतीय गोलंदाजी कशी तकलादू आहे हे दाखवून दिले. आपल्या डावात त्याने "पलटी' शॉट्‌सही अगदी लिलया खेळले. त्याने ट्रॉट आणि प्रायर यांना जोडीला घेऊन संघाची धावांची भिंत अगदी भक्कम बांधली. दिवसभरात झालेल्या 347 पैकी 180 धावा एकट्या पीटरसनने फोडून काढल्या. सामन्या दरम्यान त्याच्यात आणि प्रवीणकुमारमध्ये थोडी नोकझोंक झाली; पण त्याचा परिणाम केविनने आपल्या खेळीवर होऊ दिला नाही. उलट शतक पूर्ण केल्यानंतर आणखी आक्रमक होत द्विशतकही पूर्ण करून त्याने ऐतिहासीक कसोटीसोबत आपले नावही कायमचे कोरले. यशस्वी ठरत असलेल्या प्रवीणकुमारसह भारताच्या सर्वच गोलंदाजांना त्याच्या झळीचा चटका बसलाच. त्याने एक षटकारासह 21 चेंडू सीमापार करताना लॉर्डस्‌च्या खेळपट्टीला आपले गुलाम केले. काल झहीरच्या गोलंदाजीच्या प्रेमात पडलेली खेळपट्टी आज ऊन लागताच बदलली आणि पीटरसनवर फिदा झाली. तिने पीटरसनला पूर्णपणे साथ दिली आणि धावांचा किल्ला बांधण्यास हातभार लावला. संपूर्ण दिवसभराच्या खेळात तो दोनदाच बाद होता होता वाचला. विशेष म्हणजे या वेळी गोलंदाज होता भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी. हे दोन अपवाद वगळता पीटरसनने आपला फलंदाजीचा क्‍लास लॉर्डस्‌वर उपस्थित क्रिकेटप्रेमींपुढे पेश केला. संपूर्ण दिवसभर फलंदाजी केल्यानंतरही त्याची शरीरभाषा सकारात्मक होती. सहकारी टप्प्या टप्प्याने पॅव्हेलियनमध्ये परतत असताना. त्याने खेळपट्टीवर भ
क्कम नांगर टाकला तो अखेरपर्यंत काढलाच नाही. कर्णधार स्ट्रॉसनेही त्याच्या द्विशतकाची वाट पाहिली आणि ते पूर्ण होताच डाव घोषित केला आणि मानवंदना स्वीकारत पीटरसन दिमाखात परतला.

धोनीच्या हाती चेंडू
लंचनंतर भारतीय खेळाडू जेव्हा मैदानात उतरले तेव्हा यष्टीरक्षकाचे ग्लोव्हज द्रविडच्या हातात दिसले तेव्हा धोनी गोलंदाजी करण्याचा प्रयोग करतोय काय असा प्रश्‍न पडला आणि त्याचे उत्तर लगेचच मिळाले. लंचनंतरची पहिले षटक टाकून धोनीने सगळ्यांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. एवढ्यावरच न थांबता त्याने सलग पाच षटके टाकून आपल्या मुख्य गोलंदाजांना काहीशी विश्रांती दिली. दुसऱ्या ओव्हरमध्ये तर त्याच्या गोलंदाजीवर चेंडू पीटरसनच्या बॅटच्या जवळून द्रविडच्या ग्लोव्हजमध्ये विसावल्यानंतर बिली बॉडेन यांनी झेलबाद दिले; मात्र पीटरसनने त्याविरुद्ध रिव्ह्यू मागितला आणि तेथे तो नाबाद ठरला. धोनीने गोलंदाजीवरही हात साफ करताना आठ षटके टाकली आणि धावा दिल्या 23.

Thursday, July 21, 2011

पाऊसच जास्त खेळला! (इंग्लंड डायरी)


छायाचित्र संकेतस्थळाच्या सौजन्याने
----------------
कसोटी क्रिकेटमधील दोन हजारावी कसोटी खेळण्याचे सुवर्णपान लिहिले जात असताना वरुणराजालाही आवेग अनावर झाला आणि तो मुक्तपणे धारांतून लॉर्डस्‌वर बरसला आणि ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार बनला. दिवसभर प्रत्यक्ष क्रिकेटच्या बरोबरीने त्यानेही मैदानावर खेळ मांडून गोलंदाजांसाठी पोषक वातावरण बनविले. या पोषक वातावरणाचा फायदा उठविण्यासाठी भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकून गोलंदाजी घेतली खरी; मात्र त्याचा फायदा झहीरखान वगळता इतर कोणालाही उचलता आला नाही. अर्थात त्यांनी प्रयत्न केलेच नाहीत असे नाही; पण बिचाऱ्यांना नशिबाची साथ काही लाभली नाही. प्रवीणकुमारचे चेंडू स्विंग झाले; मात्र त्याला खेळून काढण्यात साहेबांनी यश मिळविले; तर इशांतला त्यांनी खेळविले. इशांत प्रयत्नात कोणतीही कसूर करत नाही; पण आजचा दिवस त्याचा नव्हताच. हरभजनने सुरवातीपासूनच लय पकडून जोनाथन ट्रॉटला जाळ्यात अडकवण्याचा केलेला प्रयत्न अगदी थोडक्‍यात फसला. चेंडू द्रविडच्या हाताला लागून खाली पडला. त्यावेळी हरभजन द्रविडवर आणि द्रविड स्वतःवरच जाम वैतागलेला दिसला. एक संधी हुकल्याची खंत दोघांच्या चेहऱ्यावर उमटली. दुसरीकडे पहिल्या चेंडूपासूनच उत्तम लाईन आणि लेंथ पकडलेल्या झहीरखानने लॉर्डस्‌च्या खेळपट्टीला पहिल्या काही षटकांतच वश करून घेतले मग आधी कुकला आणि नंतर नेहमीचं गिऱ्हाईक असलेल्या स्ट्रॉसला बाद करून कर्णधाराचा विश्‍वास सार्थ ठरविला. त्या वेळी भारतीय संघ पहिल्याच दिवशी मजबूत पकड घेणार अशी हवा तयार झाली; मात्र ही हवा त्यानंतर पार विरून गेली.

स्ट्रॉसचा बळी पंचविसाव्या षटकात गेला आणि त्यानंतरच्या 24 षटकांत पीटरसन आणि दोनवेळा नशिबवान ठरलेल्या ट्रॉटने भारतीय गोलंदाजांना संधीच दिली नाही आणि धावांची भरही घातली. ट्रॉटला हरभजनच्या गोलंदाजीवर द्रविडने सोडल्या
नंतर झहीरच्या गोलंदाजीवरही पहिली स्लीप आणि यष्टीरक्षक यापैकी कोणी झेल घ्यायचा या संभ्रमात चेंडू सटकला. द्रविड आणि धोनी दोघेही चेंडू पकडण्यात अपेशी ठरले. यानंतरचा खेळ मात्र पीटरसन आणि ट्रॉटनेच केला. त्यांनी पावसाळी वातावरण इंग्लंडच्या पाठीराख्यांना आणखी बोचरे होऊ नये याची काळजी घेतली आणि डाव स्थिर केल्याचे समाधान दिले. ट्रॉटने अर्धशतकी खेळी करताना दोन जीवदानांचा पुरेपूर लाभ उठविला. प्रवीणकुमार, इशांत शर्मा आणि हरभजनने जाता जाता झटका देण्याचा केलेला प्रयत्न अपुरा पडलाच. चहापानाला खेळ थांबला आणि मग पुन्हा एकदा वरुणराजाने अस्तित्व दाखवताना मनसोक्त खेळ मांडला तो मांडलाच. आता उद्या भिस्त पुन्हा एकदा झहीरवरच, पण त्याला दुखापत झालीय. रात्रीत तो तंदुरुस्त व्हावा यासाठी धोनी देव पावसात न ठेवेल तर नवल.

Wednesday, July 20, 2011

क्रिकेट युद्धाला तोंड फुटणार


आज (ता. 21) सकाळी लॉर्डस्‌च्या हिरवळीवर भारत आणि इंग्लंड संघातील खेळाडू पाय ठेवतील तेव्हा क्रिकेटच्या इतिहासातील आणखी एक सुवर्णपान लिहिलं जाईल. 2 हजाराव्या कसोटीमध्ये वर्चस्वासाठी दोन्ही संघ आमने-सामने उभे ठाकतील तेव्हा या ऐतिहासिक घटनेसोबत धोनीब्रिगेड आणि स्ट्रॉस सेना आपसुक जोडली जाईल. सायबांना त्यांच्याच घरात पराभवाचे खडे चारण्यास धोनीसेना उत्सुक असताना प्रत्यक्ष लॉर्डस्‌वर उपस्थित राहून तसेच दूरचित्रवाणीच्या माध्यमातून कोट्यवधी क्रिकेटरसिक या क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील.
15 ते 19 मार्च 1877 मध्ये पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर गेली 144 वर्षे क्रिकेटच्या मैदानावरील हा सिलसिला अखंड सुरूच आहे. या प्रवासात क्रिकेटमध्ये आमुलाग्र बदल घडला असून आणि यापुढेही घडण्याची नांदी होऊ घातली आहे. कसोटी सामने दिवस-रात्र खेळविण्याविषयी गांभीर्याने चर्चा सुरू आहे. एकदिवसीय सामन्यांमुळे कसोटी क्रिकेटची लोकप्रियता काही प्रमाणात कमी झाली असली तरी गेल्या काही वर्षांत कसोटी सामने निकाली होऊ लागल्याने पुन्हा एकदा प्रेक्षक या सामन्यांकडे वळू लागला आहे. कसोटी खेळणे म्हणजेच क्रिकेट खेळणे ही भावना अद्यापही क्रिकेटपटूंमध्ये दृढ असल्याने कसोटी क्रिकेट जिवंत राहणार हे नक्की.
भारत आणि इंग्लंड यांच्यात शंभरावी लढत होत असताना इंग्लंड भूमीवर भारतीय संघाची कामगिरी म्हणावी तशी बहरलेली नाही. पंधरा लढतींपैकी अवघी एक लढत जिंकण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला आहे, तर दहा पराभव पदरी पडलेत. तर 99 पैकी 19 लढतींमध्येच भारतीय संघ विजय मिळवू शकला आहे. इंग्लंडने 34 विजय मिळवताना 46 लढती अनिर्णित राखल्यात. सध्या भारतीय संघ कसोटी क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी आहे. कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली इतिहास बदलण्यासाठी हा संघ उत्सुक आहे; मात्र स्ट्रॉसच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाविरुद्ध त्यांच्याच मैदानावर खेळताना धोनीसेनेचा कस लागणार आहे हे नक्की.

लॉर्डसवर सचिन मोका साधणार?
ही कसोटी जशी ऐतिहासिक आहे. तसेच क्रिकेटच्या पंढरीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कारकिर्दीतील शंभरावे शतक झळकावून मणिकांचन योग साधण्यात यशस्वी होणार का, याकडेही क्रिकेटरसिकांचे लक्ष लागलेले आहे. यापूर्वी या मैदानावरील त्याची कामगिरी जरी सुमार असली तरी हा भूतकाळ पुसून हा मोका साधण्याचा प्रयत्न सचिन नक्कीच करेल अशी आशा आहे.

Thursday, July 14, 2011

तो एक पाऊस


आज दर्याचा नूर तिला नेहमीपेक्षा वेगळा जाणवत होता. जाऊ नको म्हटलं तरी त्यानं पहाटे होडी घातलीच समुद्रात. नको म्हटलं तर म्हणाला, "अगं आता तीन महिने नाहीच जायचं दर्यावर. आज मिळेल तेवढी मासळी आणतो. तेवढेच चार पैसे जादा होतील आणि दुसरं कोण नाही म्हटल्यावर मलाच जादा मासोली गावणार. तू नको काळजी करू. मी येतो सुखरूप' असं म्हणत त्यानं होडी समुद्रात लोटलीपण. पहाटेच्या अंधारानं त्याला लगेच कवेत घेतलं. होडीवरचा मिणमिणता कंदिल दिसला बराच वेळ आणि नंतर तो ही दिसेनासा झाला. तो गेला तेव्हा समुद्र अगदी शांत होता शहाण्या मुलासारखा. किनाऱ्यासोबत लाटांचा खेळ सुरू होता. फेसाळणाऱ्या लाटा तिच्या पायाला स्पर्शून जात होत्या. गाज कानाला गोड वाटत होती.
त्याचं अस्तित्वच धुसर झालं तशी ती माघारी वळून चालू लागली आणि विचारांच्या लाटा तिच्या मनात उसळू लागल्या.
"हा ऐकतच नाही माझं. तू देशील त्यामध्ये मी सुखी राहीन म्हटलं की म्हणतो, "अगं तू माझी राणी होणार. तुला अगदी फुलासारखं ठेवणार मी. पण त्यासाठी पैसे नको? नुसत्या प्रेमानं पोट नाही भरत. या चार दिवसांत वेगळी-वेगळी मासळी मिळाली तर पैसैही जास्त मिळतील आणि आपल्याला उपयोगही होईल.'
किती वेगळा आहे हा. शिकलाय चांगला, कोठेही शहरात नोकरी मिळू शकली असती, पण आई एकटी कशी राहणार म्हणून शहरात जात नाही. शेती, मच्छिमारी करतो. कोणाच्याही मदतीला हा पहिला. सगळ्या वाडीत त्याला नावाजतात. एरव्ही कोणाच्या अध्यात ना मध्यात. त्याच्या आईनं माझ्याबद्दल वडिलांना विचारलं तेव्हा आपल्या पदरात समुद्राच्या पोटात मावणार नाही एवढी खुशी पडली. अशा तरुणाबरोबर लग्न करणार या कल्पनेनेच आपण मोहरून गेलो.'
--
एकदम माडांची सळसळ वाढली आणि तिचे विचार थांबले. पाठोपाठ पावसाचे मोठे-मोठे थेंब येऊ लागले. पळत तिनं घर गाठलं. तरी ती भिजलीच. अवघ्या अर्ध्या तासात सगळा नूर पालटला. जोरदार वादळ सुरू झालं आणि जोडीला पाऊस धो धो कोसळू लागला. आता तिच्या मनातही विचारांचं वादळ थैमान घालू लागलं.
"जाऊ नको म्हटलं तरी ऐकलं नाही. आता काय करणार तो? दर्यापण खवळलेला असणार. हा घरी कसा येणार? कशा अवस्थेत असेल तो?'
तिच्या डोळ्यासमोर भर समुद्रात उधाणलेल्या लाटांसोबत झगडणारा तो दिसू लागला. हेलकावणारी होडी जीवाच्या कराराने सावरत पाण्याच्या माऱ्याला तोंड देताना त्याची होणारी दमछाक तिला दिसू लागली.
आता तिचा जीव कासावीस होऊ लागला. दोघांनी संसाराची पाहिलेली स्वप्ने तिच्या डोळ्यासमोर तरळू लागली आणि काही विपरीत घडलं तर... हा विचार येता क्षणी तिचा ठाव सुटला आणि धो-धो पावसात ती समुद्राच्या दिशेने धावत सुटली...
----
ठणकणाऱ्या डोक्‍यावर तिचा हात गेला आणि ती जागी झाली. तीन दिवसांनंतर. समोर आबा, त्याची आई आणि शेजाऱ्यांना पाहताच तिला काही कळेना. तिची नजर त्याला शोधू लागली.
"काकी तो आला का? कुठे आहे तो?'
तिच्या प्रश्‍नावर त्याच्या आईनं तोंडाला पदर लावला आणि ती मुसमुसू लागली.
म्हणजे, तो अजून आला नव्हता. कधी येणार तो? त्याला मी सांगितलं होतं जाऊ नकोस. ऐकल नाही माझं, येतो म्हणाला, काळजी करू नकोस. तो येईल, हो आत्ता. आत्ताशी सूर्य मावळतीला आला आहे. मला जायला पाहिजे. असं म्हणून ती उठू जाऊ लागली. तशी पाठीतून एक सणक आली. काकींनी तिला सावरून पुन्हा झोपवलं.

तिला आठवलं, पाऊस सुरू झाला म्हणून आपण समुद्राच्या दिशेने धावत सुटलो आणि पाण्यात शिरलो. समुद्राने आधी आत ओढून घेतलं आणि उसळलेल्या लाटेने आपल्याला पुन्हा बाहेर फेकून दिलं. त्यानंतर...
----
आज पंधरा दिवसांनंतरही भर पावसात तिचं समुद्राकाठी येणं आणि त्याची वाट पाहणं यात खंड पडलेला नव्हता. समुद्रातून त्याची होडी येतेय आणि आपण त्याच्याकडे धावतोय, हेच दृष्य सारखं तिच्या डोळ्यासमोर तरळत राही. तुफान पडणाऱ्या पावसामुळे त्याच्या शोधासाठीचे प्रयत्न बंद पडले आणि पंधरा दिवसानंतर सगळ्यांनी आशाही सोडून दिली. सगळी वाडी त्याच्याबद्दल हळहळत होती आणि हिच्या डोक्‍यावर परिणाम झालाय म्हणून कुजबुजत होती. पण, तिला त्याची कसलीच जाणीव नव्हती. ती ना सरळ जेवत होती, ना झोपत होती. संध्याकाळच्या वेळी ती समुद्राकाठी भर पावसातही फिरत राही. रात्र चढू लागली की कोणीतरी तिला घरी घेऊन जाई.
--
खोल गेलेले डोळे. नजरेत वाट पाहण्याची काठोकाठ भरलेली आर्तता. थकून गेलेलं शरीर आणि मनात फक्त तो नक्की येणार हा विश्‍वास घेऊन आजही ती किनाऱ्यावर फिरत होती. दिवस मावळला आणि ती ठरलेल्या खडकावर जाऊन त्याची वाट पहात बसली. रात्र चढू लागली. पाऊस सुरूच होता. एवढ्यात काठावर एका सावलीचा तिला भास झाला. ती निरखून पाहू लागली. देहयष्टी त्याच्या सारखीच वाटली. हळू-हळू ती आकृती पाण्यातून बाहेर आली आणि काठावर कोसळली. धप्प आवाजाने तिची तंद्री भंगली.
पायांत बळ एकटून ती उठली. हळू-हळू खडकावरून वाळूत उतरली. पडलेल्या व्यक्तीच्या दिशेने प्रचंड आशेने धावत सुटली. जवळ जाऊन त्याचा चेहरा अंधारात पाहण्याचा प्रयत्न केला. पण दाढीमुळे काहीच समजत नव्हतं. ती निराश झाली. त्याला सोडून उठली; मात्र तिच्या स्पर्शाने काहीशा भानावर आलेल्या त्या व्यक्तीच्या तोंडून तिचंच नाव बाहेर पडलं आणि... मग आनंदाश्रूंचा पाऊस अखंड कोसळू लागला...!

Thursday, June 23, 2011

'बाप' माणूस...

त्यांनी टोपी काढली, घाम पुसला. पायऱ्या चढून आल्यामुळे लागलेली धाप कमी होण्याची वाट पहात शांतपणे खुर्चीत बसून राहिले. वयाने बहुधा पासष्टी ओलांडली असावी; पण अगदी अपटुडेट होते.
"वयाच्या मानाने झेपत नाही. पायऱ्या चढल्या की धाप लागते'' स्वगत बोलावे तसे ते टेलीफोन ऑपेरटरशी बोलले. मग शांतपणे उठले. हळूहळू जाहिरात विभागात गेले.
जाहिरात घेणाऱ्याकडे पाहून ओळखीचं हसले. त्यानेही फोनवर बोलतच हसून दाद दिल्याने त्यांना जरा बरं वाटलं. त्याने आजोबांना खुर्चीकडे हात करून बसण्याची खूण केली. आजोबांनी खुर्चीवर बसून शरीर काहीसं सैलावलं आणि त्याच्या फोन संपण्याची वाट पाहू लागले.
फोन संपवून तो म्हणाला, ""बोला आजोबा. किती उन्हात आलात? काल रात्रीच नाही का यायचं? ऊन तरी लागलं नसतं''
"ठरवलं होतं यायचं, पण जमलंच नाही. आज येण्याशिवाय पर्याय नव्हता.''
मला त्यांचा संवाद ऐकू आला आणि माझं त्यांच्याकडे लक्ष गेलं. मी पाहतोय हे पाहिल्यावर ते माझ्याकडे पाहून ओळखीचं हसले. त्यांच्या नजरेत मला हरवलेपण जाणवलं. माझ्या चेहऱ्यावरील स्मित पाहून बहुधा त्यांनाही बरं वाटलं.
दोघांत काहीतरी बोलणं झालं. त्यांनी खिशातून कसलासा लिहिलेला कागद काढून त्याच्याकडे दिला. त्यानं खात्री केली आणि पैसै घेतले.
"बराय निघतो मी, पुढील आठवड्यात येणार आहेच''
"ओके, आजोबा ! बाकी कसं काय चाललंय?''
"खरं सांगू मरण येत नाही म्हणून म्हातारपणाचं ओझं जेवढे दिवस वागवता येईल तेवढे वागवतो आहे; मग जगतोच आहे, तर जास्तीत जास्त समाधानाने कसं जगता येईल ते पाहतो. रोज फिरायला जाऊन प्रकृती उत्तम राखण्यासाठी प्रयत्न करतो. दिवसभरात सोसायटीमधील लोकांची जमतील तेवढी कामं करतो. सायंकाळी लहान मुलांना घेऊन गोष्टी सांगत बालपण शोधतो. रात्री मंदिरात भजन-कीर्तनाला जातो. जेवढं म्हणून आनंदी राहता येईल तेवढा आनंदी राहतो. जगण्याची शिक्षा मिळालीच आहे तर ती आनंदानं कशी भोगता येईल हे पाहतो. बराय चलतो. फार वेळ घेतला तुमचा, येतो.'' असं म्हणून पिशवी सावरत ते दरवाजाबाहेर पडले.
त्यांचं बोलणं ऐकून मी त्याला विचारलंच कोण होते हे आजोबा आणि कशासाठी आले होते?
त्यानं जे सांगितलं ते ऐकून मी सुन्न झालो....
माझ्यासमोर आजोबांनी दिलेला फोटो धरत तो म्हणाला, "" हा फोटो पाहिलांत, हा त्यांच्या 20 वर्षांच्या मुलाचा आहे. त्याच्या श्रद्धांजलीची जाहिरात द्यायला आले होते ते. दरवर्षी येतात न चुकता''
"कशानं गेला तो?''
"इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. कॉलेजमध्ये गॅदरींग होतं. मित्रांसोबत राबून त्यानं त्याची तयारी केली. गॅदरींगच्या आदल्या दिवशी डिसेंट्री लागल्याचं निमित्त झालं आणि त्यातून तो उठलाच नाही. हाता-तोंडाशी आलेल्या लेकाचं निष्प्राण कलेवर थकलेल्या खांद्यावरून आजोबांना वहावं लागलं.''
"बाप रे, केवढा मोठा आघात!'' माझा स्वर जड झाला.
"सर ते मघाशी म्हणाले नं पुढील आठवड्यात येणार आहे, का माहित आहे?''
"का?''
"बायकोला आदरांजली वाहण्याची जाहिरात द्यायला''
"काय...?''
"हाता-तोंडाशी आलेला मुलगा गेल्याचा धक्का ती माऊली सहन नाही करू शकली. तिने अंथरूण धरलं आणि त्यातून ती उठलीच नाही. त्या दिवसापासून गेली काही वर्षे आजोबा आपल्या एका मुलीसह राहत आहेत. इतर दोन मुलींची चांगल्या घरात लग्ने झाली आहेत. घरी आहे त्या मुलीला फिट्‌सचा विकार आहे, त्यामुळे ती त्यांच्याबरोबरच राहते. दोघंच एकमेकांचे आधार.''
"काय सालं नशीब!' केवढे हे आघात आणि ते सर्व सहन करणारा पहाडासारखा बाप माणूस. अडचणींचे एवढे अडथळे येऊनही मोडून न पडता जगण्याशी दोन हात करून जगण्यावर विजय मिळविण्याचा प्रयत्न करणारा बाप माणूस... त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना माझ्या डबडबलेल्या डोळ्यांतून दोन थेंब ओघळलेच.

Sunday, June 19, 2011

बापपण अनुभवताना...

कानावर तुझा रडण्याचा पहिलावहिला ट्याहां ट्याहांचा स्वर पडला अन्‌ आनंदानं छाती गच्च भरून आली.
तुझा जन्मसोहळा सुखरूप पार पडावा म्हणून हातांची बोटे होती त्या वेळी एकवटलेली परमेश्‍वरचरणी.
दुपट्यात गुंडाळलेली मऊसुत सावरीपरी तू आलीस सामोरी खरी; मात्र तेव्हा पापण्यांवर थबकल्या थेंबांतून तू भेटलीस मला धूसर धूसर.
मला सुचलेच नाही तुला अनुभवण्याचे, ना हृदयाशी कवटाळण्याचे.
मग आलं भान जरा, इवल्याशा तुला मी धरलं
हृदयाला आणि बापपणाचा अर्थ पोचला पार मनाच्या तळाला.
तुझ्या लुकलुकत्या डोळ्यांनी, बालमुठीत एकवटलेल्या असंख्य स्वप्नांनी घातली मला साद आणि आनंदाने भरून वाहत राहिला माझा श्‍वास अन्‌ श्‍वास.

------------------------
आळसावलेलाच होता तो माझा दिवस जरा.
भोवताली तुझं रांगत-रांगत खेळणं, मध्येच येऊन पुस्तक ओढणं, मस्ती करणं आणि सुरू होतं खळाळून हास्यफुलं उधळणं.
खेळता खेळता एकवटलंस बळ आणि राहिलीस क्षणभरच पहिल्यांदाच उभी स्वतःच्या पायावर.
पाहिलंस माझ्याकडे तेव्हा डोळ्यांत तुझ्या उसळला होता आत्मविश्‍वासभरला सागर.
हसलीस छानसं गोड आणि टाकलंस पहिलं अडखळतं पाऊल.
गेला तोल तुझा, सावरलं मी तुला अलगद हातांवर.
तुझ्या चेहऱ्यावर आनंद उमटला आणि माझ्या विस्फारल्या बाहुल्यांनी साठविला तो क्षण डोळाभर.

------------------------
त्या दिवशी पोचलो पाऊसधारांना सोबत घेतच शाळेवर.
मस्त गुलाबी ड्रेस खुलला होता तुझ्या नाजुकशा अंगावर.
गोड-गोड बोलत, समजावून सांगत, कॅडबरीचं प्रॉमिस करत सोडलं तुला वर्गाच्या दारात.
बाईंनी तुला घेतलं आत आणि लावून घेतलं दार.
बंद होणाऱ्या दारांच्या फटीतून दिसली मला तुझी भरून आलेली नजर आणि जाणवली त्यामध्ये दूर जातानाची असहायता, माझ्यावर आलेला मोठ्ठा राग आणि व्यक्त न करता येणारी घुसमट. बोलत होती नजर, "बाबा, तू वाईट्ट आहेस, सोडून मला नको जाऊस...' आईशपथ सांगतो त्या नजरेनं कालवला जीव. शहारा उमटला देहभर.

------------------------
कॅलेंडरवरील तारखा राहिल्या फडफडत, अंगणातला पारिजातकही फुलत राहिला काठोकाठ.
उगवणाऱ्या प्रत्येक सोनेरी दिवसाचं बोट धरून तू आनंदाच्या किरणांनी शिंपलेस आपलं अंगण.
समाधानाचे क्षण गुंफत राहिलीस एक-एक आणि घट्ट होत गेले आपसुक सारे भावबंध.
तुझे यशाचे क्षण घेऊन आले आनंदसरींची बरसात आणि चिंब न्हात राहिलं आपलं घर.
कधी पुरवून घेतलास हट्ट, कधी रुसलीस, कधी लटक्‍यानेच रागावलीस, भांडलीसही, मोठी होऊनही "गट्टी फू' करताना तू माझ्यासाठी मात्र सानुलीच राहिलीस.
तुझ्या कर्तृत्वाने आकाश आमचे उजळले, यशाचे ते सोनभरले क्षण भरून ठेवले मनाच्या कुपीत.
वाटली जेव्हा काळजी पहिल्यांदा तुझ्याबद्दल, तेव्हा खांद्यावर हात ठेवून म्हणालीस, "पिलावर विश्‍वास नाही का तुमचा बाबा?'
गैरविश्‍वास नव्हता गं! आतून आलेले तुझ्याबद्दलचे काळजी वाहणाऱ्या बापाचे भेदरलेपण.
ते भेदरलेपण मोडताना भक्कम अस्तित्वाने तू घालत राहिलीस सतत फुंकर.
ओळखतात जेव्हा मला "तुझा बाबा' म्हणून, अभिमानाने भरलं माझं मन हिंदोळत राहतं वाऱ्याच्या लहरींवर.

------------------------
पाहू या- करू या... करत मी ढकलत राहिलो तुझ्या आयुष्यातला तो सोनेरी दिवस.
मात्र अखेर आलाच "तो क्षण', जो माहीत असूनही लपवत राहिलो स्वतःपासून आयुष्यभर.
सनई, चौघडे वाजू लागले, घर सजलं, अंगण मांगल्यानं काठोकाठ भरलं.
सनईच्या सुरावटीने भारला सारा भवताल. पळ भरले आणि आली लग्नघटिका समीप.
"शुभमंगल....' शब्द-सूर उच्चारत गेले आणि फुटणारा बांध कसा आवरू आवरू झाले.
...आठवला तुझा जन्मसोहळा, तुझा पहिला मृदू सहवास, लुकलुकणारे डोळे, तुझं पहिलं पाऊल, पहिलं यश.
आठवला तुझा मला धीर देणारा स्पर्श, मैत्रीण होऊन झेलताना लुटलेला बापपणाचा आनंद.
उभे राहिले डोळ्यांसमोर तुझ्यासोबतचे लटके रागाचे क्षण, कधी तरी चुकून उचलला गेलेला हात आणि मग कुशीत शिरून मुसमुसणाऱ्या तुला सावरताना माझ्यातला गळून पडलेला कठोर बाप.
"कन्यादानाचं पाणी सुटलं हातातून अन्‌ जाणवलं आपलं पिलू आपल्याला कायमचं दुरावलं...'
उंबरठा ओलांडण्यास निघाली अन्‌... "बाबा।।। म्हणून धावत शिरलीस आवेगाने माझ्या कुशीत...'
खरं सांगतो पोरी, तेव्हा कढ दाटल्या हृदयातलं बापपण धो धो रितं होत राहिलं अश्रूंमधून..
also on: http://72.78.249.107/esakal/20110619/5214167252538387743.htm

Thursday, June 9, 2011

पाऊसपाऊस उधाणलेला
दर्यावर स्वार झालेला!
पाऊस इंद्रधनूतला
सप्तरंगातून उमटलेला!
पाऊस छत्रीतला
थेंब-थेंब वेचलेला!
पाऊस पागोळ्यांतला
रात्रभर जागलेला!
पाऊस मनातला
तुफानाला नमविलेला!
पाऊस तुझ्या-माझ्यातला
मौनाला बोलकं केलेला!
पाऊस चिंब ओला
देह भरून मनात उतरलेला!
पाऊस तुझा, माझ्यासवे
सप्तपदी चाललेला!

Saturday, April 2, 2011

Dhonis world cup winning sixerDhoni lift this ball in the air and it goes for six at that moment crowed chiared and enjoying the crown of champion. All boyes deserved himself...they becom winner...they win all idians hearts.

Tuesday, March 29, 2011

पुन्हा आले डोळा पाणी!


"दमलेल्या बाबाची कहाणी...' हे गाणं साधारणपणे दोन वर्षांपूर्वी झालेल्या "आयुष्यावर बोलू काही'च्या पाचशेव्या भागामध्ये सलील आणि संदीप यांनी सादर केलं आणि पाहता पाहता अवघ्या मराठी मनाला "बाबा'ला वाटणारी काळजी अंगावर आली. समस्त बाबा लोकांनी त्यावेळी लपून-छपून का होईना रडली. त्यानंतर या गाण्याची पारायणं करत अनेक बाबांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. आईपुरतीच मर्यादीत राहिलेली "माया' संदीपने "बाबा'साठीही किती मोलाची आहे हे शब्दबद्ध केले आणि बाबा लोक भावनांना वाट मोकळी करून देऊ लागले. पहिल्यांदा झालेल्या या कार्यक्रमात ही कविता ऐकताना घराघरांतून बाबा लोक आपल्या लेकीसह रडले. बाबा आणि मुलीमधील असलेल्या नाजूक नात्यातला ओलावा, जिव्हाळा, माया, काळजी सगळं सगळं अगदी थेटपणे समोर आलं आणि काळजाला भिडलं. संदीपने लिहिलं अप्रतिम पण त्या जोडीला दोघांनी ते सादरही केलं अप्रतिम.
दोन वर्षानंतर जेव्हा "आयुष्यावर बोलू काही'चा भाग "साम'मराठीवरून 30 तारखेला प्रक्षेपीत झाला तेव्हाही दोन वर्षांपूर्वीचाच अनुभव अनेकांना आला. गाणं संपताना गालावरून ओघळलेल्या अश्रूंनी सलील-संदीपला दाद दिली. (गेल्या वर्षभरात अनेकांनी तो अनेकदा घेतला. हे गाणं म्हणजे त्यांच्या भावना मोकळ्या करण्याचं जणू साधनच बनलं) सातशेव्या भागातही दोघांनी ही कविता सादर करताना तेवढ्याच आर्तपणे सादर केली आणि उपस्थितांना पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडलं, हे त्यांच्या सादरीकरणाचं शंभरनंबरी यश.
एवढ्या तेवढ्या कारणांनी वाद घालणारे, रुसवा धरणारे, इगो कुरवाळत आपल्या हाताशी असलेले सुंदर क्षण गमावणारे आपण किती करंटे आहोत. हे पुन्हा एकदा ही कविता ऐकताना जाणीव झाली. म्हणजे पहा..."लग्न ठरल्यावर कसे होईल...' या कल्पनेनं डोळ्यांच्या कडा भरून येतात आणि जवळ असताना आपण त्याची फारशी फिकीर करत नाही हा विरोधाभास आपण जपत राहतो. म्हणूनच मग संदीप-सलीलला मनापासून दाद द्यावी वाटते. त्यांच्यामुळे कोठेतरी माणूसपण जागं राहतं. काही क्षण का होईना आपल्याच प्रतिरुपासाठी डोळे ओलावतात. तिच्या भविष्याच्या काळजीने मन भरून येतं. काही क्षण काही होईना "मी' विसरतो, इगो बाजूला राहतो, प्रत्येकातील "बाबा' हुरहुरतो.

Monday, February 14, 2011

अखेरचा डाव!

बेल वाजली तिनं दार उघडलं ! धाप आवरत तो घरात आला. तिनं पटकन आत जाऊन पाण्याचा ग्लास आणला.
"तो' पाणी पित असताना तिनं खुणेनंच चहाविषयी विचारलं! त्यानं होकारार्थी मान हलविली.
आता त्याची धापही थांबली! त्यानं शर्ट काढला. तिथंच खुर्चीवर टाकला. त्याच खुर्चीवर रेलून पाय लांबविले आणि "ऐ मेरी जोहराजबी तुझे मालूम नही...' ची मस्त शीळ देत डोळे मिटले.
चहा घेतोस नं!
तिच्या हाकेनं तो भानावर आला. त्यानं कप घेतला आणि चहाचे घोट घेऊ लागला.
ती समोरच्या खुर्चीवर बसून चहा घेऊ लागली आणि त्याच्या "हॅपी मूड'मुळे सुखावली.
आजारपणामुळे त्याचं हास्य विरलंय हे तिला माहित होतं, त्यामुळेच त्याचा आजचा मूड पाहून तिला बरं वाटलं.
न राहवून तिनं विचारलंच,""आज एकदम मूड चेंज, काय भानगड?'
""ह्या, भानगड-बिनगड काहीही नाही! असंच! बरं पटकन आवर. बाहेर जायचंय. किशोरीच्या कार्यक्रमाची दोन तिकिटं आणलीत!''
तिच्या परवानगीची वाट न पाहता तो उठून आवरू लागला!
क्षणभर तिला काही कळेचना. तिनंही झटपट आवरलं! त्याला आवडणारी गुलाबी रंगाची साडी नेसून ती तयार झाली.
तिला पाहताच पुन्हा एकदा त्याच्या ओठांवर "ए मेरी जोहराजबी...'ची शीळ आलीच.
"चलायचं!
दोघेही रस्त्यावर आले. नेहमीप्रमाणे तिची पावलं बसस्टॉपकडे वळली, तोच "टॅक्‍सी' या त्याच्या हाकाऱ्याने ती उडालीच. आज टॅक्‍सी!
दोघे टॅक्‍सीत बसले! तिला आज तो नेहमीपेक्षा वेगळा-वेगळा भासला! आज त्याचा मूड एकदम कसा काय बदलला?
थिएटरच्या गेटसमोर टॅक्‍सी उभी राहिली आणि तिची विचारांची श्रृंखला खंडित झाली.
त्यानं टॅक्‍सीवाल्याला पैसे दिले. तिच्या हातात कार्यक्रमाची तिकिटे देऊन तिला पुढे जाण्यास सांगितले.
तिकिटं घेऊन ती अँपी थिएटरच्या पाठीमागील बाजूस गेली. समोर उभ्या स्वयंसेवकाच्या हातात तिकिटं दिली आणि बसण्याची जागा विचारली!
त्यानं तिकिटं हातात घेतली आणि मागून येण्याविषयी खुणावलं! ती पाठोपाठ चालू लागली. "किशोरी' मंचावर जेथे बसणार त्याच्या बरोबर समोर भारतीय बैठकीकडे त्या स्वयंसेवकाने खूण केली! काहीशी अवघडून ती त्या बैठकीवर जाऊ बसली! आत्तापर्यंतचे पाहिलेले सर्व कार्यक्रम थिएटरच्या शेवटच्या कोपऱ्यात बसूनच पाहिलेले असल्याने एकदम पहिल्या रांगेत जाऊन बसणे ही कल्पनाच ती करू शकत नव्हती आणि आत्ता तर खास बैठकीवर. तिचं लक्ष तिकिटांकडे गेलं. पहिल्या रांगेतील खास तिकिटे होती.
एवढ्यात तो ही आलाच!
""जरा तिकडं बघतेस!' असं म्हणून त्यानं तिच्या केसांत मोगऱ्याचा गजरा माळला.''
अपूर्वाईने मोहरलेल्या तिच्या श्‍वासांत मोगऱ्याचा गंध काठोकाठ भरला! ती त्याच्या चेहऱ्याकडे एकटक पाहू लागली.
तिची नजर चुकवत तो कार्यक्रम सुरू होण्याची वाट पाहू लागला!
तब्बलजीने तबला ठीक केला, तानपुऱ्यावरील मुलीनं तारांना ताण दिला. सतारीचे स्वर ठीक केले गेले आणि त्याच वेळी किशोरी मंचावर आल्या...
स्वरांच्या एकेक लडी उलगडल्या आणि मैफलीत रंग भरू लागला.
"जाईन विचारीत रानफुला...' किशोरींनी सुरू केलं आणि... वाह।।। च्या उत्स्फूर्त प्रतक्रिया उमटल्या!
त्यानंही तशीच दाद दिली. तल्लीन होऊन किशोरी ऐकत असताना त्यानं तिचा हात हातात घेतला आणि त्याच्या स्पर्शाचं गाणं तिच्याभोवती फेर धरून नाचू लागलं!
ती गाणं विसरली. भूतकाळात गेली. पाच वर्षांपूर्वी अखेरच्या स्टेजच्या कॅन्सरशी झगडत असताना "तो' आयुष्यात आला!
ंसह घरातील सर्वांनी जेव्हा आपल्याला दूर लोटलं तेव्हा त्याने आधार दिला. जगण्याची उमेद जागवली. वर्षभर सेवा केली! मरण लांबवलं! सहवासानं ओढ वाढली!
एक दिवस चहाला म्हणून रेस्टॉरंटमध्ये गेलो, तेथे लग्नाविषयी विचारलं! स्वतःविषयी सांगितलं! दोन मुलं अमेरिकेत! त्यांना बापाची गरज नाही. नातवंडांसाठी आजोबा अनोळखी. पत्नी दहा वर्षांपूर्वीच गेली! घरी एकटाच राहतो. कॅन्सरग्रस्तांच्या रुग्णालयात सेवाभावी वृत्तीनं काम करतो आणि आता आधाराची गरज आहे.
"नाही म्हणूच शकले नाही!'
सहजीवन नव्याने सुरू झालं. सुखाचे दिवस आल्याचं वाटत असताना "त्याला'ही ब्रेन ट्यूमर असल्याचं समजलं आणि आशेच्या पालवीने नव्याने फुललेल्या झाडाला दुःखाची वाळवी लागली! गेले वर्षभर दोघेही एकमेकांच्या आधाराने जगत अखेरच्या दिवसाची वाट पाहत असताना... आज अचानक?
टाळ्यांचा गजर झाला आणि तिची विचारमालिका भंगली.
दोघेही उठले...बाहेर आले...
त्यांच्या आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये जेवले! तेथून बाहेर पडले आणि चालत चालत नदीकाठी आले.
नेहमीप्रमाणे अनेक जोड्या बसलेल्या.
दोघेही एका ठिकाणी बसले... बराच वेळ कोणीच काही बोलले नाही!
पाण्यावर उमटणाऱ्या तरंगावर चांदणप्रकाशाचा खेळ रंगलेला.
तिनं मौनाला बोलतं केलं!
"काय विशेष? स्वारी आज एकदम वेगळ्या मूडमध्ये...घरात शीळ घालून गाणं काय?, येताना टॅक्‍सी, मग "किशोरी' तीही पहिल्या रांगेत बसून...गजरा...रेस्टॉरंट आणि आता इथे... काय दोघांच्या मरणाची तारीख समजली की काय?
तो काहीच बोलला नाही! फक्त नदीकडे पाहत राहिला!
"बोल ना काही तरी! नाही तर जाऊ या घरी' म्हणून ती उठू लागली!
आता त्याचं मौन सुटलं! तो आश्‍वासक हसला!
हसतोस काय? आपण अवघ्या काही दिवसांचे पाहुणे आहोत हे विसरलास काय?
काहीही विसरलो नाही! असं म्हणत त्यानं शर्टाच्या आतून छानसा गुलाब आणि पाकीट काढलं आणि तिच्या हाती दिलं, म्हणाला, "हॅपी व्हॅलेंटाईन!'
आता तिला दिवसभराच्या त्याच्या वागण्याचा अर्थ उमगला! तिचे डोळे भरले! जाता जाताही तो आपल्याला आनंदाचे क्षण देतोच आहे! तिच्या तोंडून हुंदका बाहेर पडला!
बराच वेळ रडल्यानंतर तिनं डोळे पुसले आणि पाकीट फोडून पाहिले.
कसली तिकिटं आहेत?
"पुढच्या आठवड्यात आपण लंडनला जातोय!'
"कशाला?'
"दोघांवरही शस्त्रक्रिया करायची आहे. दोघांचेही कॅन्सर शेवटच्या स्टेजला असले तरी होप्स आहेत! मग निदान जाता जाता दोघांसाठी एक डाव खेळून बघायला काय हरकत आहे! त्याचीच ही गिफ्ट! हॅपी व्हॅलेंटाईन!
त्यानंतर दोघे कितीतरी वेळ भविष्याविषयी बोलत राहिले!