Friday, July 22, 2011
पीटरसन पेटला (इंग्लंड डायरी)
पहिल्या दिवशी खेळ करणारा पाऊस दुसऱ्या दिवशी खुपसा शहाण्यासारखा वागला आणि नेमका त्याच वेळी झहीरखान मैदानाबाहेर राहिला. या दोन्ही बाबींचा पुरेपूर फायदा साहेबांनी विशेषतः पीटरसनने उठविला आणि भारतीय गोलंदाजीविरुद्ध धावांचा वणवा पेटवला. काल सावधपणे खेळून खेळपट्टीचा आणि भारतीय गोलंदाजीचा अंदाज घेतलेला केवीन पीटरसन आज चांगलाच पेटला. त्याने झहीरशिवाय भारतीय गोलंदाजी कशी तकलादू आहे हे दाखवून दिले. आपल्या डावात त्याने "पलटी' शॉट्सही अगदी लिलया खेळले. त्याने ट्रॉट आणि प्रायर यांना जोडीला घेऊन संघाची धावांची भिंत अगदी भक्कम बांधली. दिवसभरात झालेल्या 347 पैकी 180 धावा एकट्या पीटरसनने फोडून काढल्या. सामन्या दरम्यान त्याच्यात आणि प्रवीणकुमारमध्ये थोडी नोकझोंक झाली; पण त्याचा परिणाम केविनने आपल्या खेळीवर होऊ दिला नाही. उलट शतक पूर्ण केल्यानंतर आणखी आक्रमक होत द्विशतकही पूर्ण करून त्याने ऐतिहासीक कसोटीसोबत आपले नावही कायमचे कोरले. यशस्वी ठरत असलेल्या प्रवीणकुमारसह भारताच्या सर्वच गोलंदाजांना त्याच्या झळीचा चटका बसलाच. त्याने एक षटकारासह 21 चेंडू सीमापार करताना लॉर्डस्च्या खेळपट्टीला आपले गुलाम केले. काल झहीरच्या गोलंदाजीच्या प्रेमात पडलेली खेळपट्टी आज ऊन लागताच बदलली आणि पीटरसनवर फिदा झाली. तिने पीटरसनला पूर्णपणे साथ दिली आणि धावांचा किल्ला बांधण्यास हातभार लावला. संपूर्ण दिवसभराच्या खेळात तो दोनदाच बाद होता होता वाचला. विशेष म्हणजे या वेळी गोलंदाज होता भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी. हे दोन अपवाद वगळता पीटरसनने आपला फलंदाजीचा क्लास लॉर्डस्वर उपस्थित क्रिकेटप्रेमींपुढे पेश केला. संपूर्ण दिवसभर फलंदाजी केल्यानंतरही त्याची शरीरभाषा सकारात्मक होती. सहकारी टप्प्या टप्प्याने पॅव्हेलियनमध्ये परतत असताना. त्याने खेळपट्टीवर भ
क्कम नांगर टाकला तो अखेरपर्यंत काढलाच नाही. कर्णधार स्ट्रॉसनेही त्याच्या द्विशतकाची वाट पाहिली आणि ते पूर्ण होताच डाव घोषित केला आणि मानवंदना स्वीकारत पीटरसन दिमाखात परतला.
धोनीच्या हाती चेंडू
लंचनंतर भारतीय खेळाडू जेव्हा मैदानात उतरले तेव्हा यष्टीरक्षकाचे ग्लोव्हज द्रविडच्या हातात दिसले तेव्हा धोनी गोलंदाजी करण्याचा प्रयोग करतोय काय असा प्रश्न पडला आणि त्याचे उत्तर लगेचच मिळाले. लंचनंतरची पहिले षटक टाकून धोनीने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. एवढ्यावरच न थांबता त्याने सलग पाच षटके टाकून आपल्या मुख्य गोलंदाजांना काहीशी विश्रांती दिली. दुसऱ्या ओव्हरमध्ये तर त्याच्या गोलंदाजीवर चेंडू पीटरसनच्या बॅटच्या जवळून द्रविडच्या ग्लोव्हजमध्ये विसावल्यानंतर बिली बॉडेन यांनी झेलबाद दिले; मात्र पीटरसनने त्याविरुद्ध रिव्ह्यू मागितला आणि तेथे तो नाबाद ठरला. धोनीने गोलंदाजीवरही हात साफ करताना आठ षटके टाकली आणि धावा दिल्या 23.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment