Thursday, July 21, 2011
पाऊसच जास्त खेळला! (इंग्लंड डायरी)
छायाचित्र संकेतस्थळाच्या सौजन्याने
----------------
कसोटी क्रिकेटमधील दोन हजारावी कसोटी खेळण्याचे सुवर्णपान लिहिले जात असताना वरुणराजालाही आवेग अनावर झाला आणि तो मुक्तपणे धारांतून लॉर्डस्वर बरसला आणि ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार बनला. दिवसभर प्रत्यक्ष क्रिकेटच्या बरोबरीने त्यानेही मैदानावर खेळ मांडून गोलंदाजांसाठी पोषक वातावरण बनविले. या पोषक वातावरणाचा फायदा उठविण्यासाठी भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकून गोलंदाजी घेतली खरी; मात्र त्याचा फायदा झहीरखान वगळता इतर कोणालाही उचलता आला नाही. अर्थात त्यांनी प्रयत्न केलेच नाहीत असे नाही; पण बिचाऱ्यांना नशिबाची साथ काही लाभली नाही. प्रवीणकुमारचे चेंडू स्विंग झाले; मात्र त्याला खेळून काढण्यात साहेबांनी यश मिळविले; तर इशांतला त्यांनी खेळविले. इशांत प्रयत्नात कोणतीही कसूर करत नाही; पण आजचा दिवस त्याचा नव्हताच. हरभजनने सुरवातीपासूनच लय पकडून जोनाथन ट्रॉटला जाळ्यात अडकवण्याचा केलेला प्रयत्न अगदी थोडक्यात फसला. चेंडू द्रविडच्या हाताला लागून खाली पडला. त्यावेळी हरभजन द्रविडवर आणि द्रविड स्वतःवरच जाम वैतागलेला दिसला. एक संधी हुकल्याची खंत दोघांच्या चेहऱ्यावर उमटली. दुसरीकडे पहिल्या चेंडूपासूनच उत्तम लाईन आणि लेंथ पकडलेल्या झहीरखानने लॉर्डस्च्या खेळपट्टीला पहिल्या काही षटकांतच वश करून घेतले मग आधी कुकला आणि नंतर नेहमीचं गिऱ्हाईक असलेल्या स्ट्रॉसला बाद करून कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरविला. त्या वेळी भारतीय संघ पहिल्याच दिवशी मजबूत पकड घेणार अशी हवा तयार झाली; मात्र ही हवा त्यानंतर पार विरून गेली.
स्ट्रॉसचा बळी पंचविसाव्या षटकात गेला आणि त्यानंतरच्या 24 षटकांत पीटरसन आणि दोनवेळा नशिबवान ठरलेल्या ट्रॉटने भारतीय गोलंदाजांना संधीच दिली नाही आणि धावांची भरही घातली. ट्रॉटला हरभजनच्या गोलंदाजीवर द्रविडने सोडल्या
नंतर झहीरच्या गोलंदाजीवरही पहिली स्लीप आणि यष्टीरक्षक यापैकी कोणी झेल घ्यायचा या संभ्रमात चेंडू सटकला. द्रविड आणि धोनी दोघेही चेंडू पकडण्यात अपेशी ठरले. यानंतरचा खेळ मात्र पीटरसन आणि ट्रॉटनेच केला. त्यांनी पावसाळी वातावरण इंग्लंडच्या पाठीराख्यांना आणखी बोचरे होऊ नये याची काळजी घेतली आणि डाव स्थिर केल्याचे समाधान दिले. ट्रॉटने अर्धशतकी खेळी करताना दोन जीवदानांचा पुरेपूर लाभ उठविला. प्रवीणकुमार, इशांत शर्मा आणि हरभजनने जाता जाता झटका देण्याचा केलेला प्रयत्न अपुरा पडलाच. चहापानाला खेळ थांबला आणि मग पुन्हा एकदा वरुणराजाने अस्तित्व दाखवताना मनसोक्त खेळ मांडला तो मांडलाच. आता उद्या भिस्त पुन्हा एकदा झहीरवरच, पण त्याला दुखापत झालीय. रात्रीत तो तंदुरुस्त व्हावा यासाठी धोनी देव पावसात न ठेवेल तर नवल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment