Thursday, November 11, 2010

मोगरा फुलला


टेरेसचा दरवाजा उघडून सवयीप्रमाणे दूरवर दिसणाऱ्या पन्हाळ्याच्या डोंगररांगेकडे पाहिले तर धुक्‍याच्या पडद्याआड ती हरवून गेलेली; पण वातावरण एकमद मस्त. माझ्याभोवतीही धुक्‍याचे काही कण रेंगाळत-रेंगाळत पुढे चाललेले. त्याच्या स्नेहार्द स्पर्शाने सकाळ आणखीनच प्रसन्न झाली. नेमका हाच मोका साधून मोगऱ्याच्या हळूवार गंधाने नाकाशी येऊन साद घातली. डोळे आपोआप वळले मोगऱ्याच्या कुंडीकडे तर हिरव्याकंच पानांच्या पार्श्‍वभूमीवर पांढऱ्या शुभ्र शलाका उमटून आलेल्या. वाऱ्याच्या मंद झुळकीशी मस्तपैकी खेळत असलेल्या. पाच टप्पोऱ्या शलाका.
वर्षभरापूर्वी लावलेला मोगरीचा वेल त्याच्या वकुबानुसार फुलला. माझे प्रयत्न सुरूच होते; पण या वेलीचं वैशिष्ट्य असं की हिला नवी फांदी फुटली की पहिल्यांदा त्यावर कळी डोले आणि मगच फांदी वाढे. बरं कुंडीतली वेल ती कितीशी वाढणार? तिला फारसं बाळसं नाही; मात्र असलेल्या चार पाच छोट्याश्‍या फांद्यांवरही सातत्याने फुले उमललीच. परवा मात्र या वेलीनं एकाच दिवशी चक्क ओंजळभर फुलांचं दान आम्हाला दिलं; मग मात्र मोह आवरला नाही. आमच्या मित्रवर्यांना आमंत्रित करून छानसं फोटो सेशन उरकलं. (आमचं त्याबाबतीतल ज्ञान जरा तुटपुंजंच आहे) आमच्या कुटुंबानेही त्यादिवशी समजुतदारपणा दाखवताना या फुलांचा वेलीवरच डोलण्याचा आनंद मुळीच हिरावून घेतला नाही, त्यामुळे संपूर्ण दिवस या शुभ्र शलाकांच्या सुगंधाने घराचा परिसर भरून राहिला.

Thursday, November 4, 2010

स्वागतिका


आश्‍विन महिन्याला सोबतीला घेऊन धुक्‍यासोबत हातात हात घालून थंडीचे आगमन होतं आणि पांढुरक्‍या धुक्‍याची दुलई साऱ्या सृष्टीवर अलगद पांघरली जाते. सारे चराचर दबबिंदूंचे कण टिपून घेण्यासाठी उतावीळ असते. पाऊस पिलेला निसर्गही थंडीचे अमृत पिण्यासाठी आसुसलेला असतो. खळ्यावरून घराच्या अंगणात आलेल्या समृद्धीच्या सोन्यामुळे बळिराजाही मनोमन आनंदलेला असतो. नोकरदारांच्या हातात खुळखुळणारा ज्यादाचा पैसा सुखाची सोबत करतो. मनामनांचे गाभारे आनंदाच्या दीपोत्सवाने उजळून निघालेले असतात. नव्या नवलाईमुळे घराघरांतून आनंदाचे दीप प्रकाशमान होऊन सुखाच्या रेशीमलडी उलगडतात. हे रेशीम आणखी चमकदार बनविण्यासाठी दिवाळी येते. अशा वेळी पहाटे गाणं कानावर पडतं ...
उठी श्रीरामा पहाट झाली...
पूर्व दिशा उजळली...
उभी घेऊनी कलश दुधाचा
कौसल्या माऊली!
आणि दिवाळीची जाणीव भोवती रुंजी घालू लागते. भल्या पहाटे काकणभरले हात अंगणावरून फिरू लागतात आणि पाहता-पाहता सारे अंगण सजीव होतं, आपल्याशी बोलू लागतं. सारवलेल्या, स्वच्छ अंगणात किणकिण नाद येऊ लागतो आणि एक-एक नक्षी उमटून येऊ लागते. बोटांच्या चिमटीतून लोभस, गहिरे, मनाचा ठाव घेणारे, रंगबिरंगी रंग एकापाठोपाठ एक धरतीशी नातं जोडू लागतात आणि नक्षीची सुरेल मैफल आकार घेऊ लागते. त्या किणकिणणाऱ्या हातांची नजाकतभरी हालचाल एखाद्या चतुरस्त्र चित्रकाराची आठवण करून देतात. (तशी रांगोळी रेखणारी "ती' यजमानांच्या आयुष्यात रंग भरणारी चित्रकारच असते) रांगोळीची शुभचिन्हे गंधभरल्या अंगणावर झर-झर उतरतात आणि सारा माहौल बदलून जातो. कधी हा माहौल ठिपक्‍यांतून बोलतो, तर कधी त्यातील नक्षी तुमच्यासोबत संवादाचा पूल बांधते. कित्येक ठिकाणी फुलांच्या पाकळ्याही सोबतीला येऊन रांगोळीची श्रीमंती अधिक वाढवितात. दिवाळीसाठी घरोघरी येणारी लक्ष्मी अंगणातून प्रसन्न होऊन यावी आणि आपल्या घरीच तिने राहावे, या साठीची ही तयारी.
गारगोटीच्या चुऱ्यापासून बनविलेली पांढरीशुभ्र रांगोळी आणि रंगांची सोबत यांमुळे रांगोळी रेखलेले अंगण, येणाऱ्या प्रत्येकाशी आपसुक संवाद साधते. एरव्ही देव्हारा, तुळशीवृंदावन, जेवणाच्या ताटाभोवती रेखली जाणारी रांगोळी ऐन दिवाळीत मात्र साऱ्या अंगणाची आणि घराची शोभा अगदी काठोकाठ वाढवतं. रंगांच्या या ओळी पवित्रतेचे प्रतीक मानल्या जातात आणि म्हणूनच त्या घराघरांत रेखल्या जातात. सारं अंगण सजिव करून टाकणारी ही रांगोळी असते फक्त गारगोटीचा चुरा पण ती रेखतानाची भावना चैतन्य निर्माण करते. ही रांगोळी बंगालमध्येअल्पना म्हणून, बिहारमध्ये ती अरिपना म्हणून, राजस्थानात मांडना म्हणून, तर दक्षिण भारतात ती कोलाम म्हणून भेटते. केरळात ती पाकल्लम म्हणून समोर येते. महाराष्ट्राशिवाय इतरत्र रांगोळीसाठी तांदळाचे पीठ, फुले, फुलांच्या पाकळ्या, विटकरीचे तुकडे, नैसर्गिक रंग यांचाही उपयोग करतात; तर दक्षिणेत फुलांचा उपयोगाने रांगोळ्यांच्या पायघड्या, गालीचे अंथरले जातात; मात्र गारगोटीचा चुरा आणि रंग हे मात्र कॉमनच.
चिमटीतून सारं भावविश्‍व साकारण्याची किमया साधणारी रांगोळी मनांचा ठाव घेते आणि समृद्धीचा आनंदोत्सव साजरा करण्याचा पवित्र भाव साऱ्या अंगणभर मिरवते, सारा भवताला आनंदी, पवित्र बनवून स्वागतिका बनते.