Thursday, November 11, 2010

मोगरा फुलला


टेरेसचा दरवाजा उघडून सवयीप्रमाणे दूरवर दिसणाऱ्या पन्हाळ्याच्या डोंगररांगेकडे पाहिले तर धुक्‍याच्या पडद्याआड ती हरवून गेलेली; पण वातावरण एकमद मस्त. माझ्याभोवतीही धुक्‍याचे काही कण रेंगाळत-रेंगाळत पुढे चाललेले. त्याच्या स्नेहार्द स्पर्शाने सकाळ आणखीनच प्रसन्न झाली. नेमका हाच मोका साधून मोगऱ्याच्या हळूवार गंधाने नाकाशी येऊन साद घातली. डोळे आपोआप वळले मोगऱ्याच्या कुंडीकडे तर हिरव्याकंच पानांच्या पार्श्‍वभूमीवर पांढऱ्या शुभ्र शलाका उमटून आलेल्या. वाऱ्याच्या मंद झुळकीशी मस्तपैकी खेळत असलेल्या. पाच टप्पोऱ्या शलाका.
वर्षभरापूर्वी लावलेला मोगरीचा वेल त्याच्या वकुबानुसार फुलला. माझे प्रयत्न सुरूच होते; पण या वेलीचं वैशिष्ट्य असं की हिला नवी फांदी फुटली की पहिल्यांदा त्यावर कळी डोले आणि मगच फांदी वाढे. बरं कुंडीतली वेल ती कितीशी वाढणार? तिला फारसं बाळसं नाही; मात्र असलेल्या चार पाच छोट्याश्‍या फांद्यांवरही सातत्याने फुले उमललीच. परवा मात्र या वेलीनं एकाच दिवशी चक्क ओंजळभर फुलांचं दान आम्हाला दिलं; मग मात्र मोह आवरला नाही. आमच्या मित्रवर्यांना आमंत्रित करून छानसं फोटो सेशन उरकलं. (आमचं त्याबाबतीतल ज्ञान जरा तुटपुंजंच आहे) आमच्या कुटुंबानेही त्यादिवशी समजुतदारपणा दाखवताना या फुलांचा वेलीवरच डोलण्याचा आनंद मुळीच हिरावून घेतला नाही, त्यामुळे संपूर्ण दिवस या शुभ्र शलाकांच्या सुगंधाने घराचा परिसर भरून राहिला.

2 comments:

भानस said...

prajakta, आजची सकाळ तू सुंगधित केलीस रे. त्या सुंदर शुभ्र मोगर्‍याचा गंध मनाला पुलकित करून गेलाय. अनेक धन्यवाद.

( मी मायदेशात होते तुझी पोस्ट आली तेव्हां त्यामुळे या आनंदाला इतके दिवस मुकल्याची हुरहुर लागली बघ... )

prajkta said...

thank u....he zad agdi chotese aahe pan phule lagli ki sagla bhawtal sugandhi howoon jato.