खरे तर सुरवातीला प्रिय असे लिहिले नाही म्हणून कदाचित तू थोडी खट्टू झाली असशील; पण एकदा सखी म्हटल्यावर त्याला पुन्हा आणखी कोणती विशेषणे लावायची गरज आहे का? निदान मला तरी तसे नाही वाटले. आता तू म्हणशील आजच हे अचानक पत्र वगैरे काय? पण खरे सांगू कित्येकदा तू सोबत असलीस की मनाच्या खोलवर जे काही सुरू असतं ते ओठांवर येतच नाही...तळ नुसताच ढवळत राहतो आणि फक्त मनावर तरंग उमटत राहतात. व्यक्त होतंच नाही. नेमके जे बोलायचे असते ते बोलणे होतच नाही... म्हणून म्हटलं शब्दांना सोबतीला घ्यावं. निदान ढवळलेल्या तळातून जे जे म्हणून बाहेर पडेल त्याचे तरंग नुसतेच मनावर उमटत राहण्यापेक्षा कागदावर साठवून तुझ्यापुढे मांडता येतं का पहावं...म्हणून हा खटाटोप.
---
असो...हे असे होते...तुझ्यासोबत नुसते बोलाचये म्हंटले की "सेंटी' व्हायला होतं...तू म्हणतेस मला फार "सेंटी' होत नको जावू म्हणून; पण काय करणार...जित्याची खोड.....
झाला आला राग...माझं हे असं बोलणं तुला नक्की आवडलं नाही...तुझ्या चेहऱ्यावर नाराजीची एक रेषा उमटलीच. माफ करो...मरणाची भाषा नाही करणार. पण कित्येकदा सत्य असंच सांगावं लागतं.
---------
खरे सांगू तुझ्याप्रति मनापासून आभार व्यक्त करण्यासाठी हा पत्रप्रपंच मांडला आहे. आता आभार कशासाठी? असा प्रश्न करू नकोस...तसे केलेस तर कित्येक बोलायच्या गोष्टी राहून जातील... पुन्हा फक्त तळ ढवळला जावून तरंग उमटत राहतील.
--
खरे तर तुझे नी माझे नाते काय कसे हे प्रश्न फिजूल आहेत ते मनाशी जुळलेत. तू मला नेहमी म्हणायचीस...मन साफ हवं...मोठं हवं...समजून घेणारं हवं...जाणून घेणारं हवं...दुसऱ्याच्या मनाचा ठाव घेता यायला हवां...दुसऱ्याच्या मनातील कालवाकालव आपल्या मनापर्यंत भिडली पाहिजे...बिनधास्तपणे मनात डोकावता आले पाहिजे...तेथे कसलाही पण...परंतु...येता उपयोगी नाही. तेथे कसलेही वयाचे बंध नाही की कसला भेद नाही.
खरे तर तुझ्या याच लॉजिकने माझ्या मनाची तार कोठे तरी झेडली गेली. आपणही याच वाटेचे मुसाफिर आहोत काय? असा स्वतःलाच प्रश्न विचारला. उत्तर होकारार्थी आले पण त्याचसोबत आणखी एका प्रश्नाने फेर धरला...आपल्यासाठी अशी समोरची व्यक्ती कोण? आणि उगाचच वाटले तूच तर ती नव्हेस ना? आणि तू सखी बनलीस...सखी दोनंच अक्षरं पण किती अर्थ भरलाय ना त्यात. तू म्हणशील चल काहीतरीच तुझं....पण खरं सांगू त्यामुळेच अद्यापही तुझ्या मनाचा थांग मला लागलेला नाही किती प्रयत्न करूनही. तुझे प्रत्येकवेळचे रुपच वेगळे. त्या रुपांनाही मनात बांधू पाहिले पण तेही जमले नाही. एक निर्विवाद सत्य...तू अथांग आहेस आणि माझ्या आयुष्याला व्यापून राहिलेली आहेस. किती आश्वासक आहे तुझे माझ्यासोबत असणं...
तुला कितीतरी वेळा विचारलंय "तू इतकी चांगली का आहेस' आणि त्याच्या उत्तरादाखल तुझे फक्त स्मित. हे कोडे काही सुटत नाही आणि मग पुन्हा नव्याने मी तुला उलघडायला घेतो आणि मी छोटा छोटा होत जातो; खरं सांगू पुरुषी अहंकारालाही हे छोटं होणं मनापासून आवडून गेलंय कारण त्यातूनच तर मला सावरणारं जोडलं गेलंय. (स्वार्थच बघ...तू देत राहतेस असेही)
----
तर मूळ मुद्यावर येतो. तुझं माझ्या आयुष्यातलं असणं...किती महत्त्वाचे हे मला सांगायंचंय तुला...
प्रत्येकाला वाटतं आपल्याला सावरणारं...आवरणारं कोणीतरी असावं. तसंच मला वाटलं आणि तू भेटलीस आणि मला मनापासून व्यक्त होण्यासाठी हक्काचे ठिकाण मिळाले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे "मी जसा आहे तसां' मला तू स्वीकारलंस...लटकी तक्रार जरूर केलीस...करतेस...पण सतत सोबत राहून सावरत राहतेस... हे सावरणंच तर जगणं सुसह्य करतं...समजुतदार असणं याला वयाचं बंधन नसतं हे तुझ्यामुळेच मला समजलं...आणि तेच मनाला भावलं. व्यक्त होण्याला ठिकाण गवसलं...तू सतत तुझा कान मला दिलास... मला ऐकत राहिलीस...माझ्या दोषांना हळूवारपणे मांडत माझ्यातील छोट्यातल्या छोट्या चांगल्या गोष्टीला मनापासून दाद देत राहिलीस. मला माणूस म्हणून उभं करत राहिलीस...माझा वेडेपणा सहन करताना सतत मला उभारी देत राहिलीस... देतेस. कौतुकाचे अत्तरपाणी सतत शिंपत राहिलीस...कोणी नसले तरी तू सोबत आहेस हा विश्वास सतत देत राहिलीस. कित्येकदा मी चुकलो असतानाही सावरत राहिलीस...मी कोलमडून नये म्हणून उत्साही शब्दांनी साथ दिलीस....चुकीच्या बाबींनाही अशा काही खुबीने माझ्यासमोर मांडलेस की मलाच त्या दुरुस्त कराव्या वाटल्या त्या केवळ तुझ्यासाठी...तू मला ऐकत राहीलीस... कोणीतरी आपलं मनापासून ऐकतं ही भावनाच मुळी खूप सुखद असते...ती माझी भावना तू सतत जपलीस....सहवासाचा प्रत्येक क्षण आनंदी होईल...उभारी घेणारा होईल...जगण्याशी दोन हात करण्यासाठी बळ भरणारा होईल असे सतत जगत राहिलीस...प्रत्येक अनुभव चांगलाच करण्यासाठी प्रयत्नशील राहिलीस...म्हणून तर आज मी हे मांडू पाहतोय...
तुझं आयुष्यातलं नेमकं स्थान सांगण्यासाठी एका कवितेच्या चार ओळी आठवतात.
...ती कविता म्हणजे तू आहेस....
कैसे बतावू मै तुम्हे ...
मेरे लिए तुम कौन हो...
तुम ही मेरी पहचान हो...
कैसे बताऊँ मैं तुम्हें.
देवी हो तुम मेरे लिये.
मेरे लिये भगवान हो!
---
माहिती आहे तुला "भगवान' म्हटलेलं नाही आवडणार...तुझा माणूसपणावर जास्त विश्वास आहे आणि तू माझ्यातल्या माणुसपणाला जपण्यासाठीच सतत सोबत आहेस...पण तरीही...
तुझ्याप्रतिची ती भावना सच्ची आहे.