Saturday, May 26, 2012

आली लग्न घटी समीप


सनईच्या सुरावटीनं विवाह मंडप भरून गेलेला...
लग्नघटिका समीप येऊन ठेपलेली...
उपस्थित आप्तेष्ट, जिवलग, नातलग, सगेसोयरे हातात फुलपाकळ्या, अक्षता घेऊन मंत्रोच्चाराच्या प्रतीक्षेत...
करवल्यांची गडबड... मामा मंडळींची धावपळ...
सजलेल्या लग्नवेदीवरील फुललेले हार तिला भेटण्यास आतूर...
तो येऊन उभा... जन्माची गाठ बांधण्यास उत्सुक... मुंडावळ्यांआडून तिची चाहूल शोधणारा...

..ती...
गौरीहारासमोर बसलेली...
लग्नघटिका जवळ येईतो "नवे' पाऊल टाकण्यास उत्सुक असलेली...
प्रत्यक्ष पाऊल टाकण्याचा क्षण खुणावू लागल्याने मागे-मागे रेंगाळणारी...
गौरीहारावर पुनःपुन्हा हळदी-कुंकू वाहत "तो' क्षण लांबवू पाहणारी....
पुरोहितांचे बोलावणे कानावर पडताच.... भरल्या मनाने... हळुवार पावलांनी विवाहवेदीकडे जाण्यास निघणारी
त्याक्षणी युगायुगाचे वाटणारे हे अंतर... मनाशी कल्लोळ पेलत कमी करणारी...

...नेमका असाच ऊर घुसमटणारा कल्लोळ तिच्या जन्मदात्यांच्याही मनी
तिला फुलापरी जपणाऱ्या तिच्या दादा आणि सखी म्हणून मिरविणाऱ्या ताईच्याही हृदयी...

ती...
माझ्या मायेच्या अंगणाची सय आज संपणार...
जेथे भातुकलीचा खेळ मांडला... दादा-ताईसोबत भांडून... मी हरलेला प्रत्येक डाव जिंकला...
जेथे माझी पावलं आई-बाबांचे बोट धरून उभी राहिली... नंतर दुडदुडली आणि मग मुक्तपणे पडली...
ते अंगण माझ्यासाठी अनोळखी होणार...
माझ्या बोटाला धरून ज्यांनी माझं पहिलं पाऊल साजरं केलं... माझ्या पावलांना बळ दिलं...
माझ्या ओठी मायेचा घास भरवत लहानाचं मोठं केलं...
संस्कारांच्या शिदोरीने माझं मन तुडुंब भरलं...
कधी समजावून सांगून, कधी समजून घेऊन, कधी माघार घेऊन पुरविला माझा हट्ट...
चुकल्यावर काहीसं रागे भरून... पण नंतर पाठीवरून मायेचा हात फिरवून मला समजावलं...
माझ्या पंखांत बळ भरलं...
जगण्याशी दोन हात करण्यासाठी खंबीर बनवलं...
प्रत्येक हळवे क्षण जपले...
स्वतंत्र ओळख रुजविण्यासाठी धडपडले...
माझ्या सुखमय भविष्यासाठी दुरावा लाभणार असूनही चेहऱ्यावर हास्य दाखवून दुःख ठेवलं पोटात... खोलवर...
माझ्या आनंदासाठी शरीर आणि मन दोन्ही झिजवलं...
कमीपणा घेण्यातही नाही मानला कमीपणा...
त्या आई-बाबांसोबत अंतर आता पडणार....
...घराच्या प्रत्येक कोपऱ्याला दुरावणार...
या भिंतींच्या साक्षीने जगलेल्या त्या सर्व क्षणांना पारखी होणार... गोड गुपितं... माझे सवंगडी... माझ्या सख्या... माझे सोबती... माझी हक्काची ठिकाणं... छोटे छोटे आनंदाचे क्षण... लुटूपुटूची भांडणं... रागावणं... रडणं... ओरडणं... खळाळून हसणं... टाळ्या पिटणं... सारं सारं इथंच राहणार...
...आपलं माहेरपण सुरू होणार...!

आई...
जन्माला आली तेव्हा वाटलं प्रतरूपच आलं पोटी...
हाताचा झोका करून वाढवताना...
बोबडे बोल ऐकताना...
बाळमुठी वळताना... प्रत्येक पाऊल सावरताना...
बाललीला अनुभवताना... छातीशी बिलगून घेता-घेता... ती कधी माझी सावली बनली समजलंच नाही...
छोटी पावलं मोठी झाली... आकाश तिचं विस्तारलं...
अंगणातली तिची भातुकली सावरताना आठवणींची रांगोळी आपसुक सजली...
डोळ्यासमोर राहिले उभे आयुष्यातले ते साठवले क्षण
तिचं शाळेच्या पहिल्या दिवशीचं रडणं... आणि शाळा सुटल्यानंतर येऊन घट्ट बिलगणं...
शाळेतलं यश साजरं करणं आणि छोट्या छोट्या हातांनी स्वयंपाकघरातलं लुडबुडणं...
वाढत्या वयाबरोबर तिचं प्रगल्भ होणं आणि माझा त्रास कमी करण्यासाठी सतत धडपडणं...
अडचणींत माझ्यासह घर सावरणं...
लाघवी बोलण्यानं माणूस-माणूस जोडणं...
अडचणीतून मार्ग काढताना खंबीर उभं राहणं...
"आई मी आहे गं!' हे आधाराचे शब्द बोलणं आणि सावली बनूनच पुढं... पुढं जाणं...
कधी रुसणं... कधी फुगणं... पण माझ्या संस्कारांना जागून माझं नाव राखण्यासाठी धडपडणं...
मैत्रीण, माझी सखीच ती...
बोलली नाही कधी उलटे, की बोलली नाही कधी लागट...
सावरलं... मलाच समजावलं... जेव्हा कधी आली अडचण...
घराचं घरपण सर्वांनी टिकवायचं असतं... जाणून घेतलं तिनं...
जन्मली तेव्हाच होतं ठाऊक...
कधी ना कधी दुरावणार हे परक्‍याचं धन...
आता आली वेळ... घटका-पळे भरतील..."...सावधान' म्हटले जाईल...
...माझी ही वेल तिच्या हक्काच्या अंगणी रुजण्या सप्तपदी चालेल....
पावले ती टाकेल सात... आणि... मी शोधत राहीन... तिची माझ्या आयुष्यातून निसटून चाललेली पाऊलवाट...!

बाबा... 
पाहू या - करू या... करत मी ढकलत राहिलो तुझ्या आयुष्यातला "तो' सोनेरी दिवस.
मात्र अखेर आलाच "तो क्षण', जो माहीत असूनही लपवत राहिलो स्वतःपासून आयुष्यभर.
सनई, चौघडे वाजू लागले, घर सजलं, अंगण मांगल्यानं काठोकाठ भरलं.
सनईच्या सुरावटींनी भारला सारा भवताल.
"शुभमंगल....' शब्द-सूर उच्चारत गेले आणि फुटणारा बांध कसा आवरू आवरू झाले.
...आठवला तुझा जन्मसोहळा,
तुझा पहिला मृदू सहवास...
लुकलुकणारे डोळे, तुझं पहिलं पाऊल, पहिलं यश...
आठवला तुझा मला धीर देणारा स्पर्श, मैत्रीण होऊन लुटलेला बापपणाचा आनंद...
उभे राहिले डोळ्यांसमोर तुझ्यासोबतचे लटके रागाचे क्षण...
कधी तरी चुकून उचलला गेलेला हात आणि मग कुशीत शिरून
मुसमुसणाऱ्या तुला सावरताना माझ्यातला गळून पडलेला कठोर बाप...
कन्यादानाचं पाणी सुटलं हातातून अन्‌ जाणवलं... आपलं पिलू आपल्याला कायमचं दुरावलं...
उंबरठा ओलांडण्यास निघाली अन्‌...
"बाबाऽऽ म्हणून धावत शिरलीस आवेगाने माझ्या कुशीत...
खरं सांगतो पोरी,
तेव्हा कढ दाटल्या हृदयातलं बापपण... धो धो रितं होत राहिलं अश्रूंमधून..! 

Sunday, May 6, 2012

दिल को लग गयी...


छायाचित्र संकेतस्थळाच्या सौजन्याने

दिल को लगेगी तभी तो बात बनेगी... हे वाक्‍य "सत्यमेव जयते' ही मालिका सुरू होण्यापूर्वी आमिरखान आपल्या जाहिरातीमधून सातत्याने ऐकवत होता. त्याच वेळी आमिरचा हा कार्यक्रम कोणत्या दिशेने जाणार हे स्पष्ट होत होते. रविवारी सकाळी अकरा वाजता कार्यक्रम जेव्हा एअरवर गेला त्यानंतरची 90 मिनिटे फक्त आमिरची होती. या नव्वद मिनिटावरील (निदान पहिल्या भागात तरी) त्याची हुकुमत अगदी स्पष्ट दिसून आली. तो परफेक्‍सनिस्ट आहे...ते का हे पुन्हा सप्रमाण सिद्ध झालं. कार्यक्रमाचा प्रत्येक मिनिट पुढे-पुढे सरकत राहिला आणि आमिरखान या माणसाचं भोवतालच्या परिस्थितीबाबत असलेलं अवधान स्पष्ट होत राहिलं.
आमिरने छोट्या पडद्यावर येण्याचा मोह सातत्याने टाळला. त्याला कित्येकदा विचारणा करूनही, पैशांच्या थैल्या रिकाम्या करूनही तो आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. जेव्हा त्याच्या मनाने त्याला साद घातली तेव्हा त्याने छोट्या पडद्यावर यायचं ठरविलं मात्र तेही काहीतरी वेगळं करून दाखविण्याचा मनाशी चंग बांधूनच. त्यासाठी गेली दोन वर्षे त्यानं चौफेर अभ्यास केला. ....असं केलं तर कसं होईल? तसं केलं तर कसं होईल?...कार्यक्रम तर करायचा पण निव्वळ करमणूक म्हणून नाही. माझा कार्यक्रम वेगळा कसा होईल याचा ध्यास त्यानं घेतला. त्यासाठी भक्कम पूर्वतयारी केली. देशाच्या कानाकोपऱ्यात तो फिरला, सगळ्या टिमला त्यानं फिरवलं...आपण जे करणार आहे... त्यातून समाजाच्या भल्यासाठी काही करता येईल का? या एकमेव विचाराने तो झपाटला असावा... असं एकूण "सत्यमेव जयते' या कार्यक्रमाचा पहिला भाग पाहिल्यानंतर सारखं वाटत राहतं.
पहिल्या भागामध्येच त्याने देशापुढे आ वासून उभ्या असलेल्या "स्त्री भ्रूण हत्येसारखा' प्रचंड संवेदनशील विषयाला हात घातला आहे. हा विषय यापूर्वी वाहिन्यांवर, माध्यमांतून अनेकदा येऊन गेलेला आहे...तरीही आमिरने त्यासाठी घेतलेली मेहनत त्याच्या कितीतरी पट अधिक आहे हे जाणवत राहतं.
त्यानं मांडलेली तिन्ही उदाहरणे ही प्रतिकात्मक पण, तरीही अंगावर येणारी...पाहताना ऐकताना अंगावर काटा आणणारी...ज्यांनी भोगलं त्यांच्याविषयी अपार करुणा भरून आणणारी आणि ज्यांनी केली त्यांच्याविरोधात पेटून उठायला लावणारी आहेत...त्यांनी जे सोसलं ते पाहताना डोळ्यांच्या कडांवर अश्रू जमा करणारं आणि आपल्याच अवती भोवती हे सारं घडतंय हे जाणून अस्वस्थ करायला लावणारी होती.
हे सारं मांडताना आमिरचं थेट ह्रदयाला हात घालणारं निवेदन आणि प्रत्येक मुद्याशी प्रेक्षकांना जोडण्याचा त्याचा प्रयत्न पहिल्या भागात तरी नक्कीच यशस्वी झाला आहे असं म्हणता येईल. तो विषय मांडून थांबत नाही...त्यावरील उत्तर सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न तो करतो आहे. त्यासाठी तो पुढाकार घेणार आहे ही अत्यंत महत्वाची बाब. मी सांगतो तुम्ही करा...असा उंटावरून शेळ्या हाकण्याचा कोणताही प्रयत्न यामध्ये नाही...मी तुमच्यातलाच एक आहे आणि हा मुद्दा उपस्थित केला आहे. आपण मिळून त्यावर तोडगा काढायचा आहे हे अत्यंत संयमीत पण परिणामकारकरित्या सांगण्याचा त्याचा प्रयत्न म्हणूनच भावणारा आहे.
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच त्याच्याबद्दलची उत्सुकता शिगेला नेण्यात तो यशस्वी झालाच; पण जेव्हा रविवारी सकाळी अकरा वाजता दूरचित्रवाहिनी संच सुरू करून प्रेक्षकांनी आपल्या सुटीमधील नव्वद मिनिटे घालविली तेव्हा ती वाया गेली नाहीत...याचं समाधान त्यानं दिलंच...वरपक्षी या नव्वद मिनिटांचं गारूड पुढचा एपिसोड येईपर्यंत कायम राखण्यात तो यशस्वी ठरला.
एरव्ही हाच विषय एक डॉक्‍युमेंटरी सारखा वाटला असता; पण आमिरच्या सादरीकरणाने त्याची दाहकता पाहणाऱ्याच्या काळजापर्यंत नक्कीच पोचली आणि हेच आमिरच्या मालिकेच्या पहिल्या भागाचे यश. कार्यक्रम पाहताना त्याला नक्की काय करायचं आहे? त्याला नक्की कोठे जायचं आहे हे स्पष्ट असल्याचं जाणवत राहतं. बरं हे मांडताना आपण हा प्रश्‍न सोडविणार आहे असा दिवास्वप्न दाखविणारा आव तो आणत नाही हे सर्वात महत्त्वाचे.
चला आता उत्सुकता आहे त्याच्या दुसऱ्या भागामध्ये काय असणार याची आणि खात्री वाटते तो भागही असाच वेगळा...ह्रदयाला हात घालणारा असेल...लेटस सी...