"लोकप्रभा'मधील "अल्केमिस्ट्री' सदरात परुळेकर यांनी सचिन तेंडुलकरबद्दल लिहिलेला लेख वाचला आणि त्या लेखामध्ये त्यांनी उधळलेली मुक्ताफळे वाचताना परुळेकरांच्या विचारांबद्दल किव आली. सचिन तेंडुलकरला टार्गेट करून लिहिलेला हा लेख परुळेकर यांच्यासारखा "विचारी' माणूस बुद्धी (शंका आहेच) गहाण ठेऊन कसा काय लिहू शकतो याचे आश्चर्य वाटले.
मुळात या लेखाचे प्रयोजन अखेरपर्यंत समजत नाही. या लेखात ते सचिन तेंडुलकरला भंपक-ढोंगी म्हणतात, शरद पवार यांच्यावर टिप्पणी करतात, सचिनला ग्लॅडीएटर संबोधून पुन्हा तो कसा भंपक आहे हेच सांगतात. मला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही असे एकिकडे लिहितात आणि दुसरीकडे संपूर्ण लेखात मिळेल तेथे सचिनला ओरखडत राहतात हे कशाचे लक्षण.
सचिन खेळतो व चाहते त्याचा आनंद घेतात. तो खेळत नाही तेव्हा हेच चाहते त्याच्यावर टीकेची झोड उठवितात हा साधा सरळ मामला आहे. म्हणूनच मग त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 20 वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्याचे कौतुकही अगदी दिलदारपणे करतात. त्याबाबत प्रसारमाध्यमांना मठ्ठ म्हणण्याचा अधिकार परुळेकर यांना कोणी दिला? या लेखानुसार इतर सर्व मुर्ख आणि परुळेकरच तेव्हढे शहाणे असे वाटून राहते हे खरे कसे समजायचे? अनेक बाबींची गल्लत करताना अत्यंत गोंधळलेल्या मानसिकतेमध्ये परुळेकर यांनी हा लेख लिहिला असावा असे वाटते पण असे का?
सचिन एक खेळाडू आहे. तो सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर वावरत असतो. मुंबई कोणाची? या प्रश्नावर त्याने दिलेले उत्तर अगदी सहज होते; मात्र इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनीच सलग दोन दिवस सचिनचे तेच ते वाक्य पुनःपुन्हा दाखवून अनावश्यक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी परुळेकर काहीच कसे बोलले नाहीत. हा चावटपणा त्यांना दिसला नाही की तो त्यांनी पाहून न पाहिल्यासारखा केला. बरं स्वतः फारसे क्रिकेट न पाहणाऱ्या परुळेकरांनी सचिनबद्दलची फुटपट्टी कशाच्या आधारावर लावली?
प्रकाश-मंदा आमटे, अभय-राणी बंग आदी दिग्गजांबद्दल परुळेकर लिहितात. ते महान आहेतच. त्यांनी कधीही ते महान आहेत याचा ढोल वाजविलेला नाही. ते ही कधी प्रसारमाध्यमांकडे प्रसिद्धी द्या, असे सांगायला गेले नाहीत हे सत्यच आहे कारण त्याची त्यांना गरज वाटत नाही. त्या प्रमाणेच सचिनही कधी प्रसारमाध्यमांकडे आपणहून गेल्याचे ऐकिवात नाही. (अपनालयसारख्या संस्थांना तो मदतीचा हात देतो, हे कित्येक वर्षांनी उघड झाले. जर त्याला सामाजिक भान नसते तर तो अशा बाबी करूच शकला नसता) आत्ताही "माझी आंतरराष्ट्रीय क्रिकेटची 20 वर्षे झाली आहेत, तुम्ही माझ्यावर पुरवण्या काढा, लेख लिहा, चॅनेल दिवसभर ढणढणत ठेवा असे सांगण्यास तो गेलेला नव्हता. कोट्यवधींसाठी विरंगुळ्याचे ठिकाण असलेल्यांना सचिनबद्दल जे वाटते तेच देण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यमांनी केला आहे व त्यातून व्यवसायही केला आहे. (आत्ता हेच पहा! तुम्ही ही टीकाटीप्पणी का केली? तर हा लेख वाचावा आणि यावर चर्चा सुरू व्हावी हाच तुमचा उद्देश असावा. म्हणजेच हा विषय तुम्हालाही सेलेबल वाटलाच ना? बहुधा हेच प्रयोजन हा लेख लिहिण्याचे असावे.)
मराठी माणसाला मराठी माणसाचे बरे वाटत नाही, असे मात्र हा लेख वाचल्यानंतर वाटून राहते. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटची वीस वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्याच्यावर उधळण्यात येत असलेली स्तुतीसुमने परुळेकरांना रुचलेली दिसत नसावीत आणि त्यातूनच हा लेख लिहिला की काय असा प्रश्न पडतो.
या लेखामध्ये सचिन श्रीमंत असल्यामुळे त्याला मान देतात असा एक उल्लेख केला आहे. तो उल्लेख वाचल्यानंतर परुळेकरांचा सचिनबद्दलचा आकसच दिसतो. वीस वर्षांपूर्वी जेव्हा सचिन मैदानात उतरला तेव्हा तो सर्वसामान्यच होता. आणि तरी त्यावेळीही जगभरातील क्रिकेट खेळणाऱ्या देशांचा तोच लाडका होता. आपल्या बॅटची मर्दमुकी गाजवून जेव्हा त्याने भारतीय संघाच्या यशात वाटा उचलला तेव्हा लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न झाली आणि मग ती त्याच्यावर फिदा झाली; मात्र त्यासाठी त्याला कुणापुढे हात पसरावे लागले नाहीत. तो खेळत राहिला आणि यश त्याला मिळत गेले. कोट्यवधींची स्वप्ने तो मैदानात प्रत्यक्षात उतरवू लागला म्हणूनच वैभवाचा मानकरी तो ठरला.
"मी भारतीय आहे; पण महाराष्ट्रीयन असल्याचा मला अभिमान आहे,' या सचिनच्या वाक्याचा अर्थ बहुधा परुळेकर यांना समजलेला नसावा (किंवा त्यांना तो समजून न घेता "सचिन मुंबई भारताची म्हणाला' यावरच बोट ठेवायचे आहे काय? शिवसेना स्टाईल; पण तसा अधिकार शिवसेनाप्रमुखांना आहे. तुम्ही तर पत्रकार) किंवा प्रत्येक वेळा सचिनने "मी मराठी'चा ढोल वाजविलाच पाहिजे' अशी अपेक्षा ठेऊन ती पूर्ण न झाल्याच्या आकसातून हा लेख लिहिला आहे, असे मात्र वाटून राहते. त्यामुळे परुळेकर यांच्या सारख्या साक्षेपी, बहुआयामी, विचारवंत पत्रकाराचा नेमका राग कोणावर आहे? हा प्रश्न, प्रश्नच राहतो.
Sunday, November 22, 2009
Friday, November 13, 2009
प्रिय सचिन
खूप दिवस झाले तुला पत्र लिहिण्याचा विचार डोक्यात घोळत होता; पण कारणच सापडत नव्हते. त्याला कारण म्हणजे एक तर तू अपयशी ठरलास की प्रसारमाध्यमं (विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स) तुझ्यावर अक्षरशः तुटून पडतात. दिवसभर त्यांचं चॅनेल ढणढणत राहतं आणि पाहणारेही मग हळूहळू सचिन संपलाय, या हाकाटीच्या बाजूने झुकू लागतात. हा गेल्या काही वर्षांमधील अगदी परिपाठ झालेला आहे. तुझ्या निवृत्तीसाठी तर अनेक जण देव पाण्यात ठेवल्याप्रमाणे वागत, लिहीत, बोलत असतात. जेव्हा जेव्हा तुझ्यावर टीकेचे फुटेज सुरू व्हायचे तेव्हा तेव्हा त्या चॅनेलवाल्यांचे तोंड फोडावे असे वाटायचे. बरं तू त्यांना कधीही बोलून उत्तर देत नाहीस. तुला जे काही बोलायचे असते ते तू तुझ्या बॅटनेच बोलतोस. मग माझ्यासारख्या तुझ्या चाहत्याला तू सुंदर खेळी केलीस की चेव चढतो. तरी बरं एक बाब खूप महत्त्वाची. आपले बहुतेक सारे मराठी पेपरवाले मात्र तुझ्या पाठीशी ठाम उभे राहतात. (खरे तर महाराष्ट्रात पाय ओढण्याची परंपरा आहे. तुझ्याबाबतीत मात्र ही परंपरा मोडली गेलीय ही अतिव आनंदाची बाब आहे) असो...परवा तुझे संघ सहकारी हैदराबादी बिर्याणी झोडत होते, तेव्हा तू मात्र त्यांच्यात नव्हतास. दुसऱ्या दिवशी त्याचा परिणाम जाणवला. तू तडाखेबंद 175 धावांची खेळी करून पुन्हा एकदा टीकाकारांचे तोंड फोडलेस आणि ज्यांच्या कौतुकांचे पूल बांधले जात होते ते फ्लॉप झाले. विशेष म्हणजे कधी नव्हे ते हिंदी इलेक्ट्रॉनिक्स मीडियाने दिवसभर तुझ्यावर स्तुतिसुमने उधळली. खरं सांगू, त्या दिवशी कधी नव्हे ते टीव्ही पुनःपुन्हा पाहावासा वाटला. त्या दिवशीची ऑस्ट्रेलियाविरुद्धची तुझी तडाखेबंद, सौंदर्यखणी खेळी खरोखरच मनाच्या कुपीत जपून ठेवावी अशीच होती. ऐन तारुण्यात असताना तू ज्याप्रमाणे गोलंदाजांना सीमारेषेच्या बाहेर उर्मटपणे भिरकावून द्यायचास, तोच पुन्हा अवतरल्याचा भास झाला. रिकी पॉंटिंगचा चेहरा तर पाहवत नव्हता. खडूस ऑस्ट्रेलियन्सची कशी ठेचायची असते ते तू पुन्हा एकदा दाखवून दिलेस. अगदी झोकात तू सतरा हजार धावांचा टप्पा ओलांडलास; मग तू अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर मात्र तुझी रनमशिन धडधडू लागली आणि धावांची रास पाहता पाहता उभी राहिली. क्रिकेटचे सर्व फटके पुन्हा एकदा "याची डोळा याची देही' अनुभवण्यास मिळाले. अगदी धन्य धन्य झालो. त्या दिवशी अगदी टेचात मित्रमंडळींत फिरलो. तुझ्या अनेक परममित्रांचे चेहरे वाचताना मी त्या दिवशी अगदी असुरी आनंद लुटला. अनेकदा त्यांनी सचिन कसा संपलाय हे अगदी बेंबीच्या देठापासून सांगण्याचा प्रयत्न केला होता ना! (सामना तुझ्या नाकर्त्या सहकाऱ्यांमुळे हरल्याचे जराही दुःख वाटले नाही). त्यानंतर मालिका भारत हरला; मात्र तुझ्या खेळीच्या हॅंगओव्हरमधून आम्ही काही बाहेर आलो नाही. त्यावर कळस चढला गुरुवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमामुळे. सुनील गावस्कर आणि गुंडाप्पा विश्वनाथ यांचा साठीनिमित्त झालेला सत्कार सोहळा. या सोहळ्यात चित्रपटसृष्टीचा शहेनशाह अमिताभ बच्चन (यशाच्या शिखरावर असूनही विनम्रतेचा कळस म्हणजे हा माणूस), यांच्यासोबत तुला त्या व्यासपीठावर पाहून कृतकृत्य झाल्याचे समाधान लाभले. या कार्यक्रमात तू ज्याप्रमाणे बोललास किंवा तुझ्याबद्दल अमिताभ, सुनील जे बोलले ते पाहताना डोळ्यांचे पारणे फिटले. तू कसा ग्रेट आहेस हेच पुन्हा एकदा पाहावयास मिळाले.आजच हे सारं पुन्हा तुला लिहिण्याचे कारण म्हणजे, 15 नोव्हेंबरला तुझ्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीस वीस वर्षे पूर्ण होत आहेत. सध्याच्या फास्ट क्रिकेटच्या युगात तू तब्बल वीस वर्षे भारतीय क्रिकेटसाठी स्वतःला वाहून घेतलेस. या कालावधीत खेळाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद तू मनमुरादपणे लुटलास आणि क्रिकेटचा देव बनलास. जगभरात चाहते निर्माण केलेस, धावांच्या एव्हरेस्टची उंची अधिकच उंच केलीस. बरं एवढं करूनही तू धावांसाठी आजही लहान मुलासारखाच भुकेलेला आहेस. भारतीय संघाला विश्वकरंडक जिंकून देण्याचे स्वप्न पाहत आहेस आणि एका अर्थाने पुन्हा एकदा विश्वकरंडक उंचावल्याचे स्वप्न दाखवत आहेस. कोट्यवधींचा मानकरी तू निश्चित असशील; पण कोट्यवधींच्या हृदयात तुझ्याबद्दल असलेल्या प्रेमाची गणतीच होणार नाही. तुझी ती श्रीमंती मोजताच येणार नाही.या पुढेही तू यशाचे नवे शिखर गाठून स्वतःचा अमिट ठसा उमटवावास याच शुभेच्छा!
तुझाच चाहता
Wednesday, November 4, 2009
घे भरारी...
वैताग आणलाय या चिमण्यांनी !
हिचा वैतागलेला स्वर कानावर पडला.
काय झालं? विचारत मी गॅलरीत गेलो; तर तेथे दोन चिमण्या चिवचिवाट करत इकडून तिकडं-तिकडून इकडं भरारत होत्या. त्यांच्या चिवचिवाटानं "ही' पुरती वैतागलेली. न राहवून हिनं त्या चिमण्यांना हुसकावलंच, तशी त्या तेथून जरा दूर पळाल्या.
असू दे गं! अशी तिची समजूत काढत मी तिला आत घेऊन गेलो (जाताना हिचा तोंडाचा पट्टा सुरूच) आणि चहाचा कप घेऊन पुन्हा गॅलरीत आलो. खुर्चीत पाय ताणवून बसलो आणि चहाचे घोट घेऊ लागलो. तेवढ्यात मघाच्या दोन्ही चिमण्या पुन्हा परतल्या. माझी कसलीच दखल न घेता पण माझ्यावर लक्ष ठेवून कोपऱ्यात अडकवलेल्या कपाटाच्या वरच्या बाजूस बसून काही तरी खुडबूड करू लागल्या. आता मात्र माझी उत्सुकता ताणली आणि मी दोन्ही चिमण्यांचं निरीक्षण करू लागलो.
एक चिमणी उडून जाई, चोचीतून काटक्या घेऊन येई, कपाटाच्या वरच्या बाजूस जाई, काहीबाही करीत बसे, तोपर्यंत दुसरी बाहेर राखण करी. आतलीचं काम संपलं की दोघं मिळून उडून जात आणि पुन्हा चोचीतून काहीबाही घेऊन येत.
अरेच्चा म्हणजे ही जोडी घरटे बांधणार तर!
यस्सऽऽऽ मी सुखावलो. माझ्या घरात नव्या पाहुण्यांनी केलेल्या घुसखोरीवर मी जाम खूश झालो.
आता छानसं घरटं तयार होणार... त्यामध्ये चिमणी अंडी घालणार... काही दिवसांनी त्या अंड्यांतून नवा जीव जग पाहणार... त्याला मोठे करण्यासाठी दोघी धडपडणार... चिमणचारा भरवणार आणि तो मला पाहायला मिळणार... त्याचं प्रत्येक घासासाठीचं आसुसलेपण पाहायला मिळणार... थोडं मोठं झालं की ते घरट्यातून उडू पाहणार... मग दोन्ही चिमण्या त्याच्या पंखात बळ भरणार... आणि एक दिवस आई-बाबांना मागं ठेवून ते उंच भरारी घेणार...
वाऽऽऽ हा सारा सृजनसोहळा माझ्या घराच्या गॅलरीत रंगणार... क्या बात है!
----------
""अहो, आंघोळीला पाणी काढलंय... येताय ना?''
हिच्या पुकाऱ्याबरोबर भानावर येऊन आत पळालो.
""एक रिक्वेस्ट होती!''
""बोला, काय?''
"ए त्या चिमण्यांना तिथून हुसकावू नकोस प्लीज ! हवं तर त्यांनी केलेली घाण मी स्वच्छ करतो. ''
"तुम्ही ना!''
तिच्या त्या लटक्या रागाबरोबरच मिळालेल्या होकाराने मी खूश.
------
आता माझं चिमणी निरीक्षण नेमानं सुरू झालं. आमच्या विश्वासावर "त्यांचं' इटुकलं घरकुल हळूहळू तयार झालं. माझा रोजचा चहा... त्यांच्या साक्षीने होऊ लागला आणि चिमण्यांनी केलेली घाण "ही' माझ्यावर डोळे मोठे करत साफ करू लागली. कधीतरी... "काय म्हणतात तुमचे लव्ह बर्डस्?' अशी विचारणाही ती करे; पण घुश्शातच केवळ माझ्यासाठी ती त्यांना सहन करीत होती.
एक दिवस दोन्ही चिमण्या नसताना त्या घरट्यात डोकावून पाहिलं तर दोन अंडी तेथे दिसली; मग तर मी त्या चिमण्यांची काळजी घेऊ लागलो. त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आणि थोडासा खाऊही ठेवू लागलो. मला वेध लागले बाळचिमण्यांचे.
-----
एक दिवस सकाळी-सकाळी, ""अहो उठा लवकर. ते पाहा तुमचे लव्ह बर्डस् चार झालेत'' असे सांगत हिनेच मला "गुड न्यूज' दिली.
मी डोळे चोळत गॅलरीत आलो... तर घरट्यातून डोकावणाऱ्या छोट्या चोची दिसल्या आणि त्यांच्या चोचीत चोच घालून त्यांच्यावर माया करणाऱ्या चिमण्या पाहताना आनंदाने डोळ्यांच्या कडा ओलावल्या. नवजीवाच्या जन्माच्या आनंदसोहळ्याचे आम्ही साक्षीदार झाल्याचा आनंद आम्हीही साजरा केला. आता आम्ही दोघेही त्या जिवाच्या बाललीला पाहण्यात रंगून जाऊ लागलो.(हिचाही त्रागा काहीसा कमी झाला) आता त्यांचा चिवचिवाट आम्हाला हवाहवासा, आपला वाटू लागला.
----
एका रविवारी कामानिमित्त परगावी जाऊन आलो. सोफ्यावर डोळे मिटून शांत बसलो होतो. तेवढ्यात हिची गॅलरीतून हाक ऐकू आली.
""अहो इकडं या बघू...'' तिचा घाबरा स्वर ऐकून
""काय झालं गं?'' म्हणत मी तातडीने गॅलरीत पोहोचलो.
तिनं चिमण्यांच्या घरट्याच्या दिशेनं हात केला आणि छातीत धस्स झालं.
घरटं विस्कटलं होतं... खाली काड्या पडल्या होत्या... काही पिसंही पडलेली होती... आणि एका बाजूला एक पिलू निष्प्राण होऊन पडलं होतं आणि त्याला सर्व बाजूंनी मुंग्या डसल्या होत्या... दोन्ही चिमण्या जोरजोरात चिवचिवत होत्या... घरटे केलेल्या जागेजवळ जाऊन पुन्हा माघारी अशा भिरभिरत होत्या. पिलांच्या जाण्यानं त्या सैरभैर झाल्या होत्या... काळजाचा तुकडा हरवल्याचं दुःख सहन करण्याचा प्रयत्न करीत होत्या... पिलांच्या आठवणींनी त्या मोडलेल्या घरट्याजवळ पुनःपुन्हा जाऊन पिलांना शोधत होत्या.
माझा श्वास काहीसा जड झाला...
मी हिच्याकडं पाहिलं... तर चिमण्या आल्यादिवशी संतापलेल्या हिचे डोळे पाण्यानं काठोकाठ भरले होते.
-----
परवा सकाळी...
"अहो उठा पटकन'च्या हाकेनं जागा झालो.
""काय झालं?''
चला म्हणत तिनं मला ओढत गॅलरीत नेलं आणि तिनं बोट केलेल्या दिशेकडं पाहिलं. चिमण्या पुन्हा परतल्या होत्या आणि आमची दखल न घेता घरकुल बांधण्यात दंग झाल्या होत्या...

Subscribe to:
Posts (Atom)