Tuesday, March 29, 2011

पुन्हा आले डोळा पाणी!


"दमलेल्या बाबाची कहाणी...' हे गाणं साधारणपणे दोन वर्षांपूर्वी झालेल्या "आयुष्यावर बोलू काही'च्या पाचशेव्या भागामध्ये सलील आणि संदीप यांनी सादर केलं आणि पाहता पाहता अवघ्या मराठी मनाला "बाबा'ला वाटणारी काळजी अंगावर आली. समस्त बाबा लोकांनी त्यावेळी लपून-छपून का होईना रडली. त्यानंतर या गाण्याची पारायणं करत अनेक बाबांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. आईपुरतीच मर्यादीत राहिलेली "माया' संदीपने "बाबा'साठीही किती मोलाची आहे हे शब्दबद्ध केले आणि बाबा लोक भावनांना वाट मोकळी करून देऊ लागले. पहिल्यांदा झालेल्या या कार्यक्रमात ही कविता ऐकताना घराघरांतून बाबा लोक आपल्या लेकीसह रडले. बाबा आणि मुलीमधील असलेल्या नाजूक नात्यातला ओलावा, जिव्हाळा, माया, काळजी सगळं सगळं अगदी थेटपणे समोर आलं आणि काळजाला भिडलं. संदीपने लिहिलं अप्रतिम पण त्या जोडीला दोघांनी ते सादरही केलं अप्रतिम.
दोन वर्षानंतर जेव्हा "आयुष्यावर बोलू काही'चा भाग "साम'मराठीवरून 30 तारखेला प्रक्षेपीत झाला तेव्हाही दोन वर्षांपूर्वीचाच अनुभव अनेकांना आला. गाणं संपताना गालावरून ओघळलेल्या अश्रूंनी सलील-संदीपला दाद दिली. (गेल्या वर्षभरात अनेकांनी तो अनेकदा घेतला. हे गाणं म्हणजे त्यांच्या भावना मोकळ्या करण्याचं जणू साधनच बनलं) सातशेव्या भागातही दोघांनी ही कविता सादर करताना तेवढ्याच आर्तपणे सादर केली आणि उपस्थितांना पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडलं, हे त्यांच्या सादरीकरणाचं शंभरनंबरी यश.
एवढ्या तेवढ्या कारणांनी वाद घालणारे, रुसवा धरणारे, इगो कुरवाळत आपल्या हाताशी असलेले सुंदर क्षण गमावणारे आपण किती करंटे आहोत. हे पुन्हा एकदा ही कविता ऐकताना जाणीव झाली. म्हणजे पहा..."लग्न ठरल्यावर कसे होईल...' या कल्पनेनं डोळ्यांच्या कडा भरून येतात आणि जवळ असताना आपण त्याची फारशी फिकीर करत नाही हा विरोधाभास आपण जपत राहतो. म्हणूनच मग संदीप-सलीलला मनापासून दाद द्यावी वाटते. त्यांच्यामुळे कोठेतरी माणूसपण जागं राहतं. काही क्षण का होईना आपल्याच प्रतिरुपासाठी डोळे ओलावतात. तिच्या भविष्याच्या काळजीने मन भरून येतं. काही क्षण काही होईना "मी' विसरतो, इगो बाजूला राहतो, प्रत्येकातील "बाबा' हुरहुरतो.