Saturday, May 26, 2012

आली लग्न घटी समीप


सनईच्या सुरावटीनं विवाह मंडप भरून गेलेला...
लग्नघटिका समीप येऊन ठेपलेली...
उपस्थित आप्तेष्ट, जिवलग, नातलग, सगेसोयरे हातात फुलपाकळ्या, अक्षता घेऊन मंत्रोच्चाराच्या प्रतीक्षेत...
करवल्यांची गडबड... मामा मंडळींची धावपळ...
सजलेल्या लग्नवेदीवरील फुललेले हार तिला भेटण्यास आतूर...
तो येऊन उभा... जन्माची गाठ बांधण्यास उत्सुक... मुंडावळ्यांआडून तिची चाहूल शोधणारा...

..ती...
गौरीहारासमोर बसलेली...
लग्नघटिका जवळ येईतो "नवे' पाऊल टाकण्यास उत्सुक असलेली...
प्रत्यक्ष पाऊल टाकण्याचा क्षण खुणावू लागल्याने मागे-मागे रेंगाळणारी...
गौरीहारावर पुनःपुन्हा हळदी-कुंकू वाहत "तो' क्षण लांबवू पाहणारी....
पुरोहितांचे बोलावणे कानावर पडताच.... भरल्या मनाने... हळुवार पावलांनी विवाहवेदीकडे जाण्यास निघणारी
त्याक्षणी युगायुगाचे वाटणारे हे अंतर... मनाशी कल्लोळ पेलत कमी करणारी...

...नेमका असाच ऊर घुसमटणारा कल्लोळ तिच्या जन्मदात्यांच्याही मनी
तिला फुलापरी जपणाऱ्या तिच्या दादा आणि सखी म्हणून मिरविणाऱ्या ताईच्याही हृदयी...

ती...
माझ्या मायेच्या अंगणाची सय आज संपणार...
जेथे भातुकलीचा खेळ मांडला... दादा-ताईसोबत भांडून... मी हरलेला प्रत्येक डाव जिंकला...
जेथे माझी पावलं आई-बाबांचे बोट धरून उभी राहिली... नंतर दुडदुडली आणि मग मुक्तपणे पडली...
ते अंगण माझ्यासाठी अनोळखी होणार...
माझ्या बोटाला धरून ज्यांनी माझं पहिलं पाऊल साजरं केलं... माझ्या पावलांना बळ दिलं...
माझ्या ओठी मायेचा घास भरवत लहानाचं मोठं केलं...
संस्कारांच्या शिदोरीने माझं मन तुडुंब भरलं...
कधी समजावून सांगून, कधी समजून घेऊन, कधी माघार घेऊन पुरविला माझा हट्ट...
चुकल्यावर काहीसं रागे भरून... पण नंतर पाठीवरून मायेचा हात फिरवून मला समजावलं...
माझ्या पंखांत बळ भरलं...
जगण्याशी दोन हात करण्यासाठी खंबीर बनवलं...
प्रत्येक हळवे क्षण जपले...
स्वतंत्र ओळख रुजविण्यासाठी धडपडले...
माझ्या सुखमय भविष्यासाठी दुरावा लाभणार असूनही चेहऱ्यावर हास्य दाखवून दुःख ठेवलं पोटात... खोलवर...
माझ्या आनंदासाठी शरीर आणि मन दोन्ही झिजवलं...
कमीपणा घेण्यातही नाही मानला कमीपणा...
त्या आई-बाबांसोबत अंतर आता पडणार....
...घराच्या प्रत्येक कोपऱ्याला दुरावणार...
या भिंतींच्या साक्षीने जगलेल्या त्या सर्व क्षणांना पारखी होणार... गोड गुपितं... माझे सवंगडी... माझ्या सख्या... माझे सोबती... माझी हक्काची ठिकाणं... छोटे छोटे आनंदाचे क्षण... लुटूपुटूची भांडणं... रागावणं... रडणं... ओरडणं... खळाळून हसणं... टाळ्या पिटणं... सारं सारं इथंच राहणार...
...आपलं माहेरपण सुरू होणार...!

आई...
जन्माला आली तेव्हा वाटलं प्रतरूपच आलं पोटी...
हाताचा झोका करून वाढवताना...
बोबडे बोल ऐकताना...
बाळमुठी वळताना... प्रत्येक पाऊल सावरताना...
बाललीला अनुभवताना... छातीशी बिलगून घेता-घेता... ती कधी माझी सावली बनली समजलंच नाही...
छोटी पावलं मोठी झाली... आकाश तिचं विस्तारलं...
अंगणातली तिची भातुकली सावरताना आठवणींची रांगोळी आपसुक सजली...
डोळ्यासमोर राहिले उभे आयुष्यातले ते साठवले क्षण
तिचं शाळेच्या पहिल्या दिवशीचं रडणं... आणि शाळा सुटल्यानंतर येऊन घट्ट बिलगणं...
शाळेतलं यश साजरं करणं आणि छोट्या छोट्या हातांनी स्वयंपाकघरातलं लुडबुडणं...
वाढत्या वयाबरोबर तिचं प्रगल्भ होणं आणि माझा त्रास कमी करण्यासाठी सतत धडपडणं...
अडचणींत माझ्यासह घर सावरणं...
लाघवी बोलण्यानं माणूस-माणूस जोडणं...
अडचणीतून मार्ग काढताना खंबीर उभं राहणं...
"आई मी आहे गं!' हे आधाराचे शब्द बोलणं आणि सावली बनूनच पुढं... पुढं जाणं...
कधी रुसणं... कधी फुगणं... पण माझ्या संस्कारांना जागून माझं नाव राखण्यासाठी धडपडणं...
मैत्रीण, माझी सखीच ती...
बोलली नाही कधी उलटे, की बोलली नाही कधी लागट...
सावरलं... मलाच समजावलं... जेव्हा कधी आली अडचण...
घराचं घरपण सर्वांनी टिकवायचं असतं... जाणून घेतलं तिनं...
जन्मली तेव्हाच होतं ठाऊक...
कधी ना कधी दुरावणार हे परक्‍याचं धन...
आता आली वेळ... घटका-पळे भरतील..."...सावधान' म्हटले जाईल...
...माझी ही वेल तिच्या हक्काच्या अंगणी रुजण्या सप्तपदी चालेल....
पावले ती टाकेल सात... आणि... मी शोधत राहीन... तिची माझ्या आयुष्यातून निसटून चाललेली पाऊलवाट...!

बाबा... 
पाहू या - करू या... करत मी ढकलत राहिलो तुझ्या आयुष्यातला "तो' सोनेरी दिवस.
मात्र अखेर आलाच "तो क्षण', जो माहीत असूनही लपवत राहिलो स्वतःपासून आयुष्यभर.
सनई, चौघडे वाजू लागले, घर सजलं, अंगण मांगल्यानं काठोकाठ भरलं.
सनईच्या सुरावटींनी भारला सारा भवताल.
"शुभमंगल....' शब्द-सूर उच्चारत गेले आणि फुटणारा बांध कसा आवरू आवरू झाले.
...आठवला तुझा जन्मसोहळा,
तुझा पहिला मृदू सहवास...
लुकलुकणारे डोळे, तुझं पहिलं पाऊल, पहिलं यश...
आठवला तुझा मला धीर देणारा स्पर्श, मैत्रीण होऊन लुटलेला बापपणाचा आनंद...
उभे राहिले डोळ्यांसमोर तुझ्यासोबतचे लटके रागाचे क्षण...
कधी तरी चुकून उचलला गेलेला हात आणि मग कुशीत शिरून
मुसमुसणाऱ्या तुला सावरताना माझ्यातला गळून पडलेला कठोर बाप...
कन्यादानाचं पाणी सुटलं हातातून अन्‌ जाणवलं... आपलं पिलू आपल्याला कायमचं दुरावलं...
उंबरठा ओलांडण्यास निघाली अन्‌...
"बाबाऽऽ म्हणून धावत शिरलीस आवेगाने माझ्या कुशीत...
खरं सांगतो पोरी,
तेव्हा कढ दाटल्या हृदयातलं बापपण... धो धो रितं होत राहिलं अश्रूंमधून..! 

No comments: