Tuesday, June 5, 2012

पहिला पाऊस


दुपार कलंडू लागली आणि आकाशपटलावर ढगांची मैफल जमू लागली आणि पाऊस ओतायच्या आत घरी पोचावं या मनीषेनं स्नेह्यांच्या घरातून पाऊल बाहेर टाकलं. बाईकला किक मारली आणि बाहेर पडणार तेवढ्यात थेंबांचे सूर उमटू लागले. बाईक लगेच माघारी वळविली पुन्हा स्नेह्यांच्या घरी येऊन थांबलो. थेंबांच्या धारा झाल्या आणि पागोळीमधून वाहणाऱ्या धारा दिसू लागल्या. खिडक्‍यांच्या काचांवर थेंबांची दाटी झाली. अंगणातल्या फरशीवर पाऊस फुलांमध्ये उमलण्याची स्पर्धा सुरू झाली. एकेक फूल उमलत राहिले. मातकट पाण्याचे प्रवाह वाहू लागले. मातीचा सुगंधही नाकाशी रुंजी घालू लागला. त्या घराच्या खिडकीमधून हा पहिला पाऊस न्याहाळताना मित्र भेटल्याचा मनस्वी आनंद होत राहिला; पण पावसात जाऊन भिजण्याची अनिवार भावना मात्र तशीच दाबून ठेवली गेली. फार मोठी नाही पण पंधरा-वीस मिनिटे ही झड सुरू राहिली. भोवतालची झाडे हा पाऊस आसुसून प्याली आणि तजेला मिळवून आनंदाने लहरली...वारे वाहू लागले आणि ढगांनी एकमेकांशी फारकत घेतली. मैफल रंगू पाहत असताना उठली...मी अलिप्तपणे त्या मैफलीचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला; पण पूर्णत्वाचे समाधान काही लाभलेच नाही...

...मी बाहेर पडलो...बाईकला वेग दिला. वाटेत कामानिमित्त पंधरा-वीस मिनिटे थांबावे लागले. काम आटोपले आणि घर जवळ करू लागलो. पंधरा-वीस मिनिटांच्या कालावधीत मघाशी उठलेली ढगांची मैफल पुन्हा एकदा मस्त जमू लागल्यासारखे वाटले. पुन्हा एकदा थेंबांनी तारा झंकारल्या...धारांचे संगीत झंकारू लागले आणि पाहता पाहता मैफल रंगू लागली. पाठोपाठ पाऊस धारांच्या सुरावटी लडीवाळपणे सलगी करू लागल्या. आता मात्र या मैफलीला नाकारणे शक्‍यच नव्हते. बाईकच्या मुठीवरील पकड ढिली झाली, वेग कमी झाला आणि मी त्या मैफलीतला एक होऊन गेलो. आता भवताल विसरला...बाईक चालत राहिली...मी पाऊसधारांच्या सुरावटींमध्ये तल्लीन झालो...माझ्या भोवती फेर धरून नाचणाऱ्या पाऊसधारांच्या गाण्यात एकरूप झालो...थेंबांतून झंकारणाऱ्या आरोह-अवरोहांचे तरंग मनावर उमटत राहिले...गडगडणाऱ्या ढगांतून तबल्याचा नाद मैफलीला उंची देऊ लागला...

...बाईक गचके देत थांबली...तंद्री भंगली...ऐन पावसात बंद बाईकला सुरू करण्याचा प्रयत्न चालू ठेवला; पण मैफल मोडू दिली नाही. माझ्या जिद्दीपुढे बाईक नमली...गुरगुरली...सुरू झाली...घराच्या दिशेने धावू लागली. नखशिखांत भिजूनही मैफलीचा आनंद तसूभरही कमी झाला नाही. उलट वाढतच राहिला. घर जवळ आले आणि पहिल्या पावसाच्या मैफलीचा आनंद अंगभर मिरवतच घरात प्रवेश केला. पुन्हा नव्या मैफलीच्या प्रतीक्षेत..... 

No comments: