तो गॅलरीमध्ये येऊन उभा राहिला... आभाळ गच्च भरून आलेलं... दूरवर कुठे तरी पाऊस पडत असावा... गार वारा त्याची साक्ष देत होता... आणि इथे तो कोणत्याही क्षणी अस्तित्व दाखवेल असं वातावरण तयार झालेलं... आतून अस्थिर असल्याने वाहणाऱ्या गार वाऱ्याचा स्पर्श त्याच्या मनापर्यंत पोचत नव्हता. दूरवरचे ढगाळलेले क्षितिज न्याहाळताना त्याच्या मनावरही त्याची काही पुटे चढत राहिली. तो आतून भरून आलेला... आता कोसळायचा फक्त बाकी होता...
उद्या कोर्टात आपल्या सहा वर्षांच्या संसाराचा "निकाल' लागणार. गैरसमजाच्या झाडाला किती कडू फळं येतात हे इतके दिवस ऐकलं होतं, आता ती अनुभवावी लागणार. कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी तिला पटत नाही आणि तिला ते पटावं असं तिच्याभोवतीच्या काहींना वाटत नाही. होत नाहीत का माणसाच्या हातून चुका? बरं, नसलेल्या चुकाही मान्य करून पुन्हा एक संधी मागतोय. ती देण्याचा मोठेपणा ना ती दाखवतेय ना तिच्या घरचे... का तिला जाणीवपूर्वक माझ्यापासून दूर केलं जात आहे? आठ वर्षांच्या सहवासाने दोघांमधील विश्वास, ओढ किती भक्कम आहे याची वेळोवेळी साक्ष पटली आहे. नेहमी ती माझ्यासोबत राहिली. मी कोसळताना ठामपणे पाठीशी उभी राहिली. मंदीने नोकरी हिरावल्यानंतर पुन्हा नवा जॉब मिळेपर्यंतचे दोन महिने दुप्पट राबली. मला जरासुद्धा त्याची झळ लागणार नाही यासाठी धडपडली. ओव्हरटाईम करताना चिन्मयकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली. मी दिवसभर नोकरी शोधत भटकताना माझा खिसा हलका राहणार नाही हे पाहिलं. बरं, हे सर्व करूनही आपण काही वेगळं करतोय असा अभिनिवेशही दाखविला नाही. सगळं किती व्यवस्थित मॅनेज केलं; पण सहा-सात महिन्यांपूर्वी काय बिघडलं कोण जाणे... सगळे रंगच उडून गेले. मला जॉब मिळून सगळं सुरळीत सुरू झालं, असं वाटत असताना अचानक काहीतरी बिनसलं. आधी अबोला, मग वाद, नंतर भांडणं आणि थेट "वेगळं' होण्याची मागणी. बरं, कारण काय तेही सांगत नाही. कारण समजलं तर निदान त्यावर चर्चा तरी करता येईल. जॉब नसल्याच्या टेन्शनमध्ये मी कधी नव्हे ती "घेतली'... पण एकदाच. मला माझी चूक समजली. त्याबद्दल माफीही मागितली तिची. चिडचिड झाली तेव्हा एकदा तोलही गेला आणि बोललोही तिला वाट्टेल तसं; पण तरीही ही काही एवढी मोठी कारणं नव्हती, की लगेच वेगळं व्हावं... मग नेमकं झालंय तरी काय? कसं कळणार? एक मात्र खरं, गैरसमजातून... कायद्याच्या तडाख्याने काडी काडी करून उभं केलेलं घरटं मोडलं जाणार हे नक्की... जरा आपणच माघार घेतली असती तर...
ें----
पाऊस येणार का?... येईल बहुधा... भरून तर आलं आहे. कोणत्याही क्षणी तो कोसळू लागेल; पण तोपर्यंत घालमेल होत राहणार... वारा सुटलाय खरा; पण त्यामध्ये फारसा दम नाही. एकदाचा कोसळून जाऊ दे... म्हणजे सगळं मोकळं मोकळं होईल... सभोवार आणि मनावरही दाटलेलं मळभ एकदाचं दूर होईल... रितं झाल्याशिवाय नव्या विचारांना धुमारे कसे फुटणार? उद्या आपल्या मनावर साठलेलं मळभही दूर होईल कदाचित... काय माहीत काय होतं ते...? विचारांनी तिच्या डोक्यात नुसता चिखल झाला होता...
उद्या कोर्टात काय होणार? चिन्मयची कस्टडी मिळणार का आपल्याला? तोच तर एक आधार आणि त्याची आपल्याकडे राहणारी एकमेव आठवण. जर कस्टडी नाही मिळाली तर... तर... आपल्या जगण्याला काही अर्थच उरणार नाही. माझं असं कोण उरणारच नाही. काही प्रश्न आपले आपणच सोडवायचे असतात हेच खरं... पण, आपल्याला हे समजलंच नाही. तो माफी मागत होता... त्यावेळीच आपण त्याला माफ करून या विषयावर पडदा टाकायला हवा होता (बहुधा त्याची चूक नव्हती. आपणच आक्रस्ताळेपण केला... कोणाच्या तरी.. काहीबाही सांगण्यावरून... शहानिशा न करता) पण त्यानं तरी असं का वागावं? वाटेल तसं बोलला.. "घेऊन' आला... हे म्हणजे अतिच झालं. खरं तर त्याची चूक नेमकी काय झाली आणि आपण त्यावर का रिऍक्ट झालो तेही आता लक्षात नाही. गैरसमज झालाय खरा. तो दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या जवळच्यांनी तो दूर करूच दिला नाही. उलट दोघांत दुरावा वाढेल असंच पाहिलं. तोही मोकळेपणाने बोलला नाही... घातला मी वाद तर प्रतवादच करत राहिला. गैरसमजाचं विष उतरण्याऐवजी पसरत राहिलं. काय अवदसा आठवली आणि कोणताही विचार न करता वेगळं होण्याच्या अर्जावर सह्या केल्या. चुका कोणाच्या हातून होत नाहीत; पण त्यानं जरा पडती बाजू घेतली असती तर... मीच का पडती बाजू घ्यायची? ...स्त्री आहे म्हणून...? पण उद्या आपलं घर मोडणार हे नक्की. सहा वर्षे प्रत्येक क्षण जपत दोघांनी उभं केलेलं... दोघांनी कष्ट सोसून भक्कम केलेलं... मग ते डगमगलं कसं?... गैरसमजाच्या वादळाने विश्वासाला धक्का लागलाच कसा?....आपलंच काही चुकलं नाही ना?
ें----
""बाबा, तू कुठे निघालास... मला सोडून.. आईला सोडून? माझ्याशी कट्टी केलीस का तू? ए, जाऊ नको ना तू आम्हाला सोडून...''
चिन्मयच्या बोबड्या बोलांनी तो थबकला... "मी'पणा गळून पडला... आतून कोसळला... वळला आणि चिन्मयला येऊन बिलगला... ढसाढसा मोकळा होऊ लागला...
""मला नाही रे जायचं तुम्हा दोघांना सोडून...'' एवढंच म्हणाला...
त्याच्या या वाक्याने ती थिजली... त्या दोघांशिवाय आपण अपूर्ण आहोत... या जाणिवेनं कोलमडली... कमीपणा घेण्यातलं सुख तिला जाणवलं... ती पुढे झाली, चिन्मयच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली, ""...चला "आपल्या' घरी जाऊ आपण!''
त्याच वेळी दाटून आलेलं गच्च आभाळ सुटलं... जलधारांतून बरसू लागलं... अश्रूंमधून वाहू लागलं... गैरसमजाने मोडू पाहणारं घर... समजुतीनं सावरलं. दोघांच्याही मनावरचं मळभ दूर झालं... आनंदभरला पाऊस... डोळ्यांतून अखंड झरझरत राहिला...
No comments:
Post a Comment