Tuesday, December 14, 2010

सैर माडबनची


ही वाट दूर जाते... स्वप्नामधील गावा...
जैतापूरला अणुऊर्जा प्रकल्प होण्याचे नक्की काय झालं आणि "माडबन' साऱ्या जगभर प्रकाशझोतात आलं. कारण हा प्रकल्प होणार आहे माडबनच्या हद्दीमध्ये. कोकणातील टिपीकल छोटंसं खेडं असलेल्या माडबन आणि परिसरावर निसर्गानं सौंदर्याची अगदी मुक्त हस्ते उधळण केलेली आहे. माडबनच्या किनाऱ्यावरून पश्‍चिमेकडे समुद्राच्या लाटांशी झुंजणारा विजयदुर्ग पहावयास मिळतो. तर येथील समुद्र किनाऱ्याला असलेल्या सुरूच्या बनातूनच किनाऱ्यावर छोट्याशा पायवाटेच्या साथीने येता येते. पायवाट संपून जेव्हा आपण किनाऱ्यावर पोचतो तेव्हा आपले स्वागत स्वच्छ, शांत, सुरक्षीत मऊशार वाळूंचा किनारा करतो. या वाळूच्या अंगणात ठिकठिकाणी खेकड्यांनी रेखाटलेली नक्षी पहावयास मिळते. छोट्या छिद्रांभोवती रेखलेली ही नक्षी पाहण्याची मौज काही औरच. शांतपणे काठावर बसून पहात राहिलं तरी आपल्या डोळ्यांदेखत अशा नक्षी उमटून येताना पहावयास मिळते. तुरूतुरू धावणारे लहान-मोठे खेकडे या वाळूवर एकसे एक नक्षी रेखाटतात आणि त्यांच्या कलाकारीला दाद दिल्याशिवाय राहवत नाही. साधारण किलोमीटरभर लांबीच्या या किनाऱ्यावर अगदी निर्धोकपणे फिरण्याचा आनंद घेता येतो, तर कंबरेएवढ्या पाण्यात जाताना कसलीही भीती वाटत नाही. येथील पाण्याला तुलनेत ओढ कमी असल्यामुळे अगदी बिनधास्त पाण्यात फिरता येते; मात्र सोबत गावातील कोणीतरी असणं आवश्‍यक आहेच बरं. जर वातावरण स्वच्छ असेल तर विजदुर्ग किल्ल्याच्या परिसरातील हालचालीही आपण सहज पाहू शकतो.
साधारण साडेसातशे लोकसंख्या असलेलं माडबन टिपीकल कोकणी गाव. चिऱ्यातील घरे, त्यावर कौलारू छत, अंगणात आणि परसात माड, सुपारी, आंबा, काजू, रातांब्याची झाडे. स्वच्छ अंगण आणि प्रत्येक अंगणाला चिऱ्याच्या भिंतीचे कुंपण, त्याला लावलेला कुडाचा दरवाजा. गावाला लागूनच असलेली भाताची खाचरे. त्यातल्या त्यात सधन घरापुढे उभ्या गाड्या. भगवतीचे सुरेख मंदिर आणि तिची तेवढीच सुंदर, सुबक मूर्ती. उतारावरून गावात आल्यानंतर साऱ्या जगाशी कसलाही संपर्क नसलेलं सुंदर देखणं गाव. यावं प्रेमात पडावं आणि येथील होऊन जावं असं मनात रुतून बसणारं माडबन. (सध्या जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पविरोधातील हालचालींचे प्रमुख केंद्र बनल्याने गाव शांतता हरवून बसले आहे)

हे आहे खेकड्याचे घर

खेकड्यांनी मिळून नक्षी काढून सजवलेला रुपेरी वाळूचा किनारा

हा सागरी किनारा...

कोकणातलं टिपीकल घर आपुलकीनं बोलावणारं

No comments: