Tuesday, December 21, 2010

स्टॅंड लागलंय!

शीर्षक वाचून हा काय प्रकार? असा प्रश्‍न तुम्हाला नक्कीच पडला असेल. जरा थांबा खुलासा करतोच. त्याचं काय झालं परवा असाच बाईकवरून फेरफटका सुरू होता. ट्रॅफिकमधून वाट काढत निघालो होतो. एवढ्यात एक मोटरसायकलस्वार बाजूने पुढे निघून गेला, जरा घाईतच दिसला. त्याच्या पाठोपाठ एक सॅंट्रोवालाही पुढे गेला. दोन्हीही माझ्या अगदी नजरेसमोर. एवढ्यात सॅंट्रोवाल्याने गाडीचा वेग वाढविला आणि तो त्या मोटरसायकलस्वाराजवळ गेला आणि ओरडला,
भाईसाब स्टॅंड लागलंय!फ
मोटरसायकलस्वारानं खाली पाहिलं, मोटरसायकलचा वेग कमी केला. सराईतपणे स्टॅंड पायानं मागं ढकललं आणि सॅंट्रोवाल्याकडे पाहत अगदी मनापासून मान हलवून आभार मानून निघूनही गेला. त्याच्या आभार मानण्याने सॅंट्रोवाल्याच्या चेहऱ्यावर छानशी स्उिमटली आणि तोही त्याच्या मार्गे रवाना झाला.
बाब अगदी साधी पण मला खात्री आहे, आपणही अनेकदा असा प्रसंग पाहिलेला असेल. आपल्यापैकी काहींनी अनुभवलाही असेल. आपण कित्येकदा विसरतो तसंच हा मोटरसायकलस्वार कोठे तरी उभा राहिला असणार आणि त्यानंतर गाडीला कीक मारून सुसाट निघाला असणार. गडबडीत स्टॅंड काढायचं राहिलं असणार. नेमकं हेच त्या सॅंट्रोवाल्याच्या लक्षात आलं आणि तो पटकन मोटरसायकलस्वाराला धोसुचना देऊन मोकळा झाला.
मला प्रश्‍न पडला त्या सॅंट्रोवाल्यानं हे का सांगितलं? त्याचा काय संबंध? त्या मोटरसायकलस्वाराचं आणि त्याचं नातं काय? समजा त्या तशा स्टॅंडमुळे तो मोटरसायकलस्वार पडला असता, त्याला काही दुखापत झाली असती तरी त्या सॅंट्रोवाल्याचं काहीही बिघडलं नसतं किंवा त्याचं काही नुकसानही झालं नसतं. जे काही नुकसान झालं असतं ते मोटरसायकलस्वाराचं; पण...
दोस्तांनो हा पणफच इथं खूप महत्त्वाचा आहे. त्या सॅंट्रोवाल्याच्या साध्या कृतीनं माणुसकीचा झरा वाहता आहे, तो अद्याप आटलेला नाही हे अधोरेखीत झालं. लागलेल्या स्टॅंडमुळे तो मोटरसायकलस्वार पडेल आणि त्याला काही तरी इजा होईल, ही काळजी वाटल्याने सॅंट्रोवाल्याने त्याला तातडीनं सांगितलं. त्याच्यातल्या माणुसकीनं त्याला साद घालून तातडीनं व्यक्त होण्यास भाग पाडलं आणि कदाचित होऊ घातलेला एक अपघात, एखाद्या कुटुंबावर होणारा आघात टळला.
तर दुसरीकडे च्या बीजाची एका ह्रदयातून दुसऱ्या ह्रदयात आपसूक पेरणी झाली. धोका असताना दुसऱ्याला सावधान करण्याची साधी माणुसकी जपली पाहिजे हा संदेश एकाकडून दुसऱ्याकडे अगदी अलवारपणे पोचला. मला खात्री आहे आता पुन्हा तो मोटरसायकलस्वार दुसऱ्या कुणाच्या गाडीचे स्टॅंड लागलेलं दिसेल तेव्हा तातडीनं त्याला त्याबाबत सांगेल कारण आता तो मोटरसायकलस्वार या वाहत्या झऱ्यातील एक धार बनला आहे. त्याच्या परीने तो जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा हा झरा अखंड वाहता राहण्यासाठी प्रयत्नशील राहील.
या आणि अशा छोट्या-छोट्या बाबींमुळेच जगाचे रहाटगाडगे काहीसे व्यवस्थीत सुरू आहे. नाहीतर आजूबाजूला पाहिलं तर फारसं सुखावह चित्र दिसतच नाही; मग अशावेळी असे काहीसे निर्मळ झरे नजरेला पडतात आणि आपल्या पावित्र्याने आपल्यालाही त्याचा एक भाग बनण्यासाठी साद घालतात. मी ठरवलं आहे या सादेला प्रतिसाद देण्याचं!... तुम्ही?

5 comments:

भानस said...

खरेचं... बाब अगदी साधीच आहे; पण...

या झर्‍यात कधीचीच अडकलेय. किती जणांनी किती प्रकारे हात पुढे करून त्यांच्यात सामील केले आहे. खरेच असे सहृदयी लोक आहेत म्हणून समतोल आहे.

पोस्ट छान.

prajkta said...

khup khup thanks....aapn kharicha wata oochlat rahu.

Anonymous said...

तुला काय पडल आहे ऐवढ असे मित्रांचे टोमणे ऐकून पण रस्त्यावरून जातांना, आमच कोणाच स्टॅंड लागलंय कां लाईट चालू राहिली आहे हे पाहून त्यांना सांगण्याचा उद्योग चालूच असतो...पोस्ट आवडली ..

prajkta said...

thank u davbindu. bab agdi sadhi aahe pan khup molichi aahe.

SUSHMEY said...

म्हटलं तर खूप छोटी बाब पण जरा खोलात विचार केला तर त्यातून अनेक अर्थही निघतात.. आज स्वतःच्या पायापुरते बघणारे लोक बघितले की अशा प्रसंगाचे अप्रुप वाटते. अनेकदा आपणही जाऊ दे असं म्हणून बऱ्याच गोष्टी सोडून देतोच की.... तुम्हाला आठवतंय आपण एकदा असंच आईस्क्रीक खात होतो... दोन पोरं आली आणि त्यांनी आईस्क्रीमवाल्याला थोडे दटावले दटावले कसले शिव्याच दिल्या त्यानं गुमान आईस्क्रीम काढलं... दोघांनी घेतलं आणि पैसे न देताच ते दोघे निघून गेले... बाब आठ-दहा रुपयांची होती... पण फुकट खायची सवय लागलेली ती पोरं.... नंतर जाताना थोडं आपण त्यावर बोललोही पण विषय सोडून दिला... त्यांच्या नादाला लागलो नाही कारण ते दारु प्यायले होते.... आजही कधी तरी शब्दांचे खेळ मांडताना त्या आईस्क्रीमवाल्याचा चेहरा आठवतो.... म्हणूनच वरील प्रसंगासारखा एखादा प्रसंग बघितला आणि वाचला की त्या प्रसंगाची कळ आणखी वाढते... काही जखमा ओल्या ठेवण्यातच मजा असते... नाही का? खूप छान