Showing posts with label लंडन डायरी. Show all posts
Showing posts with label लंडन डायरी. Show all posts

Monday, August 1, 2011

हार आणि फक्त हारच! (लंडन डायरी)


खेळामध्ये हार जीत ठरलेली आहे. कोणीतरी एक हरतो म्हणूनच तर कोणीतरी जिंकतो. मात्र हरतानाही त्यामध्ये प्रतिकार केल्याचे, लढल्याचे समाधान मिळविता आणि इतरानाही देता येते. मात्र काही पराभव जिव्हारी लागणारे असतात. सोमवारी नॉटींगहॅमला झालेला 319 धावांनी झालेला दणदणीत पराभव असाच तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींच्या जिव्हारी लागणारा आणि चिड आणणाराच ठरला. बाद झालेल्या बेलला पुन्हा बोलावून खेळण्याची संधी देऊन सर्वांना जिंकणाऱ्या धोनी सेनेने जिंकता येईल अशी कसोटी गमावली ती निव्वळ बेजबाबदारीने. पहिल्या दिवशी इंग्लंड संघाला दीडशेमध्ये गुंडाळण्याची संधी दवडली. त्यानंतर फलंदाजी करताना मोठी आघाडी मिळविण्याची संधी अशाच बेफिकीरीने विकेट फेकून गमावली. धावांची आघाडी दीडशेच्या घरात असती तरी ही कसोटी भारतीय संघ किमान हरला तरी नसता; पण बहुधा नियतीला ते मंजूर नसावे. ज्या खेळपट्टीने ब्रॉडचे बोट धरले त्याच खेळपट्टीने दुसऱ्या डावात प्रवीणकुमार, इशांत, श्रीशांतला दमविले. पुन्हा बेल फलंदाजी करत असताना याच खेळपट्टीने त्याच्या फटक्‍यांसाठी कोणतीही अडकाठी येऊ दिली नाही; मात्र तेथेच दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांविरुद्ध ब्रेस्नन वर अगदी दिलोजानसे फिदा झाली इतकी की त्याच्या खिशात पाच बळींचा खुराक टाकून रिकामी झाली. खेळपट्टीने जरी रंग सरड्यासारखे बदलले असले तरी भारताच्या पराभवाला फक्त तीच एकटी जबाबदार नाही तर तिच्यापेक्षा शतपटीने भारतीय फलंदाजांची हाराकिरी कारणीभूत आहे. पहिल्या डावात राहुल द्रविड वगळता एकही पठ्ठ्या खेळपट्टीवर टिकून राहू शकला नाही. दुसऱ्या डावात काही प्रमाणात सचिन तेंडुलकर (पण त्याच्या खेळात कसलीच जान नव्हती). कर्णधार महेंद्रसिंग धोनी तर फलंदाजी करण्याचेच विसरून गेल्यासारखी परिस्थिती आहे. दोन कसोटी चार डावांत मिळून त्याने अवघ्या 49 धा
वा फटकावलेल्या आहेत. राहुल द्रविड आणि लक्ष्मण वगळता एकही खेळाडू सायबांच्या गोलंदाजीचा समाचार घेण्यात यशस्वी ठरलेले नाहीत. पहिल्या कसोटीमधील जोरदार पराभवाच्या धक्‍क्‍याने भारतीय खेळाडूंनी कसलाही बोध घेतलेला नसल्याचे नॉटींगहॅम कसोटीमध्ये दिसून आले. स्विंग गोलंदाजीला एकीकडे द्रविड समर्थपणे तोंड देत असताना इतर स्पेशालिस्ट फलंदाज मात्र त्यापुढे लोटांगण घालताना दिसले. एकाच्याही खेळामध्ये ब्रॉड, अंडरसन, ब्रेस्नन आदींचा सामना करण्याची, त्यांच्यावर वर्चस्व गाजविण्याची धमक दिसली नाही. भारतीय फलंदाजीच्या 158 धावांत ठिकऱ्या उडाल्या. सामना वाचविण्याच्या दिशेने एकही भागिदारी झाली नाही. उसळत्या चेंडूवरली भंबेरी साऱ्या क्रिकेट जगताने पाहिली. 478 धावांचा डोंगर चढावयाचा असताना खेळपट्टीवर नांगर टाकायचा असतो हे आता पुन्हा एकदा भारतीय फलंदाजांना शिकविण्याची वेळ आली आहे.
पहिली कसोटी हरल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार नासिर हुसेनने भारतीय खेळाडूंवर जोरदार टिकास्त्र सोडले होते. त्यावेळी त्याने भारतीय खेळाडू थकले असून ते क्रिकेटसाठी शंभर टक्के योगदान देत नसल्याचे म्हटले होते. त्या वेळी त्याचा जाम राग आला होता; मात्र सोमवारची भारताची फलंदाजी पाहिली असता तो किती योग्य बोलला होता तंतोतंत पटते. कसोटी क्रमवारीतील अग्रस्थान जवळपास गमावल्यात जमा असलेल्या भारतीय संघाला सर्वच पातळ्यांवर कामगिरी उंचावण्याचे आव्हान आता आहे. धोनीसेनेने गेल्या दोन वर्षांत मिळविलेले यश पहिल्या दोन सामन्यात पार रसातळाला गेले आहे. विश्‍वकरंडकाची धुंदी आणि आयपीएलमधून मिळालेल्या पैशाचा खळखळाट यामध्ये भारतीय संघ हरवू लागला आहे काय? असा प्रश्‍न पडल्यावाचून राहत नाही. पहिल्या दोन पराभवाने भारतीय संघाची अब्रू तर इंग्लंडच्या वेशीवर टांगली गेली आहेच. निदान येत्या दोन सामन्यांत उरलीसुरली प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी किमान प्रयत्न होतील अशी आशा आहे.

Friday, July 29, 2011

ब्रॉड आडवा आला (लंडन डायरी)



लॉर्डस्‌वर भारताला पराभूत करण्यामध्ये ख्रिस ब्रॉडचा वाटा मोठा होता. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये त्याने धडाकेबाज कामगिरी करताना भारतीय संघाची भंबेरी उडवली होती. ज्या खेळपट्टीवर त्याच्या गोलंदाजीवर भारतीय फलंदाजांना खेळता आले नव्हते, त्याच खेळपट्टीवर भारतीय जलदगती गोलंदाजीचा मारा त्याने फोडून काढला. त्याने प्रायरसोबत भक्कम भागीदारी नोंदवताना भारताच्या पराभवाचा पाया रचला होता. आजही भारतीय संघ पूर्ण वर्चस्व मिळवण्याच्या वाटेवर असताना ब्रॉड भक्कमपणे आडवा आला आणि संघाला दोनशे धावांच्या पार नेले. ब्रॉड खेळला नसता तर इंग्लंडचा डाव दीडशेच्या आत खल्लास झाला असता; पण ब्रॉडने प्रवीणकुमार, इशांत आणि तेजतर्रार श्रीशांतसह हरभजनसिंगच्या गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेतला. त्याने जोरदार प्रतिआक्रमण करून भारताचे मनसुबे पुरते उधळून लावले. त्याने 66 चेंडूंमध्ये 64 धावा फटकावताना नऊ चौकार लगावले. त्याने हे आक्रमण रचताना स्वानला हाताशी धरले. संघाची धावसंख्या 124 असताना स्वान मैदानात उतरला होता. त्यानंतर दोघांनी भारतीय गोलंदाजीवर प्रहार करण्यास प्रारंभ केला. कुमारच्या गोलंदाजीवर मुकुंद झेल घेईपर्यंत संघाची धावसंख्या 197 वर पोचली होती. त्यानंतर अँडरसनच्या साथीने ब्रॉडने इंग्लंडला दोनशेचा टप्पा पार करून 221 वर पोचविले. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ब्रॉड गेल्या काही सामन्यांत कामगिरी करत आहे. विशेषतः जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा तो अलीकडे खेळताना दिसतोय.
ब्रॉडचे प्रतिआक्रमण वगळता आज भारतीय गोलंदाजांची तारीफ करावी तेवढी थोडीच आहे. झहीरच्या अनुपस्थितीत संधी मिळालेल्या श्रीशांतने डोके शांत ठेवत गोलंदाजी करताना आपला क्‍लास आज तरी दाखवलाच. त्याच्या संगतीने इशांत आणि प्रवीणकुमारने नॉटिंगहॅमच्या जिवंत खेळपट्टीचा फायदा अगदी अधाशासारखा उठविला. भारतीय क्षेत्ररक्षकांनी दोन-तीन झेल सोडले नसते तर इंग्लंडला आणखी स्वस्तात तंबूत पाठविण्यात या जलद त्रिकुटाला नक्की जमले असते. तिघांनीही अचूक गोलंदाजी करताना स्विंगवर भर दिला. विशेष म्हणजे तिघांनीही टप्पा बिलकूल भरकटू दिला नाही. तिघेही एकमेकांना मार्गदर्शन करताना दिसत होते आणि हे चित्र निश्‍चितच सुखावणारे होते. झहीरच्या नसण्याचा कोणताही परिणाम होऊ न देण्याचा विडा तिघांनी उचलल्याप्रमाणे गोलंदाजी केली आणि मग बळीही समसमान वाटून घेतले. त्यामुळे हरभजनला फार काही करायची वेळ आली नाही. त्याने अखेरचा घाव घालताना ब्रॉडला बाद केले आणि सायबांना 221 धावांवर रोखले.



धावांची रास ओतायला हवी
सायबांना स्वस्तात बाद करण्यात जरी यश मिळाले असले तरी त्यांच्याकडे अँडरसन, ब्रॉडसारखे भेदक गोलंदाज आहेत हे विसरून चालणार नाही. हा सामना जिंकण्यासाठी जगातली सर्वात भक्कम फलंदाजी असल्याचे बिरूद मिळविणाऱ्या भारतीय संघाला धावांची रास ओतण्याची गरज आहे. पहिल्याच चेंडूवर मुकुंदला गमावणाऱ्या भारतीय खेळाडूंना किमान दोन मोठ्या भागीदाऱ्या या मैदानावर करण्याची गरज आहे. खेळपट्टीचा रंग पाहता हे काहीसे अवघड आहे; मात्र "धोनीसेनेला' हे करावेच लागेल; अन्यथा गोलंदाजांनी घाम गाळून जे कमावले ते फलंदाजांनी गमावले, असे म्हणण्याची वेळ भारतीयांवर येऊ शकते.

Thursday, July 28, 2011

लढाई अस्तित्वाची (लंडन डायरी)


कसोटी क्रमवारीत हा संघ अव्वल आहे. वेस्ट इंडीजमध्ये कसोटी मालिकाही जिंकलीय. वनडेचा विश्‍वकरंडकही पटकावलाय. अशा भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याची सुरवात पराभवाने झाली आणि कोट्यवधी क्रिकेटरसिक चुकचुकले. भारतीय संघाच्या अव्वल स्थानाविषयीच प्रश्‍नचिन्ह उभे केले जाऊ लागले. शुक्रवारपासून नॉटींगहॅमच्या वेगवान खेळपट्टीवर सुरू होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. लॉर्डस्‌च्या खेळपट्टीने भारतीय फलंदाजांना खेळवले. त्यापेक्षा वेगळी परिस्थिती नॉटींगहॅमला नाही; मात्र येथे असणाऱ्या कोरड्या वातावरणाचाच पडला तर फरक पडू शकतो. तसे पाहता हे मैदान भारतीयांसाठी लकी आहे. या मैदानावर भारतीय संघाने इंग्लंडमधील विजय साकारलेला आहे. या मैदानावर सचिनची बॅटही चमकलेली आहे. या मैदानावर सचिनने सत्तरपेक्षा जास्त सरासरीने धावा करताना शतकही झळकावलेले आहे. हे सर्व जरी खरे असले तरी भारतीय संघापुढील मुख्य समस्या गोलंदाजीची आहे. झहीरखान नाही, हरभजन निष्प्रभ ठरतोय (अर्थात वेगवान खेळपट्टीवर त्याच्याकडून किती अपेक्षा करणार म्हणा), इशांत, प्रवीणकुमार प्रयत्न करताहेत पण ते पुरेसे नाहीत. झहीर खेळू शकणार नसल्यामुळे श्रीशांत किंवा मुनाफ पटेलला संधी मिळण्याची शक्‍यता आहे. श्रीशांतला संधी दिल्यास त्याचा "आक्रमक' स्वभाव उपयोगी पडू शकतो अर्थात तो गोलंदाजीमध्येच जास्त वापरला गेला तर. दुसरीकडे फलंदाजी भक्कम असली तरी गंभीर खेळणार की नाही या विषयी मोठे प्रश्‍चचिन्ह आहे. गंभीर न खेळल्यास युवराजसिंगला संधी मिळू शकते. युवराज संघात आल्यास मुकुंदसह पुन्हा एकदा द्रविडलाच सलामीला उतरावे लागणार हे नक्की.

लॉर्डस्‌वरील मोठ्या पराभवामुळे भारतीय संघाच्या एकूणच दर्जाविषयी प्रश्‍नचिन्ह उभारण्याची अहमहिका लागलेली आहे; मात्र त्याविषयी कोणतेही भाष्य न करता कर्णधार धोनीने सामन्याच्या पुर्वसंध्येला आम्ही सकारात्मक मानसिकतेने या सामन्यात उतरू असे सांगून प्रत्यक्ष मैदानातच उत्तर देण्याची मानसिक तयारी केल्याचे स्पष्ट होत आहे. यापूर्वीचा इतिहास पाहता अनेकदा भारतीय संघ परदेशी भूमीवर सलामीच्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर पुन्हा उसळून आला असून उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न भारतीय संघाने केलेला आहे. नॉटींगहॅमच्या मैदानावरही अशाप्रकारेच भारतीय संघ पुन्हा एकदा उत्तम कामगिरीसाठी उसळी घेण्याची अपेक्षा आहे. हे जरी खरे असले तरी गेल्या सामन्यात भारतीय फलंदाजी कापून काढणाऱ्या अँडरसनची या मैदानावरील कामगिरी अफलातून अशी आहे. चार सामन्यात त्याने 28 बळी मिळविलेले आहे. त्यामध्ये चार वेळा त्याने पाचपेक्षा जास्त बळी मिळविलेले आहेत हे विसरून चालणार नाही. सध्या पूर्ण फॉर्मात असलेल्या अँडरसनचे हे फेव्हरीट मैदान आहे. त्याच्या जोडीला ब्रॉड आहेच. भारतीय संघाला पराभूत करून नंबर एकचा मुकुट हिसकावून घेण्यास स्ट्रॉस आणि कंपनी एकीकडे सज्ज होत असताना जिव्हारी लागलेल्या पराभवावर विजयाचे मलम लावून आम्हीच "नंबर एक' आहोत हे दाखवून देण्यासाठी भारतीय संघ नक्कीच प्रयत्न करेल अशी आशा आहे. पाहुया शुक्रवारी सकाळीच या फैसल्याला सुरवात होईल आणि मग नॉटींगहॅमच्या खेळपट्टीचे खरे रंग दिसायला सुरवात होईल.

Monday, July 25, 2011

फक्त रैनाच लढला! (लंडन डायरी)


लॉर्डसवरील कसोटीचा निकाल चौथ्याच दिवशी नक्की झाला होता. एकतर भारत हरणार किंवा सामना ड्रॉ राहणार हे स्पष्ट होते. पाचव्या दिवशी पराभवावर शिक्कामोर्तब झाले. चौथ्या डावामध्ये फलंदाजी करणे हे नेहमीच अवघड असते. त्यातही जर 458 धावांचे ओझे तुमच्या मानेवर असेल तर फलंदाजी करताना देव आठवणारच; मात्र जगातील सर्वात भक्कम फलंदाजी आणि कसोटी क्रमवारीतील क्रमांक एकच्या संघाकडून निदान प्रतिकार तरी होण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात लक्ष्मणचा काहीसा आणि त्यानंतर रैना वगळता इतरांनी त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ केलाच नाही. त्यातही दैवाचे सगळे फासे भारताच्या विरोधातच पडले. एकतर गंभीर पूर्णतः तंदुरुस्त नसताना मैदानात उतरला आणि सचिन अंगात ताप असताना फलंदाजीला आला. त्यामुळे भारतीय फलंदाजीही डळमळली. कालच्या आश्‍वासक सुरवातीमुळे द्रविड आणि लक्ष्मण अखेरच्या दिवशीही भक्कम खेळी करतील ही अपेक्षा अँडरसनने मोडून काढली. पहिल्या डावात भारताचे वस्त्रहरण रोखणाऱ्या द्रविडला दुसऱ्या डावात फारशी संधीच मिळाली नाही. जखमी गंभीर मैदानात उतरला खरा पण कोपराच्या कळा सोसत त्याने कशीबशी 22 धावांची मजल मारली. त्यानंतर मात्र सचिन, लक्ष्मण, सचिन, धोनी, हरभजन यांना अँडरसन, ब्रॉड जोडगोळीने फारशी संधी दिली नाही. एकीकडे रैनाने नांगर टाकलेला असताना त्याला दुसऱ्या बाजूने पुरेशी साथच मिळाली नाही. त्याने ब्रॉड, अँडरसन, ट्रेमलेट स्वॉन यांचा मारा खेळून काढताना त्यांना चौकार लगावण्याचे धारीष्ट्यही दाखविले. या ऐतिहासीक सामन्यातील भारताचा पराभव आधी टाळण्याचा आणि नंतर लांबविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. सराव सामन्यात शतक झळकवून लॉर्डस्‌वर खेळण्याची संधी मिळविलेल्या रैनाने दुसऱ्या डावामध्ये इंग्लंड गोलंदाजीचा कसून प्रतिकार केला. लढाऊ वृत्ती दाखवली. त्याने खेळपट्टीचा अंदा
ज घेऊन फलंदाजी केली. आक्रमक स्वभावाला पूर्णपणे मुरड घालून अत्यंत संयमाने फलंदाजी केली. 78 धावांच्या खेळीसाठी त्याने 136 चेंडू घेतले. तब्बल 207 मिनिटे त्याने किल्ला लढविण्याचा प्रयत्न केला. त्याच्या सोबत आणखी एक दोन मोठ्या भागीदारी झाल्या असत्या तर हा सामना भारतीय वाचवू शकले असते; मात्र प्रत्यक्ष मैदानात सायबांच्या गोलंदाजीने भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले ते पाडलेच. एकटा रैनाच अखेरपर्यंत लढत राहिला. पहिल्या दिवसापासूनच अनेक बाबी भारतीय संघाच्या विरोधात गेल्या. झहीर जायबंदी झाला, गंभीर जखमी झाला, सचिन ताप अंगात असताना खेळला. तर गोलंदाजी करून काही प्रमाणात आपल्या गोलंदाजांना विश्रांती देण्याचा प्रयत्न करणारा कर्णधार धोनी फलंदाजी करताना दोन्ही डावांत सपशेल अपयशी ठरला. जिव्हारी लागला असला तरी या पराभवातून भारतीय संघ शिकेल आणि नॉटींगहॅममध्ये शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या कसोटीमध्ये पुन्हा नव्याने उभारी घेईल ही आशा आहे.

Sunday, July 24, 2011

कोण-कोण होणार तारणहार?(लंडन डायरी)


लॉर्डस्‌वरील कसोटीत चौथ्या दिवशी सकाळी भारतीय गोलंदाजीला अचानक धार आली आणि पहिल्या डावात पूर्णपणे निष्प्रभ ठरलेला इशांत शर्मा भेदक बनला. त्याने सायबांना गुंडाळून भारताला ड्रायव्हर सीटवर नेण्याचा जोरदार प्रयत्न केला. त्यामध्ये तो काही प्रमाणात यशस्वीही झाला; मात्र दुसऱ्या बाजूने तेवढ्याच ताकदीने साथ मिळाली नाही. साहेबांचे सहा गडी 107 धावसंख्येत तंबूत पाठविल्यानंतर इंग्लंड काहीसे बॅकफुटवर आले होते; मात्र पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही प्रायर आडवा आला आणि या वेळी त्याने ब्रॉडला सोबतीला घेतले. पहिल्या दोन तासांतील नूर दोघांनी नंतरच्या सत्रांमध्ये पूर्णपणे बदलून टाकला. पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजीवर वर्चस्व गाजवून पाहता पाहता संघाची आघाडी चारशेच्यावर नेली; मात्र खेळपट्टी फलंदाजीला साथ देत आहे हे पाहून स्ट्रॉसने डाव लगेच सोडण्याची घाई केली नाही. मग मिळालेल्या संधीचा फायदा उठवून प्रायरने लॉर्डस्‌च्या यादीत आपले नाव कोरताना सुरेख शतकी खेळी साकारली. संघाला पुन्हा ड्रायव्हरसीटवर नेताना त्याने व ब्रॉडने भारतीय गोलंदाजी फोडून काढली. धोनीने पुन्हा एकदा गोलंदाजी करून ही जोडी फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रायर-ब्रॉडपुढे कोणाचीच डाळ शिजली नाही. अखेरचा सुमारे दोन तासांचा खेळ शिल्लक असताना प्रायरने शतक पूर्ण केले आणि स्ट्रॉसने त्यांना बाल्कनीतून माघारी येण्याची खूण केली.
कसोटी वाचविण्यासाठी चौथ्या दिवसाचे अखेरचे दोन तास आणि पाचवा संपूर्ण दिवस खेळण्याचे आव्हान घेऊन मैदानात उतरणाऱ्या भारतीय संघाला पहिल्या डावातील तारणहार द्रविडला-मुकुंदसह सलामीला उतरवावे लागले. प्रायरच्या स्विपवर गंभीरच्या कोपरावर बसलेला जोरदार तडाखा सहन न होण्यासारखाच होता. द्रविडने मुकुंदसह परवाची उर्वरीत खेळीच सुरू केल्याप्रमाणे सुरवात केली. पहिल्या चेंडूपासूनच तो मस्तपैकी सेट होऊन खेळला. मुकुंदने आश्‍वासक सुरवात केली; पण अनुभवाची कमतरता जाणवली आणि पुन्हा एकदा चेंडू स्टंपवर ओढवून तो बाद झाला. त्यानंतर लक्ष्मण मैदानावर आला आणि भारताच्या या सिनीयर जोडीने दिवसभरात भक्कमपणे किल्ला लढवून कोणतेही खिंडार पडू ने देण्याची काळजी घेतली. विशेष म्हणजे कसोटी वाचविण्याचे ओझे डोक्‍यावर असताना दोघांनी अत्यंत पॉझीटीव्ह खेळ केला. लक्ष्मणने एका षटकात सलग तीन चौकार मारून सामना जिंकण्यासाठीही प्रयत्न करता येऊ शकतो हे दाखवून दिले. आता अखेरच्या दिवशी सामना वाचविण्यासाठी संघासाठी तारणहार होण्याची भूमिका कोण-कोण बजावतो हे पहावे लागेल. त्याचबरोबरीने कोलकत्त्यात ज्याप्रमाणे लक्ष्मणने काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पिछाडीवरून येऊन भारतीय संघाला जिंकून दिले होते तसा पराक्रम आताही करणार का हीच उत्सुकता आहे. त्यासाठी 378 धावांचा डोंगर पार करण्याची अवघड कामगिरी त्यांच्यापुढे असेल आणि आणि जेव्हा-जेव्हा भारतीय संघ संकटात सापडला आहे तेव्हा लक्ष्मण त्याच्या पूर्ण क्षमतेने बचावासाठी धावल्याचा लौकिक आहे. अखेरच्या दिवशीही तो आपला हा लौकिक द्रविडच्या साथीने कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे. फक्त या दोघांसोबत सचिन, धोनी, रैना आणि जखमी गंभीर यांनीही आपला वाटा उचलण्याची आवश्‍यकता आहे.