Saturday, August 13, 2011

पायउतार...(इंग्लंड डायरी)


भारतीय क्रिकेटचं काहीतरी बिनसलं आहे हे नक्की. अति क्रिकेट, मिळणारा अतिपैसा, विश्‍वकरंडक विजेतेपदाचे डोक्‍यात गेलेलं यश, खेळाबद्दल खेळाडूंमध्ये असलेली बेफिकीरी आणि काही देणं घेणं नसल्यासारखा मैदानावरील वावर. या सगळ्यांचा परिपाक इंग्लंड दौऱ्यात दिसला आणि शनिवारी त्यावर कळस चढला. श्रीशांत बाद झाला आणि भारतीय संघ एक डाव 242 धावांनी पराभूत झाला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाण्या पराभवापैकी एक पराभव नोंदला गेला. गेली दोन वर्षे भारतीय क्रिकेटच्या सुरू असलेल्या घोडदौडीला आज सायबांनी लगाम घातला.
जगातली सर्वात भक्कम फलंदाजी असणाऱ्या संघाचे बुरुज ब्रॉड, अँडरसन, ब्रॉस्नन यांनी एकापाठोपाठ उध्वस्त केले आणि कसोटी क्रिकेटच्या अव्वलस्थानाच्या सिंहासनावर हक्क सांगितला. क्रिकेटची मायभूमी गेली कित्येक वर्षे अव्वलस्थानाला पोरकी झाली होती. भारतीय संघाला एजबस्टनमध्ये नमवून सायबांनी हा मुकुट हिसकावून घेतला. भारतीय संघ अव्वस्थानावरून पायउतार झाला. गेल्या तिन्ही सामन्यांमध्ये इंग्लंड संघाने केलेली कामगिरी खरोखरच कौतुक करण्यासारखी आहे. त्यांच्या फलंदाजांनी वसुली केल्याप्रमाणे भारतीय संघाच्या गोलंदाजांना ठोकून काढले. धावांच्या राशी ओतल्या. भारतीय क्रिकेटने भविष्यात गोलंदाजीसाठी खास मेहनत घेतली पाहिजे हे वाजवून सांगितले. झहीरखानशिवाय भारतीय गोलंदाजी रांगल्याचं या दिवसांत पहावयास मिळालं. इतर गोलंदाजांना इंग्लंडच्या फलंदाजांना रोखणे जमलेच नाही. त्याच्याबरोबर उलट परिस्थिती इंग्लंड गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची केली. पहिल्या दोन सामन्यात राहुल द्रविड आणि अखेरच्या सामन्यात कर्णधार धोनी वगळता एकाही भारतीय फलंदाजाला त्यांनी हुकुमत गाजवू दिली नाही. उलट प्रत्येक धाव घेण्यासाठी त्यांना कमालीचा घाम गाळण्यास भाग पाडले. क्रिकेटच्या देवाचे महाशतक हा क्रिकेटरसिकांमध्ये चेष्टेचा विषय बनला. एकाही सामन्यात त्याची बॅट बोलू दिली नाही. इतरांनाही त्यांनी फारशी करामत दाखवू दिलीच नाही. करामत दाखविण्यापूर्वीच त्यांनी आपल्या खेळपट्ट्यांना आपल्याच मुठीत ठेवले आणि त्यावर भारतीय फलंदाज अगदी टिपून बाद केले. येथील वातावरण, खेळपट्टी आणि हात-हात स्विंग होणारे चेंडू यांच्या चक्रव्युहातून भारतीय संघ बाहेर पडूच शकला नाही. भारतीय संघाचा तारणहार असा गाजावाजा करत बोलावलेला सेहवाग फलंदाजी विसरल्याप्रमाणे अखेरच्या कसोटी सामन्याच्या दोन्ही
डावांत खेळला. उभ्या उभ्या फटके मारण्याची त्याची सवय जाता जात नाही हेच खरे. त्यातही समोर जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहेत हेही तो विसरला. परिणाम त्याला दोन्ही डावांत भोपळा फोडताच आला नाही आणि इतर फलंदाज प्रतिकार करण्यापूर्वी बाद होत गेले. त्यामध्ये नवा-जुना असा भेदच राहिला नाही. मोठी खेळी करून संघाला बाहेर काढायचे असते हेच बहुधा भारतीय संघ विसरला. झहीरमुळे लंगडी झालेल्या गोलंदाजीची धुरा प्रवीणकुमारने वाहण्याचा प्रयत्न केला खरा पण; त्याला दुसऱ्या बाजूने जरासुद्धा आश्‍वासक साथ मिळाली नाही. इशांत, श्रीशांत यांना खूप काही शिकावे लागणार हे या दौऱ्याने अधोरेखीत केले. गॅरी कर्स्टन यांनी प्रशिक्षकपदावर आल्यानंतर भारतीय संघाला क्रिकेटच्या सर्व प्रकारांत अव्वलस्थानी पोचविण्यासाठी मेहनत घेतली. यामध्ये सातत्य ठेवण्यात सध्यातरी डंकन फ्लेचर यांना अपयश आले आहे. गेलेली अब्रू आणि पत परत मिळविण्यासाठी त्यांना कंबर कसून कामाला लागावे लागेल हे नक्की.

No comments: