Saturday, August 20, 2011

धुलाई (इंग्लंड डायरी)


भारतीय संघाचे नष्टचक्र सुरूच आहे. शुक्रवारी पीटरसन (175) आणि इयान बेलने (नाबाद 181) भारतीय जखमांवर अक्षरशः मीठ चोळले. त्यांनी अर्धमेल्या भारतीय गोलंदाजीवर घणाघाती हल्ला केला आणि धावांची पुन्हा एकदा लयलुट केली. काही तरी चुकत आहे; पण नेमकं काय हे कर्णधार धोनीसह कोणालाच कळेनासे झाले आहे. खराब कामगिरी होऊ शकते याबद्दल कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. पण एवढी वाईट कामगिरी गेल्या काही वर्षांत भारतीय संघाची झालेली नव्हती. पहिल्या पराभवानंतर भारतीय संघ "बाऊन्स बॅंक' करून सायबांसोबत दोन हात करेल या आशेचा पार चक्काचूर झाला. भारतीय संघ सपाटून मार खात आहे आणि सायबांचे फलंदाज भारतीय गोलंदाजीला धोपटून काढत आहेत. भारतीय संघाची अवस्था अक्षरशः गलीतगात्र झालेली आहे.
खेळामध्ये हारजीत नक्कीच असते; मात्र पराभवानंतर पेटून उठण्याची वृत्ती दाखविणेही गरजेचे असते. यापूर्वी भारतीय संघाने कितीतरी वेळा अशी वृत्ती दाखवून ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघांनाही नामोहरम केले आहे. ऑस्ट्रेलियाला पराभूत करता येते याचा वस्तूपाठ भारतीय संघानेच साऱ्या क्रिकेटजगताला घालून दिला. कित्येक सामन्यामध्ये अगदी बॅकफुटवरून येऊन अवघड विजय मिळवून दाखवून भारतीयांना जल्लोष करण्याची संधी याच भारतीय संघाने दिलेली आहे. मात्र सध्याचे खेळाडू जान नसल्याप्रमाणे मैदानात उतरताना दिसत आहेत. मैदानावरील त्यांचा वावरही गेल्या काही दिवसांत खांदे पाडूनच सुरू आहे. चौथ्या कसोटीमध्येही गेल्या तीन कसोटी सामन्यांतील अपयशाचा सिलसिला सुरूच राहिला. अवघे तीन गडी बाद होताना सायबांनी धावांचा डोंगर उभा केला. भारतीय संघाचा व्हाईटवॉश करण्याच्याच इराद्याने इंग्लंडचे फलंदाज मैदानात उतरल्याचे दिसते तर अब्रू कशी वाचवता येईल या विवंचनेत भारतीय गोलंदाज आहेत. कधी नव्हे एवढी भारतीय गोलंदाजी मोडून पडलेली आहे. बळीच मिळत नसल्याने त्यांचा आत्मविश्‍वासच गमावलेला आहे. हरभजन निष्प्रभ ठरला आणि कसोटीमधून बाहेर पडला. त्याच्या जागी आलेल्या मिश्राला अद्याप काहीही करामत दाखविता आलेली नाही. श्रीशांत, इशांत आणि आर. पी. सिंग यांना गोलंदाजीची लयच सापडलेली नाही. त्यांच्या गोलंदाजीमध्ये कोठेही आक्रमकता दिसत नाही आणि जेव्हा त्यांनी संधी निर्माण केल्या तेव्हा त्या क्षेत्ररक्षकांनी वाया घालविल्याचेही आपण पाहतो आहोत. गोलंदाजी, क्षेत्ररक्षणापाठोपाठ फलंदाजीतही खेळपट्टीवर नांगर टाकायची जिद्द कोणाचीच दिसत नाही. सर्वच आघाड्यांवर निष्प्रभ ठरणाऱ्या भारतीय संघावर निर्णायक घाव घालण्याच्या इराद्याने पीटरसन, बेल यांनी फलंदाजी करून संघाच्या नजरेच्या टप्प्यात यश आणून ठेवलेले आहे. शुक्रवारी त्यांनी कोणत्याही गोलंदाजाला दयामाया न दाखविता फोडून काढले आहे. शनिवारीही ते धावांचा डोंगर उभा करतील आणि उरलेल्या अडीच दिवसांत भारतीय संघाचे शिरकाण करण्याचा प्रयत्न करतील हे नक्की.

No comments: