Thursday, July 9, 2009
अस्पर्श अन रमणीय...
अगर फिरदौस...बररुए...हमी अस्त, जमी अस्त, जमी अस्त....अशी, स्वर्गीय अनुभूती देणारी अनेक ठिकाणे या भूतलावर आहेत. केरळचा विचार केल्यास हे राज्य पृथ्वीवरील स्वर्गच आहे. म्हणूनच केरळला "गॉडस् ओन कंट्री' म्हटले जाते. मोसमी पावसाचे प्रवेशद्वार असणाऱ्या केरळवर निसर्गसौंदर्याने मुक्तहस्ते उधळण केलेली आहे. समुद्रावरून साऱ्या किनारपट्टीला कवेत घेणारा भन्नाट वारा. माडांच्या सळसळणाऱ्या आवाजाने भरून राहिलेला परिसर. बॅकवॉटरच्या पाण्याशी सलगी करताना सूर्यकिरणांनी पाण्यावर बनविलेल्या चांदण्यांचे दागिने मिरवत प्रवास करणाऱ्या छोट्या-छोट्या नौका. जैवविविधतेने नटलेले मुन्नार, पलक्कड, पेरियारचे जंगल. हजारो वर्षांची परंपरा जपणारा आयुर्वेदाचा समृद्ध वारसा. हत्तींचे माहेरघर असलेले हे राज्य त्यामुळेच पर्यटकांच्या आवडीचे राज्य म्हणून अव्वल स्थानी आहे.1980 पर्यंत केरळची अवस्था कस्तुरी मृगाप्रमाणे होती. निसर्गसौंदर्याची खाण असूनही त्या खाणीचा उपयोग करून विकास साधण्याचे कसबच त्यांना साधलेले नव्हते. पर्यटक येत होते, पर्यटनाचा आनंद त्यांच्या परीने लुटत होते; मात्र त्याचा फारसा फायदा स्थानिकांना होत नव्हता. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून पैसाही मिळवता येतो, याबाबत फारसा विचार झालेला नव्हता. त्यानंतर मात्र चित्र बदलले. केरळ पर्यटन विकास महामंडळाने विविध योजना राबविल्या आणि गेल्या पंचवीस वर्षांत त्यांनी केरळच्या पर्यटन उद्योगाचा चेहरामोहराच बदलून टाकला. "गॉडस् ओन कंट्री' ही कॅच लाईन घेऊन केरळने पर्यटनाचे सर्व आयाम बदलून टाकले. जगातले सर्वांत झपाट्याने पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होणारे राज्य असा मानही पटकाविला. ल भौगोलिक परिस्थितीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेताना हजारो वर्षांच्या परंपरांना ऊर्जितावस्था आणली आणि ती जागतिक स्तरावर नेऊन पोहोचविली.पर्यटनच्या अंगाने केरळाच विचार केला असता त्याची पाच भागात विभागणी होऊ शकते. स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे, येथील बॅकवॉटर, जंगले आणि थंड हवेची ठिकाणे आणि महत्त्वाचा वाटा उचलणारे येथील आयुर्वेदिक औषधोपचार. या सर्व घटकांचा पर्यटनासाठी केरळ सरकारने अत्यंत खुबीने उपयोग केला आहे. पर्यटकांच्या वाढत्या ओघाची आकडेवारी पाहिली की पर्यटन वाढीसाठी केरळने घेतलेली मेहनत जाणवतेच. 2006 मध्ये केरळला साडेआठ लाखांवर पर्यटकांनी भेट दिली होती. 2008 मध्ये हाच आकडा साडेनऊ लाखांवर गेला. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांत विदेशी पर्यटकांचे प्रमाणही 25 टक्क्यांवर गेले आहे. त्यातून मिळणारे परकीय चलनही त्याच पटीत वाढले आहे.1980 मध्ये केरळची अर्थव्यवस्था काहीशी नाजूक बनलेली होती. साक्षरतेचे प्रमाण मोठे असल्यामुळे येथे साक्षर जास्त; पण त्यांच्या हाताला काम नाही, असे चित्र होते. त्यामुळे येथे शिकलेल्यांनी आखाती देशांची वाट धरली होती. येथे शिकायचे, आखाती देशांमध्ये जायचे, तेथे पैसा कमवायचा आणि पुन्हा येऊन काहीबाही उद्योगधंदा करावयाचा असे चक्र सुरू होते. या जाण्या-येण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणावर प्रवासी कंपन्या सुरू झाल्या होत्या. त्यामुळे काही प्रमाणात पर्यटनाच्या जवळ जाणारा उद्योग मूळ धरू लागला. एकीकडे आखाती देशात जाण्यासाठी कंपन्या कार्यरत होत असतानाच, काही कंपन्यांनी राज्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी सुविधा देण्यास सुरवात केली. पर्यटनाच्या माध्यमातून पैसा करण्याचा आणखी एक मोठा स्त्रोत बेरोजगारांच्या हाताला उपलब्ध झाला आणि पाहता पाहता या व्यवसायाने जोम धरला. 2000 मध्ये केरळमध्ये पर्यटन व्यवसाय एकदम भरभराटीला आला. राज्याला डॉलरमध्ये कमाई होऊ लागली. अनेक बेरोजगार हातांना काम मिळाले. अनेक कलावंतांना न्याय मिळू लागला, अनेक कलाकारांच्या कलांचे चीज होऊ लागले. 2003 मध्ये जगातील सर्वांत वेगाने विकसित होणारे पर्यटन राज्य म्हणून केरळचा नावलौकिक झाला. सध्या येथे वाढीचा वेग 13.31 टक्के इतका झाला आहे.वैद्यकीय पर्यटनाची नवी दिशाऍलोपॅथी उपचारांच्या अतिरेकाला कंटाळून अनेकांनी आयुर्वेदाचा मार्ग धरला. केरळमध्येच वर्षानुवर्षे आयुर्वेदिक उपचार पद्धती सुरू असून नव्या जमान्यामध्ये त्यामध्ये बदल तसेच सुधारणा घडवून ती अधिक सक्षम बनविली आहे. याचा पर्यटनाच्या दृष्टीने खुबीने उपयोग करून घेताना केरळ सरकारने आयुर्वेदिक उपचार केंद्रांसाठी भरघोस सुविधा देऊन ती केंद्रे सुसज्ज बनविली. जुन्या उपचार पद्धतीमध्ये आमूलाग्र सुधारणा आणून त्याचे ब्रॅंडिंग केले. त्यांच्या मोठ्या प्रमाणात जाहिराती केल्या. मोठमोठी आयुर्वेदिक केंद्रे उभारण्यासाठी प्रोत्साहन, सोयी-सवलती दिल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर येथे पर्यटक उपचार करून घेण्यासाठी येतात.केरळ पर्यटन विकास महामंडळाने खास केरळी पद्धतीने आयुर्वेदिक उपचार करण्यासाठी रिसॉर्टची उभारणी केली आहे.एकूण काय तर नियोजनबद्ध विकासामुळे केरळातले पर्यटन बहरले आहे.---------------पर्यटनाची प्रमुख वैशिष्ट्येकेरळला लाभलेल्या अनेक देणग्यांपैकी 580 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा ही सर्वांत मोठी देणगी आहे. या समुद्रकिनाऱ्यावरच केरळच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा बऱ्यापैकी तोलला आहे. या किनाऱ्यांचा बहुतांश भाग वालुकामय आहे. येथील कोवालम् बीचला सर्वाधिक पर्यटक भेट देतात. याशिवाय अलप्पुझाचे बॅकवॉटर पर्यटकांना खुणावते.बॅकवॉटरच्या माध्यमातून केरळ सरकारला कोट्यवधी रुपये मिळतात. येथे 38 नद्या, सुमारे पंधराशे किलोमीटर लांबीचे कालवे, तसेच पाच मोठे तलाव जोडले गेलेले आहेत. येथे प्रामुख्याने बोटींमधूनच वाहतूक करण्यात येते. पूर्वी फक्त वाहतुकीसाठी असणाऱ्या या बोटींचा उपयोग व्यावसायिकदृष्ट्या होऊ लागला आणि अनेकांची आर्थिक गणिते सुटली. येथे असणाऱ्या विविध प्रकारच्या बोटींमधून पर्यटक केरळच्या अंतर्भागातील सौंदर्याचा आनंद यथेच्छ लुटतात. अलेप्पीला "पूर्वेकडील व्हेनिस' असेही म्हणतात. ऑगस्टमध्ये येथे ओनमनिमित्त होणाऱ्या नावांच्या शर्यती पाहण्यासाठी देशविदेशातून पर्यटक मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावतात.राज्यात थंड हवेची ठिकाणेही पर्यटकांना खेचून घेतात. पश्चिम घाटाच्या बहुतांश पर्वतरांगा जंगलांनी व्यापलेल्या आहेत; तर उर्वरित भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर चहा व कॉफीचे मळे आहेत. यापैकी काही मळे दोनशे वर्षांपूर्वीचे आहेत. जंगलाने व्याप्त या राज्यात हत्तींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. येथे अनेक खेड्यांमध्ये हत्तींचा रोजच्या कामामध्येही उपयोग करून घेतला जातो. हत्तींना खास प्रशक्षण देण्यासाठी पाथनमिथ्थीताजवळ कोन्नी प्रशक्षण केंद्रही आहे. हत्तींशिवाय येथील जंगलांतून वाघ, बिबटे, सिंह, उडणारी खार, अस्वले तसेच माकडांचे तसेच सापांच्या विविध जातीही आढळतात. त्यामुळे येथे आयुर्वेद उपचार केंद्रांना मोठे महत्त्व आहे.
Subscribe to:
Posts (Atom)