महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणात भाविकांची नेहमीप्रमाणे वर्दळ. कोणी देवीकडे काही मागायला आलेला, कोणी असाच, कोणी अभ्यासासाठी, कोणी कोणाला तरी भेटण्यासाठी, कोणी मनःशांतीसाठी, कोणी रोजच्या धबडग्यातून बदल म्हणून. मीही त्यापैकीच एक. त्या दिवशी आत दर्शनाला जाण्यापूर्वी बाहेर रेंगाळत होतो. एवढ्यात फुग्याच्या चर्र चर्र आवाजाच्या दिशेने छोटीने केलेली खूण आणि तिच्या इटुकल्या डोळ्यांतून होत असलेल्या मागणीकडे माझे लक्ष गेले आणि मी त्या दिशेने ओढला गेलो. समोरच्या छोकऱ्याने फुगा तिच्या समोर धरला आणि तिच्या चेहऱ्यावर आनंदाने फेर धरला. फुगा हाती येताच तिच्या मुठीमध्ये आनंद शिगोशिग भरला आणि डोळ्यांच्या विस्फारलेल्या बाहुल्यांत फुग्याचे रंग उमटू लागले. तिच्या चेहऱ्यावरील आनंदाचे क्षण मी टिपत असताना, पुन्हा एकदा फुग्यांवर हात घासून काढलेला चर्र..चर्र..आवाज माझ्या कानावर आला आणि मी त्या फुगेवाल्या छोकऱ्याकडे ओढला गेलो.
त्याच्यापासून काही अंतर ठेवून उभा राहिलो आणि त्याच्या नकळत त्याला वाचू लागलो. वय जेमतेम 13-14 वर्षांचे, चण छोटीशी, काहीसा गोरा, स्मार्ट, गालावर खळी असावी आणि डोळ्यांत छानशी चमक.
त्याने एक फुगा काढला. आस्ते.. आस्ते फुगविला. एकदा न्याहाळला. मनासारखा फुगल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर उमटले. सराईतपणे फुग्याला त्याने रबर लावला आणि सोडून दिला; मग आणखी एक... त्यानंतर एक... असे काही फुगे त्याने फुगविले.
फुगा फुगविताना त्याच्या गळ्याच्या ताणल्या जाणाऱ्या शिरा स्पष्ट दिसत होत्या आणि त्यामुळे त्याला होणाऱ्या वेदनाही जाणवत होत्या. मध्येच येणाऱ्या एखाद्या गिऱ्हाईकाला हवा तो फुगा तो देई आणि पुन्हा त्याचे पुढचे काम सुरू राही.
आता मात्र मला राहावले नाही. मी पुढे झालो आणि त्याच्या पाठीवर थाप टाकली. मघाशीच फुगा घेतलेला असल्याने तो ओळखीचं हसला.
काय रे रोज इथंच असतोस?
नाही, शुक्रवार, शनिवार आणि रविवारीच फक्त असतो.
विक्री किती होते?
होते दोनअडीचशे रुपयांची; पण छोटी-छोटी पोरं फुगं घेतात आणि आनंदानं जातात. मला पैसे मिळतात; पण त्या पोरांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून बरं वाटतं. मलापण आनंद होतो.
शाळेत जातोस की?
जातो तर! आठवीत आहे. आता सुटीमुळे रोजच इथं असतो.
फुगे फुगवायला पंप नाही तुझ्याकडे?
आहे; पण मनासारखे फुगे फुगत नाहीत.
त्रास होत नाही?
होतो की! जीव पार घाईला येतोय. सारखी तहान लागते.
मग काय करतोस?
काही नाही थुंकी गिळतो. हे त्याने अगदी सहज सांगितलं.
(बोलत बोलत त्याचा उद्योग सुरू होता)
घरी कोण कोण असतं? ते पण हाच धंदा करतात? माझा पुढचा प्रश्न.
घरी आई-बाबा आणि आजी आहे. बाबा इथंच असतो, चुलता, आज्जापण मंदिर आणि परिसरात फुगंच विकतात.
शाळेचं काय?
रोज जातो, संध्याकाळी शाळा सुटली की तासभर अभ्यास करतो आणि मग येतो फुगे विकायला.
कंटाळा येत नाही?
कंटाळा येऊन कसं चालंल? घरी मदत करायला नको का?
त्याच्या उत्तरानंतर माझे प्रश्नच संपले. एवढ्या लहान वयात एवढी जाण. कुठुन मिळत असेल सारं पेलण्याचं बळ!
"अहो चला!'ने भानावर आलो आणि जायला निघालो. न राहवून आणखी एक फुगा घेतला. छोटी डबल खूश. पैसे दिले आणि चालू लागलो.
काहीसं आठवलं म्हणून पुन्हा माघारी वळलो. त्या छोकऱ्याजवळ आलो आणि विचारले, नाव काय रे तुझे?
जुबेर... आणि तो छानसं हसला.
त्याचा हसरा चेहरा क्लिक झाला. एवढा कष्टावूनही तो आनंदी वाटला आणि मी छोटीच्या चेहऱ्यावरील आनंदात जुबेरचे समाधान कोठे सापडते का, हे शोधत बाहेर पडलो.
Wednesday, October 28, 2009
Saturday, October 3, 2009
कोजागिरीला चांदणेच फितूर
को जागर्ति?.... कोण जागं आहे? असं विचारत अश्विन पौर्णिमा येते आणि शरदाचं चांदण सर्वत्र भरून राहतं. केसरयुक्त दुधाचा आस्वाद घेत चंद्रबिंब न्याहाळणं आणि त्याच्या साक्षीने गप्पांची मैफल रंगविणे यापरता आनंद तो कोणता. कोजागिरीला बहुतेक असाच काहीसा माहौल सर्वत्र असतो. ठिकठिकाणी मित्रमंडळींचा कट्टा जमतो आणि उत्साहात पौर्णिमेचं चांदणं वेचलं जातं.
यंदा मात्र या साऱ्यावर पावसाने अक्षरशः पाणी ओतले. गेले चार दिवस पाऊस मी म्हणतोय. काही ठिकाणी तर तो सुपाने ओततोय. सिंधुदुर्गसह कोकण किनारपट्टीवर पावसाच्या तांडवाने सारी जनता भयभीत झाली आहे. गेले चार दिवस येथील लोक रात्र जीव मुठीत घेऊन कंठत आहेत. त्यामुळे कोठेही फारसा गप्पांचा फड रंगलेला दिसला नाही आणि फेसाळणारे दुधाचे ग्लासही एकमेकांना भिडल्याचे दिसले नाहीत. चार भिंतींच्या आत काही प्रमाणात ते भिडले असतील तरच. चंद्रच ढगांआड लपून फितूर झाल्याने मग हा आनंद यंदा तरी नशिबी नाही. असो पुढच्या वर्षी कोजगिरीला ही कसर भरून काढावी लागणार हे नक्की
यंदा मात्र या साऱ्यावर पावसाने अक्षरशः पाणी ओतले. गेले चार दिवस पाऊस मी म्हणतोय. काही ठिकाणी तर तो सुपाने ओततोय. सिंधुदुर्गसह कोकण किनारपट्टीवर पावसाच्या तांडवाने सारी जनता भयभीत झाली आहे. गेले चार दिवस येथील लोक रात्र जीव मुठीत घेऊन कंठत आहेत. त्यामुळे कोठेही फारसा गप्पांचा फड रंगलेला दिसला नाही आणि फेसाळणारे दुधाचे ग्लासही एकमेकांना भिडल्याचे दिसले नाहीत. चार भिंतींच्या आत काही प्रमाणात ते भिडले असतील तरच. चंद्रच ढगांआड लपून फितूर झाल्याने मग हा आनंद यंदा तरी नशिबी नाही. असो पुढच्या वर्षी कोजगिरीला ही कसर भरून काढावी लागणार हे नक्की
Tuesday, September 29, 2009
यंदाचा विजय मूळस्थानचा
विट्यात लाखो नागरिकांच्या साक्षीने मूळस्थानच्या सिद्धनाथाच्या पालखीने यंदा विजयादशमीला शीलंगणाचे सोने लुटले. अखेरच्या टप्प्यात अत्यंत अटीतटीने झालेली ही शर्यत मूळस्थानच्या पालखीने जिंकली. विट्याची रेवणनाथाची पालखी पळविणाऱ्या खांदेकऱ्यांनी केलेली प्रयत्नांची शर्थ अखेरच्या टप्प्यात काहीशी कमी पडली आणि सलग तिसऱ्या वर्षी शर्यत जिंकण्याची संधी यंदा हुकली. पहिल्यापासून अखेरपर्यंत अंतर ठेवून विजय मिळविताना मूळस्थानच्या कसबी खांदेकऱ्यांनी कोठेही विजय हुलकावणी देणार नाही याची काळजी घेतली. विट्याचे खांदेकरी अखेरच्या टप्प्यात काहीसे कमी पडले आणि पिछाडी भरून काढून विजय मिळविण्यात कमी पडले. कोण जिंकले कोण हरले यापेक्षा यंदा पालख्यांचा खेळ जिंकला.
विट्याची वैशिष्ट्यपूर्ण विजयादशमी
विजयादशमी सीमोल्लंघनाचा सण. वाईट प्रवृत्ती नष्ट करून नवे घडविण्याच्या दिशेने पाऊल टाकण्याचा सण. दुष्ट प्रवृत्ती-मनोवृत्ती, तमोगुण, रजोगुण दूर सारण्यासाठी संकल्प सोडण्याचा दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस. या दिवशी कोणतेही कार्य सुरू करावे आणि ते निर्विघ्नपणे पार पडावे, ही आपली संस्कृती. या संस्कृतीला जोडून काही परंपराही रूढ झाल्या आहेत. कोल्हापूर, म्हैसूर येथे साजरे होणारा शाही दसरा हे त्याचेच मूर्तिमंत रूप. येथील सोहळ्याएवढा मोठा नसला तरी बहुतेक महाराष्ट्राला परिचित असलेला आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण दसरा विट्याचा. सांगली जिल्ह्यातील विट्यात विजयादशमीला देवांना (मुखवट्यांना) पालख्यांत ठेवून त्यांना पळविण्याची अनेक वर्षांची परंपरा असून ती आजही तेवढ्याच श्रद्धेने, भक्तीने आणि उत्साहाने जपली जाते. नोकरी-कामधंद्यानिमित्त देशभर असलेले विटेकर व परिसरातील नागरिक ही शर्यत पाहण्यासाठी आवर्जून या दिवशी उपस्थिती लावतातच.आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्रोत्सवास प्रारंभ होतो आणि विविध मंदिरांत विधिपूर्वक घटस्थापना केली जाते. या कालावधीमध्ये मंदिरांतील मूर्तींना वेगवेगळे पोशाख करतात. विजयादशमी हा मुख्य दिवस असतो आणि याच दिवशी दुपारी पालख्यांच्या शर्यती रंगतात.मूळस्थानची म्हणजे सुळेवाडी येथील सिद्धनाथाची पालखी व विट्यातील सोनार गल्लीमधील रेवणनाथाची पालखी यांच्यामध्ये ही शर्यत होते. फार पूर्वी लाकडाचाच अधिक उपयोग करून या पालख्या बनविल्या जात. त्यामुळे त्या खूप वजनदार असत. तरीही कसबी खांदेकऱ्यांमध्ये त्या पळवत नेण्याची रग असे. कालांतराने या पालख्यांमध्ये बदल होत गेले आणि आताच्या पालख्या तुलनेत वजनाने हलक्या बनल्या. पाळणा, त्यावर बसविलेले दांडा आणि त्यावर तांबड्या रंगाची पिंजरी बसविलेली असते. पिंजरी झेंडूच्या फुलांनी व गोंड्यांनी सजविलेली असते. शर्यतीच्या धामधुमीतही ही पिंजरी निघणार नाही अशारीतीने ती घट्ट बांधलेली असते. ही पालखी खांद्यावरून पळविणे सोपी बाब नाही; पण पळविणारे जोशात ही शर्यत खेळतात. पालख्या पळविताना पालखीला खांदा देणे व खांदा काढून घेऊन दुसऱ्याच्या खांद्यावर पालखी देणे ही कला खांदेकऱ्यांना अवगत असणे अत्यंत आवश्यक असते.दुपारी तीनच्या सुमारास नाथ मंदिराच्या प्रांगणात भैरवनाथ, म्हसवडसिद्ध, भैरोबा, सिद्धनाथ (मूळस्थान) व रेवणनाथाच्या पालख्या एकत्र येतात. येथून त्या वाजत-गाजत येथील मुख्य पेठेतील काळेश्वर मंदिराजवळ आणल्या जातात. तेथे मानकऱ्यांच्या हस्ते मूळस्थानच्या पालखीला निरोप दिला जातो आणि विट्यातील रेवणसिद्धाच्या पालखीसोबत शर्यत सुरू होते. पालखी शर्यत सुरू होऊन काळेश्वर मंदिर, पाण्याची टाकी, शिवाजी चौक, बसस्थानकमार्गे शीलंगण मैदान असा शर्यतीचा मार्ग असतो. पालख्यांची शर्यत सुरू होण्यापूर्वी आबदागिरी व छत्र पळवत नेले जाते. त्यामुळे पालखी शर्यत लगेचच सुरू होत असल्याची वर्दी उपस्थितांना मिळते.मूळस्थानची सिद्धनाथाची पालखी पाहुणी असल्यामुळे तिला शर्यतीच्या रेषेपासून दहा पावले पुढे उभे राहण्याचा मान दिला जातो. त्या वेळी विट्याच्या सिद्धनाथाची पालखी डाव्या बाजूला उभी असते. मानकऱ्यांनी निरोपाचे विडे देताक्षणी पालख्यांच्या शर्यतीला प्रारंभ होतो आणि सुरू होतो थरार. साधारण दोन किलोमीटर अंतराची ही शर्यत पाहताना उपस्थितांचे श्वास रोखलेले असतात. "पालखी आली'च्या आरोळ्यांनी परिसर भरून राहतो. दोन्ही पालख्या पळविणारे खांदेकरी पालखी पळविण्यासाठी शर्थ करतात. प्रचंड चुरशीने पंधरा-वीस मिनिटांत होणारा हा शर्यतीचा थरार एकदा तरी अनुभवण्यासारखाच असतो. शर्यत जिंकण्यासाठी एकमेकांच्या पालख्या पकडण्याचेही प्रयत्न होतात.सपकाळ वस्तीवरील ओढ्यापासून चढ सुरू झाल्यानंतर खांदेकऱ्यांची दमछाक होते. या वेळी वाहणाऱ्या गर्दीमधून हेलकावत पालख्या पुढे सरकत असतात. शर्यत पाहण्यासाठी रस्ता दोन्ही बाजूने फुलून गेलेला असतो. पालख्या शीलंगण मैदानावर पोहोचल्यानंतर खांदेकरी आणि उपस्थित एकच जल्लोष करतात आणि मूळस्थानच्या पालखीला निरोप दिला जातो. नंबर कोणाचा आला याला येथे गौण स्थान असते येथे "खेळ' होणे महत्त्वाचे मानले जाते. शर्यत संपल्यानंतर गावातील नागरिक मैदानावर येतात. तेथे सामुदायिकरित्या शमीच्या पानांचे पूजन होते. एकमेकांना आपट्याची पाने अर्थात सोने देऊन शुभेच्छा दिल्या जातात आणि पावले परतीच्या वाटेला लागतात. जाताना चर्चा रंगते काही वेळापूर्वी रंगलेल्या थरारक शर्यतीची.
Thursday, July 9, 2009
अस्पर्श अन रमणीय...
अगर फिरदौस...बररुए...हमी अस्त, जमी अस्त, जमी अस्त....अशी, स्वर्गीय अनुभूती देणारी अनेक ठिकाणे या भूतलावर आहेत. केरळचा विचार केल्यास हे राज्य पृथ्वीवरील स्वर्गच आहे. म्हणूनच केरळला "गॉडस् ओन कंट्री' म्हटले जाते. मोसमी पावसाचे प्रवेशद्वार असणाऱ्या केरळवर निसर्गसौंदर्याने मुक्तहस्ते उधळण केलेली आहे. समुद्रावरून साऱ्या किनारपट्टीला कवेत घेणारा भन्नाट वारा. माडांच्या सळसळणाऱ्या आवाजाने भरून राहिलेला परिसर. बॅकवॉटरच्या पाण्याशी सलगी करताना सूर्यकिरणांनी पाण्यावर बनविलेल्या चांदण्यांचे दागिने मिरवत प्रवास करणाऱ्या छोट्या-छोट्या नौका. जैवविविधतेने नटलेले मुन्नार, पलक्कड, पेरियारचे जंगल. हजारो वर्षांची परंपरा जपणारा आयुर्वेदाचा समृद्ध वारसा. हत्तींचे माहेरघर असलेले हे राज्य त्यामुळेच पर्यटकांच्या आवडीचे राज्य म्हणून अव्वल स्थानी आहे.1980 पर्यंत केरळची अवस्था कस्तुरी मृगाप्रमाणे होती. निसर्गसौंदर्याची खाण असूनही त्या खाणीचा उपयोग करून विकास साधण्याचे कसबच त्यांना साधलेले नव्हते. पर्यटक येत होते, पर्यटनाचा आनंद त्यांच्या परीने लुटत होते; मात्र त्याचा फारसा फायदा स्थानिकांना होत नव्हता. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून पैसाही मिळवता येतो, याबाबत फारसा विचार झालेला नव्हता. त्यानंतर मात्र चित्र बदलले. केरळ पर्यटन विकास महामंडळाने विविध योजना राबविल्या आणि गेल्या पंचवीस वर्षांत त्यांनी केरळच्या पर्यटन उद्योगाचा चेहरामोहराच बदलून टाकला. "गॉडस् ओन कंट्री' ही कॅच लाईन घेऊन केरळने पर्यटनाचे सर्व आयाम बदलून टाकले. जगातले सर्वांत झपाट्याने पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होणारे राज्य असा मानही पटकाविला. ल भौगोलिक परिस्थितीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेताना हजारो वर्षांच्या परंपरांना ऊर्जितावस्था आणली आणि ती जागतिक स्तरावर नेऊन पोहोचविली.पर्यटनच्या अंगाने केरळाच विचार केला असता त्याची पाच भागात विभागणी होऊ शकते. स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे, येथील बॅकवॉटर, जंगले आणि थंड हवेची ठिकाणे आणि महत्त्वाचा वाटा उचलणारे येथील आयुर्वेदिक औषधोपचार. या सर्व घटकांचा पर्यटनासाठी केरळ सरकारने अत्यंत खुबीने उपयोग केला आहे. पर्यटकांच्या वाढत्या ओघाची आकडेवारी पाहिली की पर्यटन वाढीसाठी केरळने घेतलेली मेहनत जाणवतेच. 2006 मध्ये केरळला साडेआठ लाखांवर पर्यटकांनी भेट दिली होती. 2008 मध्ये हाच आकडा साडेनऊ लाखांवर गेला. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांत विदेशी पर्यटकांचे प्रमाणही 25 टक्क्यांवर गेले आहे. त्यातून मिळणारे परकीय चलनही त्याच पटीत वाढले आहे.1980 मध्ये केरळची अर्थव्यवस्था काहीशी नाजूक बनलेली होती. साक्षरतेचे प्रमाण मोठे असल्यामुळे येथे साक्षर जास्त; पण त्यांच्या हाताला काम नाही, असे चित्र होते. त्यामुळे येथे शिकलेल्यांनी आखाती देशांची वाट धरली होती. येथे शिकायचे, आखाती देशांमध्ये जायचे, तेथे पैसा कमवायचा आणि पुन्हा येऊन काहीबाही उद्योगधंदा करावयाचा असे चक्र सुरू होते. या जाण्या-येण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणावर प्रवासी कंपन्या सुरू झाल्या होत्या. त्यामुळे काही प्रमाणात पर्यटनाच्या जवळ जाणारा उद्योग मूळ धरू लागला. एकीकडे आखाती देशात जाण्यासाठी कंपन्या कार्यरत होत असतानाच, काही कंपन्यांनी राज्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी सुविधा देण्यास सुरवात केली. पर्यटनाच्या माध्यमातून पैसा करण्याचा आणखी एक मोठा स्त्रोत बेरोजगारांच्या हाताला उपलब्ध झाला आणि पाहता पाहता या व्यवसायाने जोम धरला. 2000 मध्ये केरळमध्ये पर्यटन व्यवसाय एकदम भरभराटीला आला. राज्याला डॉलरमध्ये कमाई होऊ लागली. अनेक बेरोजगार हातांना काम मिळाले. अनेक कलावंतांना न्याय मिळू लागला, अनेक कलाकारांच्या कलांचे चीज होऊ लागले. 2003 मध्ये जगातील सर्वांत वेगाने विकसित होणारे पर्यटन राज्य म्हणून केरळचा नावलौकिक झाला. सध्या येथे वाढीचा वेग 13.31 टक्के इतका झाला आहे.वैद्यकीय पर्यटनाची नवी दिशाऍलोपॅथी उपचारांच्या अतिरेकाला कंटाळून अनेकांनी आयुर्वेदाचा मार्ग धरला. केरळमध्येच वर्षानुवर्षे आयुर्वेदिक उपचार पद्धती सुरू असून नव्या जमान्यामध्ये त्यामध्ये बदल तसेच सुधारणा घडवून ती अधिक सक्षम बनविली आहे. याचा पर्यटनाच्या दृष्टीने खुबीने उपयोग करून घेताना केरळ सरकारने आयुर्वेदिक उपचार केंद्रांसाठी भरघोस सुविधा देऊन ती केंद्रे सुसज्ज बनविली. जुन्या उपचार पद्धतीमध्ये आमूलाग्र सुधारणा आणून त्याचे ब्रॅंडिंग केले. त्यांच्या मोठ्या प्रमाणात जाहिराती केल्या. मोठमोठी आयुर्वेदिक केंद्रे उभारण्यासाठी प्रोत्साहन, सोयी-सवलती दिल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर येथे पर्यटक उपचार करून घेण्यासाठी येतात.केरळ पर्यटन विकास महामंडळाने खास केरळी पद्धतीने आयुर्वेदिक उपचार करण्यासाठी रिसॉर्टची उभारणी केली आहे.एकूण काय तर नियोजनबद्ध विकासामुळे केरळातले पर्यटन बहरले आहे.---------------पर्यटनाची प्रमुख वैशिष्ट्येकेरळला लाभलेल्या अनेक देणग्यांपैकी 580 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा ही सर्वांत मोठी देणगी आहे. या समुद्रकिनाऱ्यावरच केरळच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा बऱ्यापैकी तोलला आहे. या किनाऱ्यांचा बहुतांश भाग वालुकामय आहे. येथील कोवालम् बीचला सर्वाधिक पर्यटक भेट देतात. याशिवाय अलप्पुझाचे बॅकवॉटर पर्यटकांना खुणावते.बॅकवॉटरच्या माध्यमातून केरळ सरकारला कोट्यवधी रुपये मिळतात. येथे 38 नद्या, सुमारे पंधराशे किलोमीटर लांबीचे कालवे, तसेच पाच मोठे तलाव जोडले गेलेले आहेत. येथे प्रामुख्याने बोटींमधूनच वाहतूक करण्यात येते. पूर्वी फक्त वाहतुकीसाठी असणाऱ्या या बोटींचा उपयोग व्यावसायिकदृष्ट्या होऊ लागला आणि अनेकांची आर्थिक गणिते सुटली. येथे असणाऱ्या विविध प्रकारच्या बोटींमधून पर्यटक केरळच्या अंतर्भागातील सौंदर्याचा आनंद यथेच्छ लुटतात. अलेप्पीला "पूर्वेकडील व्हेनिस' असेही म्हणतात. ऑगस्टमध्ये येथे ओनमनिमित्त होणाऱ्या नावांच्या शर्यती पाहण्यासाठी देशविदेशातून पर्यटक मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावतात.राज्यात थंड हवेची ठिकाणेही पर्यटकांना खेचून घेतात. पश्चिम घाटाच्या बहुतांश पर्वतरांगा जंगलांनी व्यापलेल्या आहेत; तर उर्वरित भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर चहा व कॉफीचे मळे आहेत. यापैकी काही मळे दोनशे वर्षांपूर्वीचे आहेत. जंगलाने व्याप्त या राज्यात हत्तींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. येथे अनेक खेड्यांमध्ये हत्तींचा रोजच्या कामामध्येही उपयोग करून घेतला जातो. हत्तींना खास प्रशक्षण देण्यासाठी पाथनमिथ्थीताजवळ कोन्नी प्रशक्षण केंद्रही आहे. हत्तींशिवाय येथील जंगलांतून वाघ, बिबटे, सिंह, उडणारी खार, अस्वले तसेच माकडांचे तसेच सापांच्या विविध जातीही आढळतात. त्यामुळे येथे आयुर्वेद उपचार केंद्रांना मोठे महत्त्व आहे.
Monday, March 16, 2009
कुछ कुछ होता है!
दुपारचं जेवण उरकलं आणि माझं रिमोट घेऊन चॅनेल सर्फिंग सुरू झालं. एका पाठोपाठ एक चॅनेल मागे पडत गेलं आणि एका ठिकाणी थबकलो. शाहरूख-काजोल-राणीचा "कुछ कुछ होता है' सुरू असल्याचं पाहिलं आणि हिला हाक दिली. कामाने वैतागलेली "ही' काहीशी चरफडतच बाहेर आली. काय आहे? (तमाम नवरा जमातीवर वैतागलेला प्रश्न)तिच्या प्रश्नाकडे (सवयीनं) दुर्लक्ष करीत, अगं "कुछ कुछ होता है' लागलाय आवरून ये. काय? म्हणताना तिचा मघाचा त्रासिक भाव कुठल्या कुठे पळाला आणि आलेच म्हणत ती किचनमध्ये शब्दशाः पळालीसुद्धा. पटणार नाही; पण पाचव्या मिनिटाला ती पदराला हात पुसत आली. अहो कुठपर्यंत आलाय सिनेमा? असा नेहमीचा टिपीकल प्रश्न फेकत उत्तराची वाट न पाहता तिने माझ्या शेजारी बैठक मारली.झालं सिनेमातील एक-एक प्रसंग सरकू लागले आणि शेजारी हिच्या डोळ्यांतून गंगा-जमुना वाहू लागल्या. हिचा मुसमुसणारा आवाज ऐकला आणि पडद्यावरचा सिनेमा बाजूलाच राहिला. माझ्या मनःचक्षूवर वेगळाच सिनेमा सुरू झाला. माझ्या मनानं गतकाळाच्या डोहात बुडी मारली. अगदी चित्रपटात असतो तस्साच फ्लॅशबॅक सुरू झाला.... दहा वर्षांपूर्वीची पुण्यातली ती दुपार अवतरली. निलायम चित्रपटगृहासमोरची गर्दी आणि तुफान गर्दीत सुरू असलेल्या "कुछ कुछ होता है' या चित्रपटाची तिकीटे मिळविण्यासाठीची माझी धडपड. हा चित्रपट पाहण्याचे प्लॅनींग हिच्यासोबत मी केलं तेव्हाच, तिकीटे मिळणार का? हा गुगली टाकून हिनं मला बोल्ड करायचा प्रयत्न केला होता. तेव्हा मी राणा भीमदेवी गर्जना केली होती," तिकीट ब्लॅकनं घेईन पण तुला शिनुमा दाखविन.' (तेव्हा आम्ही लग्नाआधीच्या प्रेमात आकंठ बुडालो होतो ना! त्यामुळे बहुधा असेल. आता नाही तर नाही...) गर्जनेप्रमाणे तिकीटे अक्षरशः ब्लॅकनेच घेऊन आम्ही चित्रपटगृहात प्रवेश केला. नेहमीप्रमाणे लेट लतीफ आम्ही इतरांचे पाय तुडवत कसे-बसे आमच्या सीटपर्यंत पोहोचलो. सिनेमा सुरू झाला असल्याने सुरवात *********!...ऍक्चुली मी सिनेमा "एंन्जॉय' करण्यासाठी गेलो होतो, झालं मात्र भलतंच. चित्रपटातील भावूक प्रसंग सुरू झाले आणि मला मुसमुसलेला आवाज ऐकू येऊ लागला. शेजारी पाहतोय तर तोंडाला रुमाल लावून माझी सखीच हुंदके देत होती; आता मात्र माझं चित्रपटातलं लक्ष उडालं आणि अधून मधून ही किती रडतेय हे पाहण्यातच माझा वेळ चालला. प्रत्येक प्रसंगानंतर हिचे हुंदके वाढतच, गेले. सिनेमा संपेपर्यंत हिच्याजवळील दोन रुमालांसह माझ्याकडील रुमाल अक्षरशः ओले चिंब. तिचं ते चित्रपटातील व्यक्तीरेखांशी एकरूप होऊन चित्रपट अनुभवण्याची, जगण्याची मला कमालच वाटली. सिनेमा पाहताना अनेक जण तो चित्रपट जगतात हे मी ऐकलं होतं. ते अगदी जवळून अनुभवलं. त्या क्षणी मी मात्र कोरडाच. तिच्या शेजारी बसून अख्खा सिनेमा पाहिला, हिचं मुसमुसणं अनुभवलं; पण माझी सखी ज्या भावनांत वाहिली "त्या' भावना मात्र माझ्यापर्यंत पोहचल्याच नाहीत. खरंतर त्यानंतर अनेकदा हा चित्रपट आमच्या दोघांमधील चेष्टेचाच विषय ठरला. (फ्लॅशबॅकमधून मी वर्तमानात)---आजही पुन्हा तोच अनुभव... सिनेमा संपेपर्यंत हिचं अखंड मुसमुसणं सुरूच. चित्रपट पाहून उठत-उठत ही म्हणाली, काजोल खरंच ग्रेट आहे नं ! माझ्या डोक्यात प्रश्न वळवळला...म्हणजे आज ही काजोलची भूमिका जगली ?खरंच असं काय आहे या सिनेमात? साधा, स्वच्छ प्रेमाचा त्रिकोण आणि शाहरूख-काजोल आणि राणी मुखर्जीच्या अप्रतिम अभिनयाची केमिस्ट्री. प्रचंड प्रेम असूनही न मिळणारा सखा (शाहरूख) आणि "त्याच्या' प्रेमात आपण अडसर ठरू नये म्हणून कसलीही खूण मागे न ठेवता निघून गेलेली आणि प्रेमाचा त्याग केलेली सखी (काजोल). निखळ मैत्रीच्या आतमध्ये असणारं एकमेकांवरील गाढ प्रेम, प्रेमातीत विश्वास आणि एकमेकांसोबतच आयुष्य जगणार असल्याची ग्रहीतकं. या ग्रहीतकांना बसलेला धक्का. त्यामुळे अक्षरशः कोलमडून गेलेली सखी. त्यातून तिचं "त्या' दोघांमधून निघून जाणं. सखीच्या सोडून जाण्याने प्रेम मिळूनही अस्वस्थ झालेला सखा. प्रत्यक्ष त्याची असणारी "ती' (राणी मुखर्जी). तिचं त्याच्या आयुष्यात अचानक येणं आणि तेवढ्याच अचानकपणे एक गोड छोकरी देऊन काळाच्या प्रवासाला निघून जाणं. कथेची गुंफण प्रेक्षकाला न गुंतवेल तर नवलच.... सिनेमा प्रेक्षकांच्या ह्रदयाला हात घालणाराच. निदान माझ्या सखीसारख्या असंख्य संवेदनशील, हळव्या मनांसाठी तरी नक्कीच.... एक कबुली देतो. खरं तर आज सिनेमा पाहताना माझ्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या. एखादा थेंबही बहुदा बाहेर ओघळला; पण माझी सखी तेव्हा का रडली होती? याचं उत्तर मात्र मला आज मिळालं. मी आज तो चित्रपट "अनुभवला' खरंच प्रेमाच्या त्या अवस्थांत "कुछ कुछ होता है.' हे मला पटलं. गम्मत अशी की जेव्हा चित्रपटाची "सिच्युएशन' मी प्रत्यक्ष जगत होतो तेव्हा मात्र मी चित्रटाशी समजरस झालोच नव्हतो...
Thursday, October 2, 2008
माणुसकीचाघालू जागर
माणुसकीचाघालू जागर
घटस्थापनेने विधिवत नवरात्र सुरू होईल आणि सारा भवताल भक्तीच्या जागराने भरून आणि भारून जाईल. पहाटेच्या काकडआरतीपासून रात्रीच्या शेजारतीपर्यंत मंदिरांना जाग राहील. घराघरांतील देवघरांत बसविलेले घट, अखंड तेवणारा नंदादीप, भक्तीभरल्या मनाला मिळणारी मिणमिणत्या प्रकाशाची आश्वासक ऊब आणि मुखी परमेश्वराचे नामस्मरण, असं वातावरण आपल्या सभोवताली राहील. सश्रद्ध मनांसाठी हा उत्सव प्रेरणा, आश्वासन आणि दिलासा घेऊन येणाराच असेल; मात्र आजूबाजूला पाहिल्यास सध्या सामाजिक भान हरवल्यासारखी स्थिती आहे. ऐहिक सुखापाठी लागलेला एक समाज आणि टीचभर पोटाचे खळगे भरण्यासाठी खुरटणारा समाज हा ठळक विरोधाभास संवेदनशील मनाला बोचणारा आहे. ही बोच जाणवू न घेता "मला काय त्याचे?' म्हणत कोषात जगणाराही एक समाज फोफावतोय हे खरे दुःख आहे.बुद्धीदेवता श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीत डोकी तापतात, त्याचे पर्यवसान छोट्या-मोठ्या मारामारीत होते. कुणाला याचं काही देणं-घेणं नसतं! रस्त्यावर एखादी मोटारसायकल घसरते, त्यावरील दोघे जखमी होऊन तळमळत उपचाराची वाट पाहत पडतात. येणारे-जाणारे नुसतेच बघे. जखमी तरुण तडफडत असतो. मग कुणीतरी "हृदय' असलेला माणूस मदतीचा हात देतो; पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. वीज वाहक तारेच्या स्पर्शाने एक माऊली जिवाला मुकते. कोणाच्या तरी बेफिकिरीची सजा कोणाला तरी मिळते. अशा कितीतरी घटना सभोवती घडत असतात आणि मला काय त्याचे? करत जगणारा समाज पुढचा दिवस गाठण्यातच मग्न असतो. या घटनांमुळे संवेदनशील मने मात्र हळहळतात. चुकचुकतात. मनातच आक्रंदत राहतात. काही तरी करायला हवं या जाणिवेने पेटून उठतात; पण त्यांच्या पेटण्याची धग चौकटीआडच बंदिस्त राहते. पुन्हा घटना घडते, पुन्हा तसंच होतं. दिवस कॅलेंडरवर उलटला जातो. आक्रंदणारी मनं म्हणतात हे बदलायला कोणीतरी मसिहा, देवदूत जन्मास यायला हवा! आणि मग बेटं मन वाटेकडे डोळे लावून बसतं.... ...आपण किती दिवस असं वाट पाहत राहायचं. ज्या समाजाचे आपण घटक आहोत, तो कुणामुळे तरी डागाळतो. तो तसा होऊ द्यायचा का? याचा विचार आपणच करायला हवा. आजपासून सुरू होणारं नवरात्र त्यासाठीचा अगदी उत्तम मुहूर्त आहे असे मानू! चौकटीआड बंदिस्त झालेली पेटून उठण्याची, काहीतरी उत्तम, समाजहित साधण्याची, अंधार दूर लोटण्याची धग खुशाल भडकू देऊ. आहे रे-नाही रेची दरी सांधणारा सेतू बनू! समाजाचा रंग एकच बनण्यासाठी आपले मूळचे रंग विसरून जाऊ. गावगप्पांतून इमले न बांधता प्रत्यक्ष कृती करू. नवरात्रात दररोज अंबेचा जागर होईल. आपणही मिळून सारे माणुसकीचा जागर घालू!
घटस्थापनेने विधिवत नवरात्र सुरू होईल आणि सारा भवताल भक्तीच्या जागराने भरून आणि भारून जाईल. पहाटेच्या काकडआरतीपासून रात्रीच्या शेजारतीपर्यंत मंदिरांना जाग राहील. घराघरांतील देवघरांत बसविलेले घट, अखंड तेवणारा नंदादीप, भक्तीभरल्या मनाला मिळणारी मिणमिणत्या प्रकाशाची आश्वासक ऊब आणि मुखी परमेश्वराचे नामस्मरण, असं वातावरण आपल्या सभोवताली राहील. सश्रद्ध मनांसाठी हा उत्सव प्रेरणा, आश्वासन आणि दिलासा घेऊन येणाराच असेल; मात्र आजूबाजूला पाहिल्यास सध्या सामाजिक भान हरवल्यासारखी स्थिती आहे. ऐहिक सुखापाठी लागलेला एक समाज आणि टीचभर पोटाचे खळगे भरण्यासाठी खुरटणारा समाज हा ठळक विरोधाभास संवेदनशील मनाला बोचणारा आहे. ही बोच जाणवू न घेता "मला काय त्याचे?' म्हणत कोषात जगणाराही एक समाज फोफावतोय हे खरे दुःख आहे.बुद्धीदेवता श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीत डोकी तापतात, त्याचे पर्यवसान छोट्या-मोठ्या मारामारीत होते. कुणाला याचं काही देणं-घेणं नसतं! रस्त्यावर एखादी मोटारसायकल घसरते, त्यावरील दोघे जखमी होऊन तळमळत उपचाराची वाट पाहत पडतात. येणारे-जाणारे नुसतेच बघे. जखमी तरुण तडफडत असतो. मग कुणीतरी "हृदय' असलेला माणूस मदतीचा हात देतो; पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. वीज वाहक तारेच्या स्पर्शाने एक माऊली जिवाला मुकते. कोणाच्या तरी बेफिकिरीची सजा कोणाला तरी मिळते. अशा कितीतरी घटना सभोवती घडत असतात आणि मला काय त्याचे? करत जगणारा समाज पुढचा दिवस गाठण्यातच मग्न असतो. या घटनांमुळे संवेदनशील मने मात्र हळहळतात. चुकचुकतात. मनातच आक्रंदत राहतात. काही तरी करायला हवं या जाणिवेने पेटून उठतात; पण त्यांच्या पेटण्याची धग चौकटीआडच बंदिस्त राहते. पुन्हा घटना घडते, पुन्हा तसंच होतं. दिवस कॅलेंडरवर उलटला जातो. आक्रंदणारी मनं म्हणतात हे बदलायला कोणीतरी मसिहा, देवदूत जन्मास यायला हवा! आणि मग बेटं मन वाटेकडे डोळे लावून बसतं.... ...आपण किती दिवस असं वाट पाहत राहायचं. ज्या समाजाचे आपण घटक आहोत, तो कुणामुळे तरी डागाळतो. तो तसा होऊ द्यायचा का? याचा विचार आपणच करायला हवा. आजपासून सुरू होणारं नवरात्र त्यासाठीचा अगदी उत्तम मुहूर्त आहे असे मानू! चौकटीआड बंदिस्त झालेली पेटून उठण्याची, काहीतरी उत्तम, समाजहित साधण्याची, अंधार दूर लोटण्याची धग खुशाल भडकू देऊ. आहे रे-नाही रेची दरी सांधणारा सेतू बनू! समाजाचा रंग एकच बनण्यासाठी आपले मूळचे रंग विसरून जाऊ. गावगप्पांतून इमले न बांधता प्रत्यक्ष कृती करू. नवरात्रात दररोज अंबेचा जागर होईल. आपणही मिळून सारे माणुसकीचा जागर घालू!
Subscribe to:
Posts (Atom)