Monday, March 16, 2009

कुछ कुछ होता है!

दुपारचं जेवण उरकलं आणि माझं रिमोट घेऊन चॅनेल सर्फिंग सुरू झालं. एका पाठोपाठ एक चॅनेल मागे पडत गेलं आणि एका ठिकाणी थबकलो. शाहरूख-काजोल-राणीचा "कुछ कुछ होता है' सुरू असल्याचं पाहिलं आणि हिला हाक दिली. कामाने वैतागलेली "ही' काहीशी चरफडतच बाहेर आली. काय आहे? (तमाम नवरा जमातीवर वैतागलेला प्रश्‍न)तिच्या प्रश्‍नाकडे (सवयीनं) दुर्लक्ष करीत, अगं "कुछ कुछ होता है' लागलाय आवरून ये. काय? म्हणताना तिचा मघाचा त्रासिक भाव कुठल्या कुठे पळाला आणि आलेच म्हणत ती किचनमध्ये शब्दशाः पळालीसुद्धा. पटणार नाही; पण पाचव्या मिनिटाला ती पदराला हात पुसत आली. अहो कुठपर्यंत आलाय सिनेमा? असा नेहमीचा टिपीकल प्रश्‍न फेकत उत्तराची वाट न पाहता तिने माझ्या शेजारी बैठक मारली.झालं सिनेमातील एक-एक प्रसंग सरकू लागले आणि शेजारी हिच्या डोळ्यांतून गंगा-जमुना वाहू लागल्या. हिचा मुसमुसणारा आवाज ऐकला आणि पडद्यावरचा सिनेमा बाजूलाच राहिला. माझ्या मनःचक्षूवर वेगळाच सिनेमा सुरू झाला. माझ्या मनानं गतकाळाच्या डोहात बुडी मारली. अगदी चित्रपटात असतो तस्साच फ्लॅशबॅक सुरू झाला.... दहा वर्षांपूर्वीची पुण्यातली ती दुपार अवतरली. निलायम चित्रपटगृहासमोरची गर्दी आणि तुफान गर्दीत सुरू असलेल्या "कुछ कुछ होता है' या चित्रपटाची तिकीटे मिळविण्यासाठीची माझी धडपड. हा चित्रपट पाहण्याचे प्लॅनींग हिच्यासोबत मी केलं तेव्हाच, तिकीटे मिळणार का? हा गुगली टाकून हिनं मला बोल्ड करायचा प्रयत्न केला होता. तेव्हा मी राणा भीमदेवी गर्जना केली होती," तिकीट ब्लॅकनं घेईन पण तुला शिनुमा दाखविन.' (तेव्हा आम्ही लग्नाआधीच्या प्रेमात आकंठ बुडालो होतो ना! त्यामुळे बहुधा असेल. आता नाही तर नाही...) गर्जनेप्रमाणे तिकीटे अक्षरशः ब्लॅकनेच घेऊन आम्ही चित्रपटगृहात प्रवेश केला. नेहमीप्रमाणे लेट लतीफ आम्ही इतरांचे पाय तुडवत कसे-बसे आमच्या सीटपर्यंत पोहोचलो. सिनेमा सुरू झाला असल्याने सुरवात *********!...ऍक्‍चुली मी सिनेमा "एंन्जॉय' करण्यासाठी गेलो होतो, झालं मात्र भलतंच. चित्रपटातील भावूक प्रसंग सुरू झाले आणि मला मुसमुसलेला आवाज ऐकू येऊ लागला. शेजारी पाहतोय तर तोंडाला रुमाल लावून माझी सखीच हुंदके देत होती; आता मात्र माझं चित्रपटातलं लक्ष उडालं आणि अधून मधून ही किती रडतेय हे पाहण्यातच माझा वेळ चालला. प्रत्येक प्रसंगानंतर हिचे हुंदके वाढतच, गेले. सिनेमा संपेपर्यंत हिच्याजवळील दोन रुमालांसह माझ्याकडील रुमाल अक्षरशः ओले चिंब. तिचं ते चित्रपटातील व्यक्तीरेखांशी एकरूप होऊन चित्रपट अनुभवण्याची, जगण्याची मला कमालच वाटली. सिनेमा पाहताना अनेक जण तो चित्रपट जगतात हे मी ऐकलं होतं. ते अगदी जवळून अनुभवलं. त्या क्षणी मी मात्र कोरडाच. तिच्या शेजारी बसून अख्खा सिनेमा पाहिला, हिचं मुसमुसणं अनुभवलं; पण माझी सखी ज्या भावनांत वाहिली "त्या' भावना मात्र माझ्यापर्यंत पोहचल्याच नाहीत. खरंतर त्यानंतर अनेकदा हा चित्रपट आमच्या दोघांमधील चेष्टेचाच विषय ठरला. (फ्लॅशबॅकमधून मी वर्तमानात)---आजही पुन्हा तोच अनुभव... सिनेमा संपेपर्यंत हिचं अखंड मुसमुसणं सुरूच. चित्रपट पाहून उठत-उठत ही म्हणाली, काजोल खरंच ग्रेट आहे नं ! माझ्या डोक्‍यात प्रश्‍न वळवळला...म्हणजे आज ही काजोलची भूमिका जगली ?खरंच असं काय आहे या सिनेमात? साधा, स्वच्छ प्रेमाचा त्रिकोण आणि शाहरूख-काजोल आणि राणी मुखर्जीच्या अप्रतिम अभिनयाची केमिस्ट्री. प्रचंड प्रेम असूनही न मिळणारा सखा (शाहरूख) आणि "त्याच्या' प्रेमात आपण अडसर ठरू नये म्हणून कसलीही खूण मागे न ठेवता निघून गेलेली आणि प्रेमाचा त्याग केलेली सखी (काजोल). निखळ मैत्रीच्या आतमध्ये असणारं एकमेकांवरील गाढ प्रेम, प्रेमातीत विश्‍वास आणि एकमेकांसोबतच आयुष्य जगणार असल्याची ग्रहीतकं. या ग्रहीतकांना बसलेला धक्का. त्यामुळे अक्षरशः कोलमडून गेलेली सखी. त्यातून तिचं "त्या' दोघांमधून निघून जाणं. सखीच्या सोडून जाण्याने प्रेम मिळूनही अस्वस्थ झालेला सखा. प्रत्यक्ष त्याची असणारी "ती' (राणी मुखर्जी). तिचं त्याच्या आयुष्यात अचानक येणं आणि तेवढ्याच अचानकपणे एक गोड छोकरी देऊन काळाच्या प्रवासाला निघून जाणं. कथेची गुंफण प्रेक्षकाला न गुंतवेल तर नवलच.... सिनेमा प्रेक्षकांच्या ह्रदयाला हात घालणाराच. निदान माझ्या सखीसारख्या असंख्य संवेदनशील, हळव्या मनांसाठी तरी नक्कीच.... एक कबुली देतो. खरं तर आज सिनेमा पाहताना माझ्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या. एखादा थेंबही बहुदा बाहेर ओघळला; पण माझी सखी तेव्हा का रडली होती? याचं उत्तर मात्र मला आज मिळालं. मी आज तो चित्रपट "अनुभवला' खरंच प्रेमाच्या त्या अवस्थांत "कुछ कुछ होता है.' हे मला पटलं. गम्मत अशी की जेव्हा चित्रपटाची "सिच्युएशन' मी प्रत्यक्ष जगत होतो तेव्हा मात्र मी चित्रटाशी समजरस झालोच नव्हतो...

2 comments:

भानस said...

chaan aahe. Cinema pahatana bayakana yenare radu ha cheshtecha vishay aahech khara. About me-taklela photo mhanje koni hatane kadhalele chitra aahe ka? Asel ter khoopach sunder aahe.

Sonal said...

काही वर्षांपूर्वी पूजा भटचा एक चित्रपट आलेला... डॅडी नावाचा.. तो बघताना मी ही रडलेली.. पूजाची वडीलांना माणसात आणण्याची धडपड आणि तिचा प्रत्येक हट्ट अवघड असूनही पुरवणारे तिचे वडील.. अनुपम खेर.. some scenes are touching...