Wednesday, October 28, 2009

जुबेर...

महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणात भाविकांची नेहमीप्रमाणे वर्दळ. कोणी देवीकडे काही मागायला आलेला, कोणी असाच, कोणी अभ्यासासाठी, कोणी कोणाला तरी भेटण्यासाठी, कोणी मनःशांतीसाठी, कोणी रोजच्या धबडग्यातून बदल म्हणून. मीही त्यापैकीच एक. त्या दिवशी आत दर्शनाला जाण्यापूर्वी बाहेर रेंगाळत होतो. एवढ्यात फुग्याच्या चर्र चर्र आवाजाच्या दिशेने छोटीने केलेली खूण आणि तिच्या इटुकल्या डोळ्यांतून होत असलेल्या मागणीकडे माझे लक्ष गेले आणि मी त्या दिशेने ओढला गेलो. समोरच्या छोकऱ्याने फुगा तिच्या समोर धरला आणि तिच्या चेहऱ्यावर आनंदाने फेर धरला. फुगा हाती येताच तिच्या मुठीमध्ये आनंद शिगोशिग भरला आणि डोळ्यांच्या विस्फारलेल्या बाहुल्यांत फुग्याचे रंग उमटू लागले. तिच्या चेहऱ्यावरील आनंदाचे क्षण मी टिपत असताना, पुन्हा एकदा फुग्यांवर हात घासून काढलेला चर्र..चर्र..आवाज माझ्या कानावर आला आणि मी त्या फुगेवाल्या छोकऱ्याकडे ओढला गेलो.
त्याच्यापासून काही अंतर ठेवून उभा राहिलो आणि त्याच्या नकळत त्याला वाचू लागलो. वय जेमतेम 13-14 वर्षांचे, चण छोटीशी, काहीसा गोरा, स्मार्ट, गालावर खळी असावी आणि डोळ्यांत छानशी चमक.
त्याने एक फुगा काढला. आस्ते.. आस्ते फुगविला. एकदा न्याहाळला. मनासारखा फुगल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर उमटले. सराईतपणे फुग्याला त्याने रबर लावला आणि सोडून दिला; मग आणखी एक... त्यानंतर एक... असे काही फुगे त्याने फुगविले.
फुगा फुगविताना त्याच्या गळ्याच्या ताणल्या जाणाऱ्या शिरा स्पष्ट दिसत होत्या आणि त्यामुळे त्याला होणाऱ्या वेदनाही जाणवत होत्या. मध्येच येणाऱ्या एखाद्या गिऱ्हाईकाला हवा तो फुगा तो देई आणि पुन्हा त्याचे पुढचे काम सुरू राही.
आता मात्र मला राहावले नाही. मी पुढे झालो आणि त्याच्या पाठीवर थाप टाकली. मघाशीच फुगा घेतलेला असल्याने तो ओळखीचं हसला.
काय रे रोज इथंच असतोस?
नाही, शुक्रवार, शनिवार आणि रविवारीच फक्त असतो.
विक्री किती होते?
होते दोनअडीचशे रुपयांची; पण छोटी-छोटी पोरं फुगं घेतात आणि आनंदानं जातात. मला पैसे मिळतात; पण त्या पोरांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून बरं वाटतं. मलापण आनंद होतो.
शाळेत जातोस की?
जातो तर! आठवीत आहे. आता सुटीमुळे रोजच इथं असतो.
फुगे फुगवायला पंप नाही तुझ्याकडे?
आहे; पण मनासारखे फुगे फुगत नाहीत.
त्रास होत नाही?
होतो की! जीव पार घाईला येतोय. सारखी तहान लागते.
मग काय करतोस?
काही नाही थुंकी गिळतो. हे त्याने अगदी सहज सांगितलं.
(बोलत बोलत त्याचा उद्योग सुरू होता)
घरी कोण कोण असतं? ते पण हाच धंदा करतात? माझा पुढचा प्रश्‍न.
घरी आई-बाबा आणि आजी आहे. बाबा इथंच असतो, चुलता, आज्जापण मंदिर आणि परिसरात फुगंच विकतात.
शाळेचं काय?
रोज जातो, संध्याकाळी शाळा सुटली की तासभर अभ्यास करतो आणि मग येतो फुगे विकायला.
कंटाळा येत नाही?
कंटाळा येऊन कसं चालंल? घरी मदत करायला नको का?
त्याच्या उत्तरानंतर माझे प्रश्‍नच संपले. एवढ्या लहान वयात एवढी जाण. कुठुन मिळत असेल सारं पेलण्याचं बळ!
"अहो चला!'ने भानावर आलो आणि जायला निघालो. न राहवून आणखी एक फुगा घेतला. छोटी डबल खूश. पैसे दिले आणि चालू लागलो.
काहीसं आठवलं म्हणून पुन्हा माघारी वळलो. त्या छोकऱ्याजवळ आलो आणि विचारले, नाव काय रे तुझे?
जुबेर... आणि तो छानसं हसला.
त्याचा हसरा चेहरा क्‍लिक झाला. एवढा कष्टावूनही तो आनंदी वाटला आणि मी छोटीच्या चेहऱ्यावरील आनंदात जुबेरचे समाधान कोठे सापडते का, हे शोधत बाहेर पडलो.

5 comments:

भानस said...

prajakta,खेळण्याशिकण्याच्या वयात किती समज.अन हे करावे लागते अशी मनातही तक्रार नाही.मन हेलावले.पोस्ट भावली.

Mahendra said...

स्वातंत्र्यानंतर आजही अशी परिस्थिती आहे भारतामधे.. :) खेळण्याचं वय ... आणि अशी कामं. मी एकदा एका गॅल्व्हनाइझिंगच्या कंपनित पण १२-१३ वर्षाची मुलं काम करतांना पाहिली होती. वाईट वाटतं , पण आपल्या हातात काहिच करण्यासारखं नसतं. त्यांना मदत म्हणुन कांही विकत घ्या, तर ते त्यांना म्हणजे अशा मुलांकडुन काम करुन घेणाऱ्यांना प्रोत्साहन होतं.. आणि नाही , तर त्या मुलाचा केविलवाणा चेहेरा बघवत नाही..

SUSHMEY said...

vedanevar achuk bot......nidan tari lagatay...baghu konala upacharhi mahit asatil.....bhannat....

prajkta said...

भानस, सुषमेय, महेंद्र मनापासून धन्यवाद

Sonal said...

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती!!!! हसत आणि मिळालेल्या आयुष्यावर कुरकुर न करता कसं जगावं हे यांच्याकडून शिकावं... जुबेरला त्याच्या वाटचालीसाठी अनेकोत्तम शुभेच्छा :-) कधी मधे जर तिथं जाण्याचा योग आला तर त्याला नक्की शोधेन.