Tuesday, February 2, 2010

पहिलं वहिलं


पहिल्यावहिल्या प्रत्येक गोष्टीचं अप्रुप सर्वांनाच असतं! पहिला पाऊस, पहिलं प्रेम, पहिली मैत्री (मैत्रीण), पहिलं ".....', पहिलं अपत्य, पहिलं आईपण, पहिलं बापपण इत्यादी इत्यादी. या साऱ्या पहिलेपणाच्या "कळा' (आनंद या अर्थाने) ज्यांनी अनुभवल्यात त्यांनाच त्याच्यातली मजा माहीत.
(वाचकांतील बहुतेकांनी या "कळा' नक्कीच अनुभवल्या आहेत, याबद्दल माझ्या मनात जरासुद्धा शंका नाही) तर असो...
नुकताच मी एक असाच "पहिलावहिला' अनुभव घेतला. नव्या घरात राहायला आल्यापासून खिशाचा सल्ला घेतच अनेक बाबी होत असल्याने अनेक बाबींवर मर्यादा आल्या. त्यातच माझ्यासारख्या उधळ्या माणसाला याची जरा जास्तच झळ बसली. (बहुतेक जण उधळेच असतात) आम्हीही आस्ते-आस्ते घराचा लूक सुंदर करण्यासाठी धडपडत होतो; पण काही मजा येत नव्हती आणि मार्गही सुचत नव्हता. याच दरम्यान आमच्या स्नेह्यांच्या घरी आमचं जाणं झालं. त्यांच्या गॅलरीत मस्त फुललेली फुलझाडे पाहिली आणि आम्हाला "आयडिया' मिळाली. दुसऱ्याच दिवशी तातडीने आमचा मोर्चा आम्ही कुंडीवाल्याकडे वळविला. मनासारख्या सात-आठ कुंड्या आणल्या.
आता चर्चेला मुद्दा घेतला रोपे कोणती आणायची. झालं, त्यावर चहा रिचवत जोरदार चर्चा झडली. अखेर नर्सरीत जाऊन तेथे पाहून रोपे घेण्यावर एकमत झाले; मग आमचा कुटुंबकबिला एका नर्सरीत पोहोचला. अनेक रोपांची निगराणी केल्यानंतर "होम मिनिस्टर'नी काही रोपांबद्दल होकाराची मोहर उमटवली. रोपे घरी आली.
आता आमच्या गाडीने नदीकाठ गाठला. तेथून खास नदीकाठची माती घरी आली. (झाडे कशी लावायची या पुस्तकात "नदीकाठची माती आणा', असेच लिहिले होते. आम्ही ती सूचना तंतोतंत पाळली. माती आणावयास गेल्याचा त्रास आम्हाला झाला; मात्र पुरेपूर आनंद बच्चेकंपनीने मनसोक्त मातीत खेळून लुटला)
दोन दिवसांत शेणखत, गांडूळखत, नारळाच्या शेंड्या असा जामानिमा झाल्यानंतर आणलेल्या रोपांचे शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत कुंड्यांत रोपण झाले आणि टेरेसवर हिरवाईचे पहिले पाऊल पडले. मग रोज रोपांना पाणी घालणं, ठराविक दिवसांनंतर त्यांच्या मुळातील माती ढिली करणं! खतांचा डोस देणं आणि रोज होणाऱ्या बदलांना अनुभवणं असा दिनक्रम आकार घेऊ लागलां. आस्ते-आस्ते रोपांची मुळे रुजली आणि आणलेल्या रोपांवरील पानांची हिरवाई आणि आमची मैत्री गडद होऊ लागली. शेवंती, जास्वंदीने आम्हाला पहिल्या पंधरा दिवसांतच फुलांचे समाधान दिले. (अर्थात जेव्हा रोपे आणली तेव्हाच त्यांच्यासोबत कळ्याही होत्या) आमचे लक्ष मात्र गुलाबाच्या रोपांकडेच लागलेले. त्याला केव्हा एकदा फूल लागते असेच आम्हाला झालेले. त्यामुळे रोज निरीक्षण सुरूच.
...पंधरा दिवसांपूर्वी एका गुलाबाच्या फांदीवर पानांच्या बेचक्‍यांत फुगीर भाग दिसला आणि गुलाबाला पहिली कळी आल्याची वार्ता आम्हाला मिळाली. मग काय! आम्ही आणखीनच ममत्वाने त्या रोपांकडे पाहू लागलो. आस्ते-आस्ते कळी बेचक्‍यातून बाहेर पडली, वाढू लागली. दोन दिवसांपूर्वी एकमेकांना कळीच्या घट्ट बिलगलेल्या गुलाबी पाकळ्या पाहिल्या आणि आम्ही तो आनंद तिच्याभोवतीच कॉफी पिऊन साजरा केला.
--------------
आज सकाळी-सकाळी आमच्या "होम मिनिस्टर'नी झोपेतून जागं केले आणि खिडकीतून बाहेर बोट दाखविलं. वाऱ्याच्या झुळकीवर तो "गुलाब' मस्त डोलत होता. त्याच्या पाकळ्यांवर अंग चोरून बसलेले तुषार चमचमत होते. व्वा काय सकाळ आहे! पहिला-वहिला गुलाब आमच्या अंगणात फुलला, त्याचं तातडीने फोटोसेशनही केलं आणि हा लाखमोलाचा आनंद दिवसभर आम्ही मिरविला.

5 comments:

भानस said...

prajkta, आपल्या स्वत:च्या हाताने लावलेल्या गुलाबाचे-जास्वंदीचे-कुठल्याही झाडाचे, पहिले फूल उमलले की असाच आनंद होतो.तुमच्या बागकामाला अनेक शुभेच्छा! वारंवार असा आनंद मिळो.:)

आमचा ब्रम्हराक्षस.... माझ्या बागेचे थोडे फोटो,:)
http://sardesaies.blogspot.com/2009/07/blog-post_16.html

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

पहिलेपणाची मजा काही न्यारीच! रोप अगदी शास्त्रोक्त पद्धतीने लावलेलं दिसतंय. छान! त्या कळीकडे नुसतं पाहूनही किती छान वाटतं. मनापासून शुभेच्छा! नवीन रोप असं फुलांनी बहरू दे.

prajkta said...

भानस, कांचन खूप-खूप धन्यवाद. हे फुला तुम्हालाच सस्नेह!

Gouri said...

आपण लावलेल्या झाडाचं पहिलं फूल म्हणजे एकदम स्पेशल असतं ... अशीच बहरू दे बाग!

prajkta said...

THANK U GOURI