Monday, August 2, 2010

मनातला विठ्ठल!

पहाटे आजी नेहमीप्रमाणे मंदिरात गेल्या, पूजा झाली, काकड आरती झाली. मनोभावे त्यांनी विठ्ठलमूर्तीला नमस्कार केला; मात्र आज पुन्हा त्यांना विठ्ठलाच्या चेहऱ्यावर नेहमीचे तेज दिसलेच नाही. त्या पुन्हा अस्वस्थ झाल्या. गेल्या काही दिवसांत त्यांना विठ्ठलाच्या चेहऱ्यावर तेजच दिसत नव्हतं आणि असं का व्हावं हा विचार त्यांचा पिच्छा सोडत नव्हता. या विचारांच्या तंद्रीतच त्या मंदिरातून बाहेर पडल्या. रेंगाळतच पायऱ्या उतरून चालू लागल्या. पावसाची रिपरिप सुरू झाल्याने चालण्याचा वेग त्यांनी जमेल तसा वाढविला. दोन-चार मिनिटे चालल्यानंतर त्या राहत असलेल्या इमारतीजवळ आल्या. पायऱ्या चढून घरात गेल्या. काहीसा दम लागल्याने दाराजवळच खुर्चीत बसल्या. वेग घेतलेला श्‍वास लयीत येत असताना पुन्हा विठ्ठलमूर्ती आठवू लागल्या.
...पहाट असूनही आज एकादशीमुळे मंदिरात गर्दी होतीच; भक्तांची ये जा सुरू होती; बाहेर भिकारीही नेहमीपेक्षा जास्त दिसत होते. एखादा दुसरा भक्त त्यांच्या हातात चिल्लर भिरकावून निघून जात होता एवढंच. आज आपण पूजेला नेहमीपेक्षा जास्त वेळ दिला. प्रार्थना, अभंगही व्यवस्थीत म्हटले. निदान आज तरी गेले काही दिवस मनात सुरू असलेली अस्वस्थता कमी होईल असं वाटलं होतं, पण छे! असं का व्हावं? याचा विचार करताना त्यांच्या सुरकुतल्या चेहऱ्यावरील चिंतेचं जाळं आणखी दाट होत गेलं. मग मनाशी काय वाटलं! आणि त्या खुर्चीतून उठल्या. स्वयंपाकघरात गेल्या. पातेलं ठेवून त्यात आदण ठेवलं, चहा-साखर घातली, गॅस बारीक केला आणि पिशवी घेऊन होता होईल तेवढ्या वेगाने जिना उतरून खाली आल्या. जवळच्या डेअरीमध्ये जाऊन दुधाच्या पिशव्या घेतल्या आणि पुन्हा घर गाठले. एव्हाना चहा चांगलाच उकळला होता. आणलेलं दूध त्यांनी त्यामध्ये ओतलं. पुन्हा एकदा चहा चांगला उकळून घेतला. हातावर थेंब टाकून चव पाहिली. "ठिक जमलाय' असं दर्शवणारी मान आपसूक हलली. चहा किटलीत ओतला आणि किटली पिशवीत ठेवून त्या पायऱ्या उतरल्या आणि झपझप पुन्हा मंदिर गाठलं!
आता पाऊस थांबला होता; पण गारठा जाणवत होताच. मंदिरातली लगबग सुरूच होती. त्या भिकाऱ्यांजवळ गेल्या आणि एकेकाला चहा देऊ लागल्या. वीस-पंचवीस भिकाऱ्यांना त्यांनी गरम-गरम चहा दिला. चहा वाटून झाल्यानंतर भिकाऱ्यांचे चेहरे पाहून त्यांच्या मनातला मघाचा विचारांचा कल्लोळ काहीसा कमी झाला. चेहऱ्यावरील चिंतेचं जाळं काहीसं सैलावलं. घरी जाण्यापूर्वी पुन्हा मंदिरात गेल्या. विठ्ठलाला हात जोडले आणि जायला निघाल्या. आता त्यांना विठ्ठलाच्या चेहऱ्यावर काहीसं स्मित दिसलं. त्यांना भास झाल्यासारखं वाटलं म्हणून त्यांनी निट निरखून पाहिलं, तर आज त्यांना खरंच विठ्ठलाचा चेहरा प्रसन्न दिसला. विठ्ठलाच्या चेहऱ्यावर त्यांना त्यांच्याच मनातले समाधान उमटून आलेलं दिसलं.

6 comments:

Vijay Deshmukh said...

vaahavaa .... mast ...

Yogesh said...

प्रा...मला वाटत देवाला अभिप्रेत असणारा भक्ती भाव तो हाच आहे.

"शोधिसी मानवा राउळी मंदिरी
नांदतो देव हा आपुल्या अंतरी"...

सुंदर लिहल आहेस.

Shardul said...

मस्त आहे !

भानस said...

Prajkta,
khoopach chaan. Aavadle.
(maza laptop gandlay tyamule nailajane ase lihitey... :( )

आजी, te sare भिकारी va विठ्ठल nidan tyaa divasapurate tari bharun pavle.

SUSHMEY said...

आयुष्याचे हे रंग असेच असतात, एकमेकांत अगदी मिसळून गेलेले.... ते मिसळलेले रंग कधी कधी वेगळे करावे लागतात. मग त्या प्रत्येक रंगाचा अर्थ लावावा लागतो... एकदा अर्थ लागला की मग मनाची अस्वस्थता कमी होते.... मग पुढच्या रंगाच्या दिशेने मन धाव घेतं.... सगळ्याच रंगाचे अर्थ लागतीलच असे नाही पण अर्थ समजावून घेण्याचा प्रवास थांबवून चालत नाही. किंबहूना तो थांबविताही येत नाही.. एक गडद रंग तुमच्या शेल्याला चिकटला हे मात्र निश्‍चित!

prajkta said...

विजय देशमुख, मनमौजी, शार्दुल, भानस, सुषमेय प्रतिक्रियेबद्दल खुप-खुप धन्यवाद. तुमच्या कौतुकामुळे खूप बरे वाटले.