सिग्नल लागला आणि त्यानं गाडी उभी केली. उन्हाच्या तडाख्याने तो जाम वैतागला होता. हातातलं काम उरकून केव्हा एकदा ऑफिसच्या एसीमध्ये शिरतोय असं त्याला झालेलं; पण अजून दोन तास तरी त्याला उन्हात फिरावेच लागणार होते. तो दीड मिनिटे संपण्याची वाट पाहू लागला. टळटळीत उन्हातला प्रत्येक सेकंद त्याला शिक्षा वाटत होती.
"सालं काय आपलं नशिब! दिवसभर वणवण फिरा, क्लायंटना कन्व्हीन्स करा. जास्तीत जास्त बिझनेस होण्यासाठी प्रयत्न करा. बॉसपुढं रेकॉर्ड चोख राहील म्हणून धडपडा. करीयर ग्राफ वाढता रहावा, जास्त पैसा मिळावा म्हणून धडपडा. घरतल्यांच्या आनंदासाठी उन्हा-तान्हात हिंडा. चेहरा काळवंडून जातो. संध्याकाळी जीव नकोसा होतो. तरी बरं पैसे बरे सुटतात, नाहीतर...'
खण-खण आवाजाने त्याची विचारांची तंद्री भंगली. त्यानं आवाजाच्या दिशेने नजर टाकली.
फाटके कपडे घातलेली दोन पोरं जीव खाऊन खाली पडलेल्या सिमेंटच्या पिलरवर हातोड्याने घाव घालत होती.
"काय पोरं आहेत! उन्हा-तान्हात कशाला खेळत असतील? असा प्रश्न त्याच्या डोक्यात वळवळला.
तेवढ्यात पाठीमागून कर्कश्श हॉर्न वाजला आणि त्याची विचारांची तंद्री भंगली. सिग्नल सुटला होता. त्यानं किक मारली आणि वाहनांच्या गर्दीतून वाहून जाऊ लागला.
----
तासाभराचे काम आटोपून तो पुन्हा मघाच्याच चौकात आला आणि पुन्हा सिग्नल लागला. आता तो स्वतःवरच वैतागला. दीड मिनिटे पुन्हा रणरणत्या उन्हाची शिक्षा. पुन्हा घाम, चिक-चिक. वैताग साला! एवढ्यात त्याच्या कानावर पुन्हा खण-खण आवाज आला. त्याचे लक्ष तिकडं गेलं. मघाची तीच पोरं जीव खाऊन त्याच पिलरवर हातोड्याने घाव घालत होती.
आता त्याचे कुतुहल जागे झाले. त्याने गाडी वळविली आणि तो त्या पोरांच्या बाजूला जाऊन उभा राहिला.
"काय करताय रे पोरानो?'
त्याच्या प्रश्नाने ती पोरं दचकली. त्यांचे हातोडे थांबले. चेहऱ्यावर अनामिक भीती तरळली.
"काही नाही...काही नाही! आम्ही आपलं हे...' असं म्हणून ती पोरं अडखळली.
"अरे घाबरू नका, उन्हा-तान्हात काय खेळताय हे बघायला मी आलोय बाकी काही नाही'
"हात तुझं! असं म्हणून त्यातल्या एकानं पुन्हा हातोडा सरसावला आणि खाणकन पिलरवर घाव घातला.'
दुसरा त्याच्या तोंडाकडं बघत म्हणाला, ""साहेब खेळत नाय काय, या पिलरमधनं लोखंडाचं तुकडं काडतुय.''
"लोखंडाचे तुकडे? आणि त्याचं काय करता?'
"ओ साहेब जाऊ द्या नां! ए वश्या आटप लवकर. उगच नको बोलत बसू. त्यांना न्हाई काम. तू मार फटके.'
दुसरा म्हणाला,"" साहेब जावा तुम्ही ह्यो शिवज्या न्हाई शाना, उगीच काय तरी बोलंल तुम्हाला जावा तुम्ही.'
""अरे पण तुम्ही उन्हा-तान्हात या पिलरमधून लोखंडाचे तुकडे का काढत बसलाय? आणि तुम्हाला शाळा नाही?''
""शाळा आणि आमी, काय साहेब चेष्टा करताय काय गरिबाची? आवं हिथ दोन येळचं जेवण मिळावं म्हनून आख्खा दिस उन्हा-तान्हात घालवावा लागतूय. आसं पडक्या ठिकाणचं सिमेंटची दगडं, पिलर हुडकायची, दिवसभर हाताला फोड येईस्तवर फोडून त्यातनं लोखंड काढायचं. राती भंगारचं दुकान बंद व्हायच्या आत तिथं जायाचं. फोडून काढलेलं लोखंडाचं तुकडं तिथं द्यायचं. त्याचं वजन करायचं. पाच-पंचवीस रुपये मिळतात. ते घ्यायचं आनी घर गाठायचं. साला तो भंगारवाला त्यात पण काटा मारतोय, पण करणार काय? गुमान दिल ते पैसे घ्यायचं. पैसं आसलं, तर आई घरात घेती, नायतर बोंब मारती. शिव्या घालती''
""का?'' आता त्याची छाती भरून आली. दाटलेल्या आवाजात न राहवून त्यानं मध्येच प्रश्न विचारला.
""सावत्र हाय न्हवं! बाचा पत्त्या नाय; पण घरात ठिऊन घेतीया हेच लय झालं. ती पण काय करणार म्हणा. ती चार घरची धुणी भांडी करती. आणखी दोन भनी हायेत. पाच जणांच्या पोटाची खळगी तिला भरायची हाईत. दोनी पोरींना उजवायचं हाय. मग आमी नाय पैसै मिळवायचं तर कुनी, तुमीच सांगा सायेब?''
त्याचं लक्ष दोघांच्या हाताकडं गेलं. हात पार सोलवटून निघालेले; पण डोळ्यात जगण्याची चमक आणि दोन पैसै मिळवायची धमक स्पष्ट.
""आपल्याला जरा ऊन लागलं तर मघाशी आपण स्वतःवरच चरफडलो आणि ही पोरं...
त्याचे डोळे भरले. त्यानं पाकिट काढलं हाताला लागतील तेवढे पैसै घेतले आणि त्या पोराच्या सोलवटलेल्या हातावर ठेवले. दोघांच्याही डोक्यावरून हात फिरवला आणि काहीही न बोलता गाडीला कीक मारली.''
""पोरांचे डोळे चमकले. ऊन थंड वाटू लागलं, हातात आणखी बळं आलं. त्यांनी आणखी जोमाने हातोड्याचे घाव घालायला सुरवात केली. आज पोटभर अन्न मिळणार याची त्यांना मनोमन खात्री पटली होती.''
9 comments:
वा... मस्तच. :-)
thank u sanket
touching event... ithe university signal la 10 15 pora, mhataare, sagale yetat... car madhe AC chalu asto aani Tanmay vicharto.. "Tyanna garam hot asen na... " amhi dogha hi niruttar hoto..
khare aahe. kahi prashnachi oottre deta yetch nahit.
thank u sonal
khupach chan asech lihat raha
thank u sudhir
आपल्याला नेहमी स्वत:च्याच पुरतं पाहण्याची सवय नकळत जडून जाते. जो काही त्रास तो फक्त मलाच... आजूबाजूला दृष्टी वळली की सत्य कळते.
पोस्ट भावली.
thank u भानस.
छान पोस्ट... या विषयावर आधीही अशा काही पोस्ट वाचण्यात आल्यात.
समाधानी राहा...
Post a Comment